घराघरात चहासोबत खाण्यात येणाऱ्या पदार्थाच्या जन्माची रंजक कथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
चहा सोबत बिस्किट्स हे भारतात जणू एक समीकरणच आहे. आपण भारतीय लोकांसाठी चहा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कोणतंही काम करत असतांना जर का थोडा ब्रेक हवा असेल आणि कोणीतरी गरमा गरम चहा आणि बिस्किट्स ट्रे मध्ये घेऊन आलं की अहाहा… आपला अर्धा थकवा तिथेच निघून गेलेला असतो.
सकाळची सुरुवात असो किंवा परीक्षेच्या दिवसात खूप अभ्यास केल्याने डोळ्यांना आलेला थकवा असो. चहा आणि बिस्किट्स हे आपल्याला रात्रभर जागून अभ्यास करण्यासाठी शक्ती देत असतात.
चहा मुळे झोप जाते आणि ग्लुकोज बिस्किट्स मुळे सारखी भूक लागत नाही. कोणाकडे भेटायला गेल्यावर फक्त चहा जर का समोर आला तर आपल्याला काहीतरी चुकल्या सारखं वाटत असतं.
अर्थात, आपण तसं प्रत्येक वेळी बोलून दाखवत नाहीत. पण, आपल्या ते लक्षात नक्की येतं.
असंच एक अजून समीकरण भारतीय लोकांच्या मनात आहे. ते समीकरण म्हणजे बिस्किट्स म्हणजे ‘पारले G’. आजच्या पिढीत खूप पर्याय उपलब्ध असल्याने कदाचित हे कमी प्रमाणात आढळेल.
पण, एक मोठा काळ भारताने अनुभवला आहे जेव्हा कित्येक भारतीयांना टूथपेस्ट म्हणजे कोलगेट आणि बिस्किट्स म्हणजे पारले G हेच लोकांच्या मनावर कोरलेलं होतं.
याचं श्रेय हे त्या कंपनीच्या मार्केटिंग टीम ला नक्कीच द्यायला हवं.
यापैकी कोलगेट हा अमेरिकन ब्रँड आहे, तर पारले G आपला भारतीय ब्रँड आहे जो की एका घरातून सुरू होऊन आज जगभरात सर्वाधिक विकणारा बिस्किट्स झाला आहे. पारले G ने हे कसं साध्य केलं असेल? जाणून घेऊयात.
१९२९ मध्ये मुंबई चे सिल्क व्यापारी मोहनलाल दयाल चौहान यांनी एक जुन्या फॅक्टरी ची जागा विकत घेतली. खाद्यपदार्थ तयार करून विकण्याचा त्यांचा मानस होता.
मोहनलाल जी हे तत्कालीन स्वदेशी चळवळ ने प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व होते. उकलेल्या साखरेने तयार केल्या जाणाऱ्या कँडी तयार करण्याचं त्यांनी सुरुवातीला ठरवलं होतं.
ही प्रक्रिया शिकण्यासाठी ध्येयाने झपाटलेले मोहनलाल चौहान हे जर्मनी ला गेले. तिथे त्यांनी ‘confectionary making’ ही पद्धत शिकली आणि ते परत आले ते जर्मनीत वापरल्या जाणाऱ्या हायटेक मशीन्स ची ऑर्डर देऊनच.
चौहान सरांची फॅक्टरी ही मुंबईतील इरला आणि पारला या दोन गावांच्या मध्यभागी होती. १२ लोकांच्या साथीने तेव्हा ही फॅक्टरी सुरू करण्यात आली होती.
घरातील लोकांनी आणि मित्रांनी सुरू केलेल्या या कंपनीतील काही लोक इंजिनियर होते, तर काही मॅनेजर होते आणि कन्फेक्शनरी मेकिंग म्हणजेच प्रोडक्शनचं काम बघत होते.
पहिलं प्रॉडक्ट जे पारले कंपनीचं बाजारात आलं ते एक ऑरेंज कॅंडी होतं. पारले G बिस्कीट तयार होण्यासाठी या टीम ला तब्बल दहा वर्ष थांबावं लागलं होतं.
१९३९ साली या फॅक्टरी मध्ये पहिल्यांदा बिस्कीटची निर्मिती झाली. ऑरेंज कॅंडी नंतर या फॅक्टरी मध्ये बऱ्याच टॉफीज तयार होऊ लागल्या.
कंपनी च्या नावाबद्दल एक गंमत अशी झाली होती की, कित्येक वर्ष ही फॅक्टरी कोणत्याही नावाशिवाय काम करत होती. पहिलं प्रॉडक्ट बाजारात आणताना या फॅक्टरी ला ‘पारले’ असं नाव देण्यात आलं.
स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ होता. त्यावेळी बिस्कीट हे फक्त एका विशिष्ठ ‘क्लास’ च्या लोकांचा पदार्थ होता. इंपोर्टेड बिस्किट्स फक्त खायचे असा त्यांचा एक नियम होता.
या ट्रेंड ला तडा देण्यासाठी पारले कंपनी समोर आली आणि त्यांनी ‘पारले ग्लुको’ नावाचं एक बिस्कीट तयार करायचं ठरवलं. ग्लुकोजचं भरपूर प्रमाण पण किंमत मात्र कमी या धोरणाने त्यांनी हे उत्पादन बाजारात आणलं.
हे असं बिस्कीट होतं जे की भारतातील प्रत्येक वर्गातील व्यक्ती विकत घेऊ शकत होते.
‘आपल्या बजेट मध्ये बसणारं बिस्कीट’ अशी या बिस्कीटची ओळख मध्यमवर्गात झाली आणि आपणही आता बिस्कीट चा आस्वाद घेऊ शकतो हा विश्वास पारले G या बिस्कीट ने लोकांना दिला.
कमी वेळात भारतात लोकप्रिय झालेलं हे बिस्कीट दुसऱ्या महायुद्धात भाग घेणाऱ्या ब्रिटिश-इंडियन आर्मीचं प्रवासात खाण्याचं खाद्य झालं. धडाक्यात सुरू झालेल्या या प्रवासाला १९४७ मध्ये एक ब्रेक लागला होता.
हे ते वर्ष होतं जेव्हा गव्हाचा तुटवडा निर्माण झाला होता. फाळणी झाल्याने भारतात गहू उत्पादन करणारा भाग कमी झाला होता आणि त्यामुळे पारले ला काही काळासाठी बिस्कीटचं उत्पादन बंद करावं लागलं होतं.
त्यावेळी पारले कंपनी ने लोकांना ‘बारले’ या कंपनी ची बिस्किट्स विकत घेण्याचं आवाहन केलं.
मध्यंतरीच्या काळात, ब्रिटानिया कंपनी ने ‘ग्लुकोज डी’ या नावाने बिस्कीट बाजारात आणलं. पारलेचे उत्पादन कमी झाल्याचा फायदा घेण्यासाठी बऱ्याच कंपन्यांनी ग्लुकोज बिस्किट्स बनवण्याचं काम सुरू केलं.
वाढत्या स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी १९६० मध्ये पारले कंपनी ने आपलं पूर्ण रूप पालटलं. पॅकेजिंग ची पद्धत बदलण्यात आली. आज ज्या स्वरूपात आपल्याला पारले G हे बिस्कीट मिळतं हे त्याचं १९६० मध्ये बदललेलं स्वरूप आहे.
पांढऱ्या आणि पिवळ्या रंगात तयार केलेलं पॅकेट आणि त्यावर लाल रंगातील बिस्कीट चं नाव हे इतर कंपन्यांपेक्षा खूप वेगळं होतं.
‘ग्लुकोज बिस्कीट’ हे नाव कॉमन होत असल्याने पारले कंपनी ने ग्लुकोज या शब्दाला केवळ G ने बदललं आणि ‘पारले G’ हे नाव सर्वांच्या आवडत्या बिस्कीट ला मिळालं.
पारले G च्या पॅकेटचं वैशिष्ट्य हे त्यावर असलेल्या लहान मुलीच्या ‘मॅस्कट’ मुळे सुद्धा लोकांना खूप प्रकर्षाने जाणवलं. पारले गर्ल ही प्रत्येकाला खूप आवडली आणि लक्षात राहिली.
काही लोकांना ही लहान मुलगी म्हणजे नागपूरच्या नीरजा देशपांडे आहेत असं वाटलं होतं, तर काहींना ही मुलगी म्हणजे सुधा मूर्ती वाटल्या होत्या.
पारले कंपनीचे प्रॉडक्ट हेड श्री. मयंक शाह यांनी लोकांसमोर येऊन या सर्व अफवांना पूर्णविराम लावला आणि हे जाहीर केलं की –
“पारले च्या पॅकेट वर दिसणारी ही लहान मुलगी म्हणजे एक काल्पनिक पात्र आहे. एव्हरेस्ट क्रिएटिव्ह कंपनी चे संचालक मगनलाल दहीया यांनी या ‘पारले गर्ल’ चं मॅस्कट डिझाईन केलं आहे.” पारले गर्ल ही १९६० पासून कंपनी च्या प्रत्येक जाहिरातीचा भाग आहे.
नाविन्यपूर्ण जाहिरात आणि “स्वाद भरे, शक्ती भरे पारले G” या टॅगलाईन मुळे पारले G ने लोकांच्या मनात एक जागा निर्माण केली होती.
१९९८ मध्ये पारलेने त्यावेळी प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘शक्तिमान’ ब्रँडला प्रमोट करण्यासाठी साईन केलं आणि तेव्हापासून पारले G हे लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं.
त्यानंतर आलेल्या “G माने Genius” आणि “हिंदुस्तान की ताकत” सारख्या टॅगलाईन ने ही यशस्वी घोडदौड सुरू ठेवण्यास मदत केली.
आज पारले ही जगातील सर्वात जास्त बिस्किट्स विकणारी कंपनी आहे. कमीत कमी म्हणजे २ रुपयांत विकले जाणारे पारले हे एक ट्रेंड सेट करणारं बिस्कीट ठरलं.
भारतात सध्या पारले बिस्किट्स हे १३० फॅक्टरी मध्ये तयार केलं जातं. भारतात कुठेही पारले G बिस्कीट खरेदी करा ते ‘एकाच’ किमतीत मिळेल हे पारलेने करून दाखवलं जे की त्या काळात वाहतुकीच्या मर्यादित सोयीमुळे कठीण काम होतं.
४ रुपयात येणारा त्यांचं पॅकेट हा कित्येक वर्ष त्याच किमतीत विकलं जायचं.
आज पारले कंपनीची कित्येक प्रकारची बिस्किट्स बाजारात उपलब्ध आहेत. पण, पारले G म्हंटलं की एक विशिष्ट चव आपल्या सर्वांना नक्की आठवते. प्रत्येक भारतीयाने पारले G बिस्कीट एकदा तरी खाल्लं असावं असा एक अंदाज सुद्धा वर्तवला जातो.
आज पारले ग्रुप ने त्यांच्या स्पर्धकांना खूप मोठ्या फरकाने हरवलं आहे. ६० वर्षानंतर आजही पारले G ही तीच चव आणि तीच किंमत ठेवणारी एकमेव कंपनी आहे असं नक्कीच म्हणता येईल.
२७००० करोड रुपयांची उलाढाल करणारा पारले ब्रँड हा आजही त्याच्या kismi toffee साठी सुद्धा तितकाच आठवला जातो. केवळ ७५००० रुपयांत विकत घेतलेल्या फॅक्टरीतून आज एक विश्व तयार झालं आहे.
प्रत्येक वस्तू तयार करणाऱ्या बऱ्याच कंपनी आपण बाजारात बघत असतो. पण, पारले G सारखे काही ब्रॅंड असतात जे त्यांच्या व्यवसायातून त्या इंडस्ट्रीला आणि देशाला जगात एक मान मिळवून देत असतात.
भारताच्या आत्मनिर्भर प्रवासात मैलाचा दगड ठरलेल्या पारले ग्रुपला त्यांच्या सातत्यपूर्ण कर्तृत्वासाठी सलाम!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.