Site icon InMarathi

लक्ष्मी ते राम सेतू : “बिझनेसमन” अक्षय कुमारची तुम्हाला माहीत नसलेली बाजू!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार त्याच्या एका चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करतो.

त्या सिनेमाचं नाव असतं राम सेतु, पोस्टर बघून सिनेमा ओह माय गॉड च्या पठडीतला वाटतो, पोस्टरवर प्रभू श्रीराम यांचा एक फोटो सुद्धा असतो.

बरं हे सगळं कशासाठी चाललंय याचा आपण अंदाज लावायचा प्रयत्न केला तर एक गोष्ट समोर येते की नुकताच अक्षयचा रिलीज झालेल्या लक्ष्मी या सिनेमाला लोकांनी साफ नाकारला.

त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी सारख्या टुकार सिनेमाची भरपाई म्हणून हा भाऊ डायरेक्ट प्रभू श्रीराम यांच्या महिमेचा वापर करतोय!

 

 

बरं जेंव्हा अयोध्येत भव्य राम मंदिराचं भूमिपूजन झालं तेंव्हा याने हे पोस्टर आणि सिनेमाचं नाव का आनऊन्स केलं नाही? हा तर पंतप्रधानांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना आंबा आवडतो का नाही विचारणारा “सेक्युलर” अॅक्टर!

का त्या दिवशी हिंदुस्थानातल्या एका मोठ्या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ या “देशभक्ताला” एक साधं ट्विट सुद्धा करावंसं वाटलं नाही?

काही झालं की लगेच “डायरेक्ट दिल से” येऊन सतत ज्ञान पाजळणारा हा इसम त्या दिवशी कुठे गायब झाला होता? आणि आजच ह्याला प्रभू श्रीरामाची आठवण का बरं झाली असावी?

या सगळ्या गोष्टींचा जरा नीट विचार केला तर एक गोष्ट ध्यानात येईल की अक्षय कुमार हा चांगला अॅक्टर आहेच पण याबरोबरच तो एक लाज कोळून प्यायलेला कट्टर बिझनेसमनसुद्धा आहे!

आज जेंव्हा लक्ष्मी सारख्या सिनेमावर लोकांनी इतके ताशेरे ओढले तेंव्हा या सगळ्या गोष्टी साइडट्रॅक करून ह्याला रामाच्या नावावर स्वतःच्या करियरची पोळी भाजून घ्यायची आहे.

नो डाऊट हा एक शो-बिझनेस आहे त्यामुळे यात काम करताना इतकं निगरगट्ट असावंच लागतं, पण जनाची नाही तर निदान मनाची तरी बाळगावी ही म्हण अक्षय कुमार बाबत अगदी तंतोतंत लागू होते!

 

 

अक्षय कुमारचा करियर ग्राफ जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की २०१३ नंतर अक्षय कुमार हा भारत कुमार यांच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागला.

सुरुवातीला नीरज पांडे सोबत त्याने केलेले बेबी किंवा स्पेशल २६ हे २ सिनेमे सोडले तर बाकी सगळ्या सिनेमातून अक्षय ने “मीच एकमेव देशभक्त” अशी इमेज क्रिएट करायला सुरुवात केली.

हॉलिडे, एयरलिफ्ट, गब्बर, रुस्तम, टॉयलेट एक प्रेम कथा, पॅडमॅन, गोल्ड, केसरी, मिशन मंगल अशा सिनेमातून त्याने स्वतःची देशभक्त इमेज तयार केली आणि लोकांना देशभक्ती अक्षरशः विकली.

या सिनेमांच्या मध्ये काही टुकार कॉमेडी सिनेमे सुद्धा त्याने केले ते फक्त लोकांना मूर्ख बनवण्यासाठी.

खऱ्या अर्थाने अक्षय कुमार हा स्वतःचा करियर ग्राफ आणि मार्ग बिल्ड करत होता. मुळात मला प्रॉब्लेम अक्षय कुमारचाही नाहीये ना त्याच्या सो कोल्ड देशभक्त इमेजचा. मला प्रॉब्लेम आहे त्याच्या सोयीस्कररित्या स्टँड घेण्याच्या स्वभावाचा!

आज तुम्ही इतके मोठे आहात, पब्लिक फिगर आहात, तुमच्या एका स्टेटमेंटने कित्येक लोकं प्रेरित होतात आणि जेंव्हा तुम्ही हा सो कॉल्ड न्यूट्रल स्टँड घ्यायला लागता तेंव्हा मग ते पटत नाही.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कित्येक महीने गप्प बसलेला अक्षय कुमार लक्ष्मी बॉम्बच्या रिलीजच्या आधीच का लोकांसमोर आला आणि बॉलीवूड मध्ये चांगली लोकं सुद्धा आहेत असं सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्याने का बरं केला?

 

 

मोदी आणि बीजेपीच्या प्रवक्त्याप्रमाणे आव आणून गावोगावी टॉयलेट बांधायचं आवाहन करणाऱ्या अक्षय कुमार ने राम जन्मभूमी सोहळ्याच्या दिवशी का बरं एकही ट्विट केलं नाही?

जेंव्हा CAA च्या विरोधात संबंध देशात अराजकता पसरली होती तेंव्हा कुठे गायब होता हा देशभक्त?

असे कित्येक सवाल आपल्या मनात येतात पण हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा समोरच्या सेलिब्रिटी कडे तुम्ही एक माणूस म्हणून बघता. वर नमूद केलेल्या आणि अशा कित्येक मुद्यांच्या बाबतीत अक्षय कुमारने काहीच का स्टँड घेतला नाही?

कारण त्याला या इंडस्ट्री मध्ये राहायचं आहे. कुणी कितीही आव आणून सांगितलं तरी संपूर्ण कला क्षेत्रावर डाव्या विचारसरणीच्या लोकांचं वर्चस्व आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

अशा या वातावरणात अक्षय कुमार ने राम मंदिर बनत असल्याच्या शुभेच्छा दिल्या असत्या तर बॉलीवूड मधल्या त्याच्या अस्तित्वावर नक्कीच प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं!

 

 

पण मुळात ही भीती अक्षय कुमार सारख्या स्टार कडून अपेक्षित नाही कारण त्याने एक खूप मोठा काळ या इंडस्ट्री मध्ये काम करून स्वतःचं असं स्थान निर्माण केलेलं आहे.

त्यामुळे त्याने घेतलेल्या एखाद्या स्टँड मुळे त्याला जर इतकी भीती वाटत असेल तर मग इतरांच विचारायलाच नको!

प्रश्न अक्षय कुमारच्या देशभक्तीचा किंवा त्याने एका अजेंडयाच्या अंतर्गत केलेल्या सिनेमांचा नाहीये. प्रश्न आहे अक्षय कुमारच्या दर वेळेस पोलिटिकली करेक्ट वागण्याच्या अट्टहासाचा.

दर वेळेस स्वतःची कातडी वाचवण्यासाठी असा स्टँड घेणं हे एका भित्रट आणि भेकड माणसाचं लक्षण आहे. यापेक्षा ती लोकं परवडली ज्यांनी CAA वादाच्या च्या वेळेस बरीच भडकाऊ वक्तव्य केली.

फरहान अख्तर, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप आदि मंडळी काहीतरी एक स्टँड घेऊन आपल्यापुढे येतात. पण हे अक्षय कुमारचं दोन्ही दगडांवर पाय ठेवून वावरण्याचा आता तिटकारा यायला लागला आहे.

 

 

म्हणजे गरज पडेल तेंव्हा तुम्ही तुमची आयडियोलॉजी बदलणार, गरज आहे तेंव्हाच तुम्ही बोलणार आणि इतर वेळेस गप्प बसणार.

हे असं आता नाही चालणार कारण लॉकडाउन आणि सुशांत सिंग प्रकरण यामुळे लोकांचे तर डोळे उघडले आहेतच आणि मला तर बॉलीवूडविषयी एक वेगळीच अढी मनात निर्माण झाली आहे.

अक्षय कुमार हा एक कलाकार म्हणून उत्तम आहेच कित्येक सिनेमातून त्याने आपलं मनोरंजन केलेलं आहे, पण जेंव्हा इतकी मोठी व्यक्ति केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रभू श्रीराम यांचा वापर करते तेंव्हा मात्र डोक्यात तिडिक जाते.

अक्षय कुमारचा हा वर्क प्लान आता हळू हळू लोकांच्या समोर यायला लागलाय. आणि या सगळ्यात तग धरून उभं राहण्यासाठी “रामसेतु” सिनेमाच्या पोस्टर लॉन्चचा केविलवाणा प्रयत्न पाहून अक्षय कुमारच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते.

खिलाडी कुमारच्या या आगामी सिनेमाशी आणखीन एक मोठं आणि प्रतिष्ठित नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी. ज्यांनी चाणक्य सारखी दर्जेदार सिरिज आपल्याला दिली.

 

 

या सगळ्या विषयावरचा त्यांचा अभ्यास दांडगा आहेच यात काहीच वाद नाही, त्यामुळे या सिनेमात सुद्धा वावगं काही बघायला मिळणार नाही अशी अपेक्षा करूया. 

पण या सगळ्या गोष्टींचा अक्षय कुमार ज्या पद्धतीने वापर करतोय ते कुठेतरी खटकतय!

या एका पोस्टरमुळे अक्षय फक्त एक अॅक्टर नसून एक निर्लज्ज बिझनेसमन सुद्धा आहे यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे!

आता काही लोकं म्हणतीलच त्याने आपल्या देशाला, सैन्याला इतकी इतकी मदत केली आहे, सर्वात जास्त टॅक्स भरणारा तो एकमेव अभिनेता आहे, इतके ngo तो चालवतो, स्त्रियांसाठी उभा राहतो वगैरे वगैरे.

अशा लोकांना मी एकच सांगेन की डोळे उघडा आणि ह्या अशा आपमतलबी अॅक्टरच्या PR स्ट्रॅटेजीकडे नीट लक्ष द्या, तुम्हाला तुमचंच समजून येईल की आपण किती सहज मूर्ख बनतो ते!

 

 

खान, कपूर, खन्ना किंवा आणखीन कुणी असो सगळे एकाच माळेतले मणी आहेत, सगळेच कोडगे बिझनेसमन आहेत, त्यामुळे यांच्याकडून जेवढ्या चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या असतात त्याच घ्याव्या.

राहता राहिला प्रश्न डोनेशन, चॅरिटी किंवा टॅक्सचा, ते तर ह्या देशातला प्रत्येक सामान्य माणूस भरतोय त्यामुळे ह्या गोष्टी करून हे सेलिब्रिटीज देशावर उपकार करतायत या भ्रमात राहू नका.

शेवटी इतकंच सांगेन की कोणताही माणूस सर्वगुणसंपन्न नसतो. प्रत्येकात चांगले आणि वाईट गुण असतात, पण जे चांगलं आहे त्याची प्रशंसा जो करतो आणि वाईट गोष्टी स्पष्टपणे लोकांसमोर मांडतो तो खरा प्रेक्षक.

त्यामुळे आपण सगळ्या प्रेक्षकांनी हे समजून घेणं आणि ते त्वरित आमलात आणणं अत्यंत आवश्यक आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version