आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपण हॉटेलात किंवा रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जेवायला जातो, तेव्हा तेथून निघताना वेटरला काही रक्कम ‘टीप’ म्हणून देतो हे अनेकांना माहित असेलच, अनेकांनी पाहिले असेल आणि बहुतांश जण अशी टीप देतातही.
आपण जी ‘टीप’ देतो तेच केवळ त्या वेटर्सचं मानधन नसतं, तर त्याला मालकाकडूनही ठराविक रक्कम पगाराच्या स्वरूपात मिळत असते. मग ही वेगळी टीप त्याला देण्याची प्रथा का पडली असेल आणि कधी पडली असेल, केलाय कधी विचार? नाही… तर मग हा लेख जरुर वाचा. या टीपची थोडी वेगळी, सुरस आणि रंजक गोष्ट खास तुमच्यासाठी!
‘टिपींग’ ही अमेरिकन संस्कृती
टीप देणे हा अमेरिकन संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी मुलभूत भाग आहे असंही म्हणता येईल. तिकडे केवळ हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्येच टीप दिली जाते असे नाही तर, वस्तू आणि सेवा घरपोच डिलिव्हरी करणारे, सलून्समधले कारागिर आदींना देखील टीप देण्याची पद्धत आहे. मात्र या प्रथेची उत्पत्ती जवळपास मध्य युगात सुरू झाल्याचे काही पुरावे सापडतात.
मध्ययुगात मालकांनी त्यांच्या नोकरांना चांगले काम केल्याबद्दल किंवा अपेक्षेपेक्षा खुपच चांगल्या दर्जाची सेवा दिल्याबद्दल काही जादा पैसे देऊन नोकरांबद्दल सद्भावना व्यक्त केल्याचे काही लिखित पुरावे उपलब्ध आहेत.
पंधराव्या व सोळाव्या शतकात पाश्चिमात्य देशात विशेषतः इंग्रजी संस्कृतीतील राजे-महाराजे, बडे संस्थानिक आदींनी त्यांच्या नोकरदार मंडळींना प्रति दिवस ठरलेल्या रकमेपेक्षा थोडे जास्तीचे पैसे आभार म्हणून द्यावेत अशी प्रथा होती. तोच पायंडा पुढेही सुरू राहिला आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावल्याचे आज आपल्याला पहायला मिळते.
टिपींग आणि द ग्रेट ब्रिटनमधील काही नाट्यमय घडामोडी
–
हे ही वाचा – तब्बल १०,००० खोल्या असलेल्या या हॉटेलला ७२ वर्षांपासून आहे ग्राहकांची प्रतिक्षा!
–
अमेरिकन हिस्ट्री ऑफ सोशल ग्रॅच्युइटीज या टीप विषयाशी संबंधीत पुस्तकाचे लेखक केरी सेग्राव म्हणतात, टीपची प्रथा लवकरच सर्व ब्रिटीश आस्थापनांमध्ये पसरली.
१७६० सालापर्यंत विविध क्षेत्रांत काम करणारे नोकरदार, आचारी, घरातील नोकर, पर्सनल असिस्टंट, सलून, दुकाने, आस्थापने आदी सर्वच ठिकाणी नोकरांना टीप देणे यावर लोकांचा बराच पैसा खर्च झाला होता.
दुसरीकडे या टीपची सवय लागल्याने काही ठिकाणी नोकरमंडळी हक्काने टीप मागू लागली, याचा प्रतिष्ठित मंडळींना आणि यजमानांना त्रास होऊ लागला. पुढे तर त्याविषयी उघडपणे तक्रारी येऊ लागल्याने टीप या विषयावरुन ब्रिटनमध्ये एक छोटीशी दंगलसदृश घटनाही घडल्याचे सेग्राव यांनी एका पुस्तकात नमूद केले आहे.
टीप अर्थातच ‘TIP’ पण याचा फुलफॉर्म आहे काय?
टीप या शब्दाची उत्पत्ती कधी, कशी आणि कुठे झाली याविषयी दोन-तीन मतप्रवाह आहेत. मात्र एक त्यातल्या त्यात सर्वमान्य प्रवाह असा….
सॅम्युएल जॉन्सन नामक एक बडी व्यक्ती बरेचदा एका कॉफी शॉपमध्ये दररोज जात असे. एकदा जॉन्सनच्या लक्षात आले, की कॉफी झाल्यावर जे बील येते, त्याच्यासोबत प्लेटमध्ये एक लेबल असते त्यावर लिहिलेले असते, “टू इन्शुअर प्रॉम्प्टिट्यूड” (टीप) म्हणजेच तुम्हाला मिळालेली सेवा जर चांगल्या दर्जाची, चांगल्या पद्धतीने आणि वेळेवर मिळाली असेल तर त्या सेवा देणाऱ्याचाही तुम्ही मान ठेवा.
हे वाचून जॉन्सन आणि त्याच्या समवेत आलेल्या काही लोकांनी बिलाच्या रकमे व्यतिरिक्त काही नाणी त्या प्लेटमध्ये ठेवली जी त्या वेटरसाठी होती. पुढे त्याच लिहिलेल्या शब्दाचे छोटे रूप प्रसिद्ध झाले ते टी.आय.पी. म्हणजेच ‘टीप’.
देशनिहाय टीप कशाप्रकारे दिली जाते ते थोडक्यात पाहूया
भारत –
आपल्याकडे टीप देणे हे अनिवार्य नाही. साधारणपणे हॉटेलमध्ये जेवढे बिल झाले असेल त्याच्या ५ टक्के टीप मिळणे अशी अपेक्षा असते, पण कायद्याने कोणीही अशी टीप मागू शकत नाही. कोणाला टीप मिळाल्यास नक्कीच देणाऱ्याचे कौतुक केले जाते.
जपान –
या देशात खरं तर टीप देणे हा अपमान समजला जातो. जर कोणाला टीप द्यायची असेल, तर एका स्वच्छ आणि चांगल्या लिफाफ्यामध्ये घालून दिली जाणे अपेक्षित आहे. नुसते पैसे टेबलावर किंवा बिलासोबतच्या डिशमध्ये ठेवू नये.
नायजेरिया –
याठिकाणी तुमच्या बिलात सर्व प्रकारचे सेवा कर आणि वेटर सर्व्हिस चार्ज समाविष्ट असतात, त्यामुळे ग्राहकांनी वेगळी टीप द्यावी ही अपेक्षा नाही, मात्र वेटरचे चार्जेस त्यांना बहुतांश मिळतच नाहीत, त्यामुळे जर टीप दिली तर ते नक्कीच खुष होतात.
चीन –
चीनमध्येही अशी प्रथा नाही, मात्र परदेशी नागरिकांनी टीप देणे मान्य आहे. चीनी नागरिकांनी आपल्याच देशात कोणालाही टीप देऊ नये असा अघोषित कायदा आहे, मात्र परदेशी नागरिकांकडून चीनी वेटर टीप स्विकारू शकतात.
दुसरीकडे टूर गाईड, बस ट्राईव्हर यांना मात्र टीप देऊ शकता. तो एक ग्रॅटिट्यूडचा भाग मानला जातो.
हाँगकाँग –
या ठिकाणी थोडी वेगळी पद्धत आहे. तुमच्या बिलात सर्व चार्जेस आणि कर समाविष्ट असतात, त्यामुळे हॉटेलमध्ये कोणी टीप मिळावी ही अपेक्षा करत नाही, मात्र इकडे टॅक्सी ड्राईव्हर तुमच्या कडून एकूण बिलापेक्षा थोडी जास्त रक्कम कर्टसी फीज किंवा चार्ज म्हणून घेतात.
उदाहरणार्थ, जर तुमचे टॅक्सी बिल ९१ रुपये झाले तर ते १०० रुपये मागतात. वरचे ९ रुपये कर्टसी फी!
युरोप खंड –
–
हे ही वाचा – हॉटेल मध्ये जेवायला जाण्याआधी या ९ गोष्टींचा विचार करा व त्यानुसारच हॉटेल निवडा
–
बहुतांश युरोपीयन देशांमध्ये टीप अनिवार्य नाही. त्यांच्या बिलांमध्ये सर्व कर आणि चार्जेस समाविष्ट असतात, मात्र जर ग्राहकाला टीप द्यायचीच असेल तर एका चांगल्या लिफाफ्यामध्ये घालून तो नीट बंद करुन द्यावा. टीप देण्यातही सन्मान असला पाहिजे अशी युरोपियनांची अपेक्षा असते.
अल्बानिया –
या पूर्व युरोपीय देशात मात्र परिस्थिती वेगळी आहे. कोणत्याही सेवेसाठी ग्राहकाने बिलाव्यतिरिक्त टीप द्यावी अशी या लोकांची अपेक्षा असते. काही ठिकाणी तर ते तुमच्याकडे हक्काने टीप मागताना दिसतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.