' निकृष्ट दर्जाचं लिखाण, बॉलिवूडचा एकसुरी अजेंडा – म्हणून “लक्ष्मी” बॉम्ब गेला फुसका – InMarathi

निकृष्ट दर्जाचं लिखाण, बॉलिवूडचा एकसुरी अजेंडा – म्हणून “लक्ष्मी” बॉम्ब गेला फुसका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

एकंदरच चित्रपट सृष्टीला लागलेलं ग्रहण, लोकांनी सोशल मीडिया वर व्यक्त केलेला राग, युट्युब व्हिडिओचे आकडे लपवून ठेवण्याची युक्ती आणि तृतीयपंथी लोकांनी दर्शवलेला विरोध या सगळ्या अग्निदिव्यातून अखेर अक्षय कुमारचा बहुचर्चित लक्ष्मी हा सिनेमा ओटीटी वर डीझने प्लस हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

आणि अपेक्षेप्रमाणे लोकांनी या सिनेमावर सुद्धा त्यांचा राग व्यक्त केला.

जिथे संपूर्ण सिनेसृष्टी वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहे, जिथे हंसल मेहताची स्कॅम सिरीज आजवरची सर्वात बेस्ट सिरीजचा खिताब घेऊन मिरवतीये तिथेच बॉलिवूड मधला एक गट अजूनही तद्दन कमर्शियल सिनेमे आणि रिमेक करण्यात गर्क आहे.

लॉकडाऊन मध्ये कित्येक नवनवीन प्रयोग झाले पण तरीही २०२० मध्ये सुद्धा ह्यांना ९ वर्ष जुना साऊथकडच्या सिनेमाचा रिमेक करावासा वाटतो हीच किती दुर्भाग्याची गोष्ट आहे.

असो या सगळ्या गदारोळात हा सिनेमा ओटीटीवर रिलीज केल्यामुळे याचे मेकर्स आणि अक्षय कुमार यांच्या हिंमतीला नक्कीच दाद द्यावीशी वाटते.

 

laxmmi inmarathi

 

मुळात लक्ष्मी हा सिनेमा २०११ साली आलेल्या साऊथच्या कांचना सिनेमाचा रिमेक. पहिलेतर कांचना हा ५ वेगवेगळ्या भाषेत डब होऊन रिलीज केला गेला आणि त्याचं हिंदी डब व्हर्जन अजूनही युट्युबवर पाहायला मिळेल.

आणि एक एव्हेरज हॉरर कॉमेडी म्हणून तुम्ही कांचना कडे नक्कीच बघू शकता. पण तरीही ह्या सिनेमाचा ९ वर्षांनी रिमेक करावासा का वाटला हे एक न उलगडलेलं कोडंच.

बरं इतक्या वर्षांनी रिमेक करताय तर मग त्यात काहीतरी नवीन ऍड करायचं तर तेही नाही. कथेपासून संवाद, सिनेमॅटोग्राफी, अभिनय, बॅकग्राऊंड स्कोर सगळ्याच ठिकाणी हा सिनेमा इतका नकली वाटतो.

आणि यामुळे सिनेमाच्या माध्यमातून दिला गेलेला एक सोशल मेसेज सुद्धा हास्यास्पद वाटतो.

अतिशय रद्दड आणि टिपिकल संवाद, विचित्र बॅकग्राऊंड म्युझिक, अत्यंत निकृष्ठ दर्जाचे स्पेशल इफेक्ट्स आणि प्रत्येक कलाकाराचा भयंकर अभिनय (ओव्हरअॅक्टिंगच म्हणा ना) यामुळे हा सिनेमा कोणत्याही अंगाने एंटरटेनमेंटच्या परिभाषेत मोडत नाही.

उलट तीच घिसीपीटी कहाणी पुन्हा तशाच वाह्यात संवादांतून मांडल्याने हा सिनेमा पाहणे म्हणजे एक प्रकारचा टॉर्चर सहन करण्यासारखेच आहे.

भूत प्रेत यावर विश्वास न ठेवणारा आपला हिरो हिरॉईन सोबत ३ वर्ष लग्न करून वेगळा राहत असतो. मुलगा मुस्लिम असल्याने मुलीच्या परिवाराने मुलाला स्वीकारलं नाहीये.

आणि अशातच मुलीची आई एके दिवशी मुलीला तिच्या नवऱ्यासोबत घरी बोलावते आणि तिथे त्या मुलाला तृतीयपंथी बाईच भूत झपाटतं आणि तिथून सुरू होते एक वेगळीच रिव्हेंज स्टोरी.

मुळात ९ वर्ष जुना साऊथ कडच्या सिनेमाचा रिमेक करण्यात काहीच नावीन्य नसल्याने हा सिनेमा कसल्याच बाबतीत तुम्हाला एक्साइट करत नाही.

मूळ सिनेमा सुद्धा तसा फार काही ग्रेट नाही पण २०११ च्या मनाने त्या सिनेमाची लिहिलेली कथा त्या काळाशी सुसंगत होती पण लक्ष्मी मध्ये नेमकी ह्याचीच उणीव प्रकर्षाने जाणवते.

 

kanchana inmarathi

 

कांचनाचा दिग्दर्शक आणि नट राघव लॉरेन्स ह्यानेच हा हिंदी रिमेक दिग्दर्शित केला आहे.

मधल्या काळात क्रिएटिव्ह डिफरन्स च्या नावाखाली राघव यांनी या रिमेक मधून काढता पाय घेतला होता पण नंतर काही कारणास्तव त्यांनी कमबॅक करून हा सिनेमा पूर्ण केला आणि अखेर तो ह्या वर्षी ओटीटी वर रिलीज झाला.

फक्त कथा पटकथाच कमजोर आहेत अशातला भाग नाही. ह्या रिमेक मधला आणि ओरिजिनल फिल्म मधला क्रिएटिव्ह डिफरन्स सुद्धा काहीच्या काही आहे.

बॉलिवूडचा नेमका अजेंडा काय आहे आणि नेमकं बॉलिवूड वर सध्या एवढे ताशेरे का ओढले जात आहेत ते या सिनेमातल्या काही गोष्टी नीट अभ्यासल्या तर कळेल.

मूळ सिनेमातला नायक हा हिंदू आहे भित्रट आहे आणि आईवेडा आहे तर रिमेक मधलं अक्षय कुमारचं पात्र आसिफ हे मुस्लिम पात्र आहे, जो ढोंगी बाबांचं पितळ उघडं पाडण्यात माहिर आहे आणि भूत प्रेतांवर विश्वास ठेवत नाही, मुळात इथे हा फरक मांडण्याची गरजच काय?

शिवाय मुलीकडच्या कुटुंबातल्या सदस्यांना मागासलेल्या विचारांचे आणि कट्टरपंथी दाखवणे, स्त्रियांच्या कमकुवतपणाचा चुकीच्या अर्थाने मेसेज देणे, आणि एकाच समुदायातल्या लोकांना सतत सहिष्णू आणि पुढारलेल्या विचारांचे दाखवणे अशा कित्येक गोष्टी आणि त्यामागचा बॉलिवूडी अजेंडा आता आपल्यासमोर यायला लागलाय.

आणि या गोष्टींना जर बॉलिवूड क्रिएटिव्ह डिफरन्स म्हणत असेल तर यापेक्षा मूळ साऊथकडचे सिनेमेच पाहणं पसंत केलं पाहिजे!

 

raghav inmarathi

 

ह्या असल्या कॉन्सेप्ट कदाचित काही वर्षांपूर्वी चालल्या असत्या पण सध्या लोकं डिजिटल कंटेंट मुळे इतकी चोखंदळ आणि हुशार झाली आहेत की त्यांना सुद्धा चांगलं आणि टुकार यातला फरक कळू लागला आहे!

हा सिनेमा वाईटच आहे अशातला भाग नाही. वेळ घालवण्यासाठी कुटुंबासोबत तुम्ही हा सिनेमा नक्कीच बघू शकता, पण एवढा वेळ घालून इतक्या चांगल्या कलाकारांचा इतका लाऊड अभिनय बघणं हे जरा पचनी पडत नाही.

अक्षय कुमारने शेवटच्या काही अर्ध्या तासात जे काम केलंय तेच जरा बघण्यालायक आहे, बाकी कियारा अडवाणी म्हणजे भाजीत घातलेल्या मसाल्याप्रमाणेच तिचा रोल आहे जेणेकरून लोकांना सिनेमा बघताना नेत्रसुखद अनुभव मिळेल.

बाकी अश्विनी कळसेकर, आयेशा रजा, राजेश शर्मा यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांना या सिनेमात बघताना प्रचंड दुःख होतं.

संपूर्ण सिनेमात एकमेव शरद केळकर याच माणसाचं काम आपल्याला आवडतं पण शरद केळकर यांची एन्ट्री होईस्तोवर ह्या सिनेमाचा टॉर्चर असहनिय होतो.

सिनेमात येणारी गाणी ही त्या सिनेमापेक्षा जास्त भयावह आहेत. स्पेशल इफेक्टस तर अगदी बाळबोध आहेत.

सध्याच्या काळात असा सिनेमा थेटर मध्ये सुद्धा चालणार नाही, तरी तो सिनेमा ओटीटीच्या माध्यमातून लोकांच्या माथी मारायच्या दिग्दर्शकाच्या प्रयत्नांची कीव करावी तितकी कमी आहे.

 

burj khalifa inmarathi

 

आपण तनिष्कच्या एका जाहिरातीवरून सोशल मीडिया वर व्यक्त होतो, पण हाच अजेंडा जेंव्हा बॉलिवूडच्या अशा सिनेमातून मांडला जातो तेंव्हा आपण त्याकडे मनोरंजनाचा भाग म्हणून कानाडोळा करतो म्हणूनच कदाचित आपण हे असे लक्ष्मी सारखे सिनेमे Deserve करतो.

मी पुन्हा एकदा सांगतो की हा सिनेमा वाईट नाही, त्यात दिलेला सोशल मेसेज सुद्धा योग्य आणि उत्तम आहे, पण या रिमेकचं टायमिंग, अत्यंत निकृष्ट दर्जाचं लिखाण आणि बॉलिवूडचा एकसुरी अजेंडा यामुळेच हा सिनेमा आपल्या पसंतीस उतरत नाही हे मात्र खरं!

सिनेमा तुम्ही बघा किंवा नका बघू तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आजच्या काळात अशा प्रकारच्या सिनेमाविषयी उघडपणे आणि स्पष्टपणे बोललं गेलं पाहिजे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?