शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रश्नावर नामी उपाय शोधून हा झालाय “लखपती”!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हरियाणा, नोएडा, दिल्ली या भागात थंडी चालू होते, तसे प्रदूषण भयंकर वाढते. थंडीमुळे धुके, धूर, यांचा थर हवेतच कितीतरी काळ राहतो. अगदी सामान्य माणसाला श्वास घेण्यास देखील त्रास होतो.
हरियाणातील बऱ्याच लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. दरवर्षी पीक येते, त्याची छान कापणी होते, धान्य तयार होते, पण नंतर मागे राहतो तो पिकांचा निरुपयोगी वाळलेला पेंढा. मग हरियाणा, नोएडा, पंजाब या प्रांतातले शेतकरी हा राहिलेला कचरा शेतातच पेटवून देतात.
यामध्ये शेतकऱ्यांची अशीही समजूत आहे, की असा राहिलेला कचरा पेटवून दिल्यास जमिनीची मशागत होते. पुढचं धान्य घेण्यासाठी जमीन तयार होते. म्हणून तिथे शेतीच्या शेती पेटलेली दिसते.
याचा खरा धोका निर्माण होतो तो पर्यावरणाला! त्याकाळात तिथे धुराचे लोटच्या लोट निर्माण होतात. श्वास घेण्यासाठी देखील शुद्ध हवा मिळत नाही. प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पातळीहून जास्त असते, परंतु आपल्या कचरा जाळण्याच्या समजुतीवर शेतकरी ठाम असतात.
अशाच हरियाणातल्या कैथल या गावातल्या एका छोट्या शेतकऱ्याने मात्र हा वाळलेला पेंढा न जाळता त्यातून व्यवसाय सुरू केला आणि आता त्याचा हा व्यवसाय कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. शेतीच्या हंगामात त्याने दोन महिन्यात पन्नास लाख रुपये कमावले आहेत. त्याने आपल्या गावातील १५० तरुणांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
त्या शेतकरी तरुणाचे नाव आहे वीरेंद्र यादव. वीरेंद्र सध्या ३२ वर्षांचे आहेत, पण वाळलेल्या पेंढ्यापासून व्यवसाय करता येतो आणि तोही पर्यावरणपूरक हे त्यांनी त्या भागातल्या शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे. बरं त्यांची शेती ही खूप जास्त नाही. फक्त एक एकर शेत त्यांच्याकडे आहे.
वीरेंद्र ऑस्ट्रेलियामध्ये हातात राहतात. त्यांना तिथली परमनंट सिटिझनशिप मिळाली आहे. तिथे ते भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. तसं त्यांचं तिथं चांगलं बस्तान बसलं आहे, परंतु २०१८ मध्ये त्यांच्या आईची तब्येत खालावली. आईची काळजी घेण्यासाठी ते कुटुंबासह भारतात परत आले.
इथे आल्यावर त्यांनी शेती करायला सुरुवात केली, पण पिकांच्या वाळलेल्या पेंढ्याचा काय करावं हा एक यक्षप्रश्न त्यांच्याही समोर होता. इतर सर्व शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांनीही तो सगळा कचरा पेटवून दिला.
नंतर त्यांना जाणवलं, की त्यांच्या आईला आणि त्यांच्या मुलींना श्वास घ्यायला त्रास होतोय. कारण संपूर्ण गावाभोवती स्मॉगचा (धुराचा) वेढा पडलेला. स्मॉग म्हणजे विषारी हवा किंवा धूर मिसळलेले धुके.
याबद्दल सांगताना ते म्हणतात की, “माझ्या घरात आजारी आई होती आणि माझ्या दोन लहान मुली निशिका आणि तनिशा. या तिघींनाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. माझ्या मुलींना तर त्यापासून अॅलर्जी सुरू झाली. हाच माझ्या आयष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. ह्याविषयी काहीतरी केलं पाहिजे हे मी ठरवलं.
त्यानंतर मला हा वाळलेला पेंढा, भुसा विकला जाऊ शकतो हे कळले. मग मी त्या परिसरातील ऍग्रो एनर्जी प्लांट आणि पेपर मिलशी संपर्क साधला. त्यांनीही आम्हाला या पेंढ्याला योग्य किंमत देण्याचे आश्वासन दिले.
तसंही आमची शेती जास्त नाही, फक्त एक एकर आहे. त्यात सगळ्यांचं भागण कठीणच होतं, पण माझे वडील पशुसंवर्धन विभागात मध्ये कामाला होते. त्यांनी या बाबतीत मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा मला झाला.”
सुरुवातीला हा पेंढा गोळा करण्यासाठी वीरेंद्रने मशीन खरेदी केले. आधी त्यांच्याकडे दोनच मशीन होत्या, पण मग यामध्ये नफा मिळतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी अजून दोन मशीन खरेदी केल्या. त्यासाठी त्यांना कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून ५०% मदत मिळाली आहे.
तो पेंढा गोळा करण्याच्या एका मशीनची किंमत १५ लाख रुपये आहे. त्या मशिनद्वारे तो पेंढा आयाताकृती बंडल बनवून गोळा केला जातो. त्याच्या आयातकृती आकारामुळे तो वाहतुकीस नेण्यास सोपा पडतो.
आता वीरेंद्र आसपासच्या शेतकऱ्यांकडून देखील पेंढा गोळा करत आहेत. केवळ दोन महिन्याच्या धान उत्पादनातून त्यांनी तीन हजार एकरातून ७०००० क्विंटल पेंढा गोळा केला आहे. त्यांनी तो जवळच्याच परली गावातील सुखबीर ऍग्रो एनर्जी या मिलमध्ये १३५ रुपये प्रति क्विंटलने विकला आहे.
१०००० क्विंटल पेंढा परलीच्याच सॅनसन पेपर मिलला विकला आहे. पुढील १०००० क्विंटल पेंढा जानेवारी, डिसेंबर मध्ये विक्रीसाठी देण्याचा करार केला आहे.
यावर्षी वीरेंद्रने ९४ लाख ५० हजार रुपये केवळ पेंढा विकून मिळवले आहेत. त्यांचा एकूण खर्च वगळता त्यांना निव्वळ नफा पन्नास लाख रुपये इतका झाला आहे. ही त्यांची दोन महिन्याची कमाई आहे.
ते ज्या शेतकऱ्यांकडून पेंढा घेतात त्यांना काही रक्कम दिली जाते. तसेच आता त्यांनी गावातील आणि आसपासच्या खेड्यातील १५० तरुणांना रोजगार दिला आहे. त्यांचा पगार देऊनही त्यांना आता ५० लाख रुपये मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियातील त्यांची कमाई ३५ लाख रुपये होती. त्याच्यापेक्षा त्यांना इथे जास्त पैसे मिळत आहेत.
आपलं जीवन, पर्यावरण यांचा विचार करून जर काही करायचं ठरवलं तर ते नक्कीच करता येतं हे वीरेंद्रच्या उदाहरणावरून दिसून येईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.