स्वदेशी, आत्मनिर्भरता अशा गोष्टी भारताला देणाऱ्या गांधी टोपीचा रंजक इतिहास वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतात पुरुषांच्या डोक्यावर काहीतरी शिरस्त्राण असलं पाहिजे असा पूर्वीपासूनचा रिवाज आहे. म्हणूनच पूर्वी प्रत्येकाच्या हुद्द्यानुसार डोक्यावर काहीतरी घातलेलं असायचं.
म्हणजे राजाला मुकुट असायचा, मग त्याच्या खाली असणाऱ्या प्रधान, सेनापती यांच्या डोक्यावरती वेगळ्या प्रकारचं शिरस्त्राण असायचं. तर शिपाई किंवा सैनिक यांना वेगळे शिरस्त्राण असायचं. सामान्य लोकांनाही वेगळ्या प्रकारचे शिरस्त्राण असायचं.
पण काळ बदलत गेला तसं डोक्यावरचं शिरस्त्राणही बदलत गेले. मग आले फेटे, पगड्या आणि टोप्या. परंतु सगळ्यात जास्त जर डोक्यावरची गोष्ट चर्चिली गेली असेल तर ती म्हणजे गांधी टोपी.
अर्थातच गांधीटोपी अस्तित्वातच आली ती मुळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात. या टोपीचे नाव महात्मा गांधी यांच्या नावावरून गांधीटोपी असं पडलं. स्वतः महात्मा गांधी यांनी ही टोपी फारशी वापरली नाही.
म्हणजे महात्मा गांधींचे आपण जे फोटो पाहतो, पुतळे पाहतो त्यात कुठेही गांधीजींच्या डोक्यावर ही टोपी नसते. पण तरीही तिचं नाव गांधीटोपी का पडलं असावं?
तसा भारतात प्रत्येक प्रांताचा एक वैशिष्टपूर्ण पेहराव आहे. त्यात डोक्यावर देखील वेगवेगळे शिरस्त्राण घातले जातात. म्हणजे पंजाबी, महाराष्ट्रीयन, राजस्थानी, गुजराती, दक्षिण भारतीय, यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण शिरस्त्राण होते.
कुणाची टोपी, कुणाची पगडी, कुणाचा शिरपेच, कुणाचा फेटा, पटका अस्तित्वात होते. त्यावरून तो माणूस कोणत्या राज्यातील आहे हे ओळखले जायचे.
पण गांधीटोपी बाबत उल्लेख आढळतात ते काकासाहेब कालेकर यांच्या ‘बापू की झांकिया’ या पुस्तकात.
गांधीटोपी कशी अस्तित्वात आली. महात्मा गांधींनी ही टोपी अस्तित्वात आणण्यासाठी काय काय केलं याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे. हे पुस्तक काकासाहेबांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात तुरुंगात असताना लिहिले आहे.
मुळात गांधीजींना या स्वातंत्र्यलढ्यात देशभरातील जनतेने सहभागी व्हावे असे वाटत होते. आणि या लढ्यातील जनता एका विशिष्ट पेहरावने ओळखली जावी यासाठी त्यांनी काही विचार केला होता.
महात्मा गांधीजींच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये उष्णता भरपूर असल्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावरती काहीतरी आच्छादन आवश्यक होते. त्यासाठी अनेक पर्यायांचा विचार केला गेला.
फेटा किंवा पगडी हा प्रकार गांधीजींना फारसा रुचलाच नाही कारण त्यासाठी लागणारे भरपूर प्रमाणातले कापड. महाराष्ट्रात घातली जाणारी टोपी चांगली होती परंतु त्याचे कापड गांधीजींना आवडले नाही.
उत्तर प्रदेश, बिहार कडे डोक्यावर घेतलं जाणार आच्छादन फारच पातळ होतं त्यामुळे ते काहीच कामाचे नव्हते.
गांधीजींना काश्मिरी टोपी आवडली होती. एकतर ती वजनाने हलकी होती आणि घडी घालून ठेवता येण्यासारखी होती, पण ती लोकरीने बनली होती. जीचा गरम प्रदेशात काहीच उपयोग नव्हता.
गांधीजींना तशी सोला हॅट आवडली होती. गोलाकार आणि बांबूने विणलेली ही हॅट डोळे आणि मानेचे चांगले रक्षण करणारी होती. ही हॅट हेल्मेट सारखी दिसते. पण देशातल्या पारंपरिक वेशवार ती अजिबात सूट होत नव्हती.
तसेच ती विदेशी प्रकार म्हणून पाहिला गेला असता. कारण त्या प्रकारची हॅट युरोपियन लोक जास्त वापरतात. म्हणून तो ही पर्याय गाळला गेला.
शेवटी काश्मिरी हॅटच खादीने बनवता येईल का याचा विचार सुरू झाला. कारण गांधीजींच्या अपेक्षेप्रमाणे तिची घडी होत होती. त्यासाठी जास्तीच्या कापडाची आवश्यकता नव्हती. तिची स्वच्छता करणे देखील फार आवघड नव्हते.
तसेच ती टोपी सर्वसामान्यांना परवडणारी होती. रांगाच्याही बाबतीत गांधीजींनी जाणीवपूर्वक पांढरा रंग निवडला. गांधीजींना स्वच्छता ही तितकीच प्रिय.
एकतर भारतासारख्या उष्ण प्रदेशात माणसांना घामही तितकाच येतो. इथल्या धुळ, उष्णता, घाम यामुळे टोपी मळकट वाटली की लोकं ती स्वच्छ धुवून वापरतील.
१९१९ मध्ये जेव्हा डोक्यावरच्या टोपी बद्दल विचार सुरू झाला त्यावेळेस गांधीजींनी हे सगळे विचार मांडले.
त्यांना डोक्यावरील टोपी ही वजनाने हलकी, स्वदेशी कापडाची, घडी करून ठेवता येण्यासारखी, कुठेही न्यायला सोपी पडेल अशी हवी होती. त्याच बरोबर भारतातल्या सगळ्या प्रदेशातील लोकांनी तिचा स्वीकार केला पाहिजे असंही त्यांना वाटत होतं.
आधीची शिरस्त्राण काढून ही टोपी लोकांनी स्वीकारली पाहिजे या मताचे गांधीजी होते. तिचा रंग पांढरा असावा याविषयी देखील गांधीजी आग्रही होते कारण पांढरा रंग कुठूनही उठून दिसेल.
तसेच ती मळल्यावर लोकांकडून ती धुतली देखील जाईल. तसेच ती टोपी इस्त्री देखील करून ठेवता येईल. म्हणूनच ही टोपी खादी कपड्याची बनवली गेली.
ज्यामुळे स्वदेशीचा नारा देखील सामान्य लोकांपर्यंत पोहोचला. भारतातले गरीब-श्रीमंत ही टोपी वापरू शकत होते. प्रत्येकाला ती एकाच किमतीने मिळत होती त्यामुळे गरीब श्रीमंतांमधील दरी देखील कमी होत होती.
म्हणून गांधीजींनी स्वतः या टोपीचा प्रसार चालू केला. त्यांनी ही टोपी भारतात कधी वापरल्याचं पाहायला मिळालं नाही. परंतु ते दक्षिण आफ्रिकेत असताना तिथल्या लढ्यामध्ये गांधीजींनी ही टोपी घातली होती असे काही फोटो आहेत.
काही लोकांनी गांधीटोपी वेगवेगळ्या रंगातही विकण्याचा प्रयत्न केला. परंतु गांधीजींना मात्र टोपीचा रंग पांढराच हवा होता. त्यांच्या मते देशातल्या लहान मुलांना देखील गांधीटोपी ओळखता यायला हवी होती.
स्वतः गांधीजी या टोपीचा प्रसार करत. काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही मीटिंग, सभा यामध्ये लोकांनी गांधीटोपी वापरली पाहिजे याविषयी गांधीजी ठाम होते.
म्हणूनच थोड्याच दिवसात जिकडे काँग्रेसच्या सभा, मिटिंग असतील त्या ठिकाणांच्या बाहेर टोपी विक्रेते येऊन बसायला लागले. ब्रिटिशांना शह देण्यासाठी गांधीजी नेहमीच निरनिराळे प्रयोग करत.
त्यातलाच गांधीटोपीचा हा एक प्रयोग म्हणता येईल. जी माणसं गांधीटोपी घालतात ती ब्रिटिश विरोधी आहेत असं सर्वसाधारण समीकरण एका छोट्याशा गोष्टीतून गांधीजींनी ब्रिटिशांना दाखवून दिलं.
त्यामुळे ब्रिटिश बिथरले आणि त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये जे कर्मचारी डोक्यावर गांधी टोपी घालतील त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. जे लोक गांधीटोपी तयार करतील त्यांची धरपकड केली.
त्यांना विविध कारणांसाठी छळणं सुरू केलं. सरकारी ऑफिसेस ,कोर्टकचेऱ्या याठिकाणी गांधीटोपी घालण्यावर बंदी केली. याचा परिणाम इतकाच झाला की लोक जास्तीत जास्त गांधीटोपी वापरून फिरू लागले.
या गोष्टीचा गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी उपयोग करून घेतला.”या स्वदेशी टोपी साठी मरण पत्करायला तयार राहा”. असा संदेश त्यांनी देशातील जनतेला दिला.
पुढे मग गांधीटोपी ही स्वदेशी आणि स्वराज या चळवळीचा भागच बनली. अनेक सामान्य लोक ही टोपी परिधान करू लागले.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि गांधीटोपी ही फक्त नेत्यांपुरतीच मर्यादित होऊ लागली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गांधीटोपीची फॅशन टिकवण्याचा प्रयत्न केला पण हळूहळू तिचे महत्त्व कमी होऊ लागले.
पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर तिचे महत्त्व अजूनच कमी झाले. फक्त नेतेगिरी करायची असेल तरच गांधीटोपी वापरली पाहिजे असा एक समज होऊन बसला.
यावर महाराष्ट्रातले प्रसिद्ध लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांनी एक छानसे विडंबन केले आहे. त्यात ते म्हणतात की –
मना सज्जना, चार आण्यात फक्त
तुला व्हावयाचे असे ‘देशभक्त’ !
तरी सांगतो शेवटी युक्ती सोपी,
खिशामाजी ठेवी सदा गांधीटोपी !!
पुढे भारताचे पंतप्रधान झाल्या नंतर राजीव गांधी यांनी काहीकाळ गांधीटोपी वापरली. पण नवीन येणाऱ्या पिढ्यांनी मात्र गांधीटोपीचा स्वीकार केला नाही.
आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्स, हॅट घालतात. तरीही अजून खेड्यापाड्यांमध्ये लोकांच्या डोक्यावर गांधी टोपी दिसते.
शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतल्या डबेवाल्यांच्या डोक्यावर गांधी टोपी असते तोच त्यांचा युनिफॉर्म देखील म्हणता येईल.
अलीकडच्या काळात म्हणाल तर अण्णा हजारेंनी जेव्हा दिल्लीमध्ये आंदोलन केलं त्यानंतरही काही काळ गांधीटोपीची चलती होती. कारण अण्णा हजारे यांचा पोशाख म्हणजेच सदरा, धोतर आणि गांधी टोपी. त्यावेळेस लोक टोपीवर ” मै भी अण्णा हजारे” असे लिहायचे.
आताच्या पिढीला कदाचित गांधीटोपीचं महत्त्व कधीच कळणार नाही परंतु भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीटोपीने बराच हातभार लावलेला आहे. स्वदेशी, आत्मनिर्भरता या सगळ्या गोष्टी गांधीटोपीने भारताला दिल्या.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.