Site icon InMarathi

गुरुत्वाकर्षण शिकवणाऱ्या न्यूटनकडून चक्क “असा” गमतीशीर वेडेपणा घडला होता!

newton 1inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सर आयझॅक न्यूटन! विज्ञान किंवा वैज्ञानिक हे शब्द उच्चारले, की आपल्या डोळ्यासमोर कसलाही विचार न करता येणारे पहिले नाव!

तसे म्हटले, तर न्यूटन आणि त्याच्या शोधांबद्दल शिकण्याची वेळ साधारणतः सहावी – सातवी नंतरच येते, पण न्यूटन हे नाव मात्र त्याआधीपासूनच माहीत असते. जगाच्या कानाकोपऱ्यात ज्याचे नाव पोचले आहे असा न्यूटन हा पहिला शास्त्रज्ञ असेल.

मानवी इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये न्यूटनचे नाव घेतल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एक गणितज्ञ, भौतिकशास्त्र तज्ज्ञ, खगोल अभ्यासक, तत्त्वचिंतक आणि लेखक असणाऱ्या आयझॅक न्यूटनने अनेक क्षेत्रात मुशाफिरी केली.

 

 

न्यूटन म्हटल्यावर बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर त्याने मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत येतो, पण न्यूटनचे इतर क्षेत्रातील योगदान पाहिले तर अक्षरशः थक्क व्हायला होते. आधुनिक गणितातील ‘कॅल्क्युलस’ आणि ‘बायनॉमियल सिरीज’ चा जनक न्यूटन होय.

अभियांत्रिकीचा पाया म्हणून ज्याला ओळखले जाते, त्या ‘मेकॅनिक्स’ मधील न्यूटनचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. संपूर्ण मेकॅनिक्स जेथून सुरू होते ते गतीविषयक ३ नियम ही न्यूटनचीच देणगी. केप्लरने मांडलेला ग्रहांच्या गतीविषयक सिद्धांत न्यूटनने आपल्या संशोधनाने पुढे नेला.

न्यूटनने लिहिलेला ‘प्रिंसिपीया’ हा ग्रंथ आजही भौतिकशास्त्रातील प्रमाण ग्रंथ म्हणून मानला जातो. भौतिकशास्त्रातील क्वचितच एखादा भाग असेल, की ज्यात न्यूटनने आपले योगदान दिलेले नाही.

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जेवढा प्रसिद्ध आहे तेवढीच किंवा त्याहीपेक्षा जास्त त्यामागील सफरचंदाची कथा प्रसिद्ध आहे. सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला असताना वरून पडणाऱ्या सफरचंदाकडे पाहून न्यूटनच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले आणि त्यापुढे त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला अशी ती कथा सांगितली जाते.

 

 

न्यूटनचे गुरुत्वाकर्षणासंबंधी काम आधीपासून सुरू असले, तरी या घटनेने त्याला चालना मिळाली असे म्हणता येते. न्यूटनच्या संदर्भात जशी ही घटना सांगितली जाते, त्या प्रमाणेच अजूनही एक मजेशीर किस्सा सांगितला जातो. अर्थात, याचा कोणत्याही शोधाशी काही संबंध नाही!

घरात मांजर किंवा कुत्र्यापैकी एखादा प्राणी पाळणे ही गोष्ट फार पूर्वीपासून प्रचलित आहे. त्यातही पाश्चिमात्य देशात तर हे जास्तच दिसून येते. कुत्रा काय किंवा मांजर काय, हे प्राणी घरात सर्वत्र आणि घराबाहेर वावरत असतात.

प्राण्यांना घरात खोल्यांमध्ये फिरताना किंवा घरातून आतबाहेर करताना दरवाजे खिडक्या उघडायला लागू नयेत यासाठी ‘कॅट डोअर’ ही संकल्पना वापरली जाते. दरवाज्याला किंवा भिंतीत एक छोटा झरोका तयार करून त्याला एक झडप बसवलेली असते. मांजर झडप               त्यातून पार जाते व त्यानंतर ती आपोआप बंद होते.

 

 

पाश्चिमात्य देशात कॅट डोअर्स बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळतात. न्यूटनच्या आयुष्यातील एका प्रसंगामुळे ‘कॅट डोअर’चा शोध हा त्याने लावला असावा असा बऱ्याच जणांचा समज आहे!

तो प्रसंग म्हणजे, न्यूटन आपल्या अभ्यासिकेत अनेक विषयांवर काम करत बसलेला असे. त्याने आपल्या घरात एक मांजर पाळलेली होती. त्या मांजरीला न्यूटनच्या अभ्यासिकेत प्रवेश करायचा असेल, तर तिच्यासाठी दार तर उघडावे लागणारच! आपल्या कामात व्यत्यय यायला नको म्हणून न्यूटनने दरवाज्याला जमिनीलगत एक गोल झरोका करून घेतला, जेणेकरून ती मांजर आत-बाहेर करू शकेल आणि न्यूटनच्या कामात व्यत्ययही येणार नाही.

यथावकाश त्या मांजरीला पिल्लेही झाली! आता मांजरीसह तिच्या पिल्लांनाही ये-जा करता यावी यासाठी न्यूटनने त्या झरोक्याच्या बाजूला अजून एक लहान झरोका केला!

 

 

वास्तविक पाहता ज्या झरोक्यातून मोठी मांजर जाऊ शकते त्यातून पिल्लेही जाऊ शकली असतीच की! आणि पिल्ले काहीही झाले तरी आपल्या आईच्याच मागे येणार! न्यूटनसारख्या बुद्धिमान माणसाला ही साधी गोष्ट सुचली नसेल का? यावर अनेकजण मत व्यक्त करतात.

काहीजण ही गोष्ट म्हणजे निव्वळ काल्पनिक आहे असे म्हणतात, तर काहीजण न्यूटनच्या घरी आजही दिसू शकणाऱ्या झरोके असणाऱ्या दरवाज्याचा दाखला देत ही गोष्ट खरी असल्याचे म्हणतात! यामुळेच ‘कॅट डोअर’ किंवा ‘कॅट होल’ चा शोध न्यूटननेच लावला असेही मानले जाते!

अर्थात यातील खरे-खोटे न्यूटनच जाणो! बुद्धिमान आणि प्रसिद्ध लोकांच्या बाबतीत असे अनेक किस्से सांगितले जातात. यातील किस्से कितपत खरे किंवा खोटे हे ठामपणे सांगता नाही येत, परंतु एवढी शहानिशा करण्यापेक्षा अशा गोष्टींचा आनंद घ्यावा हेच खरे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version