आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय सेना म्हटलं की छाती कशी अभिमानाने भरून येते. त्यांची प्रत्येक शौर्यगाथा या अभिमानाची साक्षीदार आहे. शेजारील शत्रू असो की अंतर्गत फुटीरतावादी असो प्रत्येकाला अगदी सडेतोड उत्तर देण्याचं कसब आपल्या सैन्यामध्ये आहे. त्यांच्यासाठी देश प्रथम! देशाच्या सेवेसाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची तयारी असते.
अश्या या निडर भारतीय सैन्याबद्दल एक गोष्ट तुम्हाला ठावूक असेलंच की भारतीय सेना ही वेगवेगळ्या रेजिमेंट्स मध्ये विभागली गेली आहे. आवश्यकतेनुसार या रेजिमेंट्सना त्यांच्या मोहिमेवर धाडले जाते.
भारतीय सैन्यामध्ये ३२ इन्फेन्ट्री रेजिमेंट्स, ६२ आर्म्ड रेजिमेंट्स आणि उर्वरित आर्टिलरी रेजिमेंट्स आहेत. आज आपण भारतीय सैन्यामधील प्रमुख १४ रेजिमेंट्सबद्दल जाणून घेऊया.
१. राजपूत रेजिमेंट
सन १७७८ मध्ये इंग्रजांनी या रेजिमेंटची स्थापना केली होती. दोन्ही विश्व महायुद्धांमध्ये राजपूत रेजिमेंटने अतुल्य शौर्य गाजवून साजेशी कामगिरी बजावली होती. तसेच पाकिस्तान आणि चीन विरुद्धच्या युद्धांमध्ये देखील त्यांनी आपल्या पराक्रमाच्या गाथा रचल्या होत्या.
१९७१ च्या युद्धामध्ये तर पाकिस्तानी सैन्याच्या मनात राजपूत रेजिमेंटने इतके भय निर्माण केले होते की त्यांचे नाव ऐकताच पाकिस्तानी सैन्याची पाचावर धारण बसायची. कारगिल युद्धाच्या वेळी राजपूत रेजिमेंटने ‘तोलोइंग’ सारखा महत्त्वपूर्ण पॉइंट मिळवला होता.
२. कुमाओं रेजिमेंट
ब्रिटीशांनी १८१३ साली कुमाओं रेजिमेंटची स्थापना केली होती. आजवरच्या अनेक मोहिमांमध्ये कुमायूओं रेजिमेंटने आपले शौर्य गाजवत अनेक महत्त्वाची सन्मानचक्रे आपल्या नावावर करून घेतली आहेत. सध्या कुमाओं रेजिमेंट बटालियन जगातील सर्वात उंच युद्धभूमी मानल्या जाणाऱ्या सियाचीनमध्ये तैनात आहे.
३. पॅराशूट रेजिमेंट
पॅराशूट रेजिमेंटची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९ ऑक्टोंबर १९४१ रोजी करण्यात आली होती. ही रेजिमेंट भारतीय सैन्यातील सर्व दलांना आकाशमार्गे सहाय्य पाठवते. १९९९ साली कारगिल युद्धाच्या वेळी १० पैकी ९ पॅराशूट बटालियन्स ऑपरेशन विजय अंतर्गत तैनात करण्यात आल्या होत्या.
कारगिल युद्धामध्ये पॅराशूट बटालियन क्रमांक ६ आणि ७ यांनी मुश्कोह घाटात विजय संपादन केला होता तर दुसरीकडे बाटालिक पॉइंटवर बटालियन क्रमांक ५ ने शत्रूवर विजय मिळवला होता.
४. मद्रास रेजिमेंट
मद्रास रेजिमेंट देखील भारतातील सर्वात जुन्या रेजिमेंट पैकी एक म्हणून ओळखली जाते. १७५० च्या दशकामध्ये इंग्रजांनी या रेजिमेंटची स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत विविध पराक्रम गाजवून मद्रास रेजिमेंटने भारतीय सैन्याची मान अभिमानाने उंचावली आहे. या रेजिमेंटमध्ये २३ बटालियन्स आहेत.
५. मॅकेनाईज्ड इन्फेन्ट्री रेजिमेंट
१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर मॅकेनाईज्ड इन्फेन्ट्री रेजिमेंटची सैन्याला गरज भासू लागली. शेवटी भल्या मोठ्या प्रकियेनंतर १९७९ साली मॅकेनाईज्ड इन्फेन्ट्री रेजिमेंटची स्थापना करण्यात आली.
मॅकेनाईज्ड इन्फेन्ट्री रेजिमेंटने आजवर ऑपरेशन पवन अंतर्गत श्रीलंकेमध्ये, ऑपरेशन रक्षक अंतर्गत पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये तसेच ऑपरेशन विजय अंतर्गत पुन्हा जम्मू काश्मीर मध्येच आपले शौर्य दाखवून दिले आहे. सोबतच संयुक्त राष्ट्रांच्या शांती कार्यक्रमांतर्गत सोमालिया, कांगो, अंगोला, आणि सियेरा लियोन यांसारख्या देशात देखील काम केले आहे.
६. नगा रेजिमेंट
भारतीय सैन्याची सर्वात तरुण रेजिमेंट म्हणजे नगा रेजिमेंट होय. १९७० साली या रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. स्थापनेनंतर लगेचच बांगलादेश मुक्तिसंग्रामात सहभागी होत या रेजिमेंटने आपले शौर्य दाखवून दिले. कारगिल युद्धामध्ये द्रास सेक्टरमध्ये या रेजिमेंटने नेतृत्व केले होते.
७. पंजाब रेजिमेंट
भारतीय सैन्याच्या सर्वात जुन्या लष्करी रेजिमेंट पैकी एक म्हणून पंजाब रेजिमेंट ओळखली जाते. भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनानंतर पंजाब रेजीमेंटचे देखील विभाजन झाले, ज्यापैकी पहिली बटालियन ही पाकिस्तानच्या वाट्याला गेली तर दुसरी बटालियन ही भारताकडे राहिली.
लोंगेवालाचे युद्ध म्हणजे पंजाब रेजिमेंटच्या शौर्याची ज्वलंत कहाणी म्हणावी लागेल. या युद्धात पाकिस्तानी सैन्याला पंजाब रेजिमेंटने अक्षरश: सळो की पळो करून सोडलं होतं.
८. बिहार रेजिमेंट
बिहार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात या रेजिमेंटने दुसरे विश्व महायुद्ध आणि ब्रह्मा देशाच्या युद्धामध्ये सहभाग घेतला होता. स्वातंत्र्याच्या नंतर या रेजिमेंटने जवळपास सर्वच युद्धांमध्ये सहभागी होत शत्रूंना धूळ चारली होती. कारगिल युद्धामधील बिहार रेजिमेंटचे शौर्य उल्लेखनीय ठरले.
९. जाट रेजिमेंट
ब्रिटीशांनी १७९५ साली जाट रेजिमेंटची स्थापना केली होती. जाट रेजिमेंटच्या शौर्याचे किस्से आजही गोष्टींच्या स्वरुपात ऐकायला आणि वाचायला मिळतात. तसेच या रेजिमेंटच्या नावावर व्हिक्टोरिया क्रॉस, २ अशोक चक्र, ८ महावीर चक्र, ८ कीर्ती चक्र, ३२ शौर्य चक्र, ३९ वीर चक्र आणि १७० सेना पदके आहेत.
===
- सैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये
- भारतीय सैन्याबद्दल ऊर भरून येणाऱ्या १३ रंजक गोष्टी…===
१०. महार रेजिमेंट
महार रेजिमेंटची स्थापना देखील १९४१ साली करण्यात आली होती. या रेजिमेंटच्या नावावर देखील विविध शौर्य पुरस्कारांची नोंद आहे. या रेजिमेंटमध्ये संपूर्ण भारतभरातून सैनिकांची भरती केली जाते.
११. शीख रेजिमेंट
१ ऑगस्ट १८४६ रोजी ब्रिटीशांनी शीख रेजिमेंटची स्थापना केली होती. या रेजिमेंटमध्ये एकूण १९ बटालियन्स आहेत. ब्रिटीशांनी या रेजिमेंटच्या सहाय्याने स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक मोहिमा यशस्वी पार पाडल्या होत्या. स्वातंत्रोत्तर काळात देखील या रेजिमेंटने महत्त्वपूर्ण युद्धांमध्ये हिरहिरीने सहभाग घेत अनेक कामगिऱ्या नोंदवल्या आहेत.
१२. डोगरा रेजिमेंट
१८७७ साली ब्रिटीशांनी डोगरा रेजिमेंटची स्थापना केली होती. पाकिस्तान विरुद्धच्या प्रत्येक लढाईमध्ये डोगरा रेजिमेंटचा आवर्जून उल्लेख पाहायला मिळतो. देशातील सर्वात खतरनाक रेजिमेंट म्हणून डोगरा रेजिमेंटची ओळख आहे.
१३. आसाम रेजिमेंट
आसाम रेजिमेंटची स्थापना १५ जून १९४१ रोजी झाली होती. पूर्व भारतातील इच्छुकांची या रेजिमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती केली जाते. चीनने केलेल्या हल्ल्यामध्ये तसेच बांगलादेश मुक्तीसंग्रामामध्ये या रेजिमेंटने अपर शौर्य गाजवले होते.
या तर झाल्या काही प्रमुख रेजीमेंट्स आणि त्याहूनही सर्वश्रेष्ठ आहे आपली मराठा रेजिमेंट! त्याबद्दल तुम्हाला सर्वाना माहिती असलेच, तरीही जे अजूनही मराठा रेजिमेंटबद्दल अनभिज्ञ आहेत त्यांच्यासाठी मराठा रेजिमेंटबद्दल खास माहिती देत आहोत!!
१४. मराठा लाईट इन्फेन्ट्री अर्थात मराठा रेजिमेंट
१७६८ साली मराठा रेजिमेंटची स्थापन करण्यात आली होती. ही भारतीय लष्कराची सर्वात जुनी आणि वरिष्ठ इन्फेन्ट्री रेजिमेंट म्हणून ओळखली जाते. ‘बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अश्या घोषणा करत मराठा रेजिमेंट शत्रूवर तुटून पडते.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक युद्ध मराठा रेजिमेंटने गाजवली, त्यापैकी हुसैनवाला युद्धामध्ये मराठा रेजिमेंटने शौर्याची परिसीमा गाठत अभूतपूर्व पराक्रम करून दाखवला होता. लष्कराची जवळपास सर्वच सन्मानचक्रे मराठा रेजिमेंटच्या नावावर आहेत हीच गोष्ट मराठा रेजिमेंटच्या शूरपणाची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे.
अश्या या भारताच्या शान असलेल्या रेजिमेंट्स सदैव कोणत्याही संकटासाठी सज्ज असतात. त्यांना एकवार मनाचा मुजरा!!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.