आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कुंभमेळा! जगातील सगळ्यात मोठे जनसंमेलन असलेला कुंभमेळा हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे. भारतातील पवित्र नद्यांच्या काठी वसलेल्या नाशिक, प्रयागराज, उज्जैन व हरिद्वार या ४ तीर्थक्षेत्रांत दर तीन वर्षांनी एक अशा प्रकारे १२ वर्षांत ४ पूर्ण कुंभमेळे भरतात.
कुंभमेळ्यांमध्ये भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लाखो भाविक येतात आणि त्या त्या तीर्थक्षेत्री असलेल्या नदीत स्नान करतात. कुंभपर्वात केलेले स्नान हे अतिशय पवित्र आणि पापांचा नाश करणारे असल्याचे मानले जाते.
या कुंभमेळ्यांमध्ये भविकांबरोबरच देशभरातील वेगवेगळ्या आखाड्यांचे अनेक साधू, महंत आणि संन्यासी सहभागी होतात. संन्यासी म्हणजे ज्याने आपल्या घरदाराचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन ईशचिंतनासाठी अर्पण केले आहे अशी व्यक्ती.
भारतात अनेक वेगवेगळ्या पंथांचे संन्यासी आणि त्यांचे आखाडे पहावयास मिळतात. नागा साधू हे यांपैकीच एक.
भारतात शैव आणि वैष्णव असे दोन प्रमुख पंथ दिसून येतात. भगवान शंकरांची उपासना करणारे ते शैव आणि भगवान विष्णूंची उपासना करणारे वैष्णव.
नागा साधू हे शैव परंपरेतील असून भगवान शंकरांप्रमाणे सर्वांगावर भस्म धारण केलेले असतात. इतर संन्याशाच्या तुलनेत नागा साधूंचे नियम फार काटेकोर असतात.
नागा साधूंना अंगावर फक्त एक भगवा कपडा परिधान करण्याची अनुमती असते आणि तोही पूर्ण अंग झाकणारा नसावा. त्यांना केवळ केसांच्या जटा ठेवता येतात अथवा पूर्ण मुंडन करावे लागते.
सात घरी माधुकरी मागून मिळालेले अन्न नागा साधू ग्रहण करतात व एकभुक्त राहतात. थोडक्यात त्यांना आपल्या इंद्रियवासना सोडून देऊन सर्वसंगपरित्याग करावा लागतो.
कुंभमेळ्यात भारतभरातील अशा साधूंचे एकत्रीकरण होत असते. याबरोबरच सगळ्या व्यापातून विरक्ती घेऊन संन्यास घेऊ इच्छिणारेही अनेक लोक कुंभमेळ्यात आलेले असतात.
गेल्या वर्षी प्रयागराज येथे कुंभमेळा भरलेला होता. २० कोटींपेक्षा जास्त लोकांनी या काळात कुंभमेळ्याला हजेरी लावली.
या कुंभमेळ्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यात तब्बल १०,००० लोकांनी आपले सगळे घरदार सोडून नागा साधू होण्याची तयारी दर्शवली. यातील अनेकजण उच्चशिक्षित, म्हणजे अगदी डॉक्टर, इंजिनिअरही होते.
भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या विविध जात, पंथ, भाषा आणि वर्णाच्या इच्छुक लोकांना अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या माध्यमातून संन्यास दीक्षा दिली गेली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मातील लोकांनाही यात संन्यास दीक्षा दिली गेली. नागा साधू होण्यासाठी नुसती वैराग्याची इच्छा असून चालत नाही, तर त्यानुसार आपले आचरणही असावे लागते.
संन्यासधर्माची दीक्षा देताना त्या व्यक्तीला आपले स्वतःचे श्राद्ध करून घ्यावे लागते. याचा अर्थ आता त्या व्यक्तीचा भौतिक जगाशी संबंध संपलेला असून यापुढील आयुष्यावर त्याचा अधिकार नाही, असा होतो.
अशा व्यक्तीने पुढील जीवन जनसेवेत अथवा ईश्वराच्या सेवेत घालवायचे असते. दीक्षा दिल्यावर त्या व्यक्तीचे मूळ नाव बदलून त्याचा गुरू त्याजागी दुसरे नाव देतो.
दीक्षा देण्यापूर्वी त्यांना २४ तास अन्नपाण्याशिवाय ठेवण्यात येते. संन्यास दीक्षा देताना गुरूंच्या आज्ञेनुसार नागा साधूंचे पुढील भ्रमण ठरते. अनेकजण वैराग्याच्या ओढीने कुंभमेळ्यात येतात आणि दीक्षा घेतात.
पण पुढील काही दिवसात संन्याशाचे खडतर आयुष्य त्यांना निभावता येत नाही. यामुळे नागा साधू बनणे हे तितकेच कष्टप्रदही असते.
२०१९ च्या कुंभमेळ्यात अनेकजण नागा साधू म्हणून बाहेर पडले. कच्छ मधील रजत कुमार राय हा २७ वर्षांचा युवक शिक्षणाने मरिन इंजिनिअर आहे. चांगल्या पगारावर नोकरी करत असूनही त्याने नागा साधू व्हायचा निर्णय घेतलाय.
रजत कुमार प्रमाणेच शंभू गिरी, घनश्याम गिरी यांचीही तशीच काहीशी कहाणी आहे. शंभू गिरी हा युक्रेनमधील २९ वर्षांचा मॅनेजमेंटचे शिक्षण उरण केला युवक आहे.
तर उज्जैन मधून आलेला घनश्याम गिरी अवघा अठरा वर्षांचा असून त्याने १२ वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले होते. त्याच्या मते परीक्षा झाल्यावर त्याला त्याचे उद्दिष्ट समजले आणि त्याने संन्यास घेऊन नागा साधू बनण्याचा निश्चय केला.
कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान करून झाल्यावर सगळ्या इच्छुकांना संन्यास दीक्षा दिली गेली. दीक्षा दिली म्हणजे लगेच लोकांना नागा साधू म्हणून मान्यता मिळते असे नाही.
या बाबतीत आखाड्यांचे नियम फार कडक असतात. पुढचा काही काळ इतर महंत अशा लोकांचे परीक्षण करतात.
एखादी व्यक्ती खरोखरच मनापासून संन्यासी झालेली आहे की केवळ आयुष्यातील अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून संन्यास घेतला आहे याची खात्री करून घेतली जाते. या परीक्षेत खरे उतरल्यावरच अशा माणसाला संन्यासी म्हणवून घेता येते.
जेव्हा मनुष्याला आपल्या आयुष्यात विरक्ती येते, त्याला भौतिक सुख नकोसे वाटू लागते, तेव्हा तो संन्यासाकडे वळतो. गतवर्षी झालेल्या कुंभपर्वात मोठ्या संख्येने उच्चशिक्षित लोकही संन्यास घेण्याकडे वळलेले दिसून आले.
अर्थात यांपैकी किती जण खरोखरच संन्यस्त झाले हे काळच सांगेल. परंतु आजच्या युगात पैशाच्या मागे धावणारे लोक जिकडेतिकडे पहावयास मिळतात.
अशा काळात एवढ्या संख्येने नागा साधू बनण्याकडे वळलेले उच्चशिक्षित लोक आढळणे हा नक्कीच कुतूहलाचा विषय आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.