आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपण गाडीतून प्रवास करत असताना चौकामध्ये पोलिसांनी कोणालातरी सिग्नल मोडला किंवा वाहतुकीचे नियम मोडले म्हणून पकडलेलं असतं. त्याच्याकडून दंड वसूल केला जातो आणि दंड भरण्याचे पैसे नसतील, तर पोलीस थोडी चिरीमिरी घेऊन सिग्नल तोडणाऱ्या व्यक्तीला सोडून देतात.
हे आपल्या डोळ्यासमोर घडत असतं, पण आपण काही बोलत नाही. हे पोलीस म्हणजे चोरच आहेत असाच विचार मनात येतो. पैसे खायचं खातं म्हणजे पोलीसखातं असंही आपण म्हणतो. इतकी तत्परता पोलीस इतर ठिकाणी दाखवत नाहीत असाही विचार मनात येतो. म्हणूनच पोलीस खातं काही अंशी डागाळलेलं आहे.
याला सामान्य माणूसही तितकाच जबाबदार आहे. नियम मोडायचे व पोलिसांना पैसे द्यायचे आणि स्वतःची सुटका करून घ्यायची, अशी मानसिकता लोकांची असते. भ्रष्टाचाराला खतपाणी लोकांकडून घातले जाते. या भ्रष्टाचारामुळे देश ही पुढे येत नाही असेही बोलतो.
पोलीस यंत्रणेवर आपला विश्वासही आहे. सगळेच पोलीस पैसेखाऊ नसतात हे ही आपल्याला माहीत आहे. किंबहुना ते आहेत, म्हणूनच आपण सुरक्षित आहोत.
आफ्रिका खंडातील एक देश आहे नायजेरिया. एकेदिवशी तिथल्या व्हिक्टर नावाच्या व्यक्तीची गाडी चोरीला गेली. त्याची तक्रार करण्यासाठी व्हिक्टर आपल्या मित्राबरोबर पोलीस स्टेशनमध्ये अाला. त्यावेळेस पोलिसांनी व्हिक्टरचे काहीही ऐकून न घेता त्याच्या मित्रालाच पकडले आणि तुरुंगात टाकले.
पोलिसांच्या मते तोच पहिला संशयित आहे. जोपर्यंत त्याने बेल मिळवण्यासाठी त्याने $40 भरले नाही, तोपर्यंत त्याची सुटका झाली नाही.
नायजेरिया मध्ये कुठलाही संशयित पकडला गेला तरी त्याला पोलिसांकडून बंदुकीचा धाक दाखवला जातो आणि पैसे घेतले जातात. पैसे मिळेपर्यंत त्या संशयिताचा अनन्वित छळ केला जातो.
खरंतर कुठल्याही संशयिताला केवळ संशयावरून छळ करण्याचा कायदा जगातल्या कुठल्याच देशात नाही, परंतु नायजेरीयन पोलीस हे असे नियम पाळत नाहीत. छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची उलट तिकडे चंगळ असते. त्यांनाच नोकरीमध्ये बढती मिळते.
तिकडे जर पोलिसांनी तुम्हाला बघितलं आणि पकडलं, तर तुम्हाला त्या पोलिसाला लाच देऊनच सुटका करून घ्यावी लागते आणि जर लाच देणार नाही असं सांगितलं, तर मग पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागते. मग ती पोलिसी कारवाई कोणत्याही प्रकारची असू शकते, इतकी की तुम्हाला गोळी घालून ठार केले जाईल किंवा तुरुंगात डांबून टाकले जाईल.
कितीही मोठा गुन्हा केला आणि पोलिसांना पैसे दिले तर तुमच्यावर कोणताही प्रकारचा गुन्हा दाखल न होता राजरोसपणे सुटका केली जाते. उलट तक्रार करणाऱ्या तक्रारदारांना पकडले जाते आणि त्याचा छळ केला जातो.
अक्षरश: दहा-वीस रुपयांकरिता देखील तिथे माणसांचे जीव जाऊ शकतात. इतका भ्रष्टाचार तिथल्या पोलीस खात्यात बोकाळला आहे.
तिथल्याच एका माणसाने केलेल्या वर्णनानुसार, “पोलीस पहिल्यांदा तुम्हाला संशयित म्हणून पकडतात, मग तुमच्याविरुद्ध काही तरी बनाव करता येतो का हे पाहतात. जर त्यांना काही नाहीच मिळाले, तर ते तुम्हाला भीती दाखवायला चालू करतात.
जर तुम्ही त्यांना पैसे देऊ केले नाहीत, तर ते तुम्हाला दंडुक्याने फोडून काढतात, परंतु जर तुम्ही दुर्दैवी असाल तर तुम्ही त्यांच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडता.”
आता तर दिवसाढवळ्या तिथले पोलीस लुटेरे बनत आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनाही ते अडवतात. रस्त्यारस्त्यांवर त्यांनी चेकपॉईंट उभारले आहेत आणि तिथे उभे असलेले पोलीस शस्त्रसज्ज असतात. त्यांच्याकडे गोळ्यांनी भरलेली AK 47 रायफल असते.
आपलं वाहन जाण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाला त्यांना पैसे द्यावेच लागतात. पैसे न देणाऱ्या व्यक्तींना धाक दाखवला जातो. अशी परिस्थिती नायजेरिया मध्ये आहे.
तर असा हा भ्रष्टाचार जगभरात प्रत्येक देशात थोड्याफार प्रमाणात तरी असतोच. कुठल्या देशात कुठल्या क्षेत्रात किती प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे यावर एक सर्वेक्षण घेतले जाते. त्यानुसारच प्रत्येक देशाची त्या त्या क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची वर्गवारी लावली जाते.
या सर्वेक्षणानुसार, पोलीस खात्यात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे होत असेल तर तो नायजेरिया मध्ये, असं सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
अशी परिस्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजे मुळातच नायजेरिया हा गरीब देश ओळखला जातो. पराकोटीची गरिबी आणि कायदा चालवण्यासाठी नसलेला पैसा हे यामागचं महत्वाचं कारण आहे.
तिथल्या पोलिसांना वेळेवर पगार सोडा, पण जे काही मिळतं ते ही अपुरच असतं. त्यांना धड ट्रेनिंग ही दिलं जात नाही. म्हणून मग थोड्या थोड्या पैशांसाठी पोलीसच चोरी करतात.
संपूर्ण पोलीस यंत्रणा खालीपासून वरपर्यंत लाचखोरीने बरबटली आहे. शिक्षण, आरोग्य या सुविधा मिळत नाहीत. तिथेही भ्रष्टाचार आहेच. पर्यायाने जनता चहूबाजूने गांजून गेली आहे.
नायजेरिया हा आफ्रिका खंडातील तसा मोठा देश, पण तिथेही राजकीय अस्थिरता आहे. तिथे सरकारसाठी होणाऱ्या निवडणुका देखील मोकळ्या वातावरणात होत नाहीत. त्यामुळे सगळ्याच क्षेत्रांना भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे.
नायजेरियातील सात राज्यांमध्ये आणि राजधानी अबुजा मध्ये हे सर्वेक्षण केले गेले. सामान्य लोकांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेतले गेले.
यामध्ये पोलीस, न्यायव्यवस्था, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रावर प्रश्नावली तयार केली गेली होती. त्यातून जी माहिती समोर आली त्यानुसार नायजेरियातील सर्वात भ्रष्ट खाते म्हणजे पोलीस खाते हेच समोर आले आहे.
या सर्वेक्षणानुसार, ६३% जनतेने पोलिसांशी संबंध आल्यावर पैसे द्यावे लागले किंवा पोलिसांनी पैशांची मागणी केली असे सांगितले. त्याच्या खालोखाल न्याय, शिक्षण, आरोग्य हे लोकाभिमुख क्षेत्रे देखील भ्रष्टाचाराने बरबटली आहेत.
त्यामुळेच आता तिथल्या सामान्य नागरिकाला वाटते, की आपल्याला जर चांगल्या समाजात राहावे असं वाटत असेल तर ही परिस्थिती सुधारायला हवी. मोकळ्या वातावरणात निवडणुका घेतल्या पाहिजेत. कायद्याचे पालन केले गेले पाहिजे. तिथल्या कर्मचाऱ्यांना योग्य ट्रेनिंग द्यायला हवे.
रस्त्यांवर फिरणारे सगळेच चोर नसतात. त्यांच्याशी चांगले वर्तन केले पाहिजे. लोकांची आणि पर्यायाने देशाची परिस्थिती सुधारावी असे वाटत असेल, तर त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असावी लागेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.