Site icon InMarathi

आसमंत मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रीकृष्णाला ‘बासरी’ कशी मिळाली? अज्ञात पौराणिक कथा

lord krishna im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

कृष्ण! दोन अक्षरांमध्येच अवघे विश्व सामावले आहे. द्वापार युगापासून ते आजपावेतो या दोन अक्षरांनी सगळ्या विश्वाला मोहून टाकले आहे.

लहानपणी गोप गोपिकांना आपल्या लीलांनी लळा लावताना तो त्यांचा लाडका बाळकृष्ण बनला, तर नरकासुराच्या बंदिवासातून सोळा सहस्त्र स्त्रियांची मुक्तता करून त्यांचा प्रतिपालक बनला.

कालियामर्दन, पुतनेचा वध आणि पुढे साक्षात कंसवध करून तो दुर्जनांचा काळ आणि सर्वसामान्यांचा त्राता बनला, तर रणांगणावर अर्जुनाला गीता सांगताना तो त्याचा मित्र आणि गुरू झाला.

राजघराण्यात जन्माला आलेल्या मीराबाईंसारख्या संतांनी आपले आयुष्य कृष्णभक्तीत समर्पित केले. कृष्णाचे अवतारकार्य द्वापारयुगात घडले, पण गीतेत त्यानेच सांगितल्याप्रमाणे “धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे” या वचनाची पूर्ती आपल्या राष्ट्रपुरुषांचे कार्य पाहून प्रत्यक्षात होताना दिसून येते.

 

 

कृष्ण… कृष्णाची ओळख म्हणजे सुदर्शन चक्र आणि बासरी. या दोन गोष्टी म्हणजे जणू काही कृष्णाच्या विविध पैलूंची प्रतिकेच आहेत. सुदर्शन चक्र कृष्णाचे रूप सूचित करते, तर कृष्णाची बासरी त्याच्या प्रेममयी स्वभावाचे रूपक आहे.

कृष्णाच्या बासरीची मोहिनी कोणाला नाही पडली! आपल्या सवंगड्यांसमवेत गाई-गुरे चरायला घेऊन जात असताना कृष्णाची बासरी ऐकून पशुपक्षीही गुंग होऊन जात. यमुनेवर पाण्यासाठी आलेल्या गोपी याच बासरीचे स्वर ऐकून कृष्णाकडे धावून येत.

आसमंतात प्रसन्नतेची पखरण करणारी बासरी तेव्हापासूनच कृष्णाच्या प्रेममयी पैलूचे प्रतीक बनली आहे. बासरी हे एक सुषिर, म्हणजेच हवेवर वाजणारे वाद्य आहे आणि इतर कोणत्याही वाद्यापेक्षा अत्यंत सुटसुटीत व सोपे वाद्य आहे.

एक साधा लाकडाचा पोकळ तुकडा सुद्धा बासरीचे रूप घेऊ शकतो. हातातली बासरी ही भगवान श्रीकृष्णांची एक ओळखच जणू, पण कृष्ण आणि बासरी हे नाते नक्की कसे बरे जोडले गेले असावे? याबद्दल काही पौराणिक कथा सांगितल्या जातात.

त्रेतायुगातील श्रीरामावतारानंतर वसुदेव-देवकीच्या आठव्या पुत्राच्या रुपात भगवान श्रीविष्णूंनी कृष्णावतार घेतला. वसुदेवाने रातोरात त्या नवजात बालकाला आपल्या मित्राकडे, म्हणजेच गोकुळात नंद राजाच्या घरी पोचवले.

 

“देवकीचा आठवा पुत्र तुझा नाश करेल” या आधी झालेल्या आकाशवाणीमुळे कंसाने त्या अर्भकास मारण्याचा प्रयत्न केला, पण तो सफल न होता ते बालक अंतर्धान पावले, हे आपण जाणताच.

द्वापार युगात मृत्युलोकात अधर्माची वाढ झालेली असताना भगवंतांनी अवतार घेतल्यामुळे समस्त देवगण अतिशय आनंदित झाले होते. इथे गोकुळात नंदाच्या घरी बऱ्याच वर्षांनी मूल जन्मल्यामुळे समस्त गोकुळवासी देखील उत्साहित झाले होते.

नंदाच्या घरी अवतीर्ण झालेल्या बालरूपातील भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी ऋषि-तपस्वी तसेच सगळ्या देवता येऊ लागल्या. प्रत्येकजण येताना बाळाचे कौतुक करण्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन येऊ लागले.

सगळ्या देवतांप्रमाणेच भगवान शंकरही बाळकृष्णाची भेट घेण्यास उत्सुक होते. जाताना त्यांना भेट देण्यासाठी काय घेऊन जावे असा भगवान शंकरांना प्रश्न पडला. आपण जी भेट देऊ, ती कृष्णाला कायम आपल्याबरोबर ठेवता येईल अशी असावी हे त्यांना वाटत होते.

मथुरेकडे जात असताना त्यांना वाटेत दधिची ऋषींच्या अस्थी मिळाल्या. दधिची ऋषि हे त्यांच्या त्यागासाठी ओळखले जातात. देव-दानवांच्या युद्धात त्यांनी स्वतःचे शरीर अर्पण केले.

त्यांच्या अस्थींपासून देवांनी आपली अमोघ शस्त्रे तयार करवून घेतली. इंद्राचे वज्र तसेच गांडीव, पिनाक व सारंग अशी तीन धनुष्ये या हाडांपासून तयार केली होती.

 

 

भगवान शंकरांनी त्यांना मिळालेल्या अस्थींपासून आपल्या मायेने एक सुंदर बासरी तयार केली. नंतर नंदाच्या घरी जाऊन शंकरांनी ती बासरी कृष्णाला भेट दिली. साक्षात भगवान शंकरांनी दिलेला हा प्रसाद समजून श्रीकृष्णांनी ती बासरी आजन्म आपल्या बरोबर ठेवली.

याबरोबरच आणखी एक कथा या बाबतीत सांगितली जाते. एकदा भगवान श्रीकृष्ण एका वाटिकेतून फिरत होते. फिरत असताना आसपास पानाफुलांनी बहरलेल्या अनेक वेली होत्या. प्रत्येक वृक्षवेलीजवळ जाऊन श्रीकृष्ण फुलांना प्रेमाने कुरवाळत होते.

ते पाहून तिथे असलेल्या एका बाभळीच्या झाडाला वाईट वाटले. आपल्या पदरी काटे आणि रुक्षपणा असल्याने भगवान आपल्याजवळ येत नाहीत याची त्याला खंत वाटे. त्याने ही खंत श्रीकृष्णांना बोलून दाखवली.

श्रीकृष्ण त्याला म्हणाले, की त्यालाही प्रेम मिळेल, पण त्यासाठी त्याला थोडे कष्ट सहन करावे लागतील. बाभळीचे झाड तयार झाले. श्रीकृष्णांनी त्याची एक फांदी तोडली. तो वृक्ष यामुळे कळवळला, पण त्या फांदीपासून कृष्णांनी एक सुंदर बासरी बनवली आणि ती कायम आपल्याजवळ ठेवली.

 

 

अशा प्रकारे बाभळीच्या बासरीला कृष्णांनी आपल्या अत्यंत निकट स्थान दिले. या आख्यायिकेतील अर्थ जाणला तर तो असा होतो, की अनन्यभावाने शरण जाणाऱ्या भक्तावर भगवंत कायम कृपादृष्टी ठेवतात.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।। हे आपले वचन भगवंत कधीच विसरत नाहीत.

बाभळीच्या झाडाला सुरुवातीला कष्ट पडले, पण नंतर भगवंतांच्या निकट राहण्याचे सौख्य प्राप्त झाले. त्याचप्रमाणे जो आपले सर्वस्व भगवंताचरणी अर्पण करतो त्याची सगळी जबाबदारी भगवंत आपल्या शिरावर घेतात, हीच शिकवण या दुसऱ्या आख्यायिकेतून मिळते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version