आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
प्रेमात वेड्या झालेल्या कित्येक युगुलांच्या कथा आपण ऐकल्या आहेत, पण त्यातल्या काही फक्त पुस्तकांपर्यंतच सीमित आहेत, तर काही भरपूर जुन्या काळी घडून गेलेल्या आहेत.
किती तरी नवऱ्यांनी आपल्या लाडक्या बायकोच्या हट्टा साठी म्हणा, तिच्या आठवणीत म्हणा किंवा तिच्या प्रती असलेल्या प्रेमापोटी म्हणा, काय काय केले. कोणी महाल बांधले, कोणी तिच्या ओढीने भारत ते इंग्लंड अशी सायकलची वारी केली.
इतक्या विविध रंजक आणि रोमँटिक कथा आपण ऐकून आहोत, पण हल्लीच्या काळात, जिथे लहानशा गैरसमजामुळे घटस्फोट व्हायला क्षणाचाही विलंब लागत नाही तिथे “एखाद्या व्यक्तीने आपल्या बायकोच्या प्रेमापोटी चक्क हत्ती विकत घेण्याची आजची कथा जरा निराळीच वाटते, नाही?”
बांग्लादेशच्या, लालमोनिर्हाट येथील रतिधर देवती गावातील, दुलालचंद्र रॉय या शेतकऱ्याने आपल्या पत्नी तुलसी रानी यांच्यासाठी चक्क आपली जमीन विकून एक हत्तीच विकत घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी तुलसी रानीला एक स्वप्न पडलं, ज्यात देवाने त्यांना हत्ती पाळण्याचे संकेत दिले. तुलसी रानीची तब्ब्येत सुद्धा बऱ्याच दिवसांपासून खालावत चालली होती. दुलालचंद्रांना त्यांची सतत काळजी लागून होती.
त्यांची तब्येत सुधारावी म्हणून एके दिवशी घरात कोणालाही माहित नसताना ते एक हत्ती घेऊन आले. तुलसी रानींना हे स्वप्न पडून सुद्धा वर्षभराचा काळ लोटून गेला होता, पण तरीही दुलाल हे त्या स्वप्नाबद्दल विसरले नाहीत.
त्यांना विचारणा केल्यावर त्यांच्या पत्नीला हे समजले, की हा हत्ती दुलाल यांनी आपली प्रॉपर्टी विकून, म्हणजे त्यांच्या पाशी असलेल्या ४ बिघा शेतातील ३ बिघा (१ बिघा = २० गुंठे) शेत विकून आणलेला आहे आणि ज्याची किंमत जवळपास १३ लाख रुपये इतकी आहे.
एखाद्या शेतकऱ्याने हत्ती घेण्याचीही पहिलीच घटना असून, ती तिथल्या लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलेली आहे.
दुलालचंद्रांच्या म्हणण्यानुसार, “माझ्या पत्नीला स्वप्न पडलं आणि तिने घरी मंदिरं स्थापित करून तिथे पूजा -अर्चा करणे सुरू केले. तिचा देवावर भरपूर विश्वास आहे आणि माझे तिच्यावर भरपूर प्रेम आहे. तिला बरे वाटावे म्हणून मी माझ्या परीने हा प्रयत्न करून पाहिला आहे.”
त्यांच्या लग्नाला २० वर्ष झाली असून त्यांना दोन मुलं देखील आहेत. पण आजही दुलाल चे आपल्या पत्नी प्रती असलेले प्रेम जराही आटलेले नाही.
त्यांनी मौलवी बाजारातून, या हत्ती बरोबरच १३००० रुपये प्रति महिन्याप्रमाणे, इब्राहिम मिया या एका माहूताला कामावर ठेवलं आहे. जेणेकरून हत्तीची देखरेख आणि हत्तीचा सांभाळ नीट होईल.
या गावातील दोन तरुणांनी हत्ती पालनाचे प्रशिक्षण सुद्धा सुरू आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले, की इब्राहिम मिया आपल्या गावी परततील असे त्यांनी सांगितले.
“कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायको साठी असं काही कारणं फार क्वचितच घडतं आणि आम्ही सगळंच हे पहिल्यांदा पाहत आहोत. याचं आम्हाला खूप आश्चर्य वाटतंय” असं त्यांचे शेजारी म्हणतात.
त्यांच्या गावापासून थोड्या दूरवर असलेल्या गावातील लोकं सुद्धा ह्या हत्तीला बघण्याकरता दुलालचंद्रांच्या घरी हजेरी लावतात.
त्यातील एक प्रवासी म्हणतात, “मी कौतुकाने हत्तीला बघायला आलो होतो, मला हा ही प्रश्न पडला होता ,की हत्तीला सांभाळणं, त्याचे पालनपोषण करणं हे अत्यंत खर्चिक काम आहे. एक साधा शेतकरी हे कसे काय निभावेल? पण त्यांच्या पत्नी प्रती असलेलं त्यांचं प्रेम हे आजच्या जगात दुर्मिळच!”
हत्तीचा सांभाळ करण्याबद्दल अनेक लोकांनी दुलालचंद्रांना प्रश्न विचारले या सगळ्यावर त्यांचं एकच उत्तर होतं,
“तुलसीचा देवावर पूर्ण विश्वास आहे, श्रध्दा आहे. जर देवाने आम्हाला हे शिवधनुष्य उचलण्याची बुध्दी दिलीये, तर ते पेलण्याचे सामर्थ्यही देवच देईल. आम्ही सगळे मेहनत करूच.”
पत्नीवर हे असं प्रेम आजच्या जगात एखाद्या मौल्यवान मोत्यासारखे दुर्मिळ आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.