Site icon InMarathi

शरीरावर या ११ जागांवरील तीळ तुमच्याबद्दल काय सांगतोय बरं?

Mole inMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

काहीजणांच्या शरीरावर जन्मतःच काही खुणा दिसून येतात. त्यातही जवळपास प्रत्येकाच्या अंगावर एक गोष्ट असतेच, ती म्हणजे तीळ. नावाप्रमाणेच तिळाच्या आकाराचा काळपट- तपकिरी रंगाचा एक छोटा ठिपका शरीराच्या कोणत्याही अवयवावर दिसून येतो.

वैज्ञानिकदृष्ट्या तिळाच्या निर्मितीमागे त्वचेच्या पेशींची एका जागी जास्त प्रमाणात झालेली वाढ कारणीभूत असते. त्वचेत सर्वत्र पसरून वाढ न होता पेशी एका ठिकाणी समूहाने वाढल्यास तिळाची निर्मिती होते.

सामान्यतः तीळ आढळण्याची सगळ्यात जास्त शक्यता चेहऱ्यावर असते. चेहऱ्यावरचा टपोरा तीळ एखाद्याचे सौंदर्य खुलवतो. काहीजण तर मुद्दाम या एका कारणासाठी तीळ गोंदवूनही घेतात.

 

 

जन्मखूण आणि सौंदर्यात भर घालणारी एक गोष्ट याव्यतिरिक्त अंगावरील तीळ बरेच काही सांगून जातो. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर असणारे तीळ हे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल भाष्य करतात, असे मानले जाते.

याबरोबरच माणसाच्या नशिबाबद्दलचे भाकितही हे तीळ करतात असेही मानले जाते. पाहूया शरीराच्या वेगवेगळ्या भागावर असणारे तीळ नक्की काय सांगतात!

१  डोक्यावरील तीळ –

मस्तकावरचा तीळ हा केस संपूर्णपणे कापल्यावरच दिसू शकतो. जर मस्तकाच्या मध्यभागी टाळूवर तीळ असेल तर असा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो. अशा व्यक्तींच्या नशिबी राजयोग असतो. त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होऊ शकतात.

जर तीळ डोक्याच्या डाव्या बाजूस असेल, तर अशा माणसासाठी आयुष्य थोडे कष्टप्रद असू शकते. पैसा मिळवताना अडचणी येऊ शकतात. या प्रकारातल्या व्यक्ती अविवाहित राहतात, तसेच काहीजण वैराग्याकडे वळतात.

डोक्याच्या मागील बाजूस तीळ असणाऱ्या व्यक्ती पैसे कमावतात, पण त्यांना समाजात तितकीशी प्रतिष्ठा मिळेलच याची शाश्वती देता येत नाही.

२ कपाळावरील तीळ –

माणसाच्या कपाळावरचा तीळ त्याच्या संपत्तीविषयी भाष्य करतो असे मानले जाते. जर तिळाचे स्थान कपाळाच्या उजव्या बाजूस असेल आणि कपाळ रुंद असेल, तर ते धनसमृद्धी आणि कीर्तीचे प्रतीक असते.

अशा माणसाच्या नशिबी उत्तम धनलाभ असण्याबरोबरच त्याला समाजात चांगली प्रतिष्ठा मिळू शकते. असा तीळ असणारी माणसे दानशूर असतात. संपत्ती कमावण्याबरोबरच ते तिचा चांगला विनियोगही करतात.

 

 

याउलट जर तीळ कपाळाच्या डाव्या बाजूस असेल आणि कपाळ रुंद नसेल तर मात्र या गोष्टी बदलतात. अशा माणसांकडे संपत्ती आली, तरी ती साठवून ठेवण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. यामुळे इतर लोक त्यांना मान देत नाहीत.

कपाळाच्या मध्यभागी असणारा तीळ हा भाग्यसुचक आहे. अशी माणसे कामसू, जिद्दी आणि महत्वाकांक्षी असतात.

३  भुवयांवरील तीळ –

 

 

जर तीळ भुवयांच्या मधोमध असेल, तर ते उत्तम नेतृत्वगुणांचे प्रतीक असते. अशी माणसे विजिगिषु वृत्तीची असून त्यांना सगळ्या प्रकारच्या ऐश्वर्याचा लाभ होऊ शकतो.

जर उजव्या भुवई वर तीळ असेल, तर अशा व्यक्तीचे लवकर लग्न होऊ शकते तसेच वैवाहिक जीवन सुखाचे होते. अशा माणसाने आपल्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्यास अपेक्षित लाभ मिळू शकतात.

जर तीळ डाव्या भुवईवर असेल, तर मात्र असा माणूस काहीसा कमनशिबी असू शकतो. त्याला आपल्या पैशांचा विनियोग चांगल्या प्रकारे करता येत नाही. त्याला नोकरीधंद्यात काही प्रमाणात अपयशालाही समोर जावे लागू शकते.

४ पापणीजवळचा तीळ –

 

 

काहीजणांच्या डोळ्यांच्या पापणीजवळ तीळ आढळतो. उजव्या पापणीवरील तीळ हे समृद्धीचे लक्षण मानले जाते. असा माणूस संपन्न असतोच, पण त्याबरोबर दानधर्म करण्यातही अग्रेसर असतो. खासकरून धार्मिक कार्यात त्याचा सहभाग जास्त आढळून येतो.

डाव्या पापणीवरील तीळ हे सामान्य आयुष्याचे निर्देशक आहे. असा माणूस फार संपन्न नसू शकतो. तसेच जर वरच्या पापणीच्या आतल्या बाजूस तीळ असेल तर ते भाग्याचे आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते.

हे  ही वाचा – नखावर असलेलं अर्धचंद्र तुमच्या आरोग्याबद्दल देतंय महत्वाची माहिती, वाचा

 

५  डोळ्यातील तीळ –

उजव्या डोळ्यात तीळ असलेल्या माणसाला कमी श्रमांमध्ये जास्त संपन्नता मिळण्याची शक्यता असते. अशा माणसाला नशिबाची मोठी साथ मिळालेली दिसून येते.

डाव्या डोळ्यात तीळ असणारा माणूस हा काहीसा उद्धट स्वभावाचा असू शकतो. असा माणूस हा काही वेळेस स्त्रीलंपट असण्याचीही शक्यता असते.

डोळ्याच्या कोपऱ्यात तीळ असणे हे शांत स्वभावाच्या माणसाचे लक्षण आहे, पण त्याचबरोबर अशा माणसाला अकाली मृत्यूचा धोका संभवतो.

 

 

६ डोळ्याखालील तीळ –

डोळ्याखाली तीळ असणे हे सामान्यतः कमनशिबी असण्याचे लक्षण मानले जाते. असा तीळ असणाऱ्या लोकांना अपघात, वाईट बातम्या यांना सामोरे जावे लागू शकते, पण तीळ नाकापासून दूर डोळ्याच्या टोकाशी असेल तर ते मात्र भाग्याचे लक्षण असू शकते.

 

.

 

७. चेहऱ्यावरील तीळ –

मुखांच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तींचे आयुष्य हे संतुलित मानले जाते. असे तीळ असणाऱ्या स्त्रिया उपजतच सुंदर आणि बुद्धिमान असतात.

याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध असणारा तीळ, गालावरील तीळ ही तर सौंदर्याची लक्षणे आहेतच.

 

 

गालावर असणारा तीळ माणसाची संवेदनशीलता दाखवतो. अशा व्यक्ती आपल्या आईवडिलांचा कायम मान राखतात.

८. नाकावरील तीळ –

 

 

नाकावरचा तीळ माणसाच्या मानसिक चपळतेची खूण आहे. अशी माणसे फार वेगाने विचार करणारी असतात. त्याचबरोबर या व्यक्ती फार लवकर क्रोधित होतात. नाकाच्या उजव्या बाजूला असणारा तीळ हा कमी श्रमांमध्ये उत्कर्ष मिळण्याची शक्यता दर्शवतो तर डाव्या बाजूच्या तीळ मात्र काहीसा अशुभ मानला जातो.

८. कानावरील तीळ –

कानावर तीळ असणे हे ऐश्वर्यसंपन्न आयुष्याचे लक्षण मानले जाते. अशा व्यक्ती पैसे खर्च करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. कानाच्या मागे तीळ असणाऱ्या व्यक्ती परंपरावादी असू शकतात.

 

 

तसेच कानाच्या वरच्या बाजूस, अग्रावर तीळ असणाऱ्या व्यक्ती कुशाग्र बुद्धिमत्तेच्या असल्याचे मानले जाते.

९. हनुवटीवरील तीळ –

 

 

हनुवटीवर असणारा तीळ असे दर्शवतो की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभत आहे. अश्या व्यक्तीला कमी श्रमांमध्ये चांगले ऐश्वर्य प्राप्त होते, तसेच त्याला कुटुंबाची आणि समाजाची चांगली साथ लाभते.

जिभेवरील तीळ –

जिभेच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या माणसाला बोलण्यात अडचण जाणवू शकते, पण जिभेच्या अग्रावर तीळ असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वश करून घेऊ शकतो.

 

 

त्याला जणू काही वाचासिद्धी प्राप्त झालेली असू शकते. अशी माणसे बुद्धिमान असतात.

१०, मानेवरील/गळ्यावरील तीळ –

गळ्याच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या व्यक्तीचे नशीब फार जोरावर असते. बऱ्याचदा त्यांना अकस्मात नशिबाची साथ मिळू शकते.

 

 

मानेवर मागच्या बाजूला तीळ असणाऱ्या व्यक्ती सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या असतात.

११. शरीराच्या इतर भागावरील तीळ –

 

 

खांद्यांवर असणारा तीळ माणूस व्यवहारी असण्याचे लक्षण आहे. असा माणूस इतर व्यक्तींशी मिळूनमिसळून वागणारा आणि लवकर मित्र जोडणारा असतो.

दंडावर तीळ असणे हे माणूस नम्र आणि शांत असण्याचे द्योतक आहे. कोपरावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना भ्रमंती करणे आवडते. मनगटावर तीळ असणाऱ्या व्यक्ती काटकसरी असतात, तर बोटांवर तीळ असणे हे अप्रामाणिक असल्याचे लक्षण मानले जाते.

छातीवर तीळ असलेला माणूस हा काहीसा निवांत, पण आयुष्य मजेत घालवणारा असू शकतो. पाठीवर तीळ असणारी माणसे चांगले निर्णय घेऊ शकतात, तसेच ती बुद्धिमान व कल्पकही असतात.

 

उजव्या पायावरील तीळ सर्व क्षेत्रात यशस्वीतेचे प्रतीक आहे तर डाव्या पायावरील तीळ नोकरीधंद्याच्याच्या निमित्ताने होणारी भ्रमंती दर्शवतो.

याशिवाय काहींच्या मते शरीरावर १२ पेक्षा जास्त तीळ असणे अशुभ असते.

शरीराच्या विविध भागांवर असणाऱ्या तीळांबद्दल असे अनेक समज-श्रद्धा आहेत. अर्थात याबाबतीत विश्वास ठेवणे न ठेवणे हे प्रत्येकाच्या हाती आहे!

 

हे ही वाचा – प्रत्येकाचे बोटांचे ठसे वेगळे असतात, यापलीकडे फिंगरप्रिंट्सबद्दल हे माहिती आहे का?

===

टीप : ही माहिती केवळ विषयाची प्राथमिक ओळख म्हणून दिली आहे. अंधश्रद्धा पसरवण्याच्या आमचा हेतू नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version