आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
टेक्नॉलॉजीमुळे आपण नवीन गोष्टी आमलात आणतो आणि जुन्या गोष्टींना विसरतो असा एक समज प्रचलित आहे, पण लक्ष देऊन बघितलं तर प्रत्यक्षात बदल फार कमी झाले आहेत. फक्त गोष्टी अमलात आणण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर होतोय.
आपण आधी सण साजरे करायला एकत्र यायचो, आताही तेच करतो फक्त ऑनलाईन. आधी गोष्टीची पुस्तकं वाचायचो, आता लोक ‘किंडल’ वाचतात.
आपल्या लहानपणी अजून एक गोष्ट फार फेमस होती ती म्हणजे ‘आजीबाईचा बटवा’. सर्दी, खोकला सारख्या साध्या दुखण्याला घरच्या घरी आपली आजी डॉक्टर व्हायची.
लहानपणी अजून एक गोष्ट समान होती, ती म्हणजे प्रत्येक घरातील आजी ही नेहमी स्वेटर विणत असायची. एका धाग्याचं रूपांतर ती बघता बघता एका सुंदर स्वेटर मध्ये करायची. आपण कितीही ‘राहू दे’ म्हंटलं तरीही ती ते स्वेटर पूर्ण करूनच थांबायची. कोणत्याही गोष्टीचं ‘वर्तुळ’ पूर्ण करणे म्हणजे काय हे खरं तर आपण तिथूनच शिकलो आहोत.
आपल्या आजीच्या या टॅलेंटला टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन कृतिका सोढी या दिल्लीच्या २८ वर्षीय मुलीने लोकांसमोर आणलं आहे. दैनंदिन जीवनातून मधून ‘बदल’ म्हणून आपल्या आजीकडे रहायला गेलेली कृतिका ही एक यशस्वी बिझनेस सुरू करू शकेल याचा तिने कधी विचार पण केला नसेल. काय आहे WLFG या स्टार्टअपची स्टोरी ? जाणून घेऊयात.
आशा पुरी या कृतिका सोढी यांच्या आजी आहेत. त्या वेस्ट दिल्ली मध्ये राहतात. घरातील प्रत्येक आजी तिथे नेहमी स्वेटर, स्कार्फ, सॉक्स असं काही ना काही विणकाम करतच असते.
मध्यंतरी मिळालेल्या अतिरिक्त वेळेत कृतिकाने स्वतः हे सगळं शिकून घेतलं आणि तिच्या लक्षात आलं, की हे फक्त एक इंटरेस्टिंग कामच नाहीये तर यातून तणावही कमी होतो.
२०१७ मध्ये कृतिका एका अस्वस्थ मानसिकतेत अडकली होती. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी ती असं काहीतरी काम शोधतच होती. आजीला बघितल्यावर कृतिकाच्या लक्षात आलं की, तिला सुद्धा विचार, काळजी असेल, पण ती ते सगळे विचार स्वेटर विणत असताना विसरते आणि ते पूर्ण झालं, की तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो.
हातात इतकी कला असूनही आपल्या आजीचं कधी फार कौतुक झालं नाही हे कृतिकाला जाणवत होतं. “मी माझ्या आजीला तिची ओळख मिळवून देईन.” असं तिने ठरवलं.
MBA चं शिक्षण पूर्ण केलेल्या कृतिकाने आजीने तयार केलेल्या स्वेटरला विकण्यासाठी ‘With Love, From Granny (WLFG)’ ही कंपनी सुरू केली. सोशल मीडियावर प्रमोशन करतांना आजी व नात एकत्र प्रॉडक्ट फोटो, माहिती पोस्ट करतात.
त्यांच्या स्वेटर प्रमाणेच या दोघींची जोडी सुद्धा सध्या खूप लोकप्रिय झाली आहे. कुशल गृहिणी ते बिजनेस वूमन हा प्रवास सर्वांनाच ‘आपणही असं काही करावं’ अशी प्रेरणा देत आहेत.
७५ वर्ष वय असणाऱ्या आजीचा उत्साह खूप दांडगा आहे. १९ व्या वर्षी लग्न करून दिल्लीत आलेल्या आशा पुरी या मागच्या ५० वर्षांपासून फक्त कुटुंबाची सेवा करत होत्या, त्यांना स्वतःचं काहीतरी करायची इच्छा होती, पण घरातील इतर सदस्यांचा त्याला विरोध होता.
कृतिकाने आजीने तयार केलेल्या स्वेटर, बॅक स्कार्फचे फोटो इन्स्टाग्राम, फेसबुकवर पोस्ट करायला सुरुवात केली आणि तिथून त्यांना चांगला प्रतिसाद मिळायला लागला. आपला पहिला बॅक स्कार्फ ६०० रुपयांना विकल्यावर आजींचा आनंद गगनात मावत नव्हता.
पहिल्या महिन्यातच ५० पेक्षा जास्त स्वेटर्स या दोघींनी मिळून ऑनलाईन पद्धतीने विकले, पण तिथे या प्रवासाला एक ब्रेक लागला. कृतिका सोढीला अमेरिकेतून जॉब ऑफर आली आणि ती अमेरिकेत जॉब करण्यासाठी निघून गेली.
३ वर्ष WLFG चं काम ठप्प झालं होतं, पण यावर्षी मार्च मध्ये आलेल्या कोरोनाने कृतिका सोढीला तिचा अमेरिकेतील जॉब सोडून भारतात यावं लागलं होतं. मार्च ते जुलै मध्ये कृतिका कडे काहीच काम नव्हतं. त्यावेळेस तिने WLFG मध्ये अजून १० लोकांना सामील करून घेतलं आणि कामाचा वेग वाढवला.
आपल्या मैत्रिणींना जेव्हा कृतिका “विणकाम करते” असं सांगायची, तेव्हा कित्येक जण “तुने क्या MBA करने के बाद ये दादी वाले काम शुरु कर दिये है.” असं म्हणून लोकं टोमणे मारायचे. पण तिने याकडे लक्ष दिले नाही.
भारतात विणकाम म्हणजे म्हातारपणी वेळ जात नसल्यावर करायचं काम समजतात. त्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून कोणीच बघत नाही. ही हा समज बदलण्याची गरज आहे. तो समज बदलण्यासाठी कृतिका रोज मेहनत घेत आहे.
आज त्यांच्या टीममध्ये एक २९ वर्षीय डेंटिस्ट पुरुष सुद्धा काम करतोय. त्यामुळे आपली कला ही कधीच वय आणि प्रोफेशन बघून येत नसते. ती तुमच्यात उपजतच असते.
आशा पुरी यांनी कित्येक गरजू महिलांना ही कला शिकवून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या WLFG चा पूर्ण व्यवहार हा इंस्टाग्राम मार्फत सुरू आहे, पण लवकरच ते एक वेबसाइट तयार करणार आहेत.
नातं, छंद, व्यवसाय या तिन्ही गोष्टींना एकत्र करून तयार झालेल्या With Love, From Granny या स्टार्टअपकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.