Site icon InMarathi

शनिवारची बोधकथा : संकटात कोणीतरी सोबत असतं!

shanivar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : ही गोष्ट सांगेल तुम्हाला जगण्याचा मंत्र

===

“प्रत्यक्ष देवाचं दर्शन घडावां”, असा विचार प्रत्येकाच्या  मनात कधीतरी डोकावतोच. आयुष्यभर देवाची आराधना केल्यानंतर साक्षात परमेश्वराचं दर्शन म्हणजे आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याचा क्षण. असाच एक प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो.

 

 

देव खरंच असतो का? देव कधी कुणी पाहिलाय का? नास्तिक लोकांकडून असे अनेक प्रश्न विचारले जातात. तुमच्याही मनात कधीतरी एखादा असाच प्रश्न निर्माण झाला असेल तर ही कथा तुम्ही वाचलीच पाहिजे.

आयुष्यभर सत्कर्माची, सत्याची, परोपकाराची कास धरलेल्या एका व्यक्तीची मनोकामना पुर्ण होते, आणि अखेर त्याला देव भेटतो.

`याची देही याची डोळा’ या क्षण अनुभवल्यानंतर तो भक्त काही वेळात भानावर येताच, देव म्हणतो काय हवं ते माग.

भक्त म्हणतो, ” आपल्या या भेटीने मला सारं काही दिलं, आता आणखी कशाचीही अपेक्षा नाही. देवा, मला केवळ तुझ्यासोबत घेऊन जा, जिथे जिथे तु असशील, त्या प्रत्येक क्षणात मला तुझा सहवास लाभु दे “.

देवाने स्मितहास्य करत आपला हात भक्ताच्या पाठीवर ठेवला आणि ते दोघे चालू लागले.

फिरत फिरत ते दोघेही समुद्र किना-यावर पोहोचले. त्या रम्य संध्याकाळी अथांग समुद्राच्या साक्षीने भक्तीचा तो सोहळा रंगला होता.

 

 

त्यावेळी त्या भक्ताच्या आयुष्यातल्या अनेक आठवणींचा पट उलगडत होता.

जन्मापासून त्याने आयुष्यात उपभोगलेल्या सुखद आठवणींचा काळ मांडताना समुद्रकिना-यावरील वाळूत अचानक चार पावलं उमटली.

आश्चर्याने पाहणा-या भक्ताकडे बघत देव म्हणाला,” या चार पावलांमध्ये दोन पावले तुझी आणि दोन पावले माझी आहेत.”

उत्तर ऐकून साश्रुपूर्ण नयनांनी भक्ताने परमेश्वराकडे पाहिलं आणि तो नतमस्तक झाला. पुन्हा त्यांच्यातला सुसंवाद सुरु झाला.

भक्त म्हणाला, आयुष्य हे कधीही सारखे नसते, काही दिवस सुखाचे, तर काही अडचणींचे, समस्यांचे, कठीण परिक्षांचेही असतात, माझ्या जीवनात मी याचा पुरेपुर अनुभव घेतला आहे.

असं म्हणत, भक्ताने आपल्या आयुष्यातील कठीण काळातील अनेक आठवणींचा खजिना देवासमोर खुला केला. दुःखाचे, कष्टाचे, वेदनांचे ते क्षण पुन्हा एकदा आठवताना भक्ताला गहिवरून आलं.

तेवढ्यात त्याची नजर शेजारच्या वाळूवर पडली. काही वेळांपुर्वी जसे त्या वाळूत पायांचे ठसे उमटलेले दिसले होते, तसेच ठसे याही वेळी त्याच्या नजरेस पडले, आणि त्याच क्षणी त्याला परमेश्वराचे वाक्य आठवले, की सुखांच्या क्षणी मी तुझ्या सोबत होतो, म्हणून आपल्या दोघांची एकूण चार पावलं दिसत आहेत.

आता मात्र त्याच्या चेह-यावर गोंधळ आणि दुःख अशा संमिश्र भावना उमटल्या. दुखावलेल्या स्वरात त्याने देवाला विचारलं, “माझ्या आयुष्यातल्या सुखाच्या प्रत्येक क्षणात तु माझ्या सोबत होतास, आपली कधीही भेट झाली नव्हती, तरीही तुझं अस्तित्व जाणवत होतं, मग नेमक्या दुःखाच्याच क्षणी तु मला एकट्याला का सोडलंस? माझी भक्ती कमी पडली का? संकटांच्या प्रसंगात तु मला असं वा-यावर का सोडलंस?”

त्याचा प्रश्नांचा भडीमार संपताच, परमेश्वराने हसून त्याच्याकडे पाहिले आणि काहीही न बोलता, त्याचा हात हाती घेत त्याला वाळूतील पावलांकडे नेले.

वाळूतील त्या पावलांच्या ठशांकडे बोट दाखवून देव म्हणाला, ” या पावलांकडे नीट बघ, संकट काळात दिसणारी ही दोन पावलं तुझी नसून माझी आहेत, कारण दुःखाच्या, संकटाच्या प्रत्येक प्रसंगात मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं, त्यामुळे वाळूत केवळ माझ्या एकट्याच्याच पावलांचे ठसे दिसत आहेत.”

त्या क्षणी भक्ताच्या अंगावर रोमांचं उभे राहिले, पुन्हा एकदा त्याने आपल्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगांची उजळणी केली आणि त्यावेळी त्याला प्रत्येक प्रसंगात परमेश्वराचे अस्तित्व जाणवलं. सुखातच नव्हे तर दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात परमेश्वाराने आपली साथ सोडली नाही किंबहूना आपल्याला त्या दुःखाची झळ बसू नये याची काळजी घेतली आणि आपण मात्र त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं ही चूक त्याला जाणवली आणि तो परमेश्वाराला शरण आला.

 


===

हे ही वाचा – शनिवारची बोधकथा : ही गोष्ट सांगेल तुम्हाला जगण्याचा मंत्र

===

आपल्याही आयुष्यातल्या कठीण प्रसंगात आपण देवाचा धाव करतो, त्यावेळ जरी त्याचं मुर्त रुप दिसत नसलं तरी त्याचं अस्तिक्व नाकारता येत नाही. कोणत्या ना कोणत्या रुपात परमेश्वर त्या संकटाच्या दरीतून आपल्याला अलगद, सुखरूप बाहेर काढतोच.
===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version