Site icon InMarathi

मोदी सरकारकडून “शिक्षणाच्या आईचा…”!!!

modi-bad-education-marathipizza00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मे मध्ये मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होतील… सर्व जण सर्व प्रकारे त्यांचे मूल्यमापन करतीलंच… तसं तर त्यांचं मूल्यमापन १०० दिवस झाल्यानंतरच सुरु झालं होतं. सर्व प्रकारचे सुरवातीचे अडथळे यशस्वी ओलांडत त्यांचा प्रवास सुरु आहे. एक मोदीसमर्थक म्हणून मला त्यांचा अभिमान आहेच. २०१४ च्या निवडणुकीनंतर सुरेश प्रभूंप्रती त्यांनी दाखवलेली गुणग्राहकता हा एक चर्चेचा विषय झाला होता. देशाच्या अत्यंत महत्वाच्या खात्यांमध्ये त्यांनी अगदी योग्य नेमणुका केल्या आहेत आणि करतीलच. अपवाद फक्त शिक्षणाचा.

 

२०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी मुख्यत्वेकरून शिक्षणाकडे आणि शिक्षकांकडे आवर्जून लक्ष दिले जाईल असे नमूद केले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुणोत्सव, वांछे गुजरात सारख्या संकल्पना व्यवस्थित राबवल्या होत्या, त्या लक्षात घेता मोदी पंतप्रधान झाल्यावर नक्कीच काहीतरी भरीव कार्यास सुरुवात तरी करतील असं वाटलं होतं. पण अगदी खेदाने सांगावे लागते, “भारतीय शिक्षण खंगतच आहे”.

खरंतर ह्या खात्यावर अश्या व्यक्तीची नेमणूक होणे गरजेचे आहे, कि जिला मूळ अडचणींची जाण आहे, शिक्षणाचं महत्व पटलंय, एक योग्य दृष्टिकोन आहे, रोडमॅप डोक्यात तयार आहे, मुळात स्वतः उच्चशिक्षित आहे…. ह्या सर्व साधारण अपेक्षा बाजूला ठेवून स्मृती इराणी सारखीला तिथे आणून बसवलं. का? तर तिने राहुल गांधीला “काटेंकी टक्कर” दिली म्हणून.

कर्तुत्व सिद्ध करायला दरवेळेस वक्तृत्व लागतंच असं नाही. सुंदर बोलता आलं कि सगळं झालं असं नसतं. स्मृती इराणींना मंत्रीपद द्यायचं नं द्यायचं हा मोदींचा विषय. पण दुसरं कुठलंही दिलं असतं तरी चाललं असतं. अर्थात नंतर स्मृती इराणींची उचलबांगडी करण्यात आली. आणि प्रकाश जावडेकरांना तिथं आणून बसवलं. ह्यांचं क्वालिफिकेशन? अभाविप…! त्यावरही हरकत नाही…अभाविपमध्ये इतर खूप योग्य उमेदवार आहेत कि! त्यांना विचारात नं घेता जावडेकरांची नेमणूक करण्यात आली. काहीच काम होताना दिसत नाहीये.

अजूनही अडचणी तश्याच आहेत…अजूनही शिक्षकांना गुलाम म्हणून वागवणारे शिक्षणाचे दलाल जोमात आहेत. खच्चून पैसे उकळणे चालू आहे, पब्लिक स्कुलच्या नावाखाली अश्या शाळा काढल्या जात आहेत कि जिथे सर्वसामान्य पब्लिकला कधीच प्रवेश घेता येत नाही.

tkbsen.in

जेव्हढ्या रुपयात माझं ग्रॅज्युएशन झालं, तेव्हढे पैसे आज ज्युनिअर केजीला लागतात. नॉन-ग्रांटेड शाळा कॉलेजेसचा आणि तिथे सर्व्हिस करणाऱ्या क्वालिफाइड शिक्षकांचा प्रश्न तर अजून गंभीर आहे. अजूनही “लोकल इन्स्पेक्शन कमिटी” च्या नावाखाली पाने पुसण्याचे कार्यक्रम जोरात जागोजागी आयोजित केले जात आहेत. शाळा कॉलेजेसची ग्रॅन्ट सरकार अजून कमी करत आहेत. ह्यापुढे नवीन ग्रॅन्टेड कॉलेजेस दिसणे स्वप्नवत होणार आहे.

आधीच्या ग्रॅन्टेड कॉलेजेसमधल्या रिकाम्या जागी प्राध्यापकांच्या नेमणुका केल्या जात नाहीयेत. नेमणुका करायला लाखो रुपयांची मागणी केली जाते. नवीन ग्रॅन्टेड कॉलेजेस येणार नाहीत म्हणजे खाजगी कॉलेजेसना उधाण. जागीजागी शिक्षणाच्या नावाखाली दुकाने उघडू लागली आहेत. आणि ह्यासगळ्यावर शासन काहीच करत नाहीये. एकीकडे हुशार आणि समर्पित लोकं शिक्षणक्षेत्रात मिळत नाहीत म्हणायचं आणि त्यांची मुस्कटदाबी करणाऱ्यांना मोकळं सोडायचं हे तंत्र जर मोदी सरकारचं असेल तर काँग्रेस काय वाईट होती? जिथे निदान अशी आशेची किरणे तरी नव्हती…! आजच विनोद तावडेंच्या वक्तव्य ऐकलं – “शिक्षणासाठी निधी कमी पडतोय” ! एकंदरीत ह्यापुढची काही वर्षे “शिक्षणाच्या आईचा घो” असंच म्हणावं लागेल बहुतेक.

प्राध्यापक, शिक्षक लोकं ट्रस्टी आणि विद्यार्थी लाभार्थी असं नं होता, प्राध्यापक, शिक्षक लोकं पुड्या बांधणारे नोकर आणि विद्यार्थी ग्राहक असेच काहीसे चित्र जवळपास दिसत आहे.

“शिक्षण सम्राट मालामाल आणि प्राध्यापक, शिक्षक लोकं त्यांचे हमाल” अशी व्यवस्था जोरात आहे.

खरंतर खूप काही बोलता येईल, खूप काही लिहिता येईल. पण लिहिणे शक्य नाही.. काही सकारार्थी पावले पडतील अशी अशा नाहीये. तरीपण राहवलं नाही… काय सांगावं, कोणी ऐकेलही म्हणून हा शब्दप्रपंच.

प्राध्यापकाचेही पोट हातांवरच असतं. त्यालाही कोणीतरी काढून टाकेल ह्याची भीती असते. काहीच आलबेल नसताना सर्व काही आलबेल आहे असे दाखवायचे असते. शक्यतो शिक्षकलोकं आत्महत्या करत नाहीत. सहन होईस्तोवर सहन करतात आणि दुसरा मार्ग शोधतात.

पण एक खरं…हे जर असंच चालू राहिलं तर काही वर्षांनी हे क्षेत्र समर्पित प्राध्यापकांविना ओस नक्कीच पडेल… आणि नंतर मग काय होईल हे मी वेगळे सांगायची गरज नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version