एका दिवसासाठी “शिवाजी महाराज” बनून अजरामर झालेला शिवबांचा मावळा…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“स्वराज्य” एक लहानसा शब्द पण आपल्या अपत्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी व त्यांच्या साठी प्राण देणाऱ्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं, आपल्या रक्तानं त्याचं सिंचन केलं.
एक संपूर्ण पिढी ह्या स्वराज्याच्या निर्माणासाठी खर्ची पडली. शिवाजी महाराजांना सुद्धा हा एवढा मोठा डोलारा एकट्याने उभा करणं शक्य झालं नसतं.
पण त्यांना आई जगदंबेच्या आशीर्वादाने असे सोबती लाभले, ज्यांनी वेळ पडता आपल्या प्रणांवर आपल्या राजा साठी, स्वराज्या साठी तुळशीपत्र ठेवलं.
बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद अशी अनेक नावे इतिहासाच्या नोंदीत आहेत. बहिर्जी नाईक हे त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेसाठी, जिवा महाला महाराजांना अफजल खान भेटीवेळी सैय्यद बंडा पासून वाचवण्यासाठी ओळखले जातात.
पण आणखीन एका मावळ्याने शिवाजी महाराजांचे प्राण स्वतः बलिदान देऊन वाचवले होते पण त्याचे नावही फार लोकांना माहीत नाही. तो वीर मावळा म्हणजे “शिवा काशीद”.
महाराजांचा न्हावी असलेल्या शिवा काशीदनं पन्हाळ्याहून विशाळगडाकडे जाताना महाराजांचे प्राण वाचवले होते. कसे ते पाहूया.
पन्हाळगड कोल्हापूरच्या वायव्येस, शहरापासून २० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. त्याच्याच पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावात शिवा काशीदा यांचा जन्म झाला.
लहानपणा पासूनच व्यायाम, कुस्ती, रोज गड चढून उतरून शिवा अगदी रांगडा पैलवान झाला होता. पिळदार शरीर, अंगात भरपूर ताकद असलेल्या शिवा काशीद यांचे एक वैशिष्ट हे होते की ते हुबेहूब महाराजांसारखे दिसत.
जणूकाही पुढच्या योजना नीट पार पडाव्या म्हणून नियतीनेच मुद्दाम हा योगायोग घडवून आणला होता. शिवा काशीद हे महाराजांचे न्हावी म्हणून त्यांच्या सेवेस होते.
१६६० साली, महाराजांनी अफजल खानाचा वध केला व ते पन्हाळ्यावर आले. याचा सूड घेण्यासाठी विजापूरच्या आदिलशहाने सरदार सिद्दी जोहरला पन्हाळ्यावर चाल करून जाण्याचे आदेश दिले.
सिद्दी जोहर ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशी आपली विशाल सेना घेऊन चालून येत होता, वाटेत अफजल खानाचा मुलगा, फाजल खान आपल्या ४० हजार सैनिकांच्या फौजेनिशी येऊन जोहरला सामील झाला.
फाजल खानकडे ब्रिटिश तोफा सुद्धा होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याने पन्हाळगडाला वेढा दिला व तिथेच दोन्ही सरदारांनी आपले तळ ठोकले आणि महाराज व त्यांचे मावळे गडावर अडकून पडले.
मावळ्यांना एकवढ्या अवाढव्य सेनेला तोंड देणे शक्य नव्हते. गडावर जाणारी अन्नाची रसद व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही खंडित करण्यात आला होता.
पण महाराजांनी हार मानली नाही. मार्च ते जुलै असे तब्बल पाच महिने महाराज गडावर अडकून होते.
काही तरी करून गडावरून निघणं फार गरजेचं होतं. त्यावेळी शिवरायांनी एक युक्ती केली की वेढा फोडून विशाळगडाकडे निघायचं. पण कसं, हे कोणालाच कळत नव्हतं.
बाजीप्रभू देशपांडेंनी जोहरचा भ्रम घडवून आणण्याची योजना आखली.
त्यानुसार शिवा काशिदच्या महाराजांसारख्या दिसण्याचा उपयोग करून घ्यायचा होता.
शिवराय म्हणून शिवा काशीद यांना आधी पाठवण्याचा व तोपर्यंत जोहरशी भेटीची चर्चा करून त्याचे लक्ष त्यात गुंतवण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. कशाचीच परवा न करता काशिदांनी होकार दिला.
“या कामगिरीत शत्रूच्या हाती लागलो तर आपले प्राणही जाऊ शकतात याचा त्यांना पूर्ण अंदाज होता”, पण स्वराज्य आपल्या जिवाहून महत्त्वाचे आहे ह्या भावनेने त्यांना प्रेरित केले.
शिवा काशिद यांना महाराजांचा पोशाख घालण्यात आला. ते हुबेहूब महाराजांसारखे दिसू लागले. खरे महाराज कोण आणि शिवा कोण हे ओळखणे अवघडच झाले होते.
१२ जुलै १६६० सालची ती रात्र होती. सगळी कडे काळोख, घनदाट जंगल, आकाशातून कोसळणारा पाऊस, ढगांचा नाद, विजांचा कडकडाट अशातच एक पालखी पन्हाळ्यावरून निघाल्याची बातमी जोहरच्या सैनिकांना लागली.
त्यांनी पालखीचा पाठलाग केला व त्या पालखीला पकडले. “आपल्याला शिवाजी सापडला” हा एकच जल्लोष त्यांच्या तळात पसरला. सगळे निश्चिंत झाले त्यामुळे गडाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.
अशातच ६०० मावळ्यांची एक दुसरी पालखी भरधाव वेगात पन्हाळ गडावरून थेट विशाळगडाच्या दिशेने निघाली.
मावळ्यांचे पाय गुडघ्या पर्यंत चिखलात बुडत होते, धावून धावून छातीत आग होत होती तरी ते धावतच राहिले. इकडे शिवाजीला पकडून जोहर समोर उभे करण्यात आले.
सिद्दी जोहरने कधीही महाराजांना पाहिले नसल्यामुळे तो जरा साशंक होता. सोबत पकडल्या गेलेल्या इतर सरदारांना, मावळ्यांना त्याने विचारणा केल्यावर त्यांनी सुद्धा “हो हेच आमचे महाराज आहे असे सांगितले”.
“शिवाजी इतक्या लवकर पकडलाच जाऊ शकत नाही”, हे त्याला वारंवार वाटत होतं. आणि त्याची शंका खरी ठरली. काहीच तासात एक बातमी आली की गडावरून दुसरी पालखी विशाळगाकडे निघाली आहे आणि महाराज त्यात आहेत.
जोहर रागाने चवताळला व शिवाजी म्हणून आलेल्या शिवा काशीद ला त्याने तिथेच, पोटात तलवार खुपसून मृत्यूच्या सुपूर्द केलं.
आपल्या सैनिकांना त्या दुसऱ्या पालखीचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. पुढे घोड खिंडीत बाजीप्रभूंनी आपले बलिदान देऊन सिद्दीच्या सगळ्या सैनिकांना तिथे अडवून ठेवले आणि महाराज सुखरूप गडावर पोहचले.
पण जर शिवा काशीद नसते तर महाराज पन्हाळगडावरून कसे सुटले असते माहित नाही.
आज आपण सैन्यांत, पोलिसात भरती होण्या आधी दहा वेळा विचार करतो, इतके आपल्याला आपले प्राण प्रिय असतात, इतकी सगळ्यांना मृत्यूची भीती असते.
पण निधड्या छातीच्या या निर्भिड मावळ्याने कसलीच परवा न करता, आलेल्या काळाला सुद्धा न घाबरता एका क्षणात आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव समर्पित केला.
त्या शिवा काशीदला या थोर विभूतिला आपण सदैव आपल्या स्मरणात ठेउन अजरामर करूया आणि असे अनेक शिवा काशीद भारत मातेला लाभो ही प्रार्थना करूया. जय भवानी, जय शिवराय!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.