' एका वेड्या गुन्हेगाराचा जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड डिक्शनरीशी “असाही” संबंध असू शकतो… – InMarathi

एका वेड्या गुन्हेगाराचा जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड डिक्शनरीशी “असाही” संबंध असू शकतो…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इंग्लिश ही मँडरिन आणि स्पॅनिश नंतर पृथ्वीतलावर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. अनेक देशांमध्ये इंग्लिश ही नैमित्तिक व्यवहाराची भाषा म्हणून वापरली जाते. ब्रिटिशांनी जगभर ज्या देशांमध्ये राज्य केले, तिथे इंग्लिश भाषा पोचवली आणि रुजवली.

शब्दसंपत्ती हे कोणत्याही भाषेचे मुख्य वैशिष्ट्य असते. बऱ्याच ठिकाणी त्या त्या प्रदेशातील विशिष्ट भाषेतील शब्दही इंग्लिश भाषेत रूढ झाले. सध्याच्या घडीला इंग्लिश भाषेत अक्षरशः अगणित शब्द आहेत आणि दररोज त्यात भरच पडत चालली आहे.

“ऑक्सफर्ड डिक्शनरी” हा इंग्लिश भाषेतील शब्दांचे अर्थ सांगणारा जगन्मान्य कोश आहे. १९२८ साली सर्वप्रथम प्रकाशित झालेला हा कोष सध्या तिसऱ्या वेळेस अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीत प्रत्येक शब्दाचे विविध अर्थ, त्याच्याशी साधर्म्य साधणारे अर्थ आणि तो शब्द बोलण्यात किंवा वाक्यात कशा प्रकारे वापरला जातो एवढा तपशील दिलेला असतो.

 

 

इंग्लिशसारख्या प्रचंड प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या भाषेतील शब्दांचा अर्थ सांगणारा कोष असावा अशी संकल्पना फार पूर्वी मांडली गेली. काही प्रमाणात त्यावर कामही झाले, पण तरीही कोणताच शब्दकोश तेवढा परिपूर्ण नव्हता.

१८५७ मध्ये लंडनमधील काही हौशी अभ्यासू लोकांनी भाषेबद्दल अभ्यास करणाऱ्या “फिलोलॉजीकल सोसायटी” या संस्थेच्या माध्यमातून एक इंग्लिश शब्दकोश बनवण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यांचे सुरुवातीचे अनुमान हा शब्दकोश ६४,००० पानांत आणि १० वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल असे होते, पण वाटते तेवढे हे काम सोपे नाही याची जाणीव त्यांना झालीच.

सन १८७० मध्ये या मंडळींनी “ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस” बरोबर करार केला आणि या कामासाठी त्यांच्या काही संकलकांची मदत घ्यायचे निश्चित केले. डॉ. जेम्स मरे नावाचा एक भाषातज्ज्ञ या सगळ्या संकलकांचे नेतृत्व करीत होता, पण सुरुवात केल्यापासून ५ वर्षांत त्यांना जेमतेम ‘ant’ या शब्दापर्यंत पोचता आले!

 

 

वाटते त्यापेक्षा हे काम खरोखरच जिकिरीचे होते. कारण एका शब्दाचे विविध अर्थ शोधताना वेगवेगळे अर्थ ज्या वाक्यांमध्ये वापरले गेले आहेत, ती वाक्ये शोधावी लागत आणि अर्थातच अशी वाक्ये शोधण्यासाठी अनेक नवी जुनी पुस्तके धुंडाळावी लागत!

मुद्रणाचा शोध लागण्याच्या आधीपासून इंग्लिश भाषेत अनेक प्रकारचे साहित्य निर्माण झाले होते. यात कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, कविता यांबरोबरच सरकारी दस्तऐवज, पत्रे यांचा समावेश होता. या सगळ्यांचा अभ्यास करून वेगवेगळे शब्द आणि त्याचे प्रसंगोपात्त अर्थ एकत्र करणे हे काम थोड्याथोडक्या लोकांकडून होणे शक्य नाही हे बघून डॉ. मरे यांनी वर्तमानपत्रात जाहिरात लिहून लोकांना या कामात मदत करण्याचे आवाहन केले.

याकामी त्यांना अनेक लोकांचे उत्तर आले. यात लंडनजवळील बर्कशायर मधून एका अमेरिकन माणसाचेही उत्तर आले. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पत्र तेथील “ब्रॉडमूर मनोरुग्णालयातून” आले होते आणि पत्र पाठवणाऱ्या माणसाचे नाव होते विल्यम चेस्टर मायनर!

विल्यम चेस्टर मायनर हा पेशाने डॉक्टर असून १८६३ मध्ये त्याने अमेरिकेतील येल विद्यापीठातून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने अमेरिकन सैन्यात डॉक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १८६४ मध्ये अमेरिकेत यादवी युद्ध झाले, ज्यात डॉ. मायनर याने अनेक जखमी सैनिकांची शुश्रूषा करण्याचे काम केले.

 

 

या युद्धात अनेक सैनिक मृत्यूमुखीही पडले. या सगळ्या घटनांचा मायनरवर खोल प्रभाव पडला. अशातच अजूनही एक घटना घडली. त्या काळात सैन्यातून पूर्वपरवानगी शिवाय बाहेर पडणाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावली जाई, तसेच त्यांच्या गालावर तापलेल्या लोखंडाने ‘D’ हे अक्षर कोरण्यात येई.

मायनरला त्याच्या मनाविरुद्ध वरिष्ठांच्या आदेशानुसार अशाच एका सैनिकांवर ‘D’ अक्षर कोरावे लागले. या सगळ्या प्रकारांमुळे मायनर मानसिकदृष्ट्या कमजोर झाला आणि त्याला ” पॅरानॉईड स्क्रिझोफेनिया” या आजाराने ग्रासले. यात रुग्णाला आपण सतत एखाद्या भीतीच्या छायेखाली वावरत असल्यासारखे वाटते आणि यामुळे त्याच्या हातून काही अनुचित गोष्टी घडू शकतात.

मायनरच्या या आजारामुळे तो १८७० मध्ये सैन्यातून निवृत्त झाला. त्याला पेन्शन म्हणून चांगली रक्कम मिळाली होतीच. यानंतर मायनर पुढील काळ व्यतीत करण्यासाठी लंडनला रवाना झाला.

लंडनमध्ये येऊनही मायनर स्क्रिझोफेनियाने त्रस्त होताच. एके दिवशी त्याने असुरक्षिततेच्या भावनेतून जॉर्ज मेरिट या माणसाची हत्या केली. कोर्टानेही मायनरची मानसिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याला निर्दोष ठरवले, पण त्याची रवानगी लंडनजवळील ब्रॉडमूर मनोरुग्णालयात केली.

मायनरने त्याच्याकडून हत्या झालेल्या माणसाच्या पत्नी आणि मुलांसाठी दरमहा काही रक्कम पाठवायची व्यवस्था केली.

मायनर आपल्या कॉलेज जीवनापासूनच अभ्यासू होता. सैन्यात काम करत असतानाही प्रत्येक सैनिकाच्या उपचारांच्या अहवालाची योग्य प्रकारे नोंद ठेवली होती. ब्रॉडमूर मध्ये आल्यावर त्याने तेथे आपला वाचनाचा छंद जोपासायला सुरुवात केली. वेगवेगळ्या विषयांवरील नवी-जुनी पुस्तके त्याने मागवून घेतली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मायनर कडून ज्या माणसाची हत्या झाली होती, त्याच्या पत्नीने देखील मायनरला पुस्तके मिळवून देण्यात मदत केली होती! यातच १८७९ मध्ये मायनरला पुस्तकांबरोबर डॉ. मरे यांनी शब्दकोशाबद्दल मदतीचे आवाहन केलेला एक कागद मिळाला.

मनोरुग्णालयात असला, तरी मायनर नैमित्तिक कामे अगदी व्यवस्थित करीत होता. डॉ. मरेनी केलेले आवाहन वाचून आधीच वाचनाचा नाद असलेल्या मायनरला एक नवीन उद्योगच मिळाल्यासारखे झाले.

याआधी डॉ. मरेजवळ अन्य लोकांनीही आवाहनाला अनुसरून आपले साहित्य पाठवले होते, परंतु अनेक हौशी लोकांनी डॉ. मरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना प्रभावित करण्यासाठी कठीण व सहसा न वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा उपयोग असलेली भरपूर वाक्ये पाठवली, पण सोप्या, नेहमीच्या वापरातल्या शब्दांचे अर्थ सांगणारी कमी वाक्ये पाठवली.

डॉ. मरेच्या म्हणण्याप्रमाणे शब्दकोशात प्रत्येक शब्दाचे मग तो प्रचलित असो वा अप्रचलित, त्याचे सगळ्या प्रकारचे अर्थ सांगणारी वाक्ये आली पाहिजे होती.

 

 

मायनरचे वाचन दांडगे असल्याबरोबरच गोष्टींच्या नोंदी ठेवण्याचे कसबही वाखाणण्याजोगे होते. मायनरने प्रत्येक पुस्तकात वापरलेल्या शब्दांची सूची केली होती. त्यामुळे एखादा शब्द त्या पुस्तकात कोणत्या पानावर कोणत्या अर्थी आला आहे हे तो सांगू शकत होता. अशा प्रकारे डॉ. मरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना मायनरच्या रूपाने एक चांगला स्वयंसेवक मिळाला.

पहिल्याच वेळेस “art” या शब्दाचा अर्थ शोधताना ऑक्सफर्डच्या संकलकांना तो १७ वेगवेगळ्या प्रकारे वापरलेला आढळला. मायनरच्या नोंदीवरून जेव्हा त्याने तपासले, तेव्हा त्याला तब्बल २७ वाक्ये सापडली ज्यात “art” हा शब्द वेगवेगळ्या अर्थी वापरला गेला होता. अशा प्रकारे मायनर आपले काम करू लागला आणि पुढे हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच झाला.

मायनरने पाठवलेले बहुतांशी काम डॉ. मरे आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून स्वीकारले जाई. त्यात चुकांचे प्रमाण फारच नगण्य असे. मायनर आपले काम पत्रव्यवहारातूनच पाठवत असे. त्यामुळे डॉ. मरे यांना १८९१ पर्यंत आपल्याला एवढे नियमित अचूक काम पाठवणारी व्यक्ती कोण आहे, कशी दिसते याचा पत्ताच नव्हता.

१८९१ साली डॉ. मरे प्रत्यक्षात ब्रॉडमूरला येऊन मायनरला भेटले तेव्हा त्यांना खरी गोष्ट कळली. मायनरच्या संग्रहात सोळाव्या-सतराव्या शतकातील प्रवासवर्णने मोठ्या प्रमाणात होती. प्रवासवर्णने वाचण्याचा त्याला छंदच होता, तसेच आणखी काही जुनी पुस्तकेही त्याच्या संग्रही होती. या जुन्या साहित्यामुळे मायनरने पाठवलेल्या नोंदीमध्ये अनेक शब्दांचे वेगवेगळे अर्थ, त्यांची व्युत्पत्ती अधिक अचूकरित्या मांडली गेली.

 

 

खुद्द डॉ.मरेच्या म्हणण्याप्रमाणे मायनरच्या योगदानामुळे जवळपास ४ शतकांमध्ये वापरली गेलेली वाक्ये आणि त्यातील शब्दांचे अर्थ ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट करता आले, जे अन्यथा लक्षात आले नसते!

१९०२ सालापर्यंत मायनर आपल्या नोंदी पाठवत राहिला. त्यानंतर त्याच्या आजारात वाढ झाली व यातूनच त्याने स्वतःला इजा करून घेतली. पुढे १९१० नंतर तो पुन्हा अमेरिकेत गेला. तिथेही तो एक मनोरुग्णालयातच होता. १९२० साली कनेटिकट येथे त्याचे निधन झाले.

दुर्दैवाने तिथे आलेल्या त्याच्या कबरीवर त्याच्या जन्म आणि मृत्युशिवाय त्याच्या ऑक्सफर्ड शब्दकोशातील योगदानाबद्दल काहीच उल्लेख नाही!

१९२८ साली जेव्हा ७० वर्षांनंतर हा शब्दकोश प्रकाशित झाला, तेव्हा त्याचे १० खंड झाले होते आणि जवळपास ४,००,००० शब्द नोंदले गेले होते! यात मायनरने दिलेल्या सुमारे १०,००० शब्दांच्या नोंदी समाविष्ट होत्या. स्वतः मनोरुग्ण असूनही वाचनाची आवड आणि नोंदी ठेवण्याचे कसब यांमुळे मायनरकडून हे उल्लेखनिय काम घडले.

सध्या ऑक्सफर्ड डिक्शनरी तिसऱ्या वेळेस अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे आणि ते २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. ही आवृत्ती पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपाची असल्याने त्याचे आधीप्रमाणे खंड येणार नाहीत.

सध्या इंटरनेटच्या युगात अशा प्रकारे शब्दकोशाचे काम करणे काही प्रमाणात सोपे झाले आहे, पण सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी हे काम एकएक पुस्तक चाळून करणे सोपे नव्हते. सकृतदर्शनी खुनी आणि मनोरुग्ण असलेल्या विल्यम मायनर चेस्टरचे काम पाहिले, की आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही हे बाकी खरे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?