Site icon InMarathi

“भारताची पहिली वकील” : अभिमानास्पद बिरुद, पण तिची कहाणी मात्र विचारात टाकते…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘मुलगी म्हणजे ओझं’ असं मानणारा एक काळ भारताने अनुभवला आहे. मुलगी झाली की आपल्या नशिबाला कोसणारे आणि त्या मुलीला जन्म देणाऱ्या आईला त्रास देणारे कमी प्रमाणात पण कित्येक कुटुंब आजही आपल्या आजूबाजूला आहेत.

महिलांवर समाजाने लादलेली ही बंधनं झुगारण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सारख्या व्यक्तींनी फार मौल्यवान योगदान दिले आहे.

मुलींनी शिक्षण घ्यावं आणि पूर्ण घराला प्रगती करण्यास मदत करावी हा विचार त्यांनी समाजा समोर ठेवला. सुरुवातीला त्यांना प्रचंड विरोध पत्करावा लागला.

पण, तरीही महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचा लढा सुरू ठेवला. नंतरच्या काळात, महर्षी कर्वे यांनी महिलांसाठी कमिन्स कॉलेज ची स्थापना करून मुलींना मुलांच्या बरोबर शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध करून दिल्या.

या महान व्यक्तींबद्दल आपण इतिहासात वाचलेलं आहे. पण, एक नाव आपण कदाचित ऐकलं नसेल. ते नाव आहे, कॉर्नेलिया सोराबजी यांचं. या पूर्ण भारतातून बॅरिस्टर झालेल्या पहिल्या महिला आहेत.

 

१५ नोव्हेम्बर १८६६ रोजी कॉर्नेलिया सोराबजी यांचा जन्म नाशिक येथे एका पारशी-ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. लहान पणापासूनच कॉर्नेलिया सोराबजी यांना अभ्यासाची खूप आवड होती.

याच कारणामुळे त्यांना पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये सर्वात पहिलं ऍडमिशन देण्यात आलं होतं.

या आधी डेक्कन कॉलेज मध्ये फक्त पुरुषांनाच शिकण्याची संधी मिळायची. कॉर्नेलिया सोराबजी ने मिळालेल्या या संधीचं सोनं केलं.

वेळेचा सदुपयोग आणि सतत अभ्यासात राहण्याच्या वृत्तीमुळे कॉर्नेलिया सोराबजी यांनी पाच वर्षांचा हा कोर्स एक वर्षातच पूर्ण केला होता आणि त्यांचे मार्क्स सुद्धा खूप चांगले होते.

डेक्कन कॉलेज पुणे हे स्थापने पासूनच जगातील नामवंत कॉलेजेसच्या यादीत होतं. डेक्कन कॉलेज मधून चांगल्या मार्क्स ने पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या काळात ओक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधून शिष्यवृत्ती दिली जायची.

 

 

या स्कॉलरशिप साठी कॉर्नेलिया सोराबजी या पात्र असूनही त्यांना ती दिली गेली नव्हती का तर त्या महिला होत्या. हा तो काळ होता जेव्हा महिलांनी वकिली करू नये असाच ट्रेंड होता.

पण, हा भेदभाव कॉर्नेलिया सोराबजी यांच्या इच्छाशक्ती पेक्षा मोठा नव्हता. त्यांनी ठरवलं की, “कसंही करून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन शिकायचंच.”

हे प्रत्यक्षात आणणं आजच्या इतकं सोपं नव्हतं.

पण, “Luck favors the brave person” या वाक्याप्रमाणे कॉर्नेलिया सोराबजी यांना सुद्धा चांगल्या मित्रांची साथ मिळाली आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन कॉर्नेलिया यांच्या ऑक्सफोर्ड मधील ऍडमिशन साठी पैसे गोळा केले आणि हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलं.

कॉर्नेलिया सोराबजी यांच्यासमोर पुढचं आव्हान होतं ते म्हणजे लॉ मधील कोणत्या विषयात specialization करायचं? कारण, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायला त्यांच्याकडे कोणीच मार्गदर्शक नव्हता.

शेवटी त्यांनी ‘बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ’ हा कोर्स निवडायचं ठरवलं. हा विषय निवडून बॅरिस्टर होणाऱ्या त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधील पहिल्या महिला विद्यार्थी होत्या.

अजून एक किर्तीमान म्हणजे त्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती होत्या. हा प्रवास इतका सोपा नव्हता.

 

 

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी १८८९ मध्ये एक अपवाद म्हणून कॉर्नेलिया सोराबजी यांना शिकण्याची अनुमती तर दिली. पण, कोर्स चं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फायनल परीक्षा ही इतर मुलांसोबत देण्याची परवानगी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने दिली नव्हती.

त्यांनी हे सांगितलं होतं की, जर बॅरिस्टर व्हायचं असेल तर त्यांना ‘एकट्यात’ परीक्षा द्यावी लागेल. या आदेशामुळे ही डिग्री इतर ठिकाणी अवैध समजली जाऊ नये म्हणून कॉर्नेलिया सोराबजी यांनी या आदेशाविरुद्ध आवाज उठवला होता.

ही मागणी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ला मान्य करावीच लागली आणि त्यांनी कॉर्नेलिया सोराबजी यांना इतर विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देण्याची परवानगी दिली.

१८९४ मध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधून शिक्षण पूर्ण करून कॉर्नेलिया सोराबजी या भारतात परतल्या.

भारतात आल्यावर पहिलीच केस जी त्यांनी हाती गेली ती म्हणजे ‘सक्तीने पडद्याआड राहण्याच्या महिलांना दिलेल्या शिक्षेविरुद्ध आवाज उठवणे.’ या महिलांना आपल्या आर्थिक संपत्तीचं रक्षण करणं सुद्धा खूप अवघड जायचं.

केस स्ट्रॉंग असूनही कॉर्नेलिया सोराबजी यांना कोर्टात येऊन त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार नव्हता का तर त्या एक महिला वकील होत्या. कॉर्नेलिया सोराबजी यांनी तरीही हार मानली नाही.

१९०२ मध्ये कॉर्नेलिया यांनी सरकारकडे त्यांना महिला आणि लहान मुलांच्या अधिकारासाठी कायदा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली.

१९०४ मध्ये बंगाल च्या कोर्ट ऑफ वॉर्डस मध्ये त्यांना महिला सहाय्यक म्हणून नेमण्यात आले.

या पदाची गरज बघता त्यांना बिहार, ओडिशा आणि असम च्या कायदा प्रक्रियेत सुदधा सहाय्यक पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला.

या दरम्यान कॉर्नेलिया सोराबजी यांनी जवळपास ६०० महिला आणि अनाथ व्यक्तींची मदत केली होती. पण, त्या केवळ महिला असल्याने कोर्टात त्यांची बाजू मांडून लढू शकत नव्हत्या.

१९२३ मध्ये गोष्टी बदलल्या. महिला सुद्धा वकिली करू शकतात असा कायदा पास झाला आणि भारत आणि ब्रिटन मधून पहिल्या आणि एकमेव महिला वकील म्हणून कॉर्नेलिया सोराबजी यांचं नाव जगासमोर आलं.

 

 

 

कोलकत्ता हायकोर्टात प्रॅक्टिस सुरू करणाऱ्या कॉर्नेलिया यांना हायकोर्ट च्या बार मेंबर्स मध्ये स्थान मिळत नव्हतं. कारण, की त्या एक महिला होत्या.

याविरुद्ध सुद्धा त्यांना लढा द्यावा लागला आणि अखेरीस त्यांची मागणी कोलकत्ता हायकोर्ट ने मान्य केली. सतत होणाऱ्या विरोधामुळे त्यांनी कोर्टात जाऊन काम करण्यापेक्षा लोकांना केवळ सल्ला देण्याचं काम निवडलं.

एक वकील म्हणून त्यांनी नेहमीच महिला आणि लहान मुलांच्या सक्षमीकरणाकडे लक्ष दिलं. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी आग्रह धरला, सती प्रथे विरुद्ध, विधवा महिलांची स्थिती याबद्दल त्यांनी नेहमीच आवाज उठवला.

इतक्या सामाजिक विषयाबद्दल योगदान देऊन देखील कॉर्नेलिया सोराबजी यांचं नाव इतिहासात कुठे तरी गायब झाल्याचं आपणही मान्य कराल.

कॉर्नेलिया सोराबजी यांनी १९२९ मध्ये निवृत्ती घेऊन इंग्लंड मध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘इंडिया कॅलिंग’ आणि ‘इंडिया रेकॉलेड’ ही दोन पुस्तकं त्यांनी लिहिली होती.

१९५४ मध्ये त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी लंडन मधील त्यांच्या निवासस्थानी शेवटचा श्वास घेतला.

 

 

या लेखात जितक्या वेळेस ‘कारण त्या महिला होत्या’ हे वाक्य आपल्या वाचण्यात येईल तितक्या वेळेस आपल्याला कॉर्नेलिया सोराबजी यांच्या टॅलेंट वर झालेल्या अन्यायाची जाणीव नक्की होईल.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा अन्याय केवळ भारतातच नाही तर ब्रिटन सारख्या विचारांनी पुढारलेल्या देशात सुद्धा झाला होता.

कोणत्याही क्षेत्रात अपयश आणि अडथळ्यांना सामोरं जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कॉर्नेलिया सोराबजी यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version