आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – सुशील जोशी
===
“३००” सिनेमा तर सर्वांनी पहिला असेल, ह्यात ३०० स्पार्टन सैन्य त्यांच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक सैन्याशी कसे लढते, हे दाखविले आहे.
अशीच एक कथा सोळाव्या शतकामध्ये भारतात, महाराष्ट्रात, सत्यात उतरून गेली आहे आणि ह्या कथेचा नायक होता शूरवीर बाजी प्रभू देशपांडे!
बाजी प्रभू देशपांडे, तसे हे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचे. आपण सर्वांनीं त्यांच्या वीरतेच्या आणि बलिदानाच्या गोष्टी ऐकल्या आहेत, बालपणी इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचल्या आहेत. त्या पावन इतिहासाला थोडा उजाळा देण्याचा एक प्रयत्न म्हणून पावनखिंडीतल्या त्या १३ जुलै १६६० च्या रात्रीचा लढा समोर ठेवत आहे.
–
- मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले!
- स्वत:चे शीर हातात घेऊन, “मातृभुमीसाठी” अहोरात्र लढणारा महान शीख योद्धा!
–
शिवाजी महाराजांनी नुकताच अफजलखानाचा वध केला होता, त्यामुळे विजापूर स्थित आदिलशहा रागाने आणि सूड भावनेने पिसाळलेला होता. त्याला कोणत्या ही किंमतीवर शिवाजीच मरण बघायचं होत. ह्या कामगिरीसाठी त्याने सिद्धी जोहर ह्या क्रूर सरदाराची निवड केली, सिद्धी जोहर १०,००० च घोडदळ आणि १४००० च पायदळ घेऊन, रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विध्वंस करत निघाला.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
त्यावेळेस राजे पन्हाळगडावर होते. जोहरानं पन्हाळगडास वेढा घातला. राजे गडावर अडकून पडले. राजांकडे फक्त ६०० मावळ्यांची शिबंदी होती.
मुसळदार पाऊस पडत होता, विजा कडाडत होत्या, सुसाट वर वाहत होता पण सिद्धी जोहर काही माघे हटण्यास तयार नव्हता. महाराजांसाठी मदत पोचणेही अशक्य होते. पन्हाळगडावर सारेच हतबल झाले होते. एका रात्री गडाच्या पहारेकऱ्यांना एक संन्यासी आडमार्गाने गडावर येताना दिसला.
जोहरचा वेढा चुकूवून हा गडावर कसा आला याचे आश्चर्य पहारेकऱ्यांना वाटत होते, त्याला महाराजांपुढे नेले गेले. महारांनाही त्याला ओळखले. तो संन्यासी नव्हता तर महादेव नावाचा एक हेर होता. त्याने वेढयातून निसटून जाण्याची एक वाट शोधली होती. प्रसंगी कोणताही धोका पत्करण्यास तयार असणारी माणसं महाराजांनी गाठीशी बांधली होती. महादेव त्यांपैकीच एक.
शिवाजी महाराज जेवढे त्यांच्या शौर्यासाठी ज्ञात आहेत तेवढेच त्यांच्या युक्ती साठी देखील प्रसिद्ध आहेत.
त्यांनी जोहरला एक खलिता पाठविला, त्यांनी म्हंटले की, सिद्धी जोहर मी तुझा गुन्हेगार आहे, मी पन्हाळगड तुला देत आहे आणि उद्या सकाळी शरण येत आहे
–
- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल : काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं
- हे १० योद्धे भारताच्या इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ मानले जातात
–
हे वाचून जोहर भलताच खुश झाला, जे काम अफ़जल खानाला जमले नाही ते मी करून दाखविले, अश्या गुर्मीत तो गेला, शिवाजी उद्या शरण येत आहे ही गोष्ट जोहरच्या सेन्याला देखील समजली, सर्व पहारेकरी ख़ुशी मध्ये आपला विजय साजरा करू लागले. शिवाजी उद्या शरण येतोच आहे मग कशाला द्यायचा पहारा?
ह्या विचाराने पहारेकरी देखील शिथिल झाले. शिवाजींना नेमके हेच पाहिजे होते. रात्रीची हीच वेळ साधून, ६०० मावळ्यांसमवेत महाराजांची पालखी निघाली.
त्यावेळेस एक नव्हे तर वेगवेगळ्या दोन पालख्या निघाल्या. एका पालखीत राजे शिवाजी होते, तर दुसऱ्या पालखीत होता प्रति शिवाजी- शिवा नाव्ही. विजापुरात आपल्या जंगी स्वागताच्या स्वप्नांमध्ये रमलेल्या जोहरला बातमी मिळाली शिवाजी पळाला म्हणून, आणि तो खडबडून जागा झाला.
त्याची तळपायाची आग मस्तकाला लागली, त्याने त्याच्या मसूद नावाच्या सरदाराला, शिवाजीला पकडायला पाठविले. त्याने पकडले देखील पण प्रति शिवाजीला. जोपर्यंत जोहरला हि गोष्ट समजली, तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडेंनी महारांची पालखी घेऊन विशाल गडाकडे कूच केले होते.
मध्य रात्र उलटली होती. मसूद १५०० च सेन्य घेऊन महाराजांचा पाठलाग करत होता. जोहरने, खरा शिवाजी अजून गडावरच तर नाही ना ह्या विचाराने, पन्हाळगडाच्या वेढा आवळला होता. महाराजांची पालखी अरुंद अश्या घोडखिंडी पर्यंत आली होती, तेवढ्यात वर्दी मिळाली की, सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी यांनी विशाळगडाला वेढा घातला आहे. आपलीच माणसे फितूर होऊन आदिलशाहाला मिळाली होती. एकीकडे मसूद दृष्टीक्षेपात आला होता तर दुसरीकडे सुर्वेंचा वेढा.
सलग १४ तास, एक क्षणही न घालविता, झोडपणाऱ्या पावसात पालखी घेऊन पळत असलेली ६०० मावळे , दोन शत्रूंना कसे तोंड देणार ह्या विवंचनेने महाराजांची विचार शक्ती देखील सुन्न झाली. बाजींनी पालखी उतरविण्यास सांगितले आणि म्हणाले,
महाराज आपण पुढे जा, मी येथेच खिंडीत मसूद ला अडवून ठेवतो
महाराज म्हणाले,
आता जे काही करायचे आहे ते सोबतच करूया.
बाजी म्हणाले,
आपणास येथपर्यंत आणण्यास जे कष्ट वेचले आहेत त्यांचे चीझ होऊ द्या तुम्ही अर्धे मावळे घेऊन सुर्वेंचा वेढा फोडून विशालगड गाठा, तुम्ही पोहचेपर्यंत , आम्ही एका सुद्धा गनिमाला खिंड पार करू देणार नाही, फक्त तुम्ही गडावर सुखरूप पोहचल्यावर तोफा द्या.
महाराजांनी जड अंतकरणाने बाजींना मिठी मारली आणि पुढे निघाले. बाजींसोबत आता फक्त होते ३०० वीर मराठे आणि मसूदकडे होते पाचपट , १५०० गनीम.
घोडखिंडीमध्ये हर हर महादेवचा जय घोष दणाणला आणि मुसळदार पावसामध्ये जोरदार लढा सुरु झाला, बाजी दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन लढत होते, त्यांच्यामधे साक्षात रुद्र प्रकटला होता. मराठी सेन्य मसूद ला खिंड पार करू देत नव्हते. बाजी अंगावर वार झेलत होते, आणि तेवढ्याच शर्थीने प्रतिकार करत होते.
बाजींनी मनाशी ठरविले होते जोपर्यंत राजे गडावर सुखरूप पोचल्याची तोफ कानावर येत नाही तोपर्यंत एका सुद्धा शत्रूला खिंड पार करू द्यायची नाही.
इकडे राजांनी सुर्वेवर धावा बोलला होता. स्वतः मावळ्यांसोबत राजे लढत होते. घोडखिंडी मध्ये मसूद मेटाकुटीला आला होता, ७ तास उलटून गेले होते तरी सुद्धा त्याला खिंड पार करता येत नव्हती, विजा कडाडत होत्या, मुसळदार पाऊस चालूच होता, बाजींनी मावळ्यांसमवेत खिंडीमध्ये एक अदृश्य भिंतच उभा केली होती, मसू ने बंदूक मागविली आणि पुढे लढणाऱ्या बाजींच्या छातीवर वार केला. बाजी कोसळले. मावळ्यांनी त्यांना माघे घेतले. काही क्षणाने बाजी शुद्धीवर आले आणि पहिला प्रश्न केला,
तोफा झाल्या का?
मावळ्यांनी नकारार्थी माना हलविल्या. बाजी पुन्हा उभा राहिले आणि त्वेषाने म्हणाले,
राजे गडावर पोहोचले नाहीत आणि मी मरेन कसा?
बाजी पुन्हा दोन्ही हाताने तलवार घेऊन लढू लागले, त्यांचे शरीर पूर्णपणे रक्तबंबाळ झाले होते, पण शरीर प्राण सोडत नव्हते, तेवढ्यत त्यांनी तोफांचा आवाज ऐकला, राजे गडावर पोहचले होते, आपली फत्ते झाली, महाराज सुखरूप गडावर पोहोचले, हा विचार करून बाजी कोसळले, आणि त्यांच्या घायाळ शरीराने प्राण सोडले.
सर्व ३०० मावळ्यांना घोडखिंडीमध्ये वीरमरण आले. पण कोणालाही ह्याची खंत नव्हती कारण त्यांची जीत झाली होती.
राजे विशाल गडावर पोहचले होते, किल्लेदारांनी राजांचे स्वागत केले, राजानी किल्यावरील शिबंदीची पाहणी केली. सुर्वेंना आणि मसूदला कठीण अश्या विशालगडावर तग धरणे शक्य नव्हते, ते अयशस्वी प्रयत्न करून माघारी फिरले.
राजे गडावरुन, भरल्या डोळ्यांनी खिंडी कडे पाहत होते. किल्लेदाराने एका जखमी मावळ्यास राजांसमोर आणले, राजांनी त्याला खांद्याचा आधार दिला, त्या मावळ्याने घोडखिंडीलत्या बाजींचा व मावळ्यांचा पराक्रम व बलिदान शब्दरुप केला. महाराजांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते, महाराज किल्लेदारास म्हणाले,
माझ्या पराक्रमी मावळ्यांच्या व शूरवीर बाजी प्रभू देशपांडेंच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली आहे, तिचे आजपासून नाव ठेवा ‘पावनखिंड’!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.