आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
अजित वाडेकर, सुनील गावस्कर हे खेळाडू असे होते की त्यांची बातच काही और होती. कदाचित चालू क्रिकेटच्या युगात त्यांचा तितका रेलेव्हन्स नसेल पण त्यांचं क्रिकेट मधलं योगदान कुणीच नाकारत नाही. पण म्हणुन कुणी समालोचक विराट खेळत असताना वाडेकर-गावस्करांच्या शॉट्स चे रेफरन्स देत नाहीत! कारण सोपं आहे – दोघांचाही काळ जसा वेगळा आहे तसाच दोघांच्या ही काळातले क्रिकेट सुद्धा वेगळे आहेत.
गावस्करांनी वर्ल्डकपमध्ये ६० षटकांत ३५ नाबाद धावा काढल्या म्हणुन कोहलीने टी ट्वें टी मध्ये २० षटकांत नाबाद १५ धावा काढण्याची अपेक्षा ठेवणं हा मूर्खपणा आहे. मुळात क्रिकेट ह्या खेळाची परिभाषा भारतीयांपुरती का होईनात आमुलाग्ररीतीने बदलली ती विरेंद्र सेहवाग नावाच्या अवलीयाने. सचिन, राहुल, सौरव, लक्ष्मण ह्या greatest चौकडीने गावस्कर, वाडेकर, श्रीकांत, वेंगसरकर ह्यांच्याकडुन हक्काने मिळालेला conventionalizm चा वारसा पुढे चालु ठेवला होता. कॉपी बुक फटके, खेळी, strategy हे सगळं बऱ्यापैकी तसंच होतं.
पण सेहवाग आला आणि त्याने खेळाचं रूपच पालटलं…!
सेहवाग हा born talent होता. कुठलंही फुटवर्क नसताना फक्त Hand-Eye coordination च्या भरवशावर आणि भिडस्त जिद्दीच्या भरवशावर तो एकदिवसीय सोडाच पण कसोटी क्रिकेट मध्ये सुद्धा तितकाच (किंबहुना analytically अधिकच!) यशस्वी ठरला. आणखीन एक उदाहरण बघा – महेंद्रसिंग धोनीचं. तो फार फार मेहनती होता. त्याच्यात भलेही सचिन सारखं conventional क्रिकेट नसेल, द्रविड सारखी सर्वगुण संपन्न अंगभूत दैवी चमत्कार नसतील – पण त्याच्यात होती Naturally talented लीडरशिप क्वालिटी. तो भलेही सर्वोत्तम फलंदाज नसेल, सर्वोत्कृष्ट किपर नसेल पण तो उत्कृष्ट फिनिशर होता! आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून देण्यात त्याची ख्याती होती! म्हणूनच – थोडक्यात – तो भारताला लाभलेला एक सर्वोत्कृष्ट कप्तान होता आणि त्याच्या काळात भारतीय संघ हा यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होता.
आता हाच क्रिकेटचा plot सध्याच्या राजकीय सारीपटावर मांडा. तंतोतंत साम्य दिसतील तुम्हाला.
सुषमा, अडवाणी, वाजपेयी, नरसिंहाराव, इंदिरा, सरदार पटेल – ते अगदी नेहरूपर्यंत क्रम लावा. बघा गांगुली ते वाडेकरचा क्रम लागतो की नाही! लागेलच! आणि इथेही वरचं साम्य चपखल बसतं.
मोदी आणि शहा हे तसे Lutyens श्रेणीतले Conventional राजकारणी नाहीत. असलेच तर धोनी किंवा सेहवाग ह्या श्रेणीतले अगदी unconventional पण तरीही प्रचंड talent असणारे राजकारणातील खेळाडू आहेत. त्यांनी ते स्वकर्तृत्वाने सिद्ध देखील केलं आहे. त्यांची शैली वेगळी, त्यांची धाटणी वेगळी, तसेच त्यांचे निर्णयही वेगळे.
आणि बघा धोनीचे ऐन मोक्याचे जगावेगळे निर्णय देखील यशस्वी सिद्ध झालेत तसेच मोदींचे सुद्धा अनेक मोक्याचे निर्णय यशस्वी सिद्ध झालेयत कारण दोघांमध्ये साम्य एकच अपार मेहनत करून मिळवलेली नेतृत्व क्षमता…!
दोघांमध्ये अजुन एक समानता आहे ते म्हणजे धोनी आणि मोदी हे दोघेही आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास टाकतातच पण आपण दाखविलेला विश्वास सार्थ करायला ते समोरच्याला पुरेपूर संधी देतात आणि हेच त्यांच्या यशाचं गमक आहे.
सचिन तेंडुलकर हा भगवंत आहे. क्रिकेटर कसा असावा ह्याचा तो आदर्श आहे. पण जसा दुसरा तेंडुलकर होणे नाही तसंच दुसरे वाजपेयी सुद्धा होणे नाही. ती अपेक्षा ठेवणं सुद्धा अव्यावहारिक आहे. राहुल द्रविड हा परिपूर्ण नव्हता का? होताच ना! पण त्याचा Bad patch हा जेव्हा संघाच्या वर्तमानवर प्रभाव टाकत असतांना भविष्यसुद्धा अंधकारमय करत होता तेंव्हा मात्र धोनी नावाच्या नायकाला द्रविड ला संघातुन वगळावच लागलं होतं. मग हाच कित्ता मोदींनी अडवणींविरुद्ध गिरविला तेव्हा ह्याचा गजहब राजकीय समलोचकांनी का करावा…? इथेच हे अधोरेखित होतं, कि बदलत्या काळानुरूप क्रिकेट बदलत गेलं तसं क्रिकेट परीक्षक देखील आपलं धोरण बदलत गेले. त्यांनी बदलत्या काळाला ओळखण्याचं भान बाळगलं. परंतु दुर्दैवाने राजकीय विश्लेषक इथे फारच सुमार दर्जाचे ठरले.
पत्रकार, माध्यमं, विचारवंत – ह्यांची विश्लेषणं, राजकीय गणितं चुकली ह्याचं कारणच हे आहे की मोदी शहा ह्यांच्या राजकीय खेळीला त्यांनी वाजपेयी, अडवाणी ते पार इंदिरा, नेहरू ह्यांची फुटपट्टी लावली. आता सांगा, टी ट्वेंटी मध्ये वाडेकर किंवा गावस्कर सारखं खेळून चालेल का?! आणि समालोचन करणारा रवि शास्त्री – त्याने वाडेकर च्या फुटपट्टीने धोनीला मोजला किंवा सेहवागची तुलना रोहन गावस्करशी केली – फक्त तो सुनील गावस्करचा मुलगा आहे म्हणुन…तर कसं चालेल?! ह्यात चुक कोणाची? रवि शास्रीची की धोनी-सेहवागची?
ESPN/STAR असो की वृत्तवाहिन्या – त्यांचं काम टेलिकास्ट/समालोचनाचं आहे, इतकं सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे समजून घेतलं तरी खुप आहे. बाकी पत्रकार, intellectual ह्यांना ठरवावं लागेल की त्यांना Richie Benaud, Geoffrey Boycott आणि Harsha Bhogle व्हायचं आहे की रवी शास्त्री, डीन जोन्स, आणि रमीज राजा व्हायचं आहे…! कारण वरील सगळे समालोचनच करतात पण “The Bradman of Microphone” चा खिताब हा Richie ला च शोभतो आणि “परिपूर्ण समालोचन” हा खिताब Boycott आणि हर्षाचं मिरवु शकतात…!
विश्लेषण हे येरा गबाळ्याचं ते काम नाही. बाकी रोजंदारीसाठी रवी शास्त्री वगैरे असणं ठीक आहे.
राजकीय पंडित हे समजतील तो सुदिन.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.