अनंत अडचणींमधून मार्ग काढत ३६ वर्ष टिकवला आईस्क्रीम ब्रँड – फक्त २ कारणांच्या जोरावर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आजकाल कोणत्याही बाबतीत ब्रँडींग किंवा ब्रँड असणे याला खुप महत्त्व आले आहे.
केवळ निर्जिव वस्तू नव्हे तर माणसांच्या ओळखी निर्माण होण्यासाठी किंवा एखादा माणूस, व्यक्ती किंवा पर्सनॅलिटी स्वत:च एक ब्रँड असणे याला आजच्या जगात फार महत्त्व आहे.
आता ते खरोखरंच गरजेचे आहे का नाही.. हा भाग निराळा, मात्र ब्रँडेड गोष्टीला जास्त किंमत असते हा जो समज सर्वत्र पसरलाय.. त्याला आता पर्याय नाही.
हल्लीच्या जमान्यात, लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचं आणि ते वर्षानुवर्षे टिकून ठेवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही दोस्तांनो. त्यासाठी जी इमेज, व्हॅल्यू निर्माण व्हावी लागते तोच असतो ब्रँड.
तर, इथे मुद्दा असा आहे की, अनेक वस्तू आपण ब्रँडेड घेतो, मग त्यासाठी थोडे जास्त पैसे मोजायचीही आपली तयारी असते पण फेमस आणि जगन्मान्य ब्रँड असेल की लोकं फार विचार करत नाहीत, सहजी ती वस्तू ते विकत घेतात.
अर्थात त्यासाठी प्रत्येक ब्रँड प्रचंड मेहनत आणि कष्ट घेऊन आपली मार्केटमधील उच्च स्थिती आणि संबंधित वस्तूचा सर्वोत्तम दर्जा सतत जपण्याचा प्रयत्न करत असतोच.
कारण ज्या क्षणी तुम्ही तुमच्या वस्तूच्या दर्जात कॉम्प्रमाईज कराल त्या क्षणापासून तुमच्या वस्तूची समाजातील किंमत खाली घसरू लागते जे आजच्या प्रचंड स्पर्धेच्या क्षेत्रात कोणत्याही विक्रेत्याला परवडणारे नाही.
अशाच एका आईस्क्रिमच्या ब्रँडविषयी या लेखात आपण जाणून घेऊया. जवळपास गेली ३६ वर्षे सातत्याने आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे आईस्क्रिम हा ब्रँड देत आहे, ज्याची चव आजही आपल्या जीभेवर रेंगाळतेय.
इट्स यमी.. इट्स नॅचरल…!! येस हाच तो ब्रँड.. नॅचरल आईस्क्रिम..
रघुनंदन कामत. मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारे. लहानपणी आईचा स्वयंपाकाचा म्हणजेच पोळी-भाजीच्या डब्यांचा बिझनेस आणि वडिलांचा आंबे विक्रीचा बिझनेस पाहत रघुनंदन मोठे झाले होते.
आई-वडलांचे अतोनात कष्ट, स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, गुणवत्तेशी तडजोड न करणे, नफ्यासोबतच समाजसेवा हे सर्व त्यांनी पाहिले होते, त्यामुळे बिझनेस कसा करावा याचे बाळकडूच त्यांना त्यांच्या लहान वयात मिळाले होते.
मुंबईत रघुनंदन यांनी भावासोबत त्याच्याच एका जोड धंद्यात लक्ष घालायला सुरुवात केली. जो एक आईस्क्रिमचा छोटासा धंदा होता. यामुळे त्यांना व्यवसायाचे महत्त्व लक्षात येऊ लागले.
पुढे अगदी काहीच वर्षात रघुनंदन इतके धाडसी झाले की, १९८३ साली त्यांनी साडे तीन लाखांचे कर्ज घेतले आणि विले पार्लेतच स्वत:चे छोटेसे आईस्क्रिम पार्लर सुरू केले.
त्यांच्या स्वत:च्या व्यवसायाचे स्वप्न तेथूनच उदयास यायला सुरुवात झाली होती. केवळ ३०० स्क्वेअर फुटांमधून कामत यांचा नवा बिझनेस सुरू झाला.
सुरूवातीचे नियोजन :
आईस्क्रिम पार्लर सुरू केल्याबरोबर लगेचच कामत यांनी दोन गोष्टींकडे नेहमी विशेष लक्ष दिले. पहिली गोष्ट ग्राहकांचा प्रतिसाद.. जे उत्पादन आपण ग्राहकांना देत आहोत, त्यावर कसा प्रतिसाद येतो आहे?
आणि दुसरी बाब म्हणजे ग्राहकांना यात नव्याने काय हवे आहे. तसे उत्पादन आपण क्रिएट करुन देऊ शकतो का? शेवटी कोणत्याही धंद्यात तुमच्या उत्पादनाच्या वापरामुळे ग्राहक खुश असणे हेच खुप गरजेचे आणि महत्त्वाचे असते.
हॉट मील सह कोल्ड प्लेवर :
कामत यांनी सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये एक छोटासा पण महत्वाचा बदल केला. मसालेदार पावभाजीसह आईस्क्रिम अशी स्किम सुरू केली.
जेणेकरुन पावभाजी खाल्यानंतर काहीतरी थंड खाण्याची इच्छा निर्माण होते, ती त्यांच्या विविध फ्लेवर्ड आईस्क्रिमच्या माध्यमातून पूर्ण होत होती. ज्यामुळे ग्राहक आणखी खुश होत होते.
बॉलिवूड सेलिब्रिटीज् कडून मिळालेली वाहवा :
कामत यांचा हा बिझनेस मुंबईच्या विलेपार्ले येथे असल्याने त्यांना आणखी एक मोठा फायदा झाला तो म्हणजे मुंबईच्या या मध्यवर्ती भागात अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतले तारे तारका राहतात.
त्यांच्यातील काहीजण यांच्याकडे पावभाजी आणि आईस्क्रिम खाण्यास येऊ लागले. त्या इमेजचा मोठा फायदा त्यांना मिळाला.
गुणवत्तेशी तडजोड नाही :
नॅचरल आईस्क्रिमची एक खासियत म्हणजे, ज्या फ्लेवरचे आईस्क्रिम असेल त्याचा रियल फ्लेवर त्यामध्ये असतो. कोणताही आर्टिफिशल रंग, प्रिझर्वेटिव्ह किंवा इसेंस घालून हे आईस्क्रिम तयार केले जात नाही.
उदाहरणार्थ, आंबा फ्लेवरमध्ये रियल आंब्याच्या फोडी, चिकू, पेरू, अंजिर, सिताफळ, टेंडर कोकोनट, कलिंगड अशा सर्व प्रकारच्या अगदी ड्रायफ्रुट पासून ते पान, मिरची पर्यंतच्या सर्व फ्लेवर्समध्ये खऱ्या खुऱ्या पदार्थांचा वापर केलेला असतो. ही परंपरा आजही कायम आहे.
असे केले जाते संपूर्ण नियोजन :
नॅचरल आईस्क्रिम हा आज एक चेन बिझनेस आहे. पार्ले येथील एका दुकानापासून सुरू झालेल्या या पार्लरची संख्या आज खुप मोठी आहे. संपूर्ण भारतात ८९ फ्रँच्यायझी आहेत.
मुंबईत ४७ दुकाने, नवी-मुंबईसह ठाण्यात ३० दुकाने असून, पुणे शहरातही मोठ्या संख्येने विस्तार झालाय.
सहाजिकच सगळीकडे एकाच दर्जाचे आणि गुणवत्तेचे उत्पादन पोहोचवणे आवश्यक असते. त्यामुळे क्लस्टर सारखी याची रचना केली असल्याचे श्री. कामत सांगतात.
संपूर्ण माल एकाच ठिकाणी तयार करायचा आणि सर्वत्र त्याचे डिस्ट्रिब्युशन करायचे अशी ही योजना आहे. त्यासाठी दररोज खुप मोठ्या प्रमाणावर हंगामी बाजारपेठेतून फळे आणि ड्रायफ्रुट्स खरेदी केली जातात.
त्यातून सर्वोत्तम दर्जाचा माल निवडून वेगळा केला जातो. फळांचा गर काढून त्यावर योग्य प्रक्रिया करुन खराब होवू नये म्हणून अँल्युमिनिअमच्या सिलबंद डब्यांत ठेवला जातो.
नॅचरलमध्ये आता पर्यंत ६० विविध फळांच्या फ्लेवर्सचा उपयोग केल्याचं श्री. कामत सांगतात.
कांदीवली येथे या आईस्क्रिमची एकमेव फॅक्टरी असून सर्व उत्पादने येथेच बनवली जातात आणि संपूर्ण भारतभर कोल्ड फ्लिट्स मधून सप्लाय केली जातात ती सुद्धा ठरलेल्या वेळेत.
१९८४ सालापासून आकार घेतलेल्या या बिझनेसने अनेक चढ – उतार पाहिले.
तरीही सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आईस्क्रिम ब्रँड्स ना कांटेकी टक्कर देत आज २०२० मध्येही म्हणजेच सलग ३६ वर्षे ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनून राहणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही.
प्रचंड मेहनत आणि जिद्दीचेच हे फळ आहे. याचे सर्व श्रेय कामत नेहमीच त्यांच्या टिमला देतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.