Site icon InMarathi

“त्याचं” मन समजून घेण्यासाठी प्रत्येक बायकोला माहित असायलाच हव्यात या गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याकडे सर्रासपणे म्हणतात, जोड्या स्वर्गात बनतात नी गाठी जमिनीवर बांधल्या जातात. या साध्या सुध्या वाटणाऱ्या गाठी भेटी जन्मगाठीत बदलतात..आणि कधी कधी त्यांची ब्रह्मगाठ बनते.

प्रेमविवाहात एक बरं असतं, दोघंही एकमेकांना आधीपासूनच ओळखत असतात, त्यामुळे एकमेकांच्या बऱ्याच गोष्टी माहीत असतात. म्हणजे आवडणारा रंग, कपड्यांची निवड, आवडती डिश..सिनेमा आवडतो की नाही..कोणता नट आवडतो वगैरे वगैरे.. पण प्राॅब्लेम होतो तो अरेंज मॅरेज करणाऱ्या लोकांचा.

पूर्वी लग्नं ठरत ती ओळखीपाळखीतून. अमुक एक मुलगा लग्नाचा आहे म्हटलं की पत्रिका, फोटो, दाखवण्याचा कार्यक्रम, घरच्यांची पसंती वगैरे गोष्टी पार पडून आंतरपाटापर्यंत पोहोचलं की झालं.

 

 

तेव्हा तर मुला मुलींना लग्नापूर्वी एकमेकांना भेटायची पण परवानगी नसायची, मग बोलणं तर लांबची गोष्ट. कशा कळाव्या दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी…मग लग्नानंतर हळूहळू काही वर्षांनी समजून घेत घेत कळायचं यांना हे आवडतं.. तिला हे आवडत नाही!!!

आता बरीचशी लग्नं वधु वर सूचक मंडळ किंवा मॅट्रीमोनी साईटवरुन ठरतात. तिथं नांव नोंदणी करताना जुजबीच का असेना, पण माहिती द्यावी लागते.‌ पण ते काॅलम वाचून का माणूस कळतो?

माणूस खूपदा हिमनगासारखा असतो. एक चतुर्थांश भाग दाखवणारा आणि दोन तृतीयांश लपवणारा… मग याचा परिणाम वैवाहिक जीवनात कुरबुरी होतात..कटकटी होतात, ‌पण तरीही लग्न जितकं जुनं होत जातं तितके नवरा बायको पण त्या नात्यात मुरत जातात. एकमेकांच्या गुण दोषांशी परिचित होतात. म्हणून तर आपल्याकडं लग्नाचे पन्नासावे वाढदिवस पण साजरे होतात.

बायको तर केवळ “दमलीस का?” एवढ्या दोन शब्दांनी सुद्धा खुश होते. न विचारता दिलेल्या एखाद्या भेटवस्तूने आनंदाचे डोही होऊन जाते, पण पुरुषांच्या मनाचा तसा अंदाज देत नाहीत ते.

या काही टिप्स तुमचं नातं खुलवण्यासाठी. काय करावं ज्यानं तुमचं नातं अजून घट्ट होईल!

१. मानसिक तणाव असताना –

 

 

हास्य ही सगळ्या रोगांवरचं औषध आहे. कितीही ताणतणाव असले, तरी घरचं वातावरण हलकंफुलकं ठेवायचा प्रयत्न करा.

दोन तलवारी एकमेकांवर आपटल्या तर खणखणाट होऊन ठिणग्याच उडतात, पण अशा वेळी पत्नीनं थोडी समयसूचकता दाखवून त्या ताणतणावाच्या वेळी नर्मविनोदी बोलून, हलकंफुलकं काही सांगून वातावरण निवळून टाकायला हवं. नवरोबांच्या चेहऱ्यावर हसू तरळेलच.

२. त्याला स्पेस देणं-

प्रत्येक नातं त्याच्या त्याच्या परीने सुंदर असतंच, पण सतत एकमेकांच्या सोबत राहताना कधी कधी आपण हेच विसरतो, की एकमेकांशिवाय काही लोक आहेत..काही गोष्टी आहेत, ज्या त्याला मनाला फ्रेश करु शकतात. जसं त्यांचे जुने मित्र भेटणं..आवडती पुस्तकं वाचणं किंवा आवडते छंद जपणं.

हे करताना कशाला भेटायला हवं त्याला….काय ते पुस्तकात डोकं खुपसून बसायचं. अशा टिप्पण्या टाळून त्याच्या आवडीची गोष्ट करु द्या. तिथून रिफ्रेश होऊन आलेला तुमचा नवरा अजून एनर्जेटीक होऊन दैनंदिन जीवनात जास्त दिलखुलासपणे वावरेल.

३. त्याच्या आवडत्या गोष्टी करु द्या –

 

 

प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याच्या आवडीनिवडी भिन्न असतात. आपल्या आवडी आपल्यापुरत्या ठेवा. म्हणजे हे मला आवडतं म्हणून तू हेच कर किंवा मला आवडत नाही मग तू ते करायचं नाही असं बंधन कोणत्याही नात्यावर ओरखडे उठवतं. नको म्हटलं तर चोरुन त्याच गोष्टी करण्याकडं माणसाचा कल असतो.

आपल्या आवडीनुसार त्याला करु द्या, पण त्यासाठी असणाऱ्या मर्यादांची जाणीव करुन द्या.

 

४. प्रतिक्रिया देताना विचारपूर्वक द्या –

 

 

कोणत्याही गोष्टीसाठी प्रतिक्रिया द्यायलाच हवी असं आवश्यक नसतं. कधी-कधी तुम्ही प्रतिक्रिया न देता केवळ ऐकून घेणं ही पण एक उत्तम प्रतिक्रिया असते.

काही वेळा आॅफीसमध्ये व्यवसायात, नोकरीच्या ठिकाणी कुरबुरी होतात. मनावर ताण येतो, तेव्हा त्यालाही टेन्शन येतं मग त्यावेळी त्यानं केलेली एखादी कृती, एखादं वक्तव्य तुम्हाला त्रासाचं वाटू शकतं, तेव्हा पलटवार न करता शांत राहून पण परिस्थिती हाताळू शकता. प्रेमाचे, विश्वासाचे दोन शब्द पण तुमचं नातं मजबूत करतात.

५. त्याची प्रेरणा बना –

काही दिवसांनी एकमेकांना ओळखू लागले, की नवरा बायको यांचं नातं सौहार्दाचं होऊ लागतं. अडचणीत आल्यानंतर हात पाय गाळून बसायची परिस्थिती आली, तर तुम्ही त्याला सावरा…उभं करा. भक्कमपणे त्याला आधार द्या.

चांगलं चालू असतानाही त्याला आवडणारी गोष्ट करा. एखादं सरप्राइज द्या. तुमचं नातं संघर्षाच्या दिवसातून फुलून येईलच, पण तुमच्या प्रेरणेनं चांगल्या गोष्टी उत्तम प्रकारे हाताळून आयुष्य जास्त सुंदर करु शकाल.

 

६. त्याची स्वप्नं जाणून घ्या-

 

 

आयुष्य विना नियोजन जगू नये. त्या नियोजनाचा विचार करताना आपल्या पतीलाही त्यात सामील करुन घ्या. म्हणजे आपोआपच त्याचं नियोजन काय आहे हे समजेल आणि त्यातूनच त्याची स्वप्नं समजतील.

त्यासाठी आवश्यक असलेली मदत करायची तयारी तुम्ही ठेवली, की तुमच्या स्वप्नांचं जग उभारताना एकमेकांच्या साथीने आयुष्य अजून बहरेल.

 

७. प्रेमाची भाषा-

 

 

प्रेम व्यक्त करायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. कुणी खुलेपणाने सांगतात. कुणी वागण्यातून दाखवतात. ती एकदा का समजली, की आयुष्य फार सुंदर होतं. कारण आपण कुणालातरी आवडणं. आपण कुणालातरी हवेसे असणं ही गोष्ट जगात सगळ्यात सुंदर आहे.

८. तुमचं प्रेम व्यक्त करा-

 

 

हीच गोष्ट फार थोड्या लोकांना जमते. व्यक्त न होणं हे खूपदा दुराव्याचं कारण ठरतं. जेव्हा जमेल तेव्हा तुमचं प्रेम शब्दातून कृतीतून स्पष्ट दाखवून द्या.

प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. तो बोलेल याची वाट पाहू नका. तुम्ही सांगून मोकळ्या व्हा.‌ वेळोवेळी व्यक्त करा. प्रेमानं प्रेम वाढतं.

संदीप खरे आपल्या मिसेस स्पायडरमॅन कवितेत म्हणतात- नातं आमचं धाग्याचं…सोसायचं अन् झेलायचं तरीसुद्धा भाग्याचं! या टिप्स वाचून तुमचंही नातं असंच भाग्याचं व्हायला हरकत नाही…नाही का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version