' शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी – InMarathi

शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

१९९२ नंतर आज पुन्हा बिग बूल किंवा स्कॅम हे शब्द लोकांच्या ओठांवर आले आहेत. निमित्त म्हणजे “स्कॅम १९९२” ही सोनी लीव्ह वर रिलीज झालेली हर्षद मेहता फायनान्शियल स्कॅम वरची वेबसिरीज.

अगदी काहीच दिवसांपूर्वी ही सिरिज ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आणि आठवड्याभरातच प्रत्येकाच्या तोंडी ह्या सिरिजचं नाव यायला लागलं.

आयएमडिबी सारख्या साईटवर सुद्धा अवघ्या काही दिवसांतच ह्या सिरिजला ९.६/१० असं रेटिंग मिळालं आहे. पण खरंच ही सिरिज तितकी वर्थ आहे का?

 

scam 1992 inmarathi

 

का फक्त देशातल्या एका सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यावर आधारित असल्याने ही सिरिज चर्चेत आहे?

नुकतीच नेटफ्लिक्स वर Bad Boy Billionaires ही डॉक्युमेंट्री सिरिज सुद्धा अशाच काही मोठ्या घोटाळ्यांवर आधारित होती. मग त्यात आणि ह्या स्कॅम सिरीज मध्ये वेगळं काय?

यामध्ये सर्वात मोठा फरक आहे तो म्हणजे नेटफ्लिक्स वर रिलीज झाली ती एक डॉक्युमेंट्री आहे, सोनी लीव्ह वर जी रिलीज केली गेली ती एक प्रॉपर कमर्शियल वेब सिरिज आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे ही सिरिज आहे हर्षद मेहता स्कॅम वर. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या विषयी बरीच माहिती असेल.

पण १९९२ मध्ये जेंव्हा हा घोटाळा उघडकीस आला तेंव्हा माझा जन्म सुद्धा झाला नव्हता. नंतर बी कॉम करताना हर्षद मेहता स्कॅम हे नाव असंच कानावर पडलं.

तोवर स्कॅम हा शब्द माझ्या जनरेशनसाठी अगदी शिळा झाला होता.

पण कालांतराने संपूर्ण कॉमर्स क्षेत्रातली गणितं ह्या हर्षद मेहता ने कशी फिरवली हे जेंव्हा समजलं तेंव्हा लक्षात आलं की हा भारतातला सर्वात मोठा स्कॅम म्हणून का ओळखला जातो ते?

तब्बल साडेचार ते पाच हजार करोड चा हा स्कॅम, आजच्या काळात ह्या स्कॅमची व्हॅल्यू २०००० करोड इतकी.

आज कदाचित आपल्याला ही किंमत एवढी मोठी वाटणार नाही. पण १९९२ मध्ये ती किंमत ऐकून मुंबईतल्या दलाल स्ट्रीट पासून दिल्लीतल्या संसदेपर्यंत सगळ्यांचेच डोळे पांढरे पडले होते!

 

harshad mehta inmarathi

 

ओमेरता, शाहिद, सारखे सिनेमे करणाऱ्या दिग्दर्शक हंसल मेहता ह्यांनी ह्या स्कॅम बद्दल एक अन एक पदर उलगडून ह्या सिरिज मध्ये नाट्यस्वरूपात दाखवला आहे.

१९७८ ते २००१ असा मोठा कॅनव्हास त्यांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर रंगवलाय त्याला खरंच तोड नाही!

लाला लजपतराय कॉलेज मधून बीकॉम करून, वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करून शेयर मार्केट मध्ये आलेला हर्षद शांतीलाल मेहताचा बिग बूल किंवा शेअर मार्केटचा अमिताभ बच्चन बनण्या पर्यंतचा प्रवास हंसल मेहता ह्यांनी खूप बारकाईने दाखवला आहे.

महत्वाकांक्षी हर्षद मेहता ने BSE च्या जॉबर पासून सुरू केलेला प्रवास, नंतर त्याने शेयर मार्केट मध्ये घेतलेली उडी, स्वतःची चालू केलेली कन्सल्टेशन आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी Growmore.

या सगळ्यातून त्याची चाललेली घोडदौड, टक्केटोणपे खात स्वतःच नाव establish करू पाहणारा हर्षद मेहता कधी हे असे घोटाळे करूच शकत नाही असं वाटतं.

पण लालसा, हाव ही प्रत्येक माणसाच्या पाचवीलाच पूजलेली असते. जो माणूस म्हणतो मला कशाची हाव नाही तो एकतर खोटं तरी बोलत असतो किंवा मोक्षप्राप्तीच्या मार्गावर तरी असतो!

आणि हीच हाव हर्षद मेहता ला बिग बूल बनवण्यात जबाबदार ठरली.

 

mehta scam inmarathi

 

८० च्या दशकातलं मुंबई, मुंबई स्टॉक मार्केट एरिया, तिथली बूल रिंग, मार्केट मधले मातब्बर प्लेअर्स, दलाल स्ट्रीटचं एकंदर चित्र हे आपल्याला ह्या सिरिज मधून अगदी तंतोतंत बघायला मिळत.

शिवाय त्या काळात टाइम्स ऑफ इंडिया आणि तत्सम वृत्तपत्रांची कार्यपद्धती, वेगवेगळे रीपोर्टर्स, एकंदरच मुंबईचं बदलत चाललेल आर्थिक, राजकीय चित्र सुद्धा ह्यात अगदी जसंच्या तसं बघायला मिळत!

शेयर मार्केट मध्ये स्वतःच नाव कामावल्यावर हर्षद मेहता ह्याने मनी मार्केट मध्ये स्वतःचा जम बसवायच ठरवलं आणि तिथूनच खरंतर त्याच्या कुंडलीत एंट्री झाली शनीची.

शेयर मार्केटमध्ये ५० करोडची उलाढाल होत असेल तर मनी मार्केट मध्ये २००००० करोडची उलाढाल होते असं ढोबळमानाने म्हंटल जातं.

आणि ह्याच मनी मार्केट मध्ये येऊन इथल्या फॉरेन बँक्स ची मोनोपॉलि हर्षद मेहता ने तोडली आणि स्वतःचं एवढं मोठं साम्राज्य उभं केलं.

कंपनीच्या स्टॉक्स मध्ये डिल करणारा हर्षद आता मनी मार्केट मधून मोठमोठ्या बँक्ससोबत डिल करू लागला.

२ बँकांच्या Government Securities, Bonds ह्या देवाणघेवाणीत हर्षद मिडल मॅन बनला आणि तो बायर आणि सेलर बँक कडून पैसा आणि सेक्यूरिटीज सोबत एक ठराविक वेळ सुद्धा मागून घेत असे.

आणि ह्या बफर पिरेड मध्ये हर्षद बँकेकडून मिळणारी मोठी रक्कम स्टॉक मार्केट manipulate करण्यासाठी वापरू लागला, ज्यामुळे शेयर मार्केटचा आलेख कायम चढताच दिसायला लागला.

 

mehta scam 2 inmarathi

 

आणि हा बिझनेस हर्षद एका वेळेस वेगवेगळ्या बँकांसोबत करू लागला.

त्यामुळे जेंव्हा केंव्हा कोणत्याही बँकेकडून पैशाची मागणी व्हायची तेंव्हा हर्षद आपल्या स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट केलेले शेयर प्रॉफिट मध्ये विकून बँकांचे पैसे परत द्यायचा.

उदाहरण द्यायचं झालं तर तेंव्हा ACC कंपनीची स्टॉक प्राइज होती २०० रुपये, अवघ्या काही कालावधीत हर्षद ने ती स्टॉक प्राइज ९००० रुपये इतकी वर आणली.

यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की हर्षद मेहता नेमका कसे स्टॉक्स manipulate करायचा. अशा प्रकारे हर्षद मेहता ह्याने करोडो रुपये स्टॉक मार्केट मध्ये टाकून संपूर्ण मार्केट एका वेगळ्याच लेवल वर नेलं.

त्यावेळेस तेंव्हा तो एका सेलिब्रिटीची लाइफ जगत होता. टीव्ही, पेपर, मॅगजिन सगळीकडेच एक नाव कायम झळकत होतं, हर्षद मेहता!

पण जेंव्हा ९० च दशक उजाडलं तेंव्हा देशात वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या. राजकीय पातळीवर वेगवेगळे बदल होत होते, त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि स्टॉक मार्केट वर पडत होता.

भारतीय अर्थव्यवस्थे मध्ये आणि फायनान्शियल पॉलिसीज मध्ये आमूलाग्र बदल घडत होते.

आणि अशा परिस्थितीत बँकांमध्ये होणाऱ्या सेक्यूरिटीज आणि बॉन्ड च्या देवाणघेवाणीच्या वेळेस जी बँक रिसीट इश्यू केली जायची त्या बँक रिसीटच्या इश्यू करण्यावर आरबीआय ने काही कडक नियमावली जाहीर केली.

 

Rbi inmarathi

 

त्यामुळे मनी मार्केट मध्ये होणाऱ्या बऱ्याच व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण व्हायला लागले. हे सगळे बदल करण्यामागचं कारण एकच होतं हर्षद मेहता.

तोवर हर्षद मेहता आणि त्याची ख्याती ही देशभरात सगळीकडेच पोचली होती. शिवाय टाइम्स ऑफ इंडियाची पत्रकार सुचेता दलाल ह्यांचा सुद्धा यात मोठा सहभाग होता.

हर्षद मेहता आणि त्याची Modus Operandi ही सरकारच्या नजरेत तेंव्हा आली जेंव्हा स्टेट बँकच्या अकाउंट्स मध्ये ५०० करोड रुपयांचा हिशोब मीसिंग दिसला, आणि सुचेता दलाल यांच्या आर्टिकल मधून यावर जाहीर भाष्य केलं गेलं.

यामागे आणखीन एक कारण होतं ते म्हणजे हर्षद मेहता ह्याने आरबीआय च्या गाईडलाईन्सच्या विरोधात जाऊन फेक बँक रिसीटचा सुद्धा चांगलाच फायदा करून घेतला होता.

आणि बँकाना जास्तीत जास्त रिटर्न्सचे प्रॉमिस करून करोडो रुपयांची रक्कम स्वतःच्या नावावर घेतली. ह्यात एसबीआय पासून युको बँक, पंजाब नॅशनल बँक अशा कित्येक रेप्यूटेड बँक्स सुद्धा होत्या.

खरंतर बँकांना चेक ब्रोकरच्या नावावर द्यायची परवानगी नव्हती तरी हर्षद मेहता ह्या नावावर विश्वास ठेवून बँक आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा ह्यात सामील झाले.

म्हणूनच हर्षद मेहता स्कॅम हा फक्त हर्षदच्या चलाख डोक्यामुळे यशस्वी नाही झाला तर तो आपल्या आर्थिक आणि सरकारी यंत्रणांमध्ये असणाऱ्या त्रुटिंमुळे सुद्धा यशस्वी झाला असं काही तज्ञांचं म्हणणं आहे!

जेंव्हा एसबीआयच्या ५०० करोड घोटाळ्याची बातमी समोर आली तसं शेयर मार्केट पार झोपलं. हर्षदने घेतलेले शेअर्स खाली येऊ लागले. त्याच्या कंपनीतल्या कित्येक इन्व्हेस्टर्सचे पैसे बुडाले.

एका रेप्यूटेड बँकच्या चेअरमनचे नाव यात आल्याने त्यांनी तर आत्महत्या केली. हर्षद मेहता हे नाव ज्या आदराने घेतलं जायचं तेच नाव सगळ्यांना खुपू लागलं.

१५००० स्क्वेर फिटचं मुंबईतलं आलीशान घर, ऊंची गाड्या, इथवर येऊन सुद्धा ज्या माणसाची हाव पुरी होत नाही तो आणखीन काय करणार?

सीबीआयची चौकशी झाली, हर्षदला अटक झाली. जेपीसी कमिटी बसली त्यात हर्षद ने मनी मार्केट मध्ये होणाऱ्या ह्या irregularitites वर स्पष्टपणे भाष्य केलं.

सिटी बँक सारख्या कैक इंटेरनॅशनल बँक्सची पोलखोल सुद्धा केली. पण इथवरच थांबतोय तर हर्षद मेहता कसला?

त्याने जेठमलानी सारखे टॉपचे वकील घेऊन प्रेस कॉन्फरन्स करून तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना १ करोड रुपयांची लाच दिल्याचं जाहीर केलं. हे सगळे आरोप तेंव्हाच्या सरकारने फेटाळून लावले.

 

jethmalani inmarathi

 

स्टॉक एक्स्चेंज मधून बॅन केल्यानंतर सुद्धा त्याने त्याच्या काही फॅमिली मेंबर्सच्या नावावर कंपन्या चालू करून पुन्हा मार्केट मध्ये एंट्री घ्यायची तयारी केली, पण ह्या सगळ्या खटाटोपातून निष्पन्न काहीच झालं नाही.

सीबीआय आणि इतरही काही संस्थांनी त्याच्या विरुद्ध ७० क्रिमीनल केसेस आणि ६०० पेक्षा जास्त सिविल केसेस दाखल केल्या गेल्या.

३१ डिसेंबरची रात्र जेंव्हा संपूर्ण देश नवीन वर्षाचे स्वागत करण्यात मग्न होता तेंव्हा इतक्या करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बिग बूलला ठाणे कारागृहात हृदयविकाराचा झटका आला, त्याला त्वरित लोकल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले तिथच त्याचा मृत्यू झाला.

हा सगळा विषय आणखीन विस्तृत पद्धतीने सिरिज मध्ये दाखवला आहे.

हर्षदचे फॅमिली मेंबर्स, त्यांची यामध्ये असलेली involvement, शिवाय त्याच्या स्कॅममुळे देशाच्या आर्थिक कारभारात झालेले पॉझिटिव्ह बदल, सेबी सारख्या नाममात्र संस्थेला दिले गेलेले विशेष हक्क अशा कित्येक गोष्टी सुधारल्या जाऊ लागल्या.

शिवाय पत्रकारिता किती इमानदारीने केली पाहिजे त्याचं सुद्धा चित्रण सुचेता दलाल यांच्या माध्यमातून या सिरिज मधून पाहायला मिळतं.

 

sucheta dalal inmarathi

 

शेयर मार्केट मधले बारकावे, तिथली कार्यप्रणाली, तिथे मोठमोठी स्वप्न घेऊन येणारे लोकं अशा कित्येक गोष्टी सिरिजमध्ये इतक्या परफेक्ट दाखवल्या आहेत की आपण आपसूक त्या काळात खेचलो जातो.

शिवाय कोणत्याही प्रकारची भीड न बाळगता अगदी मोठमोठ्या व्यक्तींची नावं जाहीरपणे घेऊन ही सिरिज भाष्य करते त्याचं जास्त कौतुक वाटतं.

सिनेमॅटोग्राफी आणि स्पेशल इफेक्टस निव्वळ कमाल, काळाचा मोठा प्रवास हंसल मेहता यांनी अगदी अचूक आपल्यासमोर मांडला आहे. तितकंच ताकदीच बॅकग्राऊंड म्युझिक आणि टायटल ट्रॅक तर लाजवाब.

कास्टिंगच्या बाबतीत तर ही सिरिज अव्वलच आहे. एकही स्टार चेहरा नाही तरीही सिरिज तुम्हाला खिळवून ठेवते ते केवळ ह्या कलाकारांच्या दमदार परफॉर्मन्सवर.

 

scam 1992 cast inmarathi

 

प्रतीक गांधी ने साकरलेला हर्षद मेहता हा डोक्यात इतका फिट बसलाय की आता त्याजागी अभिषेक बच्चन ला येणाऱ्या बिग बूल सिनेमात imagine सुद्धा करू शकत नाही.

इतका प्रतीक गांधी ने साकरलेला हर्षद मेहता परफेक्ट आहे. श्रेया धन्वंतरी हिने साकारलेली सुचेता दलाल सुद्धा तोडीस तोड, प्रचंड कॅलिबर असलेली श्रेया कोणत्याही संधीच सोनं करेल हे मात्र नक्की.

बाकी निखिल द्विवेदी, चिराग वोरा, अनंत महादेवन, सतीश कौशिक, शरीब हाशमी ह्या कलाकारांची कामं सुद्धा तितकीच परफेक्ट आणि नॅच्युरल झाली आहेत.

शिवाय स्टॉक मार्केट मध्ये काम करताना हर्षद च्या स्कॅम बाहेर आल्याने मार्केट कोसळलं. आणि ह्याचा फायदा राकेश झुनझुंवाला ह्याने उचलला आणि बराच प्रॉफिट कमावला. त्यांच्या जोडीला आणखीन एक नाव होतं ते म्हणजे राधाकृष्ण दमानी.

ह्या दोघांची भूमिका निभावणारे केविन दवे, परेश गनत्र हे दोन कलाकार म्हणजे हीरे आहेत. खूप कमी सीन्स तरी मिळेल त्या सीन्स मध्ये त्यांनी इतर कलाकारांना खाऊन टाकलं आहे.

सर्वात जास्त आवडलेलं आणि स्क्रीन प्रेझेंस कमी असून सुद्धा स्वतःची छाप सोडणारं पात्र म्हणजे सीबीआय ऑफिसर के माधवन, जे साकारलं आहे रजत कपूर ह्या गुणी अभिनेत्याने.

ह्या माणसाच्या अभिनयाला सीमा नाहीत, कोणत्याही साच्यात टाका तो त्याचा आकार घेतो, अत्यंत स्टेबल अभिनय काय असतो ते रजत कपूर कडून शिकण्यासारखं आहे.

 

rajat kapoor inmarathi

 

एकंदरच कोणताही फेमस चेहरा नसून सुद्धा ही सिरिज लोकं आवडीने बघतायत याचं सर्वस्वी श्रेय जातं ते म्हणजे याच्या लेखकाला आणि दिग्दर्शकाला.

शेयर मार्केटच्याच भाषेतले कित्येक संवाद तुम्हाला एका टिपिकल मसाला मास फिल्मचा अनुभव देतात तिथच तुम्हाला जीवनातले खूप मोलाचे धडे सुद्धा देतात!

ही सिरिज कोणत्या महान हीरोवर नाही त्यामुळे ह्या सिरिज मध्ये चुकीच्या माणसाची इमेज सुधरवण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही. कुठेही हर्षद मेहताच्या स्कॅमचं उदात्तीकरण दिसणार नाही.

उलट ह्या सगळ्या स्कॅमसाठी जितका हर्षद जवाबदार होता तितकीच जवाबदार आपली अर्थव्यवस्था आणि कार्यप्रणाली सुद्धा होती हे ही सिरिज प्रत्येक सीन मध्ये अधोरेखित करते.

रॅग्स टू रीचेस हा हर्षदचा प्रवास तसाच उलट दाखवताना सुद्धा सिरिज कुठे हात आखडता घेत नाही.

उलट हर्षदची उतरती कळा लागलेली असतानाही त्याचे त्याच्या जुन्या पद्धतीने बिझनेस मध्ये परत उडी घेण्याचे मनसुबे पाहून आपल्याला त्याची कीव करावीशी वाटते.

याहून विचित्र म्हणजे इतक्या महत्वाकांक्षी गडगंज श्रीमंत असलेल्या माणसाचा इतका सामान्य मृत्यू आपल्याला ही गोष्ट शिकवून जातो की माणूस जग सोडून जाताना काहीच घेऊन जात नाही, मग तो सामान्य माणूस असो किंवा हर्षद मेहता सारखा बिग बूल!

 

mehta inmarathhi

 

कुठे थांबायच हे जर हर्षद मेहताला समजलं असतं तर आज कदाचित चित्र वेगळं असतं, पण ह्या अशा एखाद्या गोष्टीच्या मागे धावणाऱ्या लोकांच्या बाबतीत हे असंच घडतं.

त्यामुळे आयुष्य असो किंवा शेयर मार्केट कुठे स्वतःवर बंधनं घालायची, कुठे स्वतःच्या लालची वृत्तीला आळा घालायचा हे प्रत्येकाला समजायलाच हवं.

एकदातरी ही सिरिज प्रत्येकानेच बघायला हवी, प्रॉपर मनोरंजनाच्या माध्यमातून ही सिरिज तुम्हाला बरंच काही सांगू पाहते, बघा आणि शक्य तितक्या चांगल्याच गोष्टी वेचा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?