Site icon InMarathi

केवळ १५० मीटर रेंज असलेल्या बंदुकीतून ५०० सैनिकांना ठार करणाऱ्या राष्ट्रभक्ताची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमेरिकन स्नायपर. हॉलिवूड पटांचे चाहते असाल आणि हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल हे शक्य नाही. अमेरिकेच्या नेव्ही सील मधला ‘बेस्ट’ शूटर ख्रिस काईल याच्या वरही फिल्म आहे.

त्याने अमेरिकन फौजेत सेवा देताना इराक मध्ये असताना तब्बल १५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांची आपल्या बंदुकीने शिकार केली होती.

त्याचा नेम एवढा चोख होता की त्याच्याबद्दल अमेरिकेत आजही म्हटलं जात की एकवेळ मशीन गनचा नेम चुकेल पण काईलच्या बंदुकीतुन सुटलेल्या गोळीचा नाही.

अमेरिकेच्या या स्नायपरने त्याच्या पूर्ण सर्व्हिस मध्ये तेवढ्या शत्रूंना ढेर केलं होतं.

आज आपण अशा स्नायपर बद्दल बघणार आहोत ज्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रशियन रेड आर्मीचे तब्बल ५०० पेक्षा जास्त सैनिक टिपले होते. ते पण जुन्या काळच्या पडद्या आड गेलेल्या बंदुकीने.

रशियन सैन्यात त्यांची एवढी दहशत पसरली की त्यांना ‘व्हाइट डेथ’ नावाने संबोधले जाऊ लागले. ‘सीमो हायहा’!

 

 

हे स्वीडन आणि रशिया यांच्या मध्ये असलेल्या फिनलँड या देशाचे नागरिक. फिनलँडच्या कारलीया गावात त्यांचा १९०५ मध्ये जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेले सीमो ८ भावंडांमध्ये सातवे.

शेती हे उत्पन्नाचे माध्यम असल्याने शेती आणि जंगली जनावरांची शिकार यामध्ये सीमो यांचा चांगला हातखंडा होता. जंगलात जाऊन शिकारीसाठी नेमबाजीची प्रॅक्टिस करण्यात त्यांचे लहानपणीचे दिवस गेले होते.

पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होत. अनेक देशांच्या सीमा बदलल्या गेल्या. त्याच दरम्यान फिनलँडला सुद्धा तत्कालीन सोव्हिएत रशियाकडून स्वातंत्र्य मिळाले होते.

पण काही तरी उचापती करून रशिया फिनलँड सोबत कुरबुर करतच होता. त्यामुळे या दोन्ही देशाच्या सीमेवर तणाव निर्माण व्हायला लागला होता.

युद्धाचे गडद होणारे ढग पाहता फिनलँड सरकारने कुटुंबातील एका सदस्याला फौजेत सेवा देणे अनिवार्य केले आणि सीमो आपल्या कुटुंबातर्फे सैन्यात सामील झाले.

नेमबाजी मध्ये सीमो यांची निपुनता पाहता त्यांना सैन्याच्या स्नायपर तुकडीमध्ये समाविष्ट केले गेले आणि इथूनचं सुरू होते जगातल्या सगळ्यात बेस्ट स्नायपरची कहाणी!

जगावर दुसऱ्या महायुद्धचे ढग गडद होत चालले होते तसे फिनलँड आणि रशिया मधले वाद विकोपाला जाऊ लागले. चिघळत्या परिस्थितीचा फायदा घेत रशियाने फिनलँड वर हल्ला केला.

फिनलँड ने आपले सैन्य सीमेवर तैनात केले ज्यामध्ये सीमो सुद्धा होते. हे युद्ध हिवाळ्यात झाल्यामुळे या युद्धाला ‘विंटर वॉर’ म्हणून इतिहासात ओळख प्राप्त झाली.

 

 

रशिया आणि फिनलँडच्या सीमेवर हिवाळ्यात बर्फवृष्टी ही अतिशय भयानक होत असते. तापमान उणे २०° ते उणे ४०° सेल्सिअस पर्यंत घसरते.

चारही बाजुंनी बर्फ आणि सपाट मैदान असल्या कारणाने फिनलँडला रशियाच्या तगड्या सैन्यासमोर निभाव लागणार नव्हता. कारण रशियन सैन्य बर्फात युद्ध करण्यात तरबेज होते.

फिनलँड सैन्याच्या जेआर ३४ बटालियनच्या सहाव्या कंपनीत असलेल्या सीमो यांना कोला नदीवर एम ९१ रायफल विथ दुर्बीण देऊन तैनात केले गेले.

ही रायफल रशियन सैन्याचा प्रतिकार करण्यास अजिबात सक्षम नव्हती, तरी याच रायफलीच्या माध्यमातून त्यांना युद्ध करायचे होते.

विरोधात असलेली परिस्थिती आणि अपूर्ण युद्ध सामग्रीच्या माध्यमातून युद्ध करण्यासाठी सीमो प्लॅनिंग करू लागले. फिनलँडच्याच एका लोकल कंपनीच्या माध्यमातून त्यांनी स्वतःसाठी एक पांढरा गणवेश शिवून घेतला.

असा की बर्फाच्या रंगात तो घुळमिसळून जाईल. पांढरे ग्लोव्हज, पांढरे बूट, पांढरा मास्क शिवाय रायफल पण त्यांनी पांढऱ्या रंगाने रंगवून घेतली.

शत्रूच्या नजरेपासून लपण्यासाठी त्यांनी ही युक्ती शोधून काढली होती. पांढऱ्या गणवेशात ते वातावरणाशी एकरूप झाले पण त्यांची मुख्य अडचण होती एम ९१ रायफल.

 

 

या रायफलची रेंज होती फक्त १५० मीटर. त्यामुळे शत्रू टप्प्यात आल्याशिवाय या रायफलने त्याला टिपणे अवघड होते. शेवटी शत्रू जवळ येण्याची वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हते.

रात्रभर प्लॅनिंग केल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की नदी ओलांडण्याऐवजी नदीच्याचं परिसरात दबा धरून शत्रूला एक एक करून टिपायचं.

रशियन सैन्य नदी पार करून फिनलँडच्या सैन्याला भिडणार होती. त्यामुळे नदीच्या भागातून रशियन सैन्य मार्गक्रमण करणार हे नक्की होते आणि तिथेच सीमो त्यांचा काळ बनून लपले होते.

आणि रशियन सैन्य नदीच्या मार्गे मार्गक्रमण करत युद्धासाठी निघाली. जसे रशियन जवान सीमो यांच्या टप्प्यात आले तसे त्यांनी गोळीबार सुरू केला.

अचानक झालेला गोळीबार पाहता आणि नेमका गोळीबार कुठून होत आहे हे न कळल्यामुळे बघता बघता डझनभर रशियन जवान हुतात्मा झाले. अंधार होणार पाहता रशियन सैन्य माघारी फिरले.

पहिल्या दिवशी आलेले यश पाहता सीमो यांनी आता रशियन सैन्यावर मागच्या बाजूने हल्ला करायचा प्लॅन बनवला आणि तो सुद्धा यशस्वी झाला.

त्यानंतर मात्र हे नित्यनेमाने चालू राहिले. सीमो दिशा बदलून रशियन सैन्यावर हल्ला करत आणि बर्फामध्ये गायब होत.

बघता बघता अख्या रशियात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.’बर्फात कोणी तरी आहे जो आपल्या सैन्याला नुकसान पोहोचवत आहे’ या आशयाची बातमी रशियाच्या वर्तमानपत्रात छापून येऊ लागली.

सीमोची ओळख नसल्यामुळे त्यांचा ‘व्हाइट डेथ’ म्हणून उल्लेख होऊ लागला. सीमो यांनी त्यांच्या तैनातीच्या १०० दिवसात तब्बल ५०५ रशियन सैनिक टिपले होते.

 

 

अंततः नकळत होणारी फायरिंग बघता दिनांक ६ मार्च १९४० रोजी रशियन सैन्याने चार दिशांना चार तुकड्या पाठवल्या आणि गोळीबार होणाऱ्या दिशेकडे कुच करून गोळीबार करणाऱ्याला पकडण्याचे आदेश दिले गेले, आणि यात ते यशस्वी सुद्धा झाले.

गोळीबार होणाऱ्या दिशेकडे रशियन जवानांनी ग्रेनेड फेकण्यास सुरवात केली. याच दरम्यान क्रॉस फायरिंगच्या वेळेस सीमो यांच्या चेहऱ्याचा रशियन बुलेट ने वेध घेतला.

जखमी सीमो यांना शोधण्याचे रशियन जवानांनी खूप प्रयत्न केले पण अजिबात न हलता सीमो बर्फात तसेच निपचित पडून राहिले.

रशियन सैन्य मागे फिरले तसे आहे त्या जखमी स्थिती मध्ये सीमो हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले.

सीमो यांचे प्राण वाचले पण ते कोमा मध्ये गेले. सीमो यांची ओळख आता जगासमोर आली होती.

पण रशियन सैन्यावर तुटून पडलेला ‘व्हाइट डेथ’ आता शांत झाला होता. आणि दुसरीकडे रशिया आणि फिनलँड मधला वाद सुद्धा संपुष्टात आला होता.

युद्ध समाप्तीच्या काही दिवसानंतर सीमो शुद्धीत आले. चेहऱ्यावरचं गोळी लागल्याने त्यांचा चेहरा बिघडला होता. पण त्यांचा तोच बिघडलेला चेहरा त्यांच्या बहादुरीचे प्रतीक होते.

 

 

हॉस्पिटल मधून बाहेर आल्यानंतर सीमो यांनी सैन्यातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा शेतीकडे वळले. १९९८ मध्ये सीमो यांना त्यांच्या अचूक निशाण्याबद्दल विचारले असता त्यांनी उत्तर दिले, ‘प्रॅक्टिस!’

लहानपणापासून जंगली जनावरांना मारण्यासाठी त्यांनी केलेली सुरवात त्यांना हे यश देऊन गेली.

त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये निपुण व्हायचं असेल तर त्याचा सतत सराव करत रहा. १ एप्रिल २००२ ला वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला.

कमालीचे कौशल्य आणि प्रखर राष्ट्रभक्तीमुळे सीमो इतिहासात अमर झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version