' मुलांना “कोडिंग” शिकवावं की नाही या संभ्रमात असाल, तर आधी हे वाचा – InMarathi

मुलांना “कोडिंग” शिकवावं की नाही या संभ्रमात असाल, तर आधी हे वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : राघवेंद्र जोशी

===

लॉकडाऊनपासूनच कोडिंग क्लास’च्या जाहिराती बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे सोशल मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडियामध्ये त्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. छापील माध्यमांमध्ये तुलनेने कमी किंवा नाहीच म्हणा.

कोडिंग क्लास वगैरे सगळं निरर्थक असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे मोठमोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मालकांना कोडिंग वगैरे काही येत नाही, असंही म्हटलं जात आहे.

‘कोडिंग’ची गरज आहे का हे समजून घेण्याआधी आपल्याला बेसिकपासून सुरुवात करावी लागेल. सर्वात प्रथम संगणक म्हणजे काय ते पाहूयात.

 

computer-science-marathipizza

 

कॉम्प्युटर म्हणजे कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू हे सगळं मिळून बनतं कॉम्प्युटर. फार तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांना जोडणारा दुवा म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम एवढं आपण खात्रीनं सांगू शकतो.

मात्र संगणक म्हणजे एक प्रकारचा प्रोग्राम किंवा प्रोग्राम्सचा संच आहे. प्रोग्राम म्हणजे तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, पेंट किंवा अन्य जे काही संगणकाचा वापर करून वापरता त्याला प्रोग्राम म्हटलं जातं.

आता प्रोग्राम म्हणजे काय तर सूचना किंवा सूचनांचा संच. अधिक सुयोग्य भाषेत त्याला आपण आज्ञावली म्हणूयात.

संगणकानं काय करावं आणि काय करू नये, कोणत्या परिस्थितीत काय करावं आणि काय करू नये या सगळ्यांची त्याला आज्ञा द्यावी लागते. कारण त्याला माणसाप्रमाणे बुद्धी नाही. त्यामुळं आज्ञावलीशिवाय त्याचं पान हालत नाही.

सगळ्यात मोठी गंमत म्हणजे संगणकाला इंग्रजी भाषा समजत नाही. इतर भाषा तर खूपच दूर.

मग संगणकाला समजेल अशा भाषेत आज्ञावली लिहायची असेल तर कोणत्या भाषेत लिहायची? तर अशी भाषा म्हणजे ‘कोडिंग’ आणि ती जिथं कुठं लिहिली जाते तिला प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं.

C, C++, JAVA, PYTHON या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. अशा अनेक लँग्वेजेस आहेत. या लँग्वेजमध्ये आज्ञावली लिहिताना इंग्रजीतच लिहावी लागते, पण ते आपण लिहितो तसं नव्हे तर संगणकाला समजेल अशा कोडिंगच्या भाषेत.

 

coding inmarathi1

 

शाळेच्या वर्गातील फळा स्वच्छ करायचा असेल तर मानवी भाषेत आपण ‘फळा स्वच्छ कर’ किंवा इंग्रजीत ‘क्लिअर द बोर्ड’ असं सांगतो. पण संगणकाची स्रिकन स्वच्छ करायची असेल तर हेच C language मध्ये लिहिताना clrscr(); अशा शब्दांत लिहावं लागतं.

अशा संगणकीय आज्ञांची भाषा समजून घेणे, त्यांचा योग्य वेळी योग्य तो वापर करणे म्हणजे कोडिंग करणे असं म्हणता येईल.

आता मुख्य प्रश्न म्हणजे लहान मुलांना एवढं सगळं समजेल का? ते सगळं याला का शिकवायचं?

आपण भारतीय नेहमी पाश्चिमात्यांनी तयार केलेल्या गोष्टी वापरण्यात तरबेज असतो किंवा त्यातच आपल्याला स्वारस्य असतं.

आपल्याकडं संगणक शिकणं म्हणजे फक्त वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट आणि वेबसाईटला भेट देण्याचं किंवा अलिकडं फार तर फेसबुक वगैरे वापरणं एवढाच मर्यादित आहे. मंडळी, या सगळ्या गोष्टी संगणक साक्षरतेमध्ये मोडत असल्या तरीही हे केवळ ऑपरेटिंग शिकणं एवढ्याच मर्यादित स्वरुपात आहे.

एखाद्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीला तिची आई कधीतरी पोळ्या कर म्हणून सांगते. आतापर्यंत फक्त पोळ्या खाणारी मुलगी पोळ्या कशा करायच्या हे आईकडून शिकते.

पोळ्या करण्यासाठी तयारी करावी लागते. कणिक घ्यावी लागते. त्यात पाणी घालावतं लागतं. कणिक तिंबावी लागते. पोळ्या लाटाव्या लागतात. व्यवस्थित भाजाव्या लागतात. वगैरे सगळं करावं लागतं.

आपल्याकडं संगणक शिकणं म्हणजे फक्त पोळ्या खाण्यासारखं काम आहे. तर प्रोग्राम तयार करणं म्हणजे पोळ्या तयार करण्याचं काम आहे.

आज लहान मुलांना त्यांना समजेल अशा भाषेत सोप्या टूल्सद्वारे प्रोग्रामिंग शिकवलं जात आहे. कोडिंग शिकवलं जात आहे. हा आशेचा एक किरण आहे. म्हणजे आपण आता ऑपरेटिंगकडून हळूहळू प्रोग्रामिंगकडं चाललो आहोत. जणू काही पोळ्या खाता खाता आता आपण पोळ्या तयार करायला शिकत आहोत.

आज कोडिंग शिकणारा लहान मुलगा-मुलगी भविष्यात कोणत्याही क्षेत्रात गेला, तरीही त्याचा संगणकाशी संबंध येणार आहेच. त्यामुळं तो जर आज कोडिंग शिकला तर संगणकाच्या क्षमता, मर्यादा आणि व्याप्ती समजून घेऊन त्याच्या क्षेत्राशी संबंधित तो काहीतरी नवे संगणक टूल किंवा प्रोग्राम तयार करू शकतो. नाहीच जमलं तर सोबत काम करणाऱ्या संगणक अभियंत्यांना योग्य त्या सूचना तरी देऊ शकतो.

आता जो काही दावा केला जात आहे की, मोठमोठ्या कंपन्यांच्या मालकांना कोडिंग येत नाही, याबद्दल सविस्तर बघूयात.

तंत्रज्ञान कंपन्या चालवणारी मंडळी प्रचंड बुद्धीमान असतातच असे नाही, तर ती चतुर आणि धूर्त असतात. त्यांना व्यावसायिक ध्येयधोरणे पाठ असतात. त्यांचाच तो पाठलाग करत असतात.

अशा सगळ्या व्यापात जगाची गरज काय आहे, जगात कोणती तांत्रिक किंवा संगणकीय टूल्स उपलब्ध आहेत, याबद्दल त्यांना जाण असते. संगणकाची क्षमता, मर्यादा आणि व्याप्ती हे ते कोळून प्यालेले असतात.

 

diploma computer inmarathi

 

त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात सुवर्णपदक पटकावलेल्या विद्यार्थ्याला ते योग्य त्या सूचना देऊ शकतात. काय करता येतं आणि काय करता येत नाही हे त्यांना चांगलं ठाऊक असतं. कारण त्यांना संगणकाच्या नाड्या माहिती असतात.

एखाद्या तरुणानं तंत्रज्ञानाची कंपनी काढली. नवा आविष्कार करायचा ठरवलं. संगणकाच्या स्क्रिनमधून थेट खरेदी करायची वस्तूच बाहेर येईल, अशी आज्ञा संगणकाला देण्याची आज्ञा तो प्रोग्रामरला किंवा कोडिंग लिहिणाऱ्या व्यक्तीला अधिकारवाणीने करेल, मात्र ते शक्य नसतं. कारण तसा काही कोडच सध्या तरी अस्तित्वात नाही. (कदाचित भविष्यात तसं काहीतरी होऊसुद्धा शकतं. पण सध्या तसं काही संशोधन अस्तित्वाचं नाही.)

अशा परिस्थितीत तो प्रोग्रामर कंपनीच्या मालकाला शिव्या घालून नोकरी सोडून निघून जाईल. त्यामुळं प्रोग्रामर्सना काय सांगायचं, काय करता येतं आणि संगणकाला काय करता येत नाही, हे ही माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे.

बेसिक्स माहिती नसलेला असा एखादा नवखा व्यक्तीची कंपनी काही दिवसांतच दिवाळखोरीत निघेल.

शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतही ज्ञान निरुपयोगी नसतं. कोडींगमुळे विद्यार्थ्यांची निर्णयक्षमता, कल्पनता, सर्जनशीलता, आकलनशक्ती तसेच तर्कबुद्धी वाढीस मदत होते.

 

Online school InMarathi

 

प्रत्येक परिस्थितीत काय आणि कसं करायचं हे तो विद्यार्थी संगणकाला सांगू शकतो किंवा तसं संगणकाला सांगावं लागतं एवढं तरी त्याला कोडींगद्वारे ठामपणे समजू शकतं. त्यातून वरील सर्व गुणांचा विकास होतो आणि विद्यार्थ्यांची जडणघडण होते.

कोण, काय आणि कसं शिकवतं हे बाजूला ठेवूयात. त्यावर चर्चाच नको. पण एखाद्या संस्थेच्या चुकीमुळे कोडींग हा विषयच निरुपयोगी आहे हे म्हणणं चुकीचं ठरेल. चांगल्या भुसभुशीत जमिनीवर लावलेलं बियाणं उगवलं नाही, तर आपण जमिनीला दोष देऊ नये. एवढचं!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?