आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातच जाहिरात क्षेत्र हे कसं वर आलं आहे ते आपण अनुभवलं आहेच. जुन्या काळात जेंव्हा टेलिव्हिजन नवीन नवीन आला तेंव्हा टीव्हीवर येणारी पारले-जी, अमूल, निरमाची जाहिरात आपल्याला ठाऊक असेलच!
तिथून सुरू झालेलं जाहिरात विश्व आज एका वेगळ्याच उंचीवर पोचलं आहे. पहिले वर्तमानपत्रातून जाहिरात व्हायची, त्यानंतर रस्त्यावर मोठमोठी hoardings लागायची, मग टेलिव्हिजन वर जाहिरात चालू झाली.
नंतर थिएटर्स, मोबाइल स्मार्टफोन आणि आता सोशल मीडिया सगळीकडेच आपल्याला जाहिरातींचं पेव फुटलेलं दिसत आहे!
आणि आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग इतकं पुढे गेलं आहे की ह्या जाहिरातींच्या माध्यमातून पैसा कमावणं सुद्धा अगदी सोप्पं होऊन बसलंय!
सध्या तनिष्क ह्या मोठ्या ज्वेलरी ब्रॅंडची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पण एका वेगळ्याच कारणासाठी!
ह्या जाहिरातीत एका हिंदू मुलीने मुस्लिम मुलाशी लग्नं केलं असून त्या मुलीचा डोहाळे जेवणाचा सोहळा हिंदू परंपरेनुसार पार पाडताना दाखवला जात आहे.
ही जाहिरात पाहून सर्वसामान्य लोकांनी याविषयीची खदखद सोशल मीडिया वर व्यक्त करायला सुरुवात केली, आणि एकंदरच हा विषय खूप तापत चालला आहे. अनेकांनी या जाहिरातीमुळे हिंदू संस्कृतीचा अवमान होत असल्याचा दावा केला.
कित्येकांनी अशा जाहिरातीतून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार अशा माध्यमातून होत आहे असा केला आरोप आहे .
त्यामुळे गांधीधाम ह्या गुजरात मधल्या एका तनिष्कच्या ज्वेलरी शोरूमच्या बाहेर याबद्दल खेद व्यक्त करत एक फलक लावला गेला ज्यात त्यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफीदेखील मागितली आहे! तर हा वादंग पेटल्यानंतर या जाहिरातीचं प्रसारण थांबविण्यात आले आहे.
या जाहिरातीमुळे हिंदू संघटनांचा नेहमीच मांडला जाणारा लव्ह जिहादचा मुद्दा नव्यानं चर्चेत आला आहे.
लव्ह जिहाद म्हणजे काय?
काही वर्षांपूर्वी केरळमध्ये मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह करुन नंतर तिचे धर्मपरिवर्तन केल्याचे अनेक प्रकार समोर आले. या प्रकाराला ‘लव्ह जिहाद’ संबोधले जाते. सन 2009 पासून अशा प्रकाराविरुद्ध हिंदू संघटनांनी हिंदू समाजात जागृतीचा कार्यक्रम सुरू केला आहे. तेव्हापासून ‘लव्ह जिहाद’ हा विषय चर्चेत आहे.
त्यांनंतर समाजातल्या विविध स्तरांमधून अनेक प्रकरणं बाहेर यायला लागली आणि हळू हळू ह्या सगळ्या प्रकाराने एक वेगळंच धार्मिक आणि राजकीय वळण घेतलं!
आजही ह्या गोष्टीवरून बरेच वाद होत असतं, लोकांचे मतभेद समोर येत असतात. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे नुकतीच रिलीज झालेली तनिष्कची जाहिरात!
खरंतर ही जाहिरात दाखवण्यामागे लव्ह जिहाद हा उद्देश नसून हिंदू आणि मुस्लिम ह्या २ धर्मांचा संगम दाखवण्याचा उद्देश असल्याचं तनिष्कची मालकी असलेल्या टाटा कंपनीने स्पष्टसुद्धा केलं आहे.
पण एकंदरच सोशल मीडिया वर होणारा लोकांचा विरोध पाहता त्यांनी गुजरातमधील एक दुकानात बोर्ड लावून जाहीर माफी मागितली असून, ही जाहिरात त्यांनी मागे घेतलेली आहे!
ह्या सगळ्या प्रकरणावरून आपल्याला दिसून येतं की भारतीय हिंदू समाज हा अजूनही या गोष्टींच्या बाबतीत बराच संवेदनशील आहे.
आणि सोशल मीडिया सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममुळे तो या विषयावर उघडपणे भाष्यसुद्धा करतोय आपली मतेसुद्धा मांडतोय. सोशल मीडियावर प्रत्येकाने व्यक्त होणं हे कधीही चांगलंच असतं म्हणा!
पण हिंदू समाज अशा पद्धतीने रिॲक्ट होताना पाहून काही लोकांना पोलरायझेशन वाढेल ह्याची चिंता आहे तर काही लोकांना हिंदू समाज जागा झालाय असं वाटतंय!
या सगळ्या प्रकरणातून नेमकं काय घडतंय हे समजायला आपण सगळेच सुज्ञ आहोत.
तनिष्कच्या जाहिरातीत तसा उद्देश नसेलही, पण तरीही जाहिरात क्षेत्रातल्या मातब्बर लोकांनी जाहिरात करताना कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यायलाच हवी!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.