Site icon InMarathi

सावित्रीबाईंप्रमाणे स्त्रीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या “ह्या” कर्तुत्ववान महिलांविषयी जाणून घ्या

female activist inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा अगदी अनादिकालापासूनच ऐरणीवर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सीता काय किंवा द्रौपदी काय केवळ महिला म्हणून त्यांच्याही वाट्याला अवहेलना आलीच.

स्वतंत्र भारतातही महिलांवरचे अत्याचार थांबलेले नाहीत. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार हे थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

अगदी परवाचच उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तर प्रदेशात झालेल्या बलात्कार आणि त्यानंतरचा खून हे सध्या चर्चेत आहेत. त्यावरून होणार राजकारणही रंगते आहे.

 

 

आईबरोबर शेतात चारा आणायला गेलेली मुलगी घरी परत आलीच नाही. चार लोकांनी तिच्यावर बलात्कार केला, शिवाय तिची जीभ कापली, शरीरावर अमानुषपणे वार केले आणि जखमा केल्या.

तिला दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले परंतु पुढच्या दोन आठवड्यातच तिची जीवन यात्रा संपली.

मरणानंतरही तिच्या यातना थांबल्या नाहीत तिचा मृतदेह घरच्यांना न देता रात्रीच्या अंधारात तिथल्या पोलिसांनी तिचा मृतदेह जाळला.

भारतात आता या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत मग ते दिल्लीचे निर्भया असो नाहीतर हैदराबादची कन्या. भारतातल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या अहवालानुसार दर पंधरा मिनिटाला भारतात बलात्काराच्या घटना घडत आहेत.

२०१९ या एकाच वर्षात ४,०५,८६१  इतक्या बलात्काराच्या घटना घडल्या. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये स्त्रीयांविरुद्धचा हिंसाचाराच्या घटनांमध्ये ७.३ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

त्याचं खरं तर एकच कारण म्हणजे भारतीय समाजात असलेला शिक्षणाचा अभाव आणि स्त्री-पुरुष विषमता.

 

 

ही स्त्री-पुरुष विषमता कमी व्हावी, स्त्रियांनाही आत्मसन्मानाने राहता यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक जण याबाबत जनजागृती करतानाही दिसतात.

काही ठिकाणी या लोकांच्या प्रयत्नांना यश येताना ही दिसत आहे. भारताच्या अशाच काही महान स्त्रियांची माहिती आपण घेऊयात.

 

१. सावित्रीबाई फुले :

 

 

मुलींना शिक्षणाची कवाडं जर कुणी उघडी करून दिली असतील तर त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. बाई शिकली तरच घर शिकेल या एकाच गोष्टीसाठी फुले दाम्पत्याने आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं.

मुलींच्या शिक्षणाचा ध्यास त्यांनी घेतला होता. मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यात १८४८ मध्ये चालू केली. त्यासाठी त्यांनी अनंत यातना सहन केल्या. भारतातल्या त्या पहिला महिला शिक्षिका होत्या.

मुलींच्या शिक्षणातच नाही तर विधवांच्या प्रश्नातही त्यांनी लक्ष घातले होते.

विधवा विवाहाला त्या काळात प्रोत्साहन दिलं होतं. दलितांच्या मूलभूत हक्कासाठीही त्यांनी लढा दिला.

 

२. अरुणा रॉय :

 

 

भारतात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध अरुणा रॉय यांनी लढा दिला. १९६८ च्या त्या आयएएस ऑफिसर. १९७४ ला त्यांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी राजीनामा दिला.

त्यांनी एक एनजीओ चालू केली आहे, ज्याद्वारे तळागाळातील लोकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. माहितीचा अधिकार या कायद्यासाठी अरुणा रॉय यांनी आपले विशेष योगदान दिले आहे.

त्यामुळेच भारतात किती महिलांवर अत्याचार होतो याचीही आकडेवारी समोर येते.

 

३. कविता कृष्णन :

 

 

स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या असलेल्या कविता कृष्णन या कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्य आहेत. अखिल भारतीय महिला संघटनेच्या सचिव आहेत.

आपली पदविका मिळवण्यासाठी जेव्हा त्यांनी जेएनयु मध्ये प्रवेश घेतला तेव्हापासूनच त्या या चळवळीशी जोडल्या गेल्या.

१९९५ मध्ये त्या जेएनयु मधल्या विद्यार्थी संघटनेच्या सहसचिव म्हणून निवडल्या गेल्या. तेव्हापासून त्या अनेक सामाजिक चळवळीशी निगडित आहेत.

दिल्लीत झालेल्या निर्भया हत्याकांड प्रकरणात ज्या लोकांनी सुरुवातीला आवाज उठवला त्यात कविता कृष्णन ही होत्या.

त्या भीषण घटनेत चालत्या बस मध्ये मुलीवर बलात्कार झाला आणि अत्यंत निर्घुणपणे तिला जखमी करण्यात आले, गाडीतून फेकून देण्यात आले. त्या मुलीसाठी न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रथम आवाज उठवला.

महिला सक्षमीकरणावर त्यांचे एक ‘फियरलेस फ्रीडम’ नावाचे पुस्तक देखील आहे. ज्यामध्ये महिलांना संपूर्ण स्वातंत्र्य कसं मिळायला हवं याबद्दल लिहिले आहे.

महिलांच्या फिरण्यावर बंधन घालणं आणि एका ठराविक घरकामातच गुंतवणे याला त्यांनी विरोध केला आहे.

 

४. स्वर्ण राजगोपालन :

 

 

स्वर्ण राजगोपालन या राजकीय अभ्यासक आणि लेखिका आहेत. याच विषयात त्यांनी आपली पीएचडी केली आहे. स्त्री-पुरुष लिंगभेद आणि मानवी सुरक्षितता यावर त्यांनी अत्यंत परखडपणे लिखाण केले आहे.

जगभरातील महिलांच्या सुरक्षित वावरावर त्यांनी भाष्य केले आहे. मालदीव सारख्या देशात लग्न आणि घटस्फोट या गोष्टी नित्याच्या आहेत. त्याही ठिकाणी महिला आपलं अस्तित्व टिकून आहेत.

या गोष्टींचा सामना केल्यानंतर त्यांचं जीवन कसं आहे, यावर त्यांनी लिहले आहे. तसेच अफगाणिस्तानातील ज्या महिला पेशावरच्या रिफ्यूजी कॅम्पमध्ये आहेत, तिथेही त्यांचा जो लढा सुरू आहे यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे.

‘प्रज्ञा ट्रस्ट’ नावाची एक एनजीओ चेन्नईमध्ये त्या चालवतात. ज्याद्वारे केवळ लिंगभेद आणि त्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

असा कोणताही लिंगभेद केला जाऊ नये यासाठी ही एनजीओ लोकांनाच शिक्षण देते. तसेच शांतता राखण्यासाठी देखील शिक्षण तिथल्या शाळांमधून दिले जाते.

यासाठी अनेक शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांना सहभागी करून घेतले जाते.

 

५. कल्पना विश्वनाथ :

 

 

कल्पना विश्वनाथ या सामाजिक क्षेत्रासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. ‘सेफ्टी पिन’ या संस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत. सेफ्टी पिन ही संस्था महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी काम करते.

खेड्यापाड्यातून ज्या महिला कामासाठी प्रवास करतात त्यांच्याकरिता त्यांनी एक ॲप बनवलेला असून, त्याद्वारे कोणत्या रस्त्याने सुरक्षित प्रवास करता येईल याची माहिती दिलेली असते.

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांनी ३००० ड्रायव्हर्सना ट्रेनिंगही दिले आहे. महिलांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा यासाठी त्या काम करतात.

‘जागोरीं’ या संस्थेत त्या महिलांच्या समुपदेशनाचे काम करतात. जिथे महिला कौटुंबिक हिंसा सहन करतात त्या महिलांसाठी कल्पना विश्वनाथ काम करतात.

 

६. प्रीतम पोद्दार :

 

 

पुणे येथे राहणाऱ्या प्रीतम या सम्यक या एनजीओशी जोडल्या गेल्या आहेत. जिथे स्त्री पुरुष समानता राबवण्यासाठी काम केले जाते. तसेच महिलांच्या स्वास्थ्याकरिता देखील काम केले जाते.

मुलींना पोषण आहार दिला पाहिजे, याकडेही ही संस्था लक्ष ठेवते. प्रीतम या कार्याकडे वळाल्या याचं कारण, त्यांना घरातूनच मुलगा मुलगी भेद जाणवायला लागला.

त्यांच्यावर काही बंधन होती. कॉलेजमध्ये देखील हा भेद त्यांना कळला म्हणून मग त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करायचं ठरवलं. त्यांचं काम हे विशेषतः गर्भपातासंदर्भात आहे.

मुलींना नको असलेल्या गर्भाचा गर्भपात करण्याची परवानगी नव्हती.

म्हणजे एखाद्या मुलीला तिच्या मर्जीने झालेल्या लैंगिक संबंधातून जर गर्भधारणा झाली किंवा तिच्यावर झालेल्या बलात्कारामुळे जर गर्भधारणा झाली, तर तो नको असलेल्या गर्भाचा गर्भपात करता येत नव्हते.

मग मुली, महिला यासाठी असुरक्षितपणे गर्भपात करून घ्यायच्या, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण व्हायचा.

म्हणून त्यासाठी प्रितम यांनी अनेक डॉक्टर्स, मेडिकल संस्था यांच्याशी बोलणी करून गर्भलिंग निदान न करता सुरक्षित गर्भपात करण्याची परवानगी मिळवली.

 

७. शाहीन मिस्त्री :

 

 

शाहीन मिस्त्री यांचा जन्म मुंबईचा. परंतु त्यांच्या वडिलांच्या सतत देश-विदेशात बदल्या व्हायच्या, त्यामुळे त्यांचं सगळं शिक्षण हे बाहेरच्या देशांमध्ये झालं.

परंतु दरवर्षी उन्हाळ्यामध्ये त्या मुंबईला भेट द्यायच्या. इथे आल्यावर दरवर्षी अंधशाळेला त्या भेट द्यायच्या तिथे volunteer म्हणून काम करायच्या.

त्या अमेरिकेत कॉलेजला असताना एकदा सुट्टीसाठी म्हणून भारतात आल्या. तेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या त्यांच्या कारजवळ येऊन भीक मागणारी मुले त्यांनी पाहिली. ज्यामुळे त्या बेचैन झाल्या.

त्याचवेळेस त्यांनी ठरवलं की याच मुलांसाठी आता काम करायचं. त्यातूनच त्यांनी ‘आकांक्षा ‘ या ‘ना नफा’ या तत्वावर चालणाऱ्या संस्थेची स्थापना केली.

याद्वारे अशा भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या आकांक्षा ही संस्था ६५०० मुलांना मुंबई, पुण्यामध्ये शिक्षण देते.

या मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. तेच आता त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे.

 

८. रंगू सौरिया :

 

 

लैंगिक तस्करी मध्ये भरडल्या जाणाऱ्या पीडितांना मदत करण्यासाठी रंगू सौरिया या काम करतात. त्यासाठी त्यांनी ‘कांचनजंगा आधार केंद्र’ स्थापन केली आहे.

ही संस्था देखील ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करते. यामध्ये लहान मुलं, मुली आणि महिला यांची तस्करी होते त्या सगळ्यांची यातून सुटका केली जाते.

त्यांना जी अत्यंत वाईट वागणूक दिली जाते, त्यांचे लैंगिक शोषण होते या पीडितांना रंगू सौरिया यांची संस्था सोडवून आणते आणि यांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करते.

आत्तापर्यंत दिल्ली, पटना, मुंबई, कलकत्ता या शहरांमधून पाचशे मुलींची त्यांनी सुटका केली आहे.

 

९. अनिता रेड्डी :

 

 

तामिळनाडूतील चेन्नई येथे जन्मलेल्या अनिता रेड्डी या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसन आणि उन्नतीसाठी त्या काम करतात.

यामध्ये मुलांचे शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला जातो. त्यांचं हे कार्य पाहूनच भारत सरकारने त्यांना २०११ मध्ये पद्मश्री बहाल केली आहे.

 

१०. ज्योती ढवळे :

 

 

ज्योती ढवळे या एचआयव्हीबाधित लोकांसाठी काम करतात. एच आय व्ही एड्स बाधित लोकांचं राहणीमान जीवनमान सुधारावे यासाठी त्या प्रयत्नशील असतात.

त्यांनी हे काम त्याच वेळेस चालू केलं ज्यावेळेस त्या स्वतः एचआयव्ही बाधित झाल्या. केवळ वैद्यकीय दुर्लक्षामुळे त्यांना हा रोग जडला त्यानंतर एचआयव्ही रुग्णांच्या वेदना त्यांना समजल्या.

अनेक लोक जे एचआयव्हीबाधित असतात ते आत्महत्येस प्रवृत्त होतात अशा लोकांचं समुपदेशन ज्योती ढवळे करतात. त्याचबरोबर समलैंगिक आणि लिंगबदल केलेल्या लोकांसाठी त्या काम करतात.

या सगळ्या उदाहरणांवरून हेच लक्षात येतं की, महिला आपली संवेदनशीलता जागृत ठेवतात. मग त्या मेधा पाटकर असोत की शर्मिला इरोम किंवा मदर टेरेसा.

समाजातील सर्वच स्तरातील लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याबरोबरच त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मंत्रही त्या स्वतःच्या कार्याबरोबरच सगळ्यांना देतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version