' वाळूत गाडले गेलेले संपूर्ण प्राचीन शिवमंदिर आले समोर! कुठे? – InMarathi

वाळूत गाडले गेलेले संपूर्ण प्राचीन शिवमंदिर आले समोर! कुठे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताच्या विविध भागात अनेक प्राचीन मंदिरे पहावयास मिळतात. केरळपासून काश्मीरपर्यंत, पश्चिमेला गुजरातपासून पूर्वेकडे आसामपर्यंत असलेली विविध वास्तुशैलीतील मंदिरे म्हणजे भारताचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे.

कोणार्कचे सूर्यमंदिर, वेरुळचे कैलास लेणे, खजुराहो, महाबलीपुरम, हंपी येथील मंदिरे यांसारख्या ठिकाणांचा तर युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे.

 

khajuraho temples 3 inmarathi

 

मंदिर उभारणीच्या काळानुसार तसेच आसपासच्या प्रदेशानुसार या मंदिरांची रचना वेगवेगळी झालेली आढळून येते.

तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब मंदिरावरील कालाकुसरीतून आणि शिल्पकलेतून दिसून येते. उत्तर भारतात उत्तम स्थितीतील मंदिरांबरोबरच भग्नावस्थेतील मंदिरेही दिसून येतात.

उत्तर भारताचे भौगोलिक स्थान हे त्यामागचे कारण होय. परकीय आक्रमणांमध्ये उत्तर भारतातील पुष्कळ मंदिरांचा विध्वंस केला गेला.

दक्षिण भारतात मंदिरांना परकीय आक्रमणांपासून तुलनेने कमी हानी पोचल्यामुळे तेथील पुरातन मंदिरे आजही उत्तम अवस्थेत उभी असलेली आढळतात.

भारतातील बहुतांश संस्कृती प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांमध्ये उदयास आल्या आणि तिथेच त्यांचा विकास झाला. यामुळेच गंगा, नर्मदा, कृष्णा, गोदावरी, कावेरी यांसारख्या नद्यांच्या काठी मोठ्या प्रमाणात मंदिरे आढळून येतात.

ज्याप्रमाणे भारतात अशा संस्कृती भरभराटीला आल्या तसेच काळाच्या ओघात नैसर्गिक कारणांमुळे लुप्तही झाल्या. भूकंप, पुरामुळे नद्यांचे पात्र बदलणे अशा गोष्टी याला कारणीभूत ठरतात.

आजही अशा लुप्त झालेल्या वास्तूंचे अवशेष उत्खनन करताना सापडतात. गुजरातमधील लोथल, धोलाविरा येथे तर हजारो वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीशी निगडित वास्तू सापडल्या आहेत.

नैसर्गिक आपत्ती शिवाय मानवनिर्मित गोष्टींमुळे सुद्धा अशा प्रकारच्या जुन्या वास्तुंची हानी होते. नदीवर धरण बांधल्यावर विस्तीर्ण जलाशयाची निर्मिती होते ज्यात हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाते.

अशा वेळेस पुरातन वास्तूंची पुन्हा स्थापना करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही आणि परिणामी या वास्तू पाण्याखाली जातात.

 

temples inmarathi

 

महाराष्ट्रातही उजनी धरणाच्या जलाशयात असलेल्या पळसदेव येथील पुरातन मंदिरांच्या बाबतीतही काहीशी अशीच स्थिती आहे.

इसवी सन ९ व्या शतकात बांधले गेलेले पळसनाथ मंदिर व आसपासची काही मंदिरे जेव्हा उजनी धरणातील पाणी आटते, तेव्हाच दृष्टीस पडतात. एरवी कायम ही मंदिरे संपूर्ण किंवा अंशतः पाण्याखाली असतात.

आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात अशाच प्रकारचे एक उदाहरण नुकतेच पुढे आलेले आहे. वाळूचा उपसा करताना तिथे वाळूत गाडले गेलेले एक जुने शिवमंदिर सापडले.

आंध्र प्रदेशात नेल्लोर जिल्ह्यामध्ये पेन्ना नदीच्या काठी पेरामल्ला पाडू नावाचे एक गाव आहे. पेन्ना ही आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाची नदी असून ती कर्नाटकात उगम पावून नेल्लोर जवळ बंगालच्या उपसागराला मिळते.

काही दिवसांपूर्वी पेरामल्ला पाडू गावातील काही लोकांना नदीच्या पात्रात वाळू उपसा करत असताना मंदिरासारखे अवशेष सापडले.

त्यावरून अधिक काळजीपूर्वक उत्खनन केल्यावर वाळूत गाडले गेलेले संपूर्ण मंदिरच प्रकाशात आले. नागेश्वर या नावाने पूर्वीच्या काळी हे शिवमंदिर प्रसिद्ध होते.

या मंदिराच्या कालखंडाबद्दल अजून ठोस माहिती मिळालेली नाही.

 

temple in AP inmarathu

 

काही स्थानिक जाणकारांच्या मते हे मंदिर २०० वर्षे जुने आहे तर काहींच्या मते हे मंदिर त्याहीपेक्षा पुरातन असून भगवान परशुरामांनी पेन्ना नदीच्या काठी स्थापन केलेल्या मंदिरांपैकी एक आहे.

पुरातत्व विभागाच्या अंदाजानुसार १८५० साली पेन्ना नदीला आलेल्या पुरात तिचे पात्र बदलले होते. त्या वेळेस हे शिवमंदिर पुरामुळे वाहून आलेल्या गाळात लुप्त झाले.

आज तब्बल दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळानंतर हे मंदिर पुन्हा जगासमोर आले आहे. याबद्दल पुरातत्व खाते अधिक संशोधन करत असून मंदिराचा इतिहास उत्खननाचे काम पूर्ण झाल्यावर नक्कीच आपल्यासमोर येईल.

या घटनेच्या केवळ ३ दिवस आधी ओडिशा राज्यातही अशाच प्रकारचे एक मंदिर सापडले. ओडिशा मधील कटक जवळ महानदीच्या पात्रात साधारण ५०० ते ६०० वर्षं जुने एक मंदिर बुडालेल्या अवस्थेत आहे.

या मंदिराची उंची जवळपास ६० फूट एवढी आहे. या भागात संशोधन करणाऱ्या पुरातत्व तज्ज्ञांच्या मते अशी अनेक मंदिरे महानदीच्या पात्रात मिळू शकतात.

या भागात पूर्वी अनेक मंदिरे उभारली गेली, परंतु महानदीचे पात्र पुरात वारंवार बदलून गाळ साचल्यामुळे येथील बहुतांश मंदिरे एक तर गाडली गेली किंवा नदीच्या पात्रात बुडालेल्या अवस्थेत असू शकतात.

 

odisha temple inmarathi

 

याच बरोबर महानदीवर हिराकुड नावाचे एक मोठे धरण आहे, ज्याच्या जलाशयात जवळपास ५० जुनी मंदिरे बुडालेल्या अवस्थेत आहेत.

पुरातत्व शास्त्रातही सध्या नवनवीन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने उत्खनन करण्याबरोबरच अत्याधुनिक साधने संशोधकांच्या मदतीला आहेत.

आजही अशा प्रकारच्या लुप्त झालेल्या अनेक पुरातन वास्तू सापडू शकतात. याबद्दल इतिहासाचा अभ्यास करून अधिक बारकाईने संशोधन केल्यास मोठा ऐतिहासिक ठेवा हाती लागेल यात शंकाच नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?