Site icon InMarathi

लाल बहादुर शास्त्रींच्या मुलाने सरकारी गाडीचा खाजगी कामासाठी वापर केला, मग……

lalbahadur shastri inmarathi3

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे भारतीय संस्कृतीचे एक तत्त्व आहे. आपल्या गुणांचा, ऐश्वर्याचा, संपत्तीचा, कसलाच गवगवा न करता नि:स्वार्थी भावनेने कार्यरत राहणे फार कमी लोकांना जमते.

व्यक्तीचा मोठेपणा त्याच्या पैशांवरून नाही, तर त्याच्या स्वभावाने अधोरेखित होतो. प्रसंगी हालअपेष्टा भोगाव्या लागल्या तरीही आपल्या तत्त्वांशी तडजोड न करणारी तत्वनिष्ठ माणसे ही आपल्या समाजातील आदर्श असतात.

भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे असेच एक तत्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा शब्दांत शास्त्रीजींची ओळख सांगता येईल.

पंडित नेहरूंच्या निधनानंतर स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानपदाची धुरा शास्त्रीजींनी अत्यंत समर्थपणे सांभाळली. जय जवान, जय किसान हा नारा देत त्यांनी देशाला स्वयंपूर्णतेकडे जाण्याची दिशा दाखविली.

स्वातंत्र्यपूर्व काळात मिठाच्या सत्याग्रहापासून वेगवेगळ्या चळवळींमध्ये सक्रिय असणाऱ्या शास्त्रीजींनी १९४७ नंतर प्रशासनातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि तितक्याच ताकदीने सांभाळल्या.

 

 

राजकारणात असूनही शास्त्रीजी त्यांच्या अंगी असलेल्या साधेपणा आणि कामावरील निष्ठेमुळे इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरले.

पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. रेल्वे, वाहतूक व दळणवळण, वाणिज्य, गृह अशा वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

लालबहादूर शास्त्रींच्या साधेपणाच्या अनेक घटना प्रसिद्ध आहेत. सध्याच्या युगात राजकारणात नैतिकता कितपत शाबूत आहे याबद्दल प्रश्नचिन्ह उभे रहावे अशी अवस्था आहे, पण नैतिकता म्हणजे काय याचे आदर्श उदाहरण म्हणजे शास्त्रीजी होय.

पंडित नेहरू पंतप्रधान असताना १९५२ साली लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री झाले. ऑगस्ट १९५६ मध्ये आंध्रप्रदेश मधील मेहबूबनगर येथे एक भीषण रेल्वे अपघात झाला आणि जवळपास ११२ लोक मृत्युमुखी पडले. त्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी आपला राजीनामा पंडित नेहरूंकडे सोपवला, परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही.

त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात तमिळनाडू मध्ये आणखी एक अपघात झाला, ज्यात १४४ लोक मृत्युमुखी पडले. यावेळेस मात्र शास्त्रीजी आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले. पदाबरोबर येणारी जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी नैतिकतेचे एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केले.

 

 

एकदा रेल्वेमंत्री असताना काही कामानिमित्त शास्त्रीजी मुंबईत निघाले होते. तेव्हा बाहेर वातावरण गरम असूनही डब्यात गार कसे वाटत आहे याबद्दल आल्या स्वीय सचिवांकडे पृच्छा केली. यावर सचिवांनी डब्यात कुलर बसवले असल्याची माहिती दिली.

ट्रेनमधील सर्वसामान्य प्रवासी साध्या डब्यातून प्रवास करत असताना आपण कुलर असलेल्या डब्यातून प्रवास करणे योग्य नाही असे शास्त्रीजींनी सांगितले. त्यानुसार मथुरा स्थानकात कुलर काढून ठेवण्यास सांगून मगच त्यांनी पुढील प्रवास केला.

पुढे पंडित नेहरूंच्या निधनानंतर शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. संसदीय लोकशाहीतील सर्वोच्च पदावर पोचूनही शास्त्रीजींनी आपली साधी राहणी सोडली नाही.

त्याच्या साधेपणाचा एक किस्सा फार प्रेरक आहे. शास्त्रीजी पंतप्रधान झाल्यावर त्यांना राहण्यासाठी निवासस्थान आणि गाडी मिळाली होती. त्या काळात शेवरोले कंपनीची इम्पला ही आलिशान गाडी पंतप्रधानांचे अधिकृत सरकारी वाहन म्हणून वापरली जात असे.

मुळातच काटकसरी स्वभाव असलेले शास्त्रीजी त्या गाडीचा वापर क्वचितच करत. बरेचदा त्या गाडीचा वापर परदेशातून कोणी महत्त्वाच्या व्यक्ती किंवा अतिथी आल्यावरच केला जाई.

एक दिवस शास्त्रीजींचे पुत्र सुनील शास्त्री यांना काही वैयक्तिक कामानिमित्त बाहेर जायचे होते. त्यांनी शास्त्रीजींची सरकारी वापरासाठी असलेली इम्पाला ही गाडी वापरली आणि काम झाल्यावर पुन्हा जागेवर आणून ठेऊन दिली.

शास्त्रीजींना काही काळाने ही गोष्ट लक्षात आली. स्वतःच्या कामासाठी सरकारी गोष्ट अजिबात न वापरणाऱ्या त्यांना ही गोष्ट रूचणे शक्यच नव्हते. त्यांनी लागलीच चालकाला बोलावून घेतले आणि गाडी एकूण किती किलोमीटर चालली याचा हिशोब मागितला.

चालकाने गाडी एकूण १४ किलोमीटर चालल्याचे सांगितले. शास्त्रीजींनी तात्काळ गाडीचा तो वापर वैयक्तिक कारणासाठी केल्याची नोंद करण्यास सांगितले.

एवढेच करून ते थांबले नाहीत, तर आपल्या स्वीय सचिवाला त्या वापराबद्दल प्रति किलोमीटर सात पैसे या त्या काळच्या दराने रक्कम सरकारी कोषागारात जमा करण्याचे निर्देश दिले.

 

 

देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदी असतानाही शास्त्रीजींनी आपला साधेपणा सोडला नाही. त्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून जेमतेम १८ वर्षे लोटली होती आणि देश सामजिक, आर्थिक, राजकीय अशा अनेक पातळ्यांवर प्रगतीसाठी झगडत होता.

अशा वेळेस शास्त्रीजींसारखे नेते सरकारी पैसा स्वतःपेक्षा जनतेच्या कल्याणासाठी कसा कामी येईल याचा केवळ विचारच करत नव्हते, तर आपल्या कृतीतून दाखवून देत होते.

आजच्या जमान्यात आपण आपल्या आसपास याच्या विसंगत अशी अनेक उदाहरणे पाहतो. मंत्री सोडा, सध्या नगरसेवकापासून प्रत्येकजण आपल्या पदाचा वापर आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठीच कसा करता येईल याचा विचार करताना दिसतात. यातूनच पुढे “आदर्श” सारखे “आदर्श” उभे राहतात.

साधेपणा आणि नैतिकता या गोष्टी सुसंस्कृत समाजाची लक्षणे आहेत. आज २ ऑक्टोबर ही लालबहादूर शास्त्रीजींची जयंती. या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने ही दोन मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात काही प्रमाणात अंगिकारण्याचा प्रयत्न केल्यास देशाच्या प्रगतीला भरीव हातभार लागेल यात शंकाच नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version