आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
२ ऑक्टोबर म्हटलं की काय आठवत? विजय साळगावकर गुरुजींच्या प्रवचनासाठी पणजीला गेलेला! चित्रपटाचे त्यातल्या त्यात दृश्यम चे चाहते असाल तर हे नक्की आठवेल.
गंमतीचा भाग बाजूला ठेवूया. २ ऑक्टोबर म्हटलं की लक्षात येतात त्या दोन राष्ट्र पुरुषांच्या जयंती.
एक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची, तर दुसरे म्हणजे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांची. पण २ ऑक्टोबर ला एवढंच महत्त्व आहे का?
तर नाही. २ ऑक्टोबरला पुण्यतिथी असते ती प्रसिद्ध गांधीवादी नेते, स्वातंत्र्य सेनानी, तामिळनाडूचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भारतरत्न के.कामराज यांची!
कामराज यांना ओळखले जाते ते नेहरू आणि शास्त्रीजी यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला पंतप्रधान पदाचा पेच सोडवण्यासाठी.
आपल्या राजकीय मुत्सद्दीगिरीच्या जोरावर कामराज यांनी पहिलं शास्त्रीजी आणि मग इंदिरा गांधी यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळा पाडली होती.
कामराज यांचा जन्म १५ जुलै १९०३ रोजी तत्कालीन मद्रास प्रोव्हीन्समध्ये एका व्यवसायी कुटुंबामध्ये झाला होता.
जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर पूर्ण देशभरात इंग्रजांविरुद्ध संताप पसरला होता. त्याच पार्श्वभूमीवर कामराज स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले.
गांधीजीच्या विचारांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव होता की वयाच्या १८ व्या वर्षी ते कसलाही विचार न करता गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभागी झाले होते.
१९३० साली मिठाच्या सत्याग्रहात सुद्धा ते सामील झाले आणि त्याचवेळी त्यांना पहिल्यांदा जेलसुद्धा झाली होती.
यानंतर मात्र त्यांचं जेल मध्ये येणं – जाणं सुरू झालं. ब्रिटिशांनी कामराज यांना सहा वेळा कैदेची शिक्षा दिली. यादरम्यान ते तब्बल तीन हजार दिवस जेल मध्ये होते.
स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या शिक्षणाची चिंता भेडसावू लागली. त्यावर सुद्धा तोडगा काढून ते जेलमध्येच अभ्यास करून जेलमधूनच परीक्षा देऊ लागले.
कारावासात असताना कामराज महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. पण जशी त्यांची कारावासातून मुक्तता झाली तसा त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला.
राजीनामा देताना त्यांनी सांगितलं, ‘ज्या गोष्टीला तुम्ही पूर्ण न्याय देऊ शकत नाही, अशा कोणत्याही जबाबदारीचा स्वीकार तुम्ही केला नाही पाहिजे.’
स्वातंत्र्य संग्रामातला सहभाग, स्पष्टवक्तेपणा, कामाशी एकनिष्ठता यामुळे देशाच्या राजकारणात कामराज यांना मानाचे स्थान होते.
भारतीय काँग्रेस मध्ये सुद्धा गांधीवादी नेता असल्याने त्यांच्या शब्दाला काँग्रेसमध्ये वजन होते. १९५४ मध्ये कामराज पहिल्यांदा मद्रासचे मुख्यमंत्री झाले.
याच दरम्यान त्यांनी प्रत्येक गावात शाळा आणि प्रत्येक पंचायती भागात महाविद्यालय चालू करायची मोहीम सुरू केली. अकरावीपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुरू केले.
शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन योजना स्वतंत्र भारतात कामराज यांनीच सर्वप्रथम सुरू केली. त्यांचं म्हणणं होतं की राज्यातील गरीब मुलांना एकवेळचं तरी भरपेट जेवण हे मिळालं पाहिजे.
सरकारी शाळेमधल्या मुलांना मोफत गणवेश सुद्धा कामराज यांचीच युक्ती. अशा प्रकारेच इतर क्षेत्रात सुद्धा कामराज यांनी कामाचा धडाका चालू ठेवला होता.
ठरलेल्या योजना काळात सिंचन योजना लागू केली.
स्वातंत्र्याच्या पंधरा वर्षात त्यांनी मद्रासच्या गावात वीज पोहोचवली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनीसुद्धा कामराज यांच्या कामाची प्रशंसा करताना मद्रासचा उत्तम प्रशासित राज्य म्हणून गौरव केला होता.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कामराज यांच्या लक्षात आले की वरिष्ठ काँग्रेस नेता सत्तेच्या लोभात आहे. त्यांनी सत्ता सोडून परत संघटनेत कार्यरत झाले पाहिजे आणि लोकांशी भेटले पाहिजे.
याच धरतीवर त्यांनी २ ऑक्टोबर १९६३ मध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची मागणी केली.
हाच तो प्रसिद्ध कामराज प्लॅन. तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष पंडित नेहरू यांना कामराज यांची ही योजना खूप आवडली आणि त्यांनी हा प्लॅन पूर्ण भारतात लागू करण्याचे ठरवले.
या प्लॅननुसार वरिष्ठ सहा कॅबिनेट मंत्री आणि सहा मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन संघटनेत परत कार्यरत होण्यास सांगितले गेले.
कॅबिनेट मंत्र्यांमधले मोरारजी देसाई, एस के पाटील, लाल बहादूर शास्त्री, बाबू जगजीवन राम यांना राजीनामा द्यावा लागला.
तर उत्तर प्रदेशचे चंद्रभानू गुप्त, मध्य प्रदेशचे मंडलोई, ओडिशाचे बिजू पटनायक या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
संघटनेबद्दल कामराज यांची निष्ठा बघता त्यांना काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा बनवले गेले. १९६४ मध्ये पंडित नेहरू यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान पदासाठी काँग्रेसच्या दोन गटात संघर्ष निर्माण झाला.
काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पुढील पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी कामराज यांच्यावर आली.
प्रश्न होता नेहरू नंतर कोण? आणि प्रबळ दावेदार होते मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्री.
या आणीबाणीच्या काळात सर्वसंमतीचा मुद्दा पुढे आणत कामराज यांनी मोरारजी देसाई यांचा आक्रमकपणा कमी केला. कामराज यांच्या नेतृत्वाखाली सिंडिकेटनेसुद्धा शास्त्रीना समर्थन दिले.
(काँग्रेसचे वरिष्ठ नेता नीलम संजीव रेड्डी, निजा लिंगप्पा, अतुल्य घोष, एस के पाटील सारख्या नॉन हिंदी भाषिक नेत्यांच्या गटाला तत्कालीन मीडिया सिंडिकेट म्हणायची. त्याचं नेतृत्व स्वतः कामराज करायचे.)
कामराज यांच्या समर्थनाने लाल बहादूर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. जानेवारी १९६६ मध्ये शास्त्रीजींचा मृत्यू झाला आणि समान परिस्थिती पुन्हा उदभवली.
आणि यावेळेस मोरारजी देसाई सर्वसंमतीच्या विरोधात होते आणि त्यांनी मतदान घेण्याची मागणी केली.
सिंडिकेटने कामराज यांचं नाव सुद्धा पुढे केलं होतं. पण त्यांनी याला साफ नकार दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की ज्याला व्यवस्थित हिंदी आणि इंग्रजी येत नाही त्या व्यक्तीने पंतप्रधान होता कामा नये.
इंदिरा गांधी यांची मोर्चेबांधणी स्वतः कामराज यांनी केली आणि इंदिरा गांधी संसदीय दलाच्या ३५५ खासदारांचे समर्थन मिळवून पंतप्रधान झाल्या.
किंगमेकरच्या रुपात इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय कामराज यांचा शेवटचा निर्णय होता. पंतप्रधान बनल्या नंतर सत्तेची आणि संघटनेचे सर्व सूत्र इंदिरा गांधी यांनी आपल्या हातात घेतली.
१९६७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बऱ्याच राज्यात पराभूत झाली होती. स्वतः कामराज आपल्या विरदूनगर भागातून पराभूत झाले होते. आणि यावेळेस डाव खेळला तो इंदिरा गांधी यांनी.
त्यांनी सूचना जारी केली की पराभूत नेत्यांनी संघटनेत असलेल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यामुळे कामराज यांना काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला.
काँग्रेस अध्यक्ष लिंगप्पा बनले. पण तरीही अंतरिम निर्णय हे कामराजचं घेत होते. परंतु हे जास्त काळ चाललं नाही. संघटन आणि सरकार मधली दुरी वाढत चालली होती.
२ ऑक्टोबर १९७५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने कामराज यांचे निधन झाले.
ज्यांच्या विचारांना अनुसरून कामराज राजकारणात आले त्यांच्या जयंती दिवशीच कामराज स्वर्गवासी झाले. यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय.
१९७६ साली कामराज यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्नाने’ सन्मानित केले गेले.
मानलं जातं की, कामराज हे पहिले गैर इंग्रजी भाषिक मुख्यमंत्री होते पण त्यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळाला सर्वोत्तम प्रशासन मानले जाते.
तर याच कामराज यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.