Site icon InMarathi

लाल बहादुर शास्त्री : पंतप्रधान असूनही भाड्यावर कार घेणारा अ”सामान्य” नेता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रामाणिकपणा आणि पदाचा गैरवापर न करण्याची वृत्ती ही प्रत्येक माणसात उपजतच असावी लागते. ती कोणत्याही शालेय अभ्यासक्रमात शिकवली जात नाही.

भारत देशाचं दुर्दैव असं, की बोटावर मोजता येतील इतके राजकीय नेते सोडले तर बहुतांश लोक हे त्यांच्या पदाच्या गैर वापरामुळेच जास्त चर्चेत येत असतात.

भ्रष्टाचार आणि ‘आपल्या’ माणसांचं भलं करणं या दोन गोष्टी भारतातील कित्येक भागातील प्रगतीला ब्रेक लावणाऱ्या आहेत.

‘छोटी विचारसरणी असलेले लोक हे नेहमी छोट्या पदावरच राहतात’ या वाक्याचा प्रत्यय महाराष्ट्र राज्याला खूप वेळेस आला आहे.

जनतेच्या सेवेसाठी मुख्य पदावर बसलेली व्यक्ती जेव्हा फक्त स्वतः पुरताच विचार करायला लागते, तेव्हा लोकांचा त्या नेत्यावरचा विश्वास उडून जात असतो हे काही नेत्यांना कळतच नाही.

सगळेच राजकारणी असेच असतात असं नाहीये. भारताने काही खऱ्या अर्थाने आदर्श राजकारणी सुद्धा बघितले आहेत. या यादीमध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान श्री. लालबहादुर शास्त्री यांचं नाव सर्वात प्रथम क्रमांकावर घ्यावं लागेल. कारणही तसंच आहे.

 

 

श्री. लालबहादुर शास्त्री ज्यावेळी पंतप्रधान पदावर विराजमान होते, तेव्हा त्यांच्याकडे स्वतःची कार सुद्धा नव्हती. त्यांच्या मुलांनी त्यांना कार विकत घेण्यासाठी विनंती केली.

त्यावेळी फियाट कार ची किंमत १२,००० रुपये इतकी होती. श्री. लालबहादुर शास्त्री यांच्या बँक अकाउंट ला ७,००० रुपये होते. तेव्हा, त्यांच्या मुलांनी त्यांना कार विकत न घेण्याचा सल्ला दिला.

पण मुलांच्या हट्टापायी त्यांनी बाकी ५,००० रुपयांचं पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज घेतलं. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. हे सगळं स्वतः पंतप्रधान पदावर असताना त्यांनी केलं होतं ही खूप आश्चर्याची बाब आहे.

१९६५ मध्ये कार घेतल्यानंतर एका वर्षातच म्हणजे १९६६ या वर्षी श्री. लालबहादुर शास्त्री यांचा उझबेकिस्तान देशाची राजधानी ताश्कंद या शहरातील एका हॉटेल मध्ये गूढ मृत्यू झाला. हा इतिहास आपण सगळेच जाणतो.

 

 

शास्त्रीजींच्या निधनानंतर सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने हे ५००० रुपयांचं कर्ज माफ करण्यासाठी बँकेला विनंती केली होती, पण श्री. लालबहादुर शास्त्री यांच्या पत्नीने ती विनंती मान्य होऊ नये असं बँकेला सांगितलं आणि त्यांनी चार वर्ष सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शन मधून ते कर्ज चुकवलं.

लालबहादुर शास्त्री यांची जिथेही पोस्टींग असेल तिथे ही कार त्यांच्या सोबत असायची. आज सुद्धा ही कार दिल्लीच्या लालबहादुर शास्त्री मेमोरियल मध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे.

ही कार बघण्यासाठी लोक दुरून येत असतात आणि गर्दी करत असतात.

 

 

श्री. लालबहादुर शास्त्री यांचा राजकीय प्रवास हा सर्वार्थाने आदर्श आहे. ते रेल्वे मंत्री असताना एक रेल्वे अपघात झाला होता. त्या अपघाताची पूर्ण जबाबदारी घेत त्यांनी कोणत्याही विरोधी पक्षाच्या मागणीआधी आपला राजीनामा पंतप्रधानांना सुपूर्त केला होता.

१९६५ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. त्यांनी भारताला दिलेला ‘जय जवान, जय किसान’ हा नारा आजही लोकांना प्रोत्साहन देणारा आहे.

श्री. लालबहादुर शास्त्री यांनी जेव्हा स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता, तेव्हा त्यांना काही काळासाठी कारावास भोगावा लागला होता.

त्याकाळी लाल लजपतराय यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली होती. स्वातंत्र्य सैनिकांना अर्थसहाय्य करणे हा या संस्थेचा उद्देश होता.

ते जेल मध्ये असताना त्यांच्या पत्नीला त्याकाळी ५० रुपये इतकी मदत दिली जायची. एका पत्रात शास्त्री जींनी ती रक्कम पुरेशी आहे का हे त्यांच्या पत्नी ला विचारलं होतं.

त्यांनी उत्तर दिलं होतं की, “ती रक्कम भरपूर आहे. त्या रकमेतून मी फक्त ४० रुपये खर्च करते आणि दर महिन्यात १० रुपये वाचवते.”

हे उत्तर मिळाल्यानंतर श्री. लालबहादुर शास्त्री यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया या सोसायटीला पत्र लिहून ती मदत ४० रुपये इतकीच ठेवावी आणि बाकीचे पैसे इतर गरजूंना द्यावेत अशी विनंती केली होती.

मोठ्या माणसांच्या पाया कसे पडावे हे शिकवण्यासाठी श्री. लालबहादुर शास्त्री यांनी एकदा चक्क आपल्या मुलगा अनिल शास्त्री यांच्या पाया पडून त्यांना ती शिकवण दिली होती. ‘पाया पडणे म्हणजे फक्त गुडघ्यापर्यंत हात नेणे नाही’ हे त्यांना आपल्या मुलाला समजावून सांगायचं होतं.

 

 

गृहमंत्री असताना श्री. लालबहादुर शास्त्री एकदा महरोली या गावातून एक कार्यक्रम अटेंड करून दिल्ली ला परत जात होते. एका रेल्वे क्रॉसिंग वर त्यांची गाडी थांबवण्यात आली होती

रेल्वे फाटक उघडेपर्यंत शेजारी असलेल्या रसवंती चा उसाचा रस घेण्यासाठी ते स्वतः गाडीतून उतरले आणि त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे देऊन त्यांनी सुरक्षा कर्मचारी, ड्रायव्हर यांच्यासाठी रस त्यांनी घेऊन आले होते.

१९६४ मध्ये पंतप्रधान पदी विराजमान असतांना त्यांचा मुलगा कोलंबस शाळेत शिकत होता. मुलाचं प्रगती पुस्तक घेण्यासाठी श्री. लालबहादुर शास्त्री स्वतः शाळेत गेले होते आणि त्यांनी शाळेच्या गेटवरच गाडी थांबवून ते वर्गात गेले.

शिक्षक, कर्मचारी आणि शाळा या गोष्टीने भारावून गेले होते. शास्त्रीजींनी एकच सांगितलं होतं की, “मी आजही एक सामान्य माणूसच आहे आणि कायमच राहीन.”

हे सर्व प्रसंग वाचून कोणालाही असंच वाटेल की, ‘असा नेता पुन्हा होणे नाही.’ आजच्या राजकारणी लोकांनी श्री. लालबहादुर शास्त्री यांच्या चरित्रातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हे नक्की.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version