' “मी हाथरसची पीडित कन्या बोलतीये… पण तुम्ही ऐकताय का…?” – InMarathi

“मी हाथरसची पीडित कन्या बोलतीये… पण तुम्ही ऐकताय का…?”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सगळ्या पुरुषांनो आणि सगळ्या महिलांनो, नमस्कार!

तुम्ही मला ओळखावं अशी मी कोणी मोठी नाही. पण अवघ्या १५ दिवसांत मी संपूर्ण जगाला माहिती झाले, हे माझं दुर्दैव.

होय मी उत्तरप्रदेशमधील हाथरस शहरात सामूहिक बलात्कार झालेल्या आणि जखमांशी लढताना मेलेली अभावी.

मी तीच अभागी, तीच दुर्बला, तीच निर्बला जिच्यावर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत, अशा पद्धतीने ‘षंढ’ नराधमांनी पाशवी बलात्कार केला. होय, मी त्यांना ‘षंढ’च म्हणेन.

 

underprivileged_women-inmarathi

कारण, जर ते षंढ नसते, तर माझ्यासारख्या मुलीवर बलात्कार केला नसता तर स्वत:च्या कर्तृत्वाने अनेक मुलींवर आपली छाप पाडली असती. आणि त्यांच्या हृदयात स्थान मिळवलं असतं. असो.

माझ्यासारखे प्राण निघून गेलेले मृतदेह कधी बोलतात का हो? पण ज्या व्यवस्थेत असे ‘षंढ’ नराधम असतात तिथं मृतदेहांनाही बोलावं लागतं.

अर्थात बोलून काही उपयोग होतो की नाही माहिती मला माहिती नाही. पण तरीही मी बोलतेय.

तो दिवस नेहमीप्रमाणेच होता. सोमवार १४ सप्टेंबर. सकाळचा सूर्य लख्ख प्रकाशत होता. पण तोच दिवस माझ्या आयुष्याला हिरावून घेणारा काळ ठरला.

मी माझ्या एका कामासाठी घराबाहेर पडले. काही अंतर गेले. मला शिकवल्याप्रमाणे घराबाहेर जाताना खाली मान घालून चालत होते.

नेहमीप्रमाणे काही तरुणांच्या टोळक्यांनी माझी छेडछाड करायचा प्रयत्न केला. पण आज त्यांचा प्रकार जरा जास्त असल्याचे मला जाणवले. पण मी त्यांच्याकडे लक्ष न देता खाली मान घालून पुढे चालू लागले.

त्यापैकी एकाने माझा हात पकडला. दुसऱ्याने माझे केस ओढले. माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली. मला मारहाण केली. त्यात मी बेशुद्ध झाले. माझे डोळे उघडले त्यावेळी मी एका निर्मनुष्य ठिकाणी होते.

आता ते ठिकाण कोणतं होतं आणि किती ते नराधम किती होते ते ही मला आठवत नाही.

निर्मनुष्य ठिकाणी आल्यावर त्यांनी मला मुद्दाम जागं केलं. कदाचित बेशुद्धावस्थेत त्यांना जे काही करायचं होतं ते केलं असतं तर… त्यांनी माझे कपडे फाडले.

 

hathras case inmarathi

 

माझ्या शरीरावर कपड्याचा एक तुकडाही ठेवला नाही. पुढे जे काही घडलं ते सभ्य माणसांना मी सांगूही शकत नाही.

त्या हरामखोर नराधमांनी माझा शरीराचे शब्दश: हाल हाल केले. साले बलात्कार करून मनावर जखमा करत होतेच पण सगळ्या शरीरालाही मारहाण करत होते.

हे सगळं होत असताना मी जिवाच्या आकांताने आरडाओरडा करत होते. मी ओरडू नये म्हणून एकानं माझी जीभच कापून टाकली. त्यावेळी प्रचंड वेदना, जखमा झाल्या.

वाटलं चित्रपटात दाखवतात तसं त्यांना लाथ घालावी आणि एकेकाचं लिंग आणि मुंडकं छाटून टाकावं. पण, चित्रपटातलं खरं कधी होतं नाही, ते मला तेव्हा समजलं.

ते नराधम मात्र घाणेरड्या चित्रपटातली दृश्य खऱ्या जगात माझ्यावर करत होती. शीऽऽऽ….

ती माणसं नव्हती. पशू होती. नाही. पशूपण नव्हती. पशूंनाही एक आचारसंहिता असते. एक मर्यादा असते. त्यांना पशु म्हणणं म्हणजे पशुंचाही अवमानच आहे. त्यांनी कोणतीही उपमा नाही.

ते तेच होते. नीच, नराधम, षंढ, नालायक, बेशरम आणि… त्यांना शिव्या देऊन काही उपयोग नाही. त्यांना कठोरातील कठोर शिक्षाच द्यायला हवी.

नंतर जेव्हा मी अर्धबेशुद्धावस्थेत होते तेव्हा मला समजलं की हाथरसपासून २०० किलोमीटरवर असलेल्या दिल्लीतील एका रुग्णालयात आहे. माझ्या सगळ्या शरीरात डॉक्टरांनी नळ्या खुपसलेल्या होत्या.

 

rape victims inmarathi

 

पण तेव्हा वेळ निघून गेली होती. डोळे अर्धे उघडलेले होते. माझं अर्धे शरीर मृत झालं होतं. मला पॅरालिसीस झाला होता. नराधमांनी माझी जीभ कापली होती. शरीरातील प्रत्येक अवयव जखमी झाला होता.

मन तर केव्हाच मेलं होतं. शरीरात थोडे प्राण होते. पण जगण्याची इच्छा नव्हतीच मुळी. तरीही डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत होते. उपचार सुरु होते.

अखेर २९ सप्टेंबरच्या रात्री माझ्या शरीराची जगण्याची उरलीसुरली इच्छाही मेली आणि सोबत मीसुद्धा हे जग सोडून गेले.

माझी गोष्ट इथचं संपत नाही. पोलिसांनी ३० सप्टेंबरला पहाटे २ ते ३ दरम्यान माझ्या मृत शरीराला हाथरसला नेले.

जिवंतपणी मला ज्या वेदना झाल्या त्याहीपेक्षा मला अशा मेलेल्या स्थितीत पाहून आई-बाबांची काय अवस्था होईल या विचाराने मेल्यानंतरही मला खूप वेदना झाल्या.

मात्र, तो योग आलाच नाही. माझे आई-बाबा आणि पोलिस, माझे काही नातेवाईक, गावकरी अशा सगळ्यांचा आरडाओरडा फक्त मला ऐकू आला.

सगळेजण म्हणत होते की, आमच्या लेकीला आमच्या घरी घेऊन चला. तिथं रात्रभर तिला राहून सकाळी आमच्या परंपरेप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करूयात, असं सगळे म्हणत होते.

पोलिसांनी विचार केला. वायरलेसवर कोणाशी तरी बोलले. काहीतरी संदेश आला. आणि माझा देह असलेली गाडी थेट स्मशानभूमीत नेण्यात आली. सगळेजण धावत धावत माझ्या गाडीमागे येत होते.

 

rape-law-inmarathi

 

अखेर पोलिसांनी माझ्या देहावर अंत्यसंस्कार केले. गावकऱ्यांनी माझ्यापर्यंत पोहोचू नये, म्हणून पोलिसांच्या ताफ्याने मानवीसाखळी केली. मला अग्नीच्या हवाली केले गेले.

आई, बाबा, गावकरी, नातेवाईक कोणाकोणालाच मला बघता आले नाही. त्यांनाही मला पाहता आले नाही.

पण, सभ्य माणसांनो आणि सभ्य स्त्रियांनो आज तुम्हाला मला चार गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्ही तुमच्या किंवा कोणत्याच मुलीला मान खाली घालून पुढे जात रहा, असं चुकूनही सांगू नका.

कोणी छेड काढली तर शांत रहा असं सांगू नका, असं तर अजिबातच सांगू नका.

कुणी वाकड्या नजरेनं बघायचा प्रयत्नही केला तर त्याचे डोळे आणि लिंग फोडून काढायला सांगा. पुढे काय होईल ते पाहता येईल. कोणी स्पर्श करायचा प्रयत्न केला तर हात मोडून टाकायचं शिकवा.

कोणी केस ओढले तर त्याचं मुंडकं छाटून टाकायला सांगा. त्यासाठी जे काही प्रशिक्षण वगैरे देता येईल ते सगळं द्या.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे समस्त पुरुषांनो तुमच्या देखत असा छेडछाडीचा एखादा प्रकार घडला, तर तुम्ही गप्प बसू नका.

तुम्ही सगळे एकत्र येत नाहीत. सुरक्षितपणे घरात बसता. विरोध करत नाहीत. ट्विट करता किंवा मला मेणबत्ती आणि फेसबुक कमेंट लिहून श्रद्धांजली देता म्हणून गुंडांच्या टोळ्या जन्म घेतात. म्हणून बलात्कार होतात.

 

candle march inmarathi

 

तुम्ही एक व्हा. विरोध करा. आक्रमक व्हा. मग बघा असा प्रकार घडेल तरी का?

आणि एवढं करूनही माझ्यावर घडला तसा सारखा प्रकार घडलाच तर अशा प्रकारातील नराधमांना शहरातील मुख्य चौकात दोरीने घट्ट बांधा, त्यांच्या शरीरावर एक कपडाही ठेवू नका आणि त्यांना जिवंतपणे रॉकेल, पेट्रोल टाकून पेटवून टाका.

आपण माणसं आहोत. ही अशी शिक्षा आपल्या व्यवस्थेलाही मान्य नसेल. पण म्हणून माझ्यासारख्या अबला, तरुणींनी अशा नराधमांचे बलात्कार सहन करून मरायचं का?

आणि तुम्ही मेणबत्या पेटवत बसायच्या का? चला, माझी जायची वेळ झाली. मी निघते. तुम्ही आणि तुमचं सभ्य माणसांचं जग सुरक्षित करणं हे आता फक्त तुमच्याच हातात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?