Site icon InMarathi

आधी हे चार तोटे लक्षात घ्या, मगच #couplechallenge मध्ये सहभागी व्हा!

couple inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लॉकडाऊन सुरु झालं आणि प्रत्येकाचंच आयुष्य बदललं. ऑफिसचं काम, बाहेर भेटणं, मित्र – मैत्रिणींसोबत वेळ घालवणं, गप्पा मारणं एवढंच काय तर शिक्षणही ऑनलाइनच सुरू झालं.

सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय! व्यक्त होण्यासाठी, नवीन मित्र मैत्रिणी जोडण्यासाठी सोशल मीडिया हवंच!

लॉकडाऊनमध्ये तर सोशल मीडिया ही टाईमपासची गोष्ट नसून “गरज” बनली. “दिवसभर घरी बसून करायचं काय?” हा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर वेळ घालवून या प्रश्नाचं उत्तर लोकांना मिळालं.

 

 

करमणुकीसाठी लोकांनी वेगवेगळे फोटो टाकणं सुरु केलं आणि त्यातूनच विविध चॅलेंजेस निर्माण झाली. अशी अनेक चॅलेंजेस आली…ट्रेंडिंग झाली आणि धुमाकूळ घालून निघूनही गेली.

सध्या असंच एक चॅलेंज व्हायरल होतंय, ते म्हणजे #couplechallenge. खासगी जीवनातले फोटोज, आठवणी फेसबुकवर टाकायच्या आणि वाहवा मिळवायची.

जसजशी ही चॅलेंजेस उदयाला आली, तसतसे लोकांमध्ये दोन भिन्न मतप्रवाह तयार झाले. एक, अगदी मनापासून प्रत्येक चॅलेंज फॉलो करणारे… आणि दुसरे, या सगळ्या गोष्टीकडे फुटकळ दृष्टीने बघणारे…!

आपणही आपल्या मनाप्रमाणे कधी या गटात असतो तर कधी त्या! सोशल मीडियावरच्या चॅलेंजेस कडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच!

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे #couplechallenge आणि एकूणच चॅलेंजेमध्ये सहभागी होण्याचे फायदे आणि तोटे यांचा घेतलेला हा आढावा :

#couplechallenge चे फायदे

१) आठवणींना उजाळा :

 

 

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टींना वेळ द्यायचा विसरतो, त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाती!

लग्न झाल्यानंतर घरातील इतर जबाबदाऱ्यांमध्ये नवरा- बायको इतके अडकतात, की त्यांना एकमेकांसाठी वेळच काढता येत नाही. सध्या चालू असलेल्या #couplechallenge मुळे २ क्षण का होईना, पण त्या आठवणींना उजाळा मिळतोय.

शेवटी फोटो म्हणजे काय तर कॅमेऱ्यात कैद केलेली आठवण! त्यामुळे असे वेगवेगळे चॅलेंजेस  घेऊन आपण जुन्या आठवणींना उजाळा देत असतो.

 

२) सोशल कनेक्शन :

 

 

कॉलेजमध्ये असताना प्रत्येकाकडे भरमसाठ वेळ असतो, अर्थात ते दिवसच मज्जा करण्याचे असतात.

तेव्हा अनेक मित्र- मैत्रिणी असतात, रोज भेटी- गाठी, कट्ट्यावर भेटून चहा मारणं चालू असतं, पण कॉलेज सुटतं आणि या सगळ्याच गोष्टी थांबतात. मग काय तेच ते रुटीन!

जुने फोटो बघून जसा आठवणींना उजाळा मिळतो, तसं इतरांचे फोटो बघून, त्यावर कमेन्ट करून आपण नवे मित्र- मैत्रिणी बनवत असतो.

मुळात, सोशल मीडियाचा उद्देशच नवीन ओळखी बनवणं हा आहे. या सगळ्या चॅलेंजेसमुळे हा उद्देश योग्यप्रकारे साधला जातो.

 

३) सध्याच्या काळत महत्त्वाचं :

गेले अनेक महीने आपण कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले आहोत, लॉकडाउनमुळे घरीच आहोत. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होणं, आठवणी शेअर करणं हेच विरंगुळ्याचं साधन बनलंय.

असं म्हणतात की, “रिकामं डोकं राक्षसाचं घर”. काहीच न करता घरी बसून राहायचं, या गोष्टीचा मानसिक ताण येऊ शकतो. रिकामपण खायला उठतं. अशा काळात सोशल मीडियावर गप्पा मारून जरा हलकं वाटतं.

शेवटी माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे आता ‘वर्क फ्रॉम होम’ असलं तरीही, या सगळ्या चॅलेंजेसमुळे मानवी मनाला थोडा विरंगुळा मिळतो. जे मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे.

 

४) ताण कमी होतो :

 

 

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर मानसिक स्वास्थ्य किती महत्त्वाचं आहे याची खात्री सगळ्यांना पटली. मानसिक ताण कमी होण्यासाठी मनातल्या गोष्टी बाहेर येणं महत्त्वाचं असतं.

सोशल मीडियामुळे लोकांना व्यक्त होता येतं, वेगवेगळी चॅलेंजेस स्वीकारल्यामुळे आपण त्यात गुंतलेले राहतो, नकारात्मक विचार कमी होतात.

लाईक, कमेंट्स पाहून आपल्यासोबत लोकं आहेत, आपण एकटे नाही आहोत या भावनेने मनाला दिलासा मिळतो.

 

अशा चैलेंजेसचेमध्ये सहभागी होण्याचे तोटे

१) वेळेचा अपव्यय

 

 

 

आपण एखादं चॅलेंज स्वीकारतो आणि मग चॅलेंजेसची मालिकाच सुरु होते. आज हे…उद्या ते…. या चक्रात आपण नकळत अडकतो.

चॅलेंज स्वीकारण्यात, फोटो शोधण्यात, टाकण्यात, इतरांना टॅग करण्यात, त्यांच्या लाईक कमेंट्स बघण्यात आपण आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ वाया घालवत आहोत याची पुसटशी कल्पनाही आपल्या मनाला शिवत नाही.

या सगळ्यातून साध्य काहीच होणार नसतं, पण आपण मात्र प्रवाहासोबत पोहत राहतो. या सगळ्या चक्रात कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला हवं.

 

२) सुरक्षिततेची हमी नाही :

 

 

व्यक्त व्हायचंय, नवे मित्र – मैत्रिणी जमवायचेत म्हणून आपण बिनधास्तपणे, पुढचा मागचा कोणताही विचार न करता सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्यातले फोटो टाकतो.

असं करताना आपल्यापैकी कितीजण सुरक्षेचा विचार करतात? अर्थात आपण कोणीच करत नाही. आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते.

हल्ली अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या आपण सर्रास ऐकतो. भारताच्या पंतप्रधानांच अकाउंटदेखील हॅक होऊ शकतं, तर तुमची आमची काय गाथा!

या फोटोंचा वापर अनेकदा अश्लील साईट्स किंवा इतर अनेक कारणांसाठी केला जातो, त्यामुळे फोटो अपलोड करताना कसे आणि कोणते फोटो अपलोड करायचे याचं भान आपल्याला असायला हवं.

आपली आजची एक कृती भविष्यात आपल्याला महागात पडू शकते याचा सजग राहून विचार व्हायला हवा.

 

३) आंतराष्ट्रीय कंपन्यांना फायदा :

 

 

सोशल मीडियावर फोटो टाकून, व्यक्त होऊन आपण त्या कंपनीचा नफा करून देत असतो. ही गोष्ट आपल्या कधीच लक्षात येत नाही, पण आपण स्वतःहूनच आपल्या देशातील पैसा बाहेरील देशांमध्ये पाठवत असतो.

 

४) मानसिक स्वास्थ्यासाठी धोक्याचं :

 

 

 

व्यक्त होणं ही गोष्ट चांगली असली, तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. चॅलेंजेस स्वीकारून आपण सतत लाईक्स, कमेंट्स चेक करत असतो. त्या लाईक्सवर आपला आनंद अवलंबून असतो.

लाईक्स आपल्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत, तर आपली निराशा होते. थोडक्यात काय, तर आपला आनंद आपण या आभासी जगात शोधतोय, जे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी धोक्याचं आहे.

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, सोशल मीडिया चॅलेंजेस जसे चांगले तसे वाईटही आहेत. या गोष्टीच्या किती आहारी जायचं हे शेवटी ज्याचं त्याने ठरवावं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version