स्काय डायविंग, तेदेखील चक्क नऊवारी साडीमध्ये? या महिलेबद्दल नक्की वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
ॲडव्हेंचर स्पोर्टस् हा बऱ्याच जणांच्या आवडीचा विषय सध्या झालेला आहे. मग त्यात स्काय डायव्हिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅराशूटिंग, राफ्टींग, पॅराग्लायडिंग, सर्फिंग असे विविध प्रकार येतात.
यासाठी ट्रेनिंग ही दिलं जातं, तसचं हे सगळे स्पोर्ट्स करण्यासाठी एक जागाही ठरलेली असते. कोकण, गोवा, अंदमान ,शिमला, मनाली यासारख्या ठिकाणी अशा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची केंद्रे आहेत.
यामधल्या स्काय डायव्हिंग मध्ये एक महाराष्ट्रीयन मुलीने विक्रम केला आहे. दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरून तिने स्काय डायव्हिंग केलं आहे. हा पराक्रम करणारी ती मुलगी आहे,” शितल राणे महाजन.”
तिच्या नावावर स्काय डायव्हिंगचे अनेक विक्रम आहेत. त्याचे अनेक मेडल्स आणि सर्टिफिकेटही तिच्याकडे आहेत.
स्काय डायव्हिंग म्हणजे काय, तर विमानातून खूप उंचावरून खाली उडी मारणे. उडी मारताना खूप उंचीवर असल्यामुळे माणसाला हवेत उडाल्यासारखा भास होतो.
काही काळ हवेत राहुन माणूस जेव्हा खाली येतो, त्यावेळेस पॅराशुट उघडणे आणि खाली उतरणे. हा एक चित्तथरारक अनुभव असतो.
उडणाऱ्या विमानातून खाली उडी मारताना न घाबरणे आणि वेळेत पॅराशुट उघडणे यासाठी खूप महत्त्वाचे असते. हे थ्रील अनुभवण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात त्यासाठी प्रॅक्टिसही करतात.
शितलने मात्र असं कोणतंही ट्रेनिंग घेतलेलं नाही. परंतु स्काय डायव्हिंग मात्र ती अत्यंत आत्मविश्वासाने करते.
बरं, स्काय डायव्हिंग करणं एक वेळ समजू शकतं. परंतु तिने हे स्काय डायव्हिंग मराठमोळ्या वेशात केलं आहे. म्हणजे चक्क तिने नऊवारी साडी नेसून हे स्काय डायव्हिंग केलं आहे!
ही नऊवारी साडी नेसून तिने जे स्काय डायव्हिंग केलं आहे ते थायलंड मधल्या पट्टाया मधून. तिला खरंतर १३०००० फूट उंचीवरून झेप घ्यायची होती..
याबद्दल बोलताना ती म्हणते, “मी स्काय डायव्हिंग करतच होते, पण मला यात काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि मग जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपण हे स्काय डायव्हिंग महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रीयन पोशाखात करावं असं वाटलं.
स्काय डायव्हिंगसाठी सूटेबल असा महाराष्ट्रीयन पोशाख महिलांना उपलब्ध आहे, आणि तो म्हणजे नऊवारी साडी. अर्थात रोज ही साडी नेसत नसल्यामुळे स्काय डायव्हिंग करताना त्रास होईल का?असा विचारही मनात आला होता”, असं ती म्हणते.
तिला तिथल्या माणसांनी या साडीत स्काय डायव्हिंग करायला परवानगी देखील दिली नव्हती. पण शितल आपल्या निश्चयावर ठाम होती. शेवटी तिला परवानगी मिळाली.
नऊवारी साडी नेसणे मुळात कठीण. ती नेसून वावरणेही हल्ली अवघड जातं. म्हणून फक्त सणा समारंभात, लग्नात ही साडी स्त्रिया नेसतात. रोजच्या वापरात ती नसते.
आता इथे तर शितलला उंचीवरून उडी मारायची होती. उंचीवरून खाली येताना हवेच्या प्रभावामुळे साडी सुटली तर त्यात धोका देखील होता.
त्यामुळे तिला ती साडी अगदी चापून-चोपून नेसावी लागली. आवश्यक त्या ठिकाणी पिनअप करावं लागलं. काही ठिकाणी तिने सेलोटेपने साडी चिटकवली.
शितल महाजन याबद्दल म्हणते,
मला हे सिद्ध करायचं होतं की स्त्रिया फक्त ही साडी नेसून मिरवतच नाहीत, तर ती साडी नेसून असे स्काय डायव्हिंग सारखे चित्तथरारक खेळही खेळू शकतात.
ती म्हणते की मला हेच सांगायचं होतं की, भारतीय महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. संधी मिळाली तर त्या काहीही करू शकतात.
याआधीचे सगळे रेकॉर्डस मी भारतीय मुलगी म्हणून भारतीय मुलींना अर्पण केले होतं. पण ही नऊवारी साडी नेसून केलेला रेकॉर्ड मला तो महाराष्ट्रातील महिलांना द्यायचा होता.
तिची ही उडी या वर्षीच्या महिला दिनाच्या दिवशीच होणार होती. परंतु त्यादिवशी थायलँड पट्टायामध्ये प्रचंड प्रमाणात वादळ आणि पाऊस आला. आणि तिला हा दिवस पुढे ढकलावा लागला.
नंतर हवामान अनुकूल झाल्यावर, तिने जी उडी घेतली ती ९००० फुटावरून घेतली. तिने अशी नऊवारी साडी नेसून यशस्वीरित्या स्काय डायव्हिंग केलं.
आत्तापर्यंत शीतलने ७०४ वेळा स्काय डायव्हिंग केलेलं आहे. जगभरातल्या विविध उंच ठिकाणांवरून तिने हा पराक्रम केलेला आहे. सातही खंडातून तिने ही झेप घेतली आहे. भारतातून तिने १८ वेळेला नॅशनल रेकॉर्ड केलेला आहे. तर तिचे ६ जागतिक रेकॉर्ड आहेत.
१८ एप्रिल २००४ या दिवशी तिने पहिल्यांदा उत्तर ध्रुवावरून स्काय डायव्हिंग केलं.
रशियाच्या MI-8 या हेलिकॉप्टरमधून २४०० फूट उंचीवरून तिने उडी मारली, त्यावेळेस तिथलं तापमान होतं -३७°सेल्सियस. इतक्या उंचीवरून उत्तर ध्रुवावर उडी मारणारी ती पहिलीच महिला होती.
त्यानंतर केवळ दोनच वर्षात तिने दक्षिण ध्रुवावरून स्काय डायव्हिंग केलं. १५ डिसेंबर २००६ या दिवशी तिने अंटार्टिका मधून हेलिकॉप्टरमधून ११६०० फूट उंचीवरून उडी मारली. त्यावेळेस तिथले तापमान होतं -३८° सेल्सिअस.
दोन्ही ध्रुवावरून स्काय डायव्हिंग करणारी ती सगळ्यात पहिली आणि लहान महिला होती. यावेळेस ती फक्त २३ वर्षांची होती. तिच्या या पराक्रमामुळे तिला पद्मश्री हा किताब भारत सरकारने दिला आहे.
विशेष म्हणजे शीतलने आपलं लग्न देखील असं हवेतच केलं. १९ एप्रिल २००८ या दिवशी तिने वैभव राणे या फिनलँड स्थित अनिवासी भारतीयाशी पुण्यामध्ये लग्न केलं.
त्या दोघांचं लग्न एका एअर बलून मध्ये करण्यात आलं. अगदी त्यांचे आई-वडील आणि लग्न लावणारे गुरुजीही हवेतच होते.
वैभवला देखील अशा स्काय डायव्हिंगची आवड आहे. २०११ मध्ये दोघांनी एकत्र स्काय डायव्हिंग केलं. हा देखील एक रेकॉर्ड झाला, कारण आत्तापर्यंत कोणत्याही जोडप्यांनी एकत्र स्काय डायव्हिंग केलं नाही.
आता शितल नऊ वर्षांच्या दोन मुलांची आई आहे. तरीदेखील तिची स्काय डायव्हिंग ची आवड मात्र थांबलेली नाही. तिला आयुष्यात एकदा तरी माऊंट एव्हरेस्ट वरून स्काय डायव्हिंग करायचे आहे.
आत्तापर्यंत तिने दोन वेळा एव्हरेस्ट वरून स्काय डायव्हिंग जे प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी झाले नाहीत. पण अजूनही तिने आपली जिद्द थांबवलेली नाही.
या एव्हरेस्टच्या मोहिमेसाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे, पण सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही, याबद्दल ती खंत व्यक्त करते.
आतापर्यंतच्या सगळ्या मोहिमा तिने स्वतःच्या खर्चातून केल्या आहेत. “केवळ कुटुंबाचा पाठिंबा आहे म्हणून मला हे शक्य झालं” असं ती म्हणते. “परंतु ज्या मुलींना असा पराक्रम करायचा असेल त्यांना केवळ पैशांअभावी काही करता येत नाही”, असं ती म्हणते.
गेल्यावर्षी तिला एरो क्लब इंडियाने सातही खंडांमध्ये काय डायव्हिंग केल्याबद्दल प्रतिष्ठित ‘एफएआय सबीहा गोक्सेन मेडल’ बहाल केले आहे. हे मेडल घेणारी ही पहिलीच महिला आहे.
शितल महाजन सारखे लोक खरंतर तरुण पिढी समोरचे आदर्श व्हायला हवेत. जे काहीतरी वेगळं करू इच्छितात, कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवतात, आपल्या ध्येयापासून कधीही दूर जात नाहीत. शीतलच्या पुढच्या मोहिमांसाठी तिला शुभेच्छा!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.