आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पूर्वी म्हणजे दहा पंधरा वर्षांपूर्वी शाळेतील मुलांमध्ये एखादीच मुलगी किंवा एखादाच मुलगा जाडजूड असायचा…बाकी सगळे किडकिडीतच असायचे.
आता मात्र बरोबर उलट चित्र आहे. एखादाच मुलगा किडकिडीत शरीरयष्टीचा असतो आणि स्थूल मुलं जास्त दिसतात. कारण कधी विचार केला आहे याचा? पूर्वीच्या तुलनेत या पिढीला असलेल्या काही वाईट सवयी.
थोडं लक्षात घेतलं तर जाणवतं, धकाधकीची आधुनिक जीवनशैली, खाण्यावर नियंत्रण न राहणं, जेवणाच्या चुकीच्या वेळा याचा आरोग्यावर परिणाम होतो.
या पिढीतील मुलं, तरुण यांना असलेली जंकफूडची आवड, कार्बोनेटेड साॅफ्ट ड्रिंकचा सोस, व्यायामाचा अभाव, सतत एका जागी बसून केली जाणारी बैठी कामं यामुळे हा स्थूलपणा येतो.
शाळांमधून कमी झालेले पीटीचे तास, व्यायाम न होणं, मोबाईलला चिकटून राहील्याने मैदानी खेळ न खेळणे, आहारात असलेला बेकरीजन्य पदार्थांचा समावेश, मैदा, साखर यांचं प्रमाण यामुळे आजकाल बहुतेक लोक स्थूल होताना दिसतात.
जाडी वाढते म्हणजे काय होतं? तर शरीरात असलेला मेद हळूहळू चरबीच्या रुपात पोट, कंबर, मांड्या या शरीराच्या भागांवर जमू लागतो आणि शरीर हळूहळू बेढब दिसू लागतं.
त्याच्या जोडीला येतात मधुमेह रक्तदाब हृदयविकार असे हानिकारक पाहुणे. जे एकदा का शरीरात वस्तीला आले, की तहहयात तुम्हाला अंतर देत नाहीत.
याशिवाय काही अंशी कारणं आहेत, ज्या कारणांनी तुमच्याही नकळत तुमचं वजन वाढू लागतं आणि एकदा का वजन वाढलं, की ते आटोक्यात आणण्यासाठी भयंकर प्रयत्न करावे लागतात.
मुख्य म्हणजे त्यासाठी प्रयत्न आणि तीव्र इच्छाशक्ती असावी लागते, तरीही जाडी वाढते अशी तक्रार असतेच कारण काही कारणं आपल्याला दिसत असतात. काही दिसत नसतात. ही न दिसणारी छुपी कारणं!!!
कोणती आहेत ही छुपी कारणं?
१. अनुवंशिकता-
अनुवंशिकतेनं आलेली जाडी…यासाठी आपण काही करु शकत नाही. जाड आई वडीलांची मुलं ही अनेकदा जाड असतात.
आई वडीलांच्या स्थूलपणाचे जीन्स त्यांच्याकडं आलेले असतात. म्हणून ही मुलं जन्मतः जाड असतात, पण सरसकट सर्वच जाड लोक अनुवंशिकतेने जाड असतात असं नाही.
बुद्धिजीवी वर्गानं पाश्चिमात्य आहार स्वीकारला, जसं पिझ्झा- बर्गर- फ्रेंच फ्राईज, पास्ता. यामधील असणारा मैदा, चीझ यांमुळे जाडी वाढते. ते आपोआप शरीरात असणाऱ्या स्थूलतेच्या जीन्सना पोषक ठरतात आणि जाडी वाढते.
थोडक्यात तोंडावर ताबा असणं हेच अतिशय आवश्यक आहे. ही सतत अरबट चरबट खाण्याची सवय आपल्याही नकळत आपल्याला जाड बनवत असते.
२. प्रिझर्वेटीव्हयुक्त अन्नपदार्थ –
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळ नसणं ही पण एक मोठी समस्या आहे. नोकरीमुळे खूप स्त्रीया स्वयंपाकघरात फार वेळ देऊ शकत नाहीत.
चटण्या, लोणची इतर अन्नपदार्थ विकतचेच वापरण्याकडं जास्त कल असतो. ते टिकवून ठेवण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केली जाते. त्यात प्रिझर्वेटीव्ह वापरली जातात. ही प्रिझर्वेटीव्हज् शरीराला अपायकारक ठरू शकतात.
पदार्थ नैसर्गिकरीत्या टिकावे म्हणून मीठ वापरण्याची आपली भारतीय पद्धत, पण याशिवाय कृत्रिमरीत्या टिकवण्यासाठी वापरली जाणारी प्रिझर्वेटीव्हज् ही जाडीचं कारण ठरु शकतात. अशी प्रक्रियायुक्त पदार्थांची सवय टाळावी.
३. सतत खाण्याची सवय –
ही अतिशय घातक सवय. बसल्या बसल्या काहीतरी करु म्हणून सतत काही ना काही खात राहणं.. यामुळं होतं काय तर आतड्यांना बिलकुल विश्रांती मिळत नाही.
सतत खात राहीलं त्यामानानं व्यायाम किंवा इतर वर्क आऊट नसेल तर अन्न पचणार कसं? आणि तयार झालेली चरबी जाणार कुठं? मग ती अंगोपांगी मिरवू लागते.
पोट, कंबर, मांडल्या, दंड यावर चरबीचा चांगलाच थर जमतो आणि स्थूलतेकडं वाटचाल करता करता तुम्ही कळत नकळत स्थूलच होऊन जाता.
जंकफूड मधील अतिरिक्त साखर, मैदा, तेल यांनी जाडी वाढायला मदत होते. आपल्या मेंदूवरही हे घटक ताबा मिळवतात आणि सतत तेच खावे वाटतात, म्हणून आपल्या देशातील हवामान, ऋतूमान यांनुसार बनवलेलं घरगुती साधं जेवणच कधीही उत्तम.
४. मार्केटिंगचा भूलभुलैय्या –
ब्रेड, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, पास्ता, नूडल्स त्यावर वापरले जाणारे अजिनोमोटो, वेगवेगळे साॅस या सर्व घटकांनी बाजारपेठ प्रचंड प्रमाणात काबिज केली आहे.
या पदार्थांच्या जाहिराती पाहून छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या पदार्थांची भुरळ पडली आहे. या कंपन्यांनी इतक्या जबरदस्त जाहिराती बनवल्या आहेत की लहान मुलांना त्यांचे फायदे तोटे अजिबात कळत नाहीत.
त्या चकचकीत जाहिरातींच्या भूलभुलैय्यामध्ये अडकून हे पदार्थ खाणं कसं चांगलं आहे, गरजेचं आहे असं वाटून लोक ते घेतात..खातात नी परत परत खात राहतात. परिणामी स्थूलतेचे धनी होऊन बसतात.
या जाहिराती बघून दुर्लक्ष करणं हाच या भुलभुलैय्यामध्ये न अडकण्याचा मार्ग आहे.
५. इन्सुलिन-
माणसाच्या शरीरात प्रत्येक आजारावर औषध आहे. इन्सुलिन हे योग्य प्रमाणात असतं तेव्हा माणसाची तब्येत नाॅर्मल असते. ते कमी झालं, की मधुमेह होतो आणि वाढलं तर जाडी वाढते.
मानवी शरीरातील ऊर्जा या इन्सुलिनमुळेच असते. अगदी ते ऊर्जेचं कोठारच आहे असं समजा, पण कोणतीही ऊर्जा योग्य प्रमाणात असली तरच ती उत्तम काम करते.
एका निरीक्षणानुसार ज्या जाड महिला आहेत त्यांच्यातील इन्सुलिन जवळपास ८०% नोंदवलं आहे. मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये ते ३३% होतं आणि हेच त्यांच्या स्थूलपणाचं कारण आहे.
६. काही विशिष्ट औषधे-
नैराश्याच्या विकारांवर असलेली औषधं, मधुमेहावरील औषधं यामध्ये असलेल्या घटकांमुळे कमी अंशी जाडी वाढते.
तुमच्या शरीरातील अंतर्गत अवयव आणि मेंदू यांची कार्यक्षमता वाढवायला ही औषधं काही येतात, पण त्याचवेळी त्यांनी जाडी वाढू शकते.
७. अन्नपदार्थ गुणवत्ता –
भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी म्हण आहे आपल्याकडं. म्हणजे भूक लागली की काहीही चालतं. पण तसं नाही. भूक लागली म्हणून मिळेल ते पदार्थ खाणं यानं जाडी वाढतेच.
त्याची गुणवत्ता न बघता केवळ ते स्वस्त आहेत, भूक सांगते असा विचार करून खाल्लेलं अन्न हे जाडीच्या दारातच नेतं. म्हणून थोडं खा.
आपले भारतीय पारंपरिक आणि घरगुती पदार्थ कधीही द बेस्ट आहेत हे लक्षात घेऊन चांगले आणि पौष्टिक पदार्थच खावेत.
८. चुकीची माहिती-
ही वजनवाढीची मोठी मैत्रीण!!! पूर्ण अज्ञानी असणं हे अर्धवट ज्ञानी असण्यापेक्षा कधीही उत्तम. अर्धवट ज्ञानी माणसांनी आपलं आरोग्य, त्यावरच्या तक्रारी, त्याचे उपाय हे गूगलवरुन विविध वेबसाईटवर जाऊन शोधून आणलेले असतात.
प्रत्येकाची तब्येत वेगळी..औषधं वेगळी..पण ही अशी कुठूनही गोळा केलेली माहिती अतिशय घातक ठरु शकते. स्थल, कालमान, व्यक्तीपरत्वे ही माहिती बदलत असते.
सरसकट सगळ्या लोकांना एकच उपचार चालत नाही. वजन कमी करण्यासाठी काही कंपन्याही बरंच काही सांगतात पण तसं होत नसतं. म्हणून डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करु नये. नाहीतर अस्ताव्यस्त पसरायला वेळ लागत नाही.
थोडक्यात सांगायचं तर- योग्य, पौष्टिक आहार, जेवणाच्या वेळा सांभाळणं, मर्यादित खाणं, व्यायाम हीच जाड न होण्याची गुरुकिल्ली आहे.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.