Site icon InMarathi

एक-दोन नव्हे, तर ५ पेक्षा अधिक संघांकडून खेळले आहेत हे ५ IPL खेळाडू!

prathiv patel - dinesh karthi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट बघत असतात त्या इंडियन प्रीमियर लीगची अर्थात आयपीएलची नुकतीच सुरुवात झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्वेंटी ट्वेन्टी वर्ल्डकप रद्द झाल्यामुळे आयपीएलवरही अनिश्चीततेचे सावट होते, परंतु अखेर २००९ च्या मोसमाप्रमाणे यंदाही भारताबाहेर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल खेळण्याचा निर्णय झाला.

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी जगभरातील खेळाडू उत्सुक असतात. दिग्गज खेळाडूंप्रमाणेच अनेक नवोदित खेळाडूंना आयपीएलने चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

 

 

अनेक खेळाडूंना स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी आयपीएलचा बराच उपयोग झालेला दिसून येतो. आयपीएलमध्ये हंगाम सुरू होण्यापूर्वी होणारा खेळाडूंचा लिलाव हीसुद्धा एक महत्त्वपूर्ण गोष्ट असते.

फॉर्म मध्ये असणाऱ्या खेळाडूंना करारबद्ध करून घेण्यासाठी सगळ्याच संघांमध्ये चढाओढ दिसून येते. महेंद्रसिह धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारखे खेळाडू त्यांच्या संघांसाठी ‘आयकॉन प्लेयर’ आहेत.

यांच्याशिवाय असे अनेक खेळाडू आहेत, की ज्यांना २-३ मोसम एका संघाकडून खेळल्यावर दुसऱ्या संघात संधी मिळाली किंवा काहीजणांना कोणीच करारबद्ध न केल्याने खेळता आले नाही.

 या सगळ्या खेळाडूंमध्ये केवळ पाचच असे खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये तब्बल ५ किंवा त्यापेक्षा जास्त संघांकडून खेळले आहेत! पाहूया कोण आहेत हे ५ खेळाडू!

 

आरोन फिंच –

 

 

आरोन फिंच हा ऑस्ट्रेलियाचा एक भरवशाचा फलंदाज. काही सामन्यांमध्ये त्याने ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदाची धुरादेखील सांभाळली आहे.

२०१० मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून फिंचने आयपीएलमध्ये पदार्पण केले, पण त्या वर्षात त्याला केवळ एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.

पुढच्याच मोसमात त्याला दिल्ली डेअरडेव्हील्स संघाने करारबद्ध केले. २०११ आणि २०१२ या दोन वर्षात फिंच दिल्लीकडून ८ सामने खेळला.

२०१३ चा मोसम फिंच पुणे वॉरियर्स संघाकडून खेळला. काही सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपदही सांभाळले. लगेच २०१४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून फिंच १३ सामने खेळला.

२०१५ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला करारबद्ध केले, परंतु केवळ ३ सामन्यांत तो खेळू शकला. यानंतर मात्र पुढची २ वर्षे तो गुजरात लायन्स या नव्याने सामील झालेल्या संघाकडून मोसमातील सगळे सामने खेळला.

२०१८ मध्ये फिंच किंग्स इलेव्हन पंजाब तर्फे १० सामने खेळला. २०१९ मध्ये तो विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी आयपीएल मध्ये सहभागी झाला नाही.

अशाप्रकारे १० वर्षात तब्बल ७ संघांच्या वाऱ्या करून यंदा फिंच आपल्या आठव्या संघाबरोबर म्हणजेच बंगलोर बरोबर खेळणार आहे. या हिशोबाने आयपीएलमधील सगळ्यात अनुभवी खेळाडू म्हणून आरोन फिंचचे नाव घेतल्यास वावगे ठरणार नाही!

 

इशांत शर्मा –

 

 

२००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा इशांत शर्मा भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज म्हणून उदयास येत होता. त्यावेळी तब्बल ३.८ कोटी रुपये मोजून कोलकाता संघाने इशांतला करारबद्ध केले होते.

३ वर्षे कोलकाताकडून खेळल्यावर इशांत डेक्कन चार्जर्स संघात सामील झाला. २ वर्षांनी सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला करारबद्ध केले. या दरम्यान त्याचा फॉर्म काहीसा खालावला होता.

हैद्राबाद कडून खेळताना एका सामन्यात त्याने ४ षटकात तब्बल ६६ धावा दिल्या, ज्या आजपर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही गोलंदाजाने एका स्पेलमध्ये दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

२०१७ या एका वर्षासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून इशांत खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला करारबद्ध केले, पण बॉलिंगची मुख्य भिस्त त्याच्यावर सोपवली गेली नाही.

यावर्षी इशांत शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

 

दिनेश कार्तिक –

 

 

दिनेश कार्तिक भारताचा एक अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज आहे. आयपीएलमध्ये खेळताना दिनेश कार्तिकनेही बऱ्याच वेगवेगळ्या संघांच्या वाऱ्या केलेल्या दिसून येतात.

तब्बल १८२ आयपीएल सामान्यांचा अनुभव असलेला कार्तिक आजपर्यंत ५ वेगवेगळ्या संघांमधून खेळलेला आहे.

२००८ मध्ये सर्वप्रथम दिल्ली डेअरडेव्हील्स संघाकडून त्याने आयपीएल कारकीर्दीस सुरुवात केली. तिथे ३ वर्षं झाल्यावर २०११ मध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला. पुढची दोन वर्षे मुंबई इंडियन्सने कार्तिकला सामावून घेतले.

२०१४ मध्ये एका वर्षासाठी तो पुन्हा दिल्ली डेअरडेव्हील्समध्ये परतला. त्याने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पुढची दोन वर्षे गुजरात लायन्सचे प्रातिनिधित्व केले.

२०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये आल्यावर तो गेली २ वर्षे तेथे स्थिरावला आहे. दरम्यान त्याने कोलकाताचा कर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. या वर्षी सुद्धा कार्तिक केकेआर कडून खेळताना पहावयास मिळेल.

 

पार्थिव पटेल –

 

 

पार्थिव पटेल म्हणजे भारताचा सगळ्यात कमी वयाचा यष्टिरक्षक होय! महेंद्रसिह धोनीच्याही अगोदरपासून पार्थिव पटेलने भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांत यष्टिरक्षण केले आहे.

२००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून पार्थिवने आपले आयपीएल पदार्पण केले. तेव्हा मॅथ्यू हेडनच्या जोडीने तो सलामीला येत असे. २०१० पर्यंत ३ वर्षे तो चेन्नई बरोबर होता.

२०११ नंतर तीन वर्षे त्याने तीन वेगवेगळ्या संघांचे प्रातिनिधित्व केले. कोची टस्कर केरळ, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे ते तीन संघ होय.

२०१४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळला. पुढे २०१५ ते २०१७ पार्थिव पटेल मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला. या दरम्याने २०१५ व २०१७ साली मुंबईने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

२०१८ साली त्याने पुन्हा बंगलोरचा रस्ता धरला. यंदा सलग तिसऱ्या वर्षी पार्थिव बंगलोरकडून खेळणार आहे.

 

थिसारा परेरा –

 

 

श्रीलंकन अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा पाच पेक्षा जास्त संघांकडून खेळणारा केवळ दुसरा विदेशी खेळाडू आहे. ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात अष्टपैलू खेळाडूला जास्त महत्त्व असते, परंतु थिसारा परेराच्या बाबतीत थोडे उलटे आहे.

आपल्या संबंध आयपीएल कारकिर्दीत परेरा केवळ ३६ सामने खेळला आहे आणि तेही तब्बल सहा संघांकडून! सलग सहा वर्षे सहा वेगवेगळ्या संघांकडून खेळण्याचा अनोखा विक्रम त्याच्या नावावर आहे.

२०११ पासून २०१६ पर्यंत तो अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स, कोची टस्कर केरळ, मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या सहा संघांकडून खेळला आहे. २०१६ नंतर तो आयपीएलपासून दूर आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version