' सद्यपरिस्थितीचं भान राखत या तरुणीने राबवलेल्या उपक्रमातून प्रत्येकाने शिकायला हवं! – InMarathi

सद्यपरिस्थितीचं भान राखत या तरुणीने राबवलेल्या उपक्रमातून प्रत्येकाने शिकायला हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लग्न! प्रत्येकाच्याच आयुष्यातला एकमेव आणि संस्मरणीय असा प्रसंग. मुलगा असो की मुलगी, प्रत्येकाच्याच मनात आपल्या लग्नाविषयी वेगवेगळ्या आणि नवनविन किंवा क्रिएटिव्ह कल्पना असतात.

केवळ कपडे, दागिने, मिरवणे, हेअरस्टाईल या बेसिक गोष्टींच्या पलिकडे काही वर्षांपूर्वी ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ही संकल्पना आली. ज्यांच्याकडे प्रचंड पैसा असतो ते बडे लोक, स्टार, नेते मंडळींची मुले-मुली, कॉर्पोरेट फिल्डमधल्या बड्या हस्ती, क्रिकेटर – सेलिब्रिटी अशांची लग्ने डेस्टिनेशन वेडिंग पद्धतीने होऊ लागली. हा ट्रेंड अजुनही सुरू आहे.

 

deepika ranveer wedding inmarathi

 

मध्यंतरी ‘सोशल कॉझ’चे एक नवेच फॅड आले.. लग्नच नव्हे, तर शुभ प्रसंगी समाजाप्रती काही तरी दान करणे अशी साधारण संकल्पना, पण दान करणे या पुण्यकर्माचा सोहळा करुन दिखावा करण्याची एक दुखद किनार याला आहे हे दुर्दैव!

आम्ही हे असं दान करतो करतो याची जाहिरात करुन त्यातून आपली सामाजिक प्रतिमा उजळण्याचाच प्रकार अनेकांनी केला. बरेच जण ते आजही करताना दिसतात..

मात्र शेवटी सगळीकडे अपवाद असतातच. कोणताही बडेजाव न करता, केवळ समाजोपयोगी काम करुन वायफळ खर्च न करता चांगल्या कामासाठी आणि मुख्यत्वे गरजूंसाठी आपला पैसा कसा कामी येईल असा सकरात्मक विचार करणारेही आपल्या समाजात असतात.

अशाच एका अनोख्या लग्नाविषयी या लेखात जाणून घेऊया..

 

bride blood donation inmarathi

 

पश्चिम बंगाल राज्यातील नाडिया जिल्ह्यातील धुबुलिया गावातील एका शाळेत शिकावणारी शिक्षिका.. नूरजहाँ खातून तिचे नाव. मार्च महिन्यापासून सगळीकडे लॉकडाऊन झाले आणि तिचीदेखील शाळा बंद झाली.

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तसे ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याची मुभा मिळाली, मात्र त्यातील अनेक अडचणी ती जाणून होती. तसेच गरीब विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहूनही तिला दु:ख होत होते.

तशातच तीचे लग्न ठरले. तिचा होणारा पती हा मुर्शिदाबाद येथे राहणारा असून तो देखील पेशाने शिक्षकच आहे.

त्यातच अजूनही मोठ्या प्रमाणावर माणसे बोलावून कोणतेही सोहळे साजरे करण्यास परवानगी नाही, त्यामुळे त्यांचे लग्नही साध्याच पद्धतीने आणि अगदी कमी माणसांच्या सहवासात करायचे ठरले.

वधूने नवऱ्याकडे मांडला प्रस्ताव

नूरजहाँ हिने आपल्या पतिकडे लग्नाबद्दल एक वेगळा प्रस्ताव ठेवला. जो त्यानेही लगेचच मान्य केला. यात तीन प्रमुख गोष्टी होत्या.

एक म्हणजे कोव्हिड-19 च्या साथीमध्ये रक्ताचा जो तुटवडा निर्माण झाला होता, त्यावेळची भयावह स्थिती तीने अनुभवली होती म्हणूनच लग्नाच्या निमित्ताने नवदाम्पत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

 

blood donation inmarathi

 

याविषयी नववधूचे वडिल म्हणाले, की “मुलगी आणि जावयाच्या या प्रस्तावाला आम्ही लगेचच सहमती दिली आणि तशी सर्व तयारी केली.”

लग्नाच्या एक दिवस आधी घराबाहेरच मंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन शक्य तितक्या सर्व जणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.

केवळ गावातीलच नव्हे, आसपासच्या गावातील काहीजणांनी येऊन रक्तदान केले. याचा कोव्हिड आणि अन्य गरजूंना मोठा फायदा होईल असे ते म्हणाले.

याविषयी नूरजहाँ म्हणते, “रुग्ण रक्तासाठी तडफडताहेत आणि दुसरीकडे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठाच नाही याहून भयावह काय असू शकते..

लॉकडाऊनमध्ये असे काही अनुभव मिळाल्यानेच रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्ण आणि रक्तपेढ्यांना मदत करणे हा आमचा मुख्य हेतू होता. रक्तदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही हेच खरे.”

दुसरी महत्त्वाची गोष्ट केली ती, लग्नाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना रोपांचे वाटप केले. लग्नात सर्वांनाच आवाहन केले, की शक्य तितकी झाडे सर्वांनी लावा आणि वाढवा.

 

tree-plantation-inmarathi

 

या कोव्हिडच्या साथीत अनेक ठिकाणी, अनेक रुग्णांना ऑक्सिजनची प्रचंड गरज आहे आणि तो सहजासहजी मिळत नाहीये.. त्यामुळे मोठ्या संख्येने झाडे लावली तर साहजिकच हवेतील ऑक्सिजन वाढण्यासही मोठी मदत होईल हा त्यामागचा विचार आहे.

तिसरी उपयुक्त गोष्ट नवदाम्पत्यानी केली, ती म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप केले. नूरजहाँ ज्या शाळेत शिकवते तेथील मुला-मुलींना आवश्यक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी नाडियाचे जिल्हाधिकारी अरबिंदा बिश्वास हे उपस्थित होते. त्यांनीदेखील या सर्व समाजोपयोगी उपक्रमाबद्दल नवविवाहित जोडप्याचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे खुप कौतुक केले आणि आभारही मानले.

खरंतर या सगळ्या उपक्रमाचा या दोन्ही कुटूंबियांनी कोणताही दिखावा, बडेजाव केला नाही, मात्र थेट जिल्हाधिकारीच या वेळी उपस्थित राहिल्याने साहजिकच तेथील स्थानिक वर्तमानपत्रांनी यासंबंधी स्वत: पुढाकार घेऊन बातमी छापली आणि पुढे राज्य व राष्ट्रीय स्तरावर त्याचे खुप कौतुक झाले.

खरंच असे चांगले आणि गरजू उपक्रम आपणही राबवण्यास हरकत नाही. समाजाप्रती आपलाही खारीचा वाटा आपण उचलूया.. आज त्याची सर्वाधिक गरज आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?