आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कल्पना करा… की तुम्ही तुमच्या घरी आहात, सकाळी उठलात, बाकी सर्व काही नेहमीसारखंच घडतंय.. पण बराच वेळ झाला तरी तुम्हाला चहाच नाही मिळालाय… काय प्रतिक्रिया असेल तुमची?
सकाळी उठल्यावर ज्याची प्रत्येकालाच नितांत गरजेचा असतो तो म्हणजे चहा! सर्व भारतीयांचे पहिले प्रेम… पुण्यात तर अमृततुल्य म्हणून सुप्रसिद्ध असे हे पेय.. तो मिळेपर्यंत काहीच सुचत नाही.. होतं ना असं?
चहा हा आपल्या जीवानाचा अविभाज्य भागच बनलाय जणू.. अगदी फार फार पूर्वीपासून.. एक कटिंग घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरूवातही होत नाही.
टपरीवरच्या चहाचे घोट घेता घेता काही क्षण मनावरचं एखादं ओझं कुठच्या कुठे पळून जातं हेही कळतंच नाही. घोटभर गरम गरम चहानं दिवसाची सुरूवात फार भारी वगैरे होते असं आपल्यालाच काय, पण जगभरातील निम्म्या लोकांना वाटतं.
आता आणखी एक कल्पना करा.. तुम्ही घरी नाही तर बाहेर एखाद्या गावी आहात, हॉटेलात राहताय.. सहाजिकच तुम्हाला सकाळी उठल्यावर चहासाठी कुठेतरी बाहेर जाऊन शोध घ्यावा लागेल.
तुम्ही बाहेर पडलात.. फिरताय फिरताय.. संपूर्ण गाव पालथं घातलं तरी कुठेही एक साधी चहाची टपरी दिसू नये, एकाही दुकानात, हॉटेलात तुम्हाला चहा मिळू नये.. बरं बाकीचं सगळं मिळतंय.. पण चहा तेवढा कुठेच नाही हे कसं काय.. प्रश्न पडेल ना..?
पण ऐका.. आपल्या भारतात अगदी आपल्याच राज्यात एक असं गाव आहे जिथे चहा विकलाच जात नाही. संपूर्ण गावात कुठेही तुम्हाला चहा मिळणार नाही. आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरंय!!
असं एक गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. वेंगुर्ले तालुक्यातील ‘मातोंड’ हे ते गाव. या गावात कधीच चहा विकला जात नाही.
गावातच नव्हे, तर गावाबाहेरही मातोंडमधील व्यक्ती चहाचा स्टॉल घालून चहा विकणार नाही. शेकडो वर्षांची ती परंपरा अनेक पिढ्यांनंतर आजही कायम आहे.
मातोंड हे सावंतवाडी आणि वेंगुर्ले सीमेवरचे तळवडेलगतचे गाव. गावात सगळेजण अगदी गुण्यागोविंदाने राहतात. या गावातील अनेक व्यक्ती उच्च पदावर आहेत. गावात अनेक मंदिरे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहे. गावात सुशिक्षित कुटुंबे सर्वाधिक आहेत.
या गावात तुम्ही कधीही या तुमचे हसतमुखाने स्वागत होईल, पण गावात येऊन जर तुम्हाला चहा पिण्याची लहर आली तर मात्र तो मिळणं शक्यच नाही. कारण इथं चहाचा एकही स्टॉल नाही.
इथे चहा विकणेच निषिद्ध आहे..
खरंतर आज चहाच्या बिझनेसला खूपच चांगले दिवस आले आहेत. आज अनेक इंजिनिअर अथवा उच्चपदस्थ तरुण नोकरीचा मार्ग सोडून वेगवेगळ्या फ्लेवरच्या चहाचे कॉर्नर शहरात सुरू करून लाखोंची कमाई करत आहेत.
विशेषत: भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याभोवती जे प्रसिद्धिचे वलय आहे, त्यालाही चहाचीच किनार आहे.
महाराष्ट्रातील चहाला तर आता इतक्या उच्च दर्जाचे स्टेटस् जगभरात प्राप्त झाले आहे. असे असले तरी महाराष्ट्रातीलच ‘मातोंड’मध्ये चहा विकणे मात्र निषिद्ध आहे.
त्याच्या दोन दंतकथा सांगितल्या जातात…
कोकणात पारध करण्याची फार जुनी परंपरा आहे तशी ती मातोंड गावातही आहे.
अवसारी देवाच्या किंवा कौल प्रसादाच्या सुचनेनुसार गावातील मानकरी जंगलात पारधीसाठी जायचे. पारध करुन रानडुक्कर आणला जायचा. त्यानंतर येथील सातेरी मंदिरासमोर देवाचा मोठा मंडप उभारुन उत्सव साजरा होत असे.
एका वर्षी देवाचा मंडप उभारण्याआधीच गावातील एका व्यक्तीने चहाचा स्टॉल उभारुन मंडपही उभारला. इकडे मानकऱ्यांना सगळं जंगल पालथं घालूनही शिकार सापडेना.
त्यावेळी असे लक्षात आले, की देवाचा मंडप उभारण्याआधीच चहाचा स्टॉल सुरू केला म्हणूनच अडचणी येत आहेत.
तो मंडप आणि चहाचा स्टॉल तत्काळ हटवण्यात आला. त्याच दिवशी जंगलात शिकार मिळाली. त्या दिवसापासून गावात चहा विकणे बंद झाले.
दुसऱ्या दंतकथेनुसार…
गावात आलेल्या नेहमीच्या एका पाहुण्यांना मालकाने पूर्वीचे तीन आणि आजचे दोन कप चहा असा हिशोब सांगितला. त्यावरुन चिडलेल्या इसमाने पाहुण्यांना चहाचा हिशोब सांगून त्यांच्यासमोर आपली बेअब्रु केली असे समजून गावपंचांकडे तक्रार केली.
तेव्हापासून पंचायतीच्या निर्णयानुसार गावात सर्वांनाच चहा विक्रीला सक्तीची बंदी करण्यात आली.
या कथा वा दंतकथा काहीही असो, पण इथे अनेक पिढ्यांपासून चहा विकला जात नाही हे वास्तव आहे. मातोंड गावातीलच एक रहिवासी सांगतात की, आजोबा – पणजोबांच्या काळापासून आमच्या गावात चहा विकला जात नाही.
ग्रामस्थांपैकी कोणालाही जर कोणता व्यवसाय करावा लागला, तर ते चहाविक्री सोडून अन्य कोणताही व्यवसाय करतात. गावात येणाऱ्या पाहुण्यांना घरी नेऊन चहा दिला जातो. अनेक वर्षांची ती परंपरा आजही मातोंड गावात सुरू आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.