Site icon InMarathi

उपद्रवी बाबांची पोलखोल का आणखीन काही – ह्या “आश्रम” मध्ये नेमकं आहे तरी काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

बरेच दिवस झाले ह्या सिरीजपासून लांब रहायचं ठरवलेलं पण एकंदरच सोशल मीडिया वर झालेली चर्चा आणि प्रकाश झा सारखा दिग्दर्शक ओटीटी वर येतोय म्हंटल्यावर ह्या सिरीजचा मी ट्रेलर पाहिला.

पुन्हा आमिर खानच्या पीके ची आठवण झाली आणि वाटलं की ह्यातही अगदी सोयीस्करपणे एकाच बाजूला टार्गेट केलेलं असणार, त्यामुळे पुन्हा ह्या सिरीज पासून फारकत घेतली.

पण आज ही सिरीज बघून झाली आहे, आणि मनात काही मिश्र विचार आलेत तेच इथं मांडणार आहे.

 

 

पीके प्रमाणेच ह्या सिरीज मध्ये सुद्धा नाण्याची एकच बाजू दाखवण्यात आली आहे.

पण तरी ही सिरीज काही वेगळ्या गोष्टींवर सुदधा खूप प्रभावीपणे भाष्य करते आणि एकंदरच ह्या सिरीजच्या भव्य सादरीकरणामुळे सुद्धा ही वेगळी ठरते.

काही सत्य घटनांवरून प्रेरीत जरी असली तरी ही सिरीज तुम्हाला त्या आश्रमात खेचून घेऊन जाईल इतकी सक्षम आहे.

आणि हे शक्य झालं आहे ते केवळ आणि केवळ प्रकाश झा सारख्या दिग्दर्शकामुळे!

म्हणजे ही सिरीज बघताना तुमची आयडियोलॉजी, तुमची आस्था, श्रद्धा सगळं बाजूला ठेवाल तर एक उत्तम क्राईम थ्रिलर सिरीज अगदी फुकटात तुम्हाला अनुभवायला मिळेल.

निश्चितच ह्यात दाखवलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे अशातला भाग नाही, पण तशाच काहीशा घटना आपण ऐकल्या असतील हे मात्र नक्की.

अशाच काही घटनांचं एकत्रीकरण करून त्याला थोडा सामाजिक, राजकीय रंग देऊन प्रकाश झा ह्यांनी आश्रम ही सिरीज लोकांसमोर मांडली आहे.

 

 

मुळात मला सर्वात जास्त आनंद ह्याचाच आहे की प्रकाश झा ह्यांची पून्हा धासु एन्ट्री झाली आहे, आणि अगदी टिपिकल त्यांच्या धाटणीची तिथल्या मातीतली सिरीज तुम्हाला फुकटात अनुभवायला मिळेल!

ही कहाणी फिरते उत्तर प्रदेश मधल्या काशीपुर वाले निराला बाबा यांच्या आश्रमा भोवती.

जिथे हे self proclaimed गॉडमॅन संपूर्ण राज्यावर स्वतःच्या आश्रमातून, चॅरिटी मधून त्यांचे कित्येक अवैध उद्योगधंदे चालवत आहेत.

जिथे सरकार हे फक्त नावापुरते असून तिथला सगळा कारभार ह्या बाबांच्या आश्रमातूनच चालले आहेत.

पोलीस प्रशासन यंत्रणा, सरकार सगळे बाबांच्या इशाऱ्यावर नाचतायत आणि हे बाबा निराला लोकांच्या भक्तीच्या आणि आस्थेच्या आड हे सगळे उद्योग करत आहेत.

अचानक राज्यात एके दिवशी जंगलातून एका मुलीचा सांगाडा सापडतो आणि मग तिथून ही केस कशाप्रकारे ह्या आश्रमातली एक एक रहस्य उलगडते ते सगळं अनुभवायला मिळेल आश्रम ह्या सिरीज मध्ये!

आता हे काशीपुर वाले बाबा हे नाव जरी काल्पनिक असलं तरी ह्यात ३ खऱ्या बाबांचं प्रतिबिंब तुम्हाला पाहायला मिळेल, ते त्यांनाच कळेल ज्यांनी ही सिरीज पहिली आहे, त्यांची नावं घेणं इथं योग्य नाही!

 

 

ओह माय गॉड सिनेमातला मिथुनचा शेवटचा डायलॉग आठवला “They are not god loving people, they are god fearing people!”

अगदी हेच ही आश्रम सिरीज सिद्ध करते! आपल्या देशातली अशी करोडो भक्त मंडळी आणि त्यांना मूर्ख बनवणारे हे बाबा लोकं ह्यांच्यातला पर्दाफाश करते ही सिरीज.

आणि फक्त इतकंच नाही तर प्रकाश झा ह्यांच्या इतर पेटंट कलाकृतींप्रमाणे सामाजिक विषमता, राजकीय प्रभाव, भ्रष्टाचार, भ्रष्ट सिस्टीम ह्यावर सुद्धा पद्धतशीरपणे ताशेरे ओढते.

फक्त वाईट ह्याचंच वाटतं की ह्यांना ही फ्रॉड लोकं फक्त एकाच समुदायातील दिसतात.

इतर समुदायात सुद्धा असे कित्येक फ्रॉड आहेत त्यांच्याविषयी सुद्धा कधीतरी कुणी भाष्य करावं इतकीच अपेक्षा!

कोणत्याही समुदायाची सहिष्णुता टेस्ट न करता यापुढे अशा विषयावर सिरीजचं स्वागत करूच पण नाण्याची दुसरी बाजू सुद्धा दाखवणं तितकंच आवश्यक आहे.

 

 

प्रश्न हा फक्त धार्मिक भावनेचा किंवा आस्थेचा नाहीये आपल्या संस्कृतीचा आहे! असो एकंदरच ही सिरीज म्हणजे एक सरप्राईज धमाका आहे. कुठेही कसलीही कमी नाही.

सेट्स, प्रोडक्शन डिझाईन, रंगसंगती, कोस्च्युम्स, सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड म्युझिक सगळ्याच बाबतीत सिरीज ग्रँड आहे आणि तो अनुभव खरंच प्रत्येकाने घेण्यासारखा आहे.

मी आधी म्हंटलं तसं कोणतीही अपेक्षा किंवा पूर्वग्रह न ठेवता ही सिरीज बघाल तर कथा, पटकथा, संवाद दिग्दर्शन सगळ्याच लेव्हल वर सिरीज ही तुम्हाला वेगळाच अनुभव देईल.

याबरोबरच ह्यातल्या कलाकारांची सुद्धा परफेक्ट भट्टी जमून आली आहे.

सनी देओल पुढे बॉबी देओल हा कधी हिरो म्हणून पचलाच नाही, कारण धर्मेंद्र ह्यांची लेगसी सनी ने इतक्या उंचीवर नेऊन ठेवली की त्यासमोर बॉबी कधी आला आणि कधी आऊटडेटेड झाला समजलंच नाही.

पण ह्या सिरीज च्या बाबा निराला ह्या रोल साठी दुसरा कोणताच चेहरा सूट नसता झाला हे सुद्धा तितकंच खरं आहे. बॉबी ने दिलेलं काम खूप सचोटीने केलं आहे.

पण ह्या सिरीज मध्ये खरा भाव खाऊन जातात तर ते इतर सहाय्यक कलाकार.

अदिती पोहनकर हिने तर पम्मी अक्षरशः जिवंत केली आहे, अत्यंत स्ट्रॉंग पात्र तिने तितक्याच ताकदीने पेललं आहे.

 

 

अनुप्रिया गोएंका ही बहुतेक सगळ्याच वेष सिरीज मध्ये दिसत आहे आणि तिचं काम ती नेहमीप्रमाणे परफेक्ट करतेच.

तुषार पांडे (रंग दे बसंती च्या ऑडिशन सीन्स पासून पिंक छिछोरे सारख्या सिनेमात दिसणारा) ने साकारलेला सत्ती आणि त्याचा तो साधेपणा आणि इमानदारी लाजवाब, शेवटपर्यंत लक्षात राहतो!

अध्ययन सुमनच पात्रं हे Unintentionally Funny झालं आहे ते नसतं तरी चाललं असतं. त्रिधा चौधरी जीला नुकतंच बंदिश बॅंडीट मध्ये पाहिलं तिने सुद्धा बबिता खूप सहज साकारली आहे.

सर्वात जास्त भाव खाऊन गेलेत ते चंदन रॉय संन्याल आणि दर्शन कुमार (ज्याला NH10 मध्ये आपण पाहिलं आहेच) चंदन ने साकारलेला भोपे.

आणि त्यांचा प्रत्येक सिन लक्षात राहतो. धूर्त, मिजासखोर, अत्यंत कपटी असा बाबाचा चमचा चंदनने अगदी हुबेहूब साकारला आहे.

दर्शन कुमारचा इन्स्पेक्टर उजागर सिंग ह्या पात्राला खूप वाव आहे आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं आहे, भ्रष्ट पण शिकलेला आणि इमानदार पोलीस ऑफिसर त्याने खूप सहजपणे साकारला आहे.

 

 

ह्या सिरीज मध्ये सर्वात जास्त कुणी धमाल आणली असेल तर ह्या दोन पात्रांनी, बाकी बॉबी देओल ला ह्यांच्यापेक्षा नक्कीच स्क्रीन टाईम कमी आहे!

बाकी सिरीज मध्ये काही बोल्ड सीन्स नसते तर नक्कीच घरच्यांसोबत बसून बघण्यालायक ही सिरीज झाली असती.

आणि मुळात ह्यातले बोल्ड लव्ह मेकिंग सीन्स सुद्धा खूप वाह्यात आहेत, त्यामुळेच ते नकोसे वाटतात.

प्रत्येक एपिसोड जवळ जवळ ४५ – ५० मिनिटांचा आणि अशा ९ एपिसोड च्या ह्या सिरीजच्या शेवटच्या एपिसोड ला कथेला क्लोजर मिळत नाही.

उलट पुढच्या येणाऱ्या भागाची झलक बघायला मिळते आणि ती झलक बघून त्याबद्दल आणखीन उत्सुकता वाढते.

दुसऱ्या भागाची झलक पाहून असं वाटतंय की ह्या सीझन मध्ये घालवलेला वेळ सत्कारणी लागला, कारण जे प्रश्न ही सिरीज निर्माण करते त्याची उत्तरं पुढच्या भागात मिळतील.

मी आधी म्हंटलं तसं ही सिरीज पूर्णपणे Unbiased आहे असं म्हणता येणार नाही.

 

 

काही ठिकाणी ही सिरीज एकांगी, एकसुरी वाटू शकते पण काही ठिकाणी ही सिरीज तुम्हाला इम्प्रेस नक्की करेल ह्याची खात्री देतो.

आणि त्यासाठी ह्या टीमचे आणि प्रकाश झा ह्यांचे खूप खूप धन्यवाद. काही गोष्टी इग्नोर केल्या तर एक उत्तम क्राईम थ्रिलर बघायचा अनुभव शक्यतो चुकवू नका.

सिरीज तशी मोठी आहे पण नक्कीच एकदातरी बघण्यासारखी आहे! धन्यवाद!

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version