Site icon InMarathi

प्रभू श्रीरामांनी वनवासात खाल्लेलं कंदमूळ? यामागच्या खऱ्या-खोट्याचा शास्त्रीय निष्कर्ष

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

देवाशी जोडली गेलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे श्रद्धेचा विषय असतो. आपले देव, त्यांचे अवतारकार्य, तेव्हाचा काळ, त्यांचं राहणीमान, त्याकाळची भौगोलिक परिस्थिती ह्यातल्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला कमालीची उत्सुकता असते आणि त्याच्या कैकपट श्रद्धाभाव आपल्याला लोकांमध्ये पाहायला मिळतो.

ती श्रद्धा इतकी प्रगाढ असते, की आपण संबंधित गोष्टीचा जास्त खोलात जाऊन विचारही करत नाही, असं करणं म्हणजे आपण देवावर अविश्वास दाखवतोय, त्याचं अस्तित्व अमान्य करतोय असा काहीसा समज होऊन बसतो.

ह्या आपल्या श्रद्धेचा पगडा एवढा मोठा असतो, की समोरचा जे सांगेल आणि जसं सांगेल ते तसं तसं आपल्याला पटत जातं आणि आपण हात जोडून मोठ्या भक्ती भावाने देवाशी संबंधित त्या घटनेला, संदर्भाला, वस्तूला मान्यता देऊन टाकतो.

कधी कधी तर केवळ मान्यता देऊनच थांबत नाही आपण, त्याचा प्रचार आणि प्रसारही करतो.

आज एक अशीच माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यातून तुम्हाला ह्या अंध?श्रद्धेचा प्रत्यक्षच अनुभव येईल.

आपण तीर्थ क्षेत्री गेला असालच किंबहुना आपल्यापैकी बहुतेक जण गेले आहेतच, तर प्रत्यक्ष देवस्थानाजवळ जाईपर्यंत रस्त्यात आपल्याला अनेक लहान मोठी देवी देवतांच्या फोटोंची, माळांची, प्रसादाची दुकानं थाटलेली दिसत असतात.

त्यात पथारी पसरलेली आणि त्यावर भलामोठा ठोकळ्यासारखा कंद ठेवून, एका हातात पातळ पात्याची सुरी घेऊन रामकंद, रामकंद बोलणारी माणसं तुम्ही नक्कीच पाहिली असतील, महाराष्ट्र दर्शन करताना जवळपास प्रत्येक तिसऱ्या स्थानी अशी माणसं दिसतील.

 

 

उत्सुकता म्हणून विचारलंत, तर हे विक्रेते आपल्या हातातल्या सुरीने त्या कंदाचा शक्य तेवढा पातळ काप काढून हाती देतील, चव घेतलीत तर गोडसर लागेल. आपल्या उपवासाच्या रताळ्याच्या आसपास जाणारी चव असते ती.

ह्याला रामकंद म्हणतात म्हणे. ह्याचं कारण असं, की प्रभू श्रीरामांनी चौदा वर्षे जो वनवास भोगला त्या काळात ते हाच कंद खाऊन जगत राहिले.

हे नक्की कोणत्या झाडाचं मूळ आहे असं विचारल्यावर “दुर्मिळ आहे” असं एक मोघम उत्तर ठरलेलं असतं.

हे ऐकल्यावर नाही म्हटलं तरी जरा स्पेशल फील झालं आणि आम्ही झटक्यात हे मान्य करून टाकलं की हे असंच असणार. परंतु, नंतर ह्याचसंबंधी खरी माहिती उघड झाली.

हे कंद वगैरे नसून हा खरा प्रकारवेगळाच आहे समजलं. झालं असं, की कोल्हापूरचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मानसिंग राजे निंबाळकर, निलेश पवार आणि विनोद शिंपले ह्यांना हे असे कंद असेल हा प्रकार विचित्र वाटला.

त्यांनी ह्या कंद प्रकरणाची आणखी माहिती मिळवण्याच्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात केली असता व्यापाऱ्यांच्या चौकशीअंती असे समजले की, हा कंद सदृश प्रकार आफ्रिकेतून आयात केला जातो. जे अर्थात खोटंच होतं.

आणखी माहिती मिळविता यावी ह्यासाठी संबंधित कंदाचे काही काप खरेदी करून त्यावर संशोधन करण्यात आले.

 

 

ह्या संशोधना दरम्यान असे लक्षात आले, की हा कोणत्याही झाडाच्या मुळाचा प्रकार नसून, हे एकदल खोड आहे ही माहिती समोर आली, ज्या वनस्पतींचे हे खोड आहे ती सामान्यतः घायपात किंवा केकताड म्हणून ओळखली जाते.

दोरखंड बनवण्यासाठी ह्या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने केला जातो. ह्या शोध कार्यासाठी डी एन ए बारकोडिंग प्रणालीचा वापर करण्यात आला.

त्यावरून असे समजले, की ह्या झाडाची पूर्णपणे वाढ झाली की तिला एक फुलांचा तुरा असलेला भलामोठा कोंब येतो, जो दिसायला साधारण बांबूसारखा असतो.

ही प्रक्रिया झाली की, झाडाचा तो कोंब आणि पानांचा भाग काढून टाकला जातो, त्याला साधारणपणे कंदासारका वाटेल असा आकार दिला जातो आणि जमिनीतून काढलेले आहे असे भासवण्यासाठी त्यावर मातकट रंगाची काव चढवली जाते.

ह्या खोडाला कुठल्याही प्रकारची स्वतःची चव नसल्याने त्यात गोडवा आणण्यासाठी सॅकरिन वापरले जाते, चवीला गोड असल्याने मोठ्यांपेक्षा लहान मुलं हा कंद जास्त खातात.

 

 

आणि जसे की आपण जाणतोच सॅकरिन आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे त्यामुळे जास्त प्रमाणात हे काप खाल्ल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

थोडक्यात सांगायचं झालं तर, राम कंद का कंद आहे असे म्हणण्यात रामच नाही मुळी, ते एक खोड आहे जे निश्चितच कुठल्याही प्रकारे आहारात समाविष्ट करण्यासारखे नाही. अशावेळी ते खाऊन त्यावर १४ वर्षे जगण्याचा प्रश्नच येत नाही.

तर ही होती रामाने चौदा वर्षे वनवासात न खाल्लेल्या रामकंदाची राम कहाणी. कोणत्याही विचित्र वाटणाऱ्या पण देवाच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या अशा गोष्टी नकळत आपल्याला अपायकारक ठरतात आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते.

ह्यापुढे तुम्ही कधी देवस्थानी गेलात आणि तिथे कधी हा रामकंद दिसलाच तर त्याच्या खऱ्या जन्माची ही माहिती लक्षात असू द्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version