फॉलोऑन देऊन सुद्धा ३ वेळा पराभवाची नामुष्की सोसणारा संघ कोण, ते जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मागे एका मुलाखतीत क्रिकेट मधल्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल बोलताना सचिन तेंडुलकर बोलला होता, टी २० मिठाई आहे, वनडे क्रिकेट स्टार्टर आहे तर टेस्ट क्रिकेट पंचपक्वानयुक्त भोजन!
पाच दिवस फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सगळ्या बाबतीत खेळाडूंचा कस बघणाऱ्या टेस्ट क्रिकेटची सचिनने जेवणाशी केलेली तुलना ही योग्यच.
याच टेस्ट क्रिकेटची सुंदरता म्हणजे पहिल्या डावात मान टाकलेल्या संघाला दुसऱ्या डावात पुन्हा मान वर करून लढायला एक संधी असते.
जिथे एकतर्फी झालेला सामना हा अनिर्णित राखण्यासाठी मदत होऊ शकते किंवा सामना जिंकता येऊ शकतो!
आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट मध्ये असे कमीच झालेले आहे की पहिल्या डावात भयानक पिछाडीवर असलेला संघ दुसऱ्या डावात असं काही लढतो की पिछाडी भरून काढत थेट अशक्य असलेला विजय खेचून आणला आहे.
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात असं फक्त तीन वेळाच झालं आहे की, पहिल्या डावात फॉलोऑन मिळून सुद्धा पिछाडीवर असलेला संघ सामना जिंकला आहे.
आणि तीनही वेळेस पराभूत होणारा संघ आहे ‘ऑस्ट्रेलिया’. तोच ऑस्ट्रेलियाचा संघ जो क्रिकेट विश्वात दादा म्हणून ओळखला जातो.
वेस्ट इंडिजचा सूर्य जेव्हा मावळत होता तेव्हा याच ऑस्ट्रेलियन संघाच्या सूर्याचा क्रिकेटच्या क्षितिजावर उदय होत होता.
तर, बघूया ते तीन कसोटी सामने जिथे आघाडीवर असून सुद्धा ऑस्ट्रेलियाला पराभव चाखावा लागला होता.
१. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी. पहिली कसोटी, अँशेज १८९४ :
सहा दिवस खेळला गेलेला हा पहिला कसोटी सामना होता. सिड ग्रेगोरीचे द्विशतक आणि जॉर्ज गिफ्फिनच्या १६१ धावांच्या बळावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ५८६ धावांचा डोंगर उभा केला.
प्रतिउत्तर देण्यासाठी उतरलेल्या ब्रिटिश संघाचा डाव ३२५ धावांवर आटोपला. तरी ब्रिटिशांचा संघ ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपेक्षा २६१ रन मागे होता.
ऑस्ट्रेलियन कर्णधार जॅक ब्लॅकहमने फॉलोऑन देऊन ब्रिटिशांना परत फलंदाजीचे आमंत्रण दिले. अल्बर्ट वॉर्डच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ४३७ धावा ठोकल्या.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७६ धावांचे माफक लक्ष्य. ऑस्ट्रेलिया सामना सहज जिंकेल हे फिक्स झालं होतं.
पाचवा दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या होती, दोन विकेट गमावून ११३ धावा.
पाचव्या दिवशी रात्रभर पडलेला पाऊस आणि दिवसा पडलेला सूर्यप्रकाश याने सहाव्या दिवशी परिस्थितीच बदलून टाकली.
पावसामुळे पिच चिकट झाल्याने पिच खेळण्यायोग्य नव्हत. इंग्लिश गोलंदाजांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलला.
आणि ठराविक अंतरावर ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडत गेले. बॉबी पिलने ऑस्ट्रेलियाचे सहा बळी घेऊन ऑस्ट्रेलियन बॅटिंग लाईनअप मध्ये खिंडार पाडले.
ऑस्ट्रेलियाचा डाव १६६ धावांवर आटोपला आणि इंग्लंडने हा सामना १० धावांनी जिंकला.
२. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लीड्स. तिसरी कसोटी, अँशेस १९८१ :
अँशेसच्या इतिहासात या कसोटी सामन्याला ‘बॉथम टेस्ट’ म्हणून ओळखला जातो.
या मॅच मध्ये सर इयान बॉथम यांनी बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये चमक दाखवून इंग्लडला विजय मिळवून दिला होता.
या अँशेस मध्ये ० – १ ने पिछाडीवर असलेल्या ब्रिटिश संघाचा तिसऱ्या सामन्यात मिळालेला विजय हा एका जादूपेक्षा कमी नव्हता.
पहिली बॅटिंग करताना जॉन डायसनचे शतक आणि कर्णधार किम ह्युजेस आणि ग्रॅहम यलॉप यांच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४०१/९ धावसंख्येवर आपला डाव घोषित केला.
इंग्लंडचा पहिला डाव स्वस्तात १७६ धावांवर आटोपला. २२७ धावांची आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने अजिबात वेळ न दवडता इंग्लंडला फॉलोऑन देऊन पुन्हा बॅटिंगसाठी बोलावले.
सामना आपल्या बाजूने फिरवण्याच्या इराद्याने उतरलेला इंग्लिश संघ मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
भरवश्याचा ग्रॅहम गुच भोपळा न फोडता माघारी परतला. आणि बघता बघता ब्रिटिशांची धावसंख्या झाली १३५-७.
डावाने पराभव टाळण्यासाठी ब्रिटिशांना अजून ९२ धावा हवे होते तर फक्त ३ विकेट हातात शिल्लक होते. विजयासाठी ऑस्ट्रेलियाची फक्त फॉर्मलिटी बाकी होती.
पण, इयान बॉथम वेगळ्याच मूड मध्ये खेळत होते. आठव्या विकेटसाठी त्यांनी ग्रॅहम डिले सोबत ११७ धावा जोडल्या.
नवव्या विकेटसाठी ख्रिस ओल्ड सोबत ६७ धावा जोडल्या. तर दहाव्या विकेटसाठी बॉब विलीस सोबत ३७ धावा जोडल्या.
१३५ – ७ वरून ब्रिटिशांचा डाव ३६५ धावांवर आटोपला. इयान बॉथम १४९ बॉल खेळून १४८ धावावर नाबाद राहिले.
ऑस्ट्रेलिया समोर लक्ष्य होते फक्त १३० धावांचे. ५७ – १ अशी सावध सुरवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची फळी बॉब विलीसने कापून काढली.
ऑस्ट्रेलियाचे उरलेलले ९ विकेट ५५ धावांवर स्वस्तात परतले. उत्तम स्विंग गोलंदाजीचा नमुना दाखवत विलीस ने ९ पैकी ८ विकेट स्वतःघेतल्या.
१११ वर ऑल आऊट होणाऱ्या ऑस्ट्रेलियाने हा सामना १८ धावांनी गमावला.
३. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, दुसरी कसोटी, बॉर्डर – गावस्कर चषक :
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासाला जबरदस्त कलाटणी देणारा सामना, शतकातील उत्कृष्ट कसोटी सामना असे नानाविध विशेषण मिळालेला हा सामना क्वचित कोणता भारतीय विसरला असेल.
सलग १५ कसोटी सामने जिंकलेला ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात तीन कसोटी सामने खेळायला आला होता.
आणि अपेक्षे प्रमाणे वानखेडेवर खेळवला गेलेला पहिला कसोटी सामना १० विकेट्सने जिंकून सलग १६ टेस्ट विजयचा रेकॉर्ड नोंदवला.
दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन वर खेळला गेला. फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह वॉ च्या शतकाच्या बळावर ४४५ धावांचा डोंगर उभा केला.
प्रतिउत्तर द्यायला उतरलेल्या भारतीय संघाने सपशेल नांगी टाकली. भारताचा पहिला डाव १७१ धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलिया आपला १७ वा रेकॉर्ड सामना सहज जिंकणार अस वाटत होतं. २७४ धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉने फॉलोऑन देऊन पुन्हा भारताला फलंदाजीला बोलावले.
आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वॉ चा हा निर्णय योग्य ठरवला. सचिन तेंडुलकर सहित पहिले ३ फलंदाज ११५ धावसंख्येवर माघारी परतले होते.
चौथ्या विकेटसाठी लक्ष्मण आणि गांगुली यांनी ११७ धावा जोडल्या.
गांगुलीची विकेट पडल्या नंतर आलेल्या द्रविडने लक्ष्मण सोबत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर वर्चस्व ठेवत पाचव्या विकेटसाठी रेकॉर्ड ३७६ धावा जोडल्या.
लक्ष्मणने आपल्या करियर मधली सर्वोच्च २८१ धावा केल्या तर द्रविडने आपल्या प्रतिमेला साजेशी १८० धावा केल्या.
द्रविड आणि लक्ष्मण यांनी भारताच्या विजयचा पाया घालून दिला. आता सगळं गोलंदाजांवर अवलंबून होतं.
६५७/७ वर गांगुलीने भारताचा डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी ३८३ धावांचे लक्ष्य ठेवले.
पाचव्या दिवशी ७५ ओव्हर मध्ये अशक्य असे ३८३ धावा करून जिंकण्यापेक्षा पूर्ण ७५ ओव्हर खेळून सामना रद्द करायच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियन फलंदाज मैदानात उतरले.
त्याप्रमाणे हेडन आणि स्लेटर यांनी खेळी केली. २३ ओव्हर मध्ये दोघांनी ७४ धावा जोडल्या.
स्लेटर बाद झाल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने एकामागोमाग एक लवकर विकेटघालवल्या. पहिल्या डावात ७ विकेट घेणाऱ्या हरभजनने दुसऱ्या डावात पण कमाल केली.
भारताकडून पहिली टेस्ट हॅटट्रिक घेत हरभजनने ऑस्ट्रेलियाचे ६ बळी काढले.
आपल्या बॅटिंगने प्रभाव न पाडू शकलेल्या तेंडुलकरने तीन विकेट काढून ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाचा समारोप केला.
२१२ धावांवर ऑस्ट्रेलियन संघ गारद झाला आणि भारताने हा सामना १७१ धावांनी जिंकला.
तर, ह्या होत्या त्या तीन टेस्ट मॅचेस ज्या मध्ये फॉलोऑन देऊन सुद्धा लीड घेणारा संघ पराभूत झाला होता. आणि तिन्ही वेळेस पराभूत संघ होता ऑस्ट्रेलिया!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.