' ….तर कदाचित गिलगीट बाल्टीस्तान भारताचा भाग असता! – InMarathi

….तर कदाचित गिलगीट बाल्टीस्तान भारताचा भाग असता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गिलगीट बाल्टीस्तान…हे नाव कधी ऐकलंय का? याचा पाकिस्तानशी काहीतरी संबंध असे असं नावावरून वाटतं ना? तर हो..तुम्हाला वाटतंय ते अगदी बरोबर आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर पश्चिम भागामध्ये अतिउंचावर हा प्रदेश वसलेला आहे. पूर्वी हा भाग काश्मीरच्या साम्राज्याचा एक महत्वाचा भाग होता.

परंतु ४ नोव्हेंबर १९४७ पासून हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. हा भाग पाकिस्तानने हिसकावला असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

तेव्हा पाकिस्तानने या प्रदेशाचे नामकरण ‘उत्तर पाकिस्तान’ असे केले आणि थेट इस्लामाबादच्या नियंत्रणाखाली आणले होते. हा उत्तरी भाग पाकव्याप्त काश्मीरच्या तब्बल सहा पट मोठा आहे.

२००९ मध्ये पाकिस्तानने या प्रदेशामध्ये स्व-प्रशासन आदेश जाहीर केल्याने आता हा प्रदेश गिलगीट बाल्टीस्तान म्हणून ओळखला जातो.

पण तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की हा भाग सध्या भारताच्या अधिपत्याखाली असता, जर तेव्हा परिस्थिती उलटली नसती तर…

 

gilgit-baltistan-marathipizza00
pakistantoursguide.pk

 

काश्मीरचे महाराजा हरी सिंह यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार पार बाल्टीस्तान पर्यंत केला होता.

१९३५ मध्ये ब्रिटीश सरकारने महाराजा हरी सिंह यांच्याकडून ६० वर्षांसाठी हा भाग भाडेतत्वावर घेतला, कारण हा भाग संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा होता.

या भागाच्या रक्षणासाठी ब्रिटीश सरकारने Gilgit Scouts नावाची एक फौज देखील तैनात केली होती.

दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण भारतातून ब्रिटीशांचा प्रभाव कमी होत होता. त्याचा परिणाम गिलगीट बाल्टीस्तानवर देखील दिसू लागला होता.

आता भारतात काही जास्त दिवस आपले साम्राज्य टिकत नाही हे पाहून ब्रिटीशांनी करार रद्द करत १ ऑगस्ट १९४७ रोजी गिलगीट बाल्टीस्तान पुन्हा महाराजा हरी सिंह यांना परत केला.

हरी सिंह यांनी या प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून ब्रिगेडियर घनसारा सिंह याची नेमणूक केली. सोबतच ब्रिटीशांच्या Gilgit Scoutsचे दोन अधिकारी मेजर डब्ल्यू. ए. ब्राऊन आणि कॅप्टन ए. एस. मॅथीसन आणि सुभेदार मेजर बाबर खान यांना देखील त्या प्रदेशात ठेवून घेतले.

gilgit-baltistan-marathipizza01
dawn.com

 

पण काही महिन्यांतच ३१ ऑक्टोंबर १९४७ रोजी महाराजा हरी सिंह यांनी काश्मीर भारतात विलीनीकरणाला मान्यता दिल्यावर आपसूकच गिलगीट बाल्टीस्तान देखील भारताचा भाग झाला.

पण तो आदेश धुडकावून लावत मेजर ब्राऊन याने ब्रिगेडियर घनसारा सिंह यालाच कैद केले आणि गिलगीट बाल्टीस्तान भारताला न देण्याची योजना आखली.

त्याने पेशावर मधील आपला सहकारी कर्नल रॉजर बेकोन याला या गोष्टीची माहिती कळवली आणि गिलगीट बाल्टीस्तान पाकिस्तानच्या ताब्यात देण्याची खेळी केली.

२ नोव्हेंबर रोजी मेजर ब्राऊनने स्वत: जाऊन गिलगीट बाल्टीस्तानमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावले आणि गिलगीट बाल्टीस्तान पाकिस्तानचा अधिकृत भाग असल्याचे परस्पर जाहीर केले. आपल्या या कृत्याचे समर्थन म्हणून त्याने दावा केला की –

मी आणि माझा सहकारी मॅथीसन, आम्हा दोघांनाही पाकिस्तानच्या सेवेसाठी नेमले होते आणि दुसरीकडे महाराजा हरी सिंहांनी परस्पर करारावर सह्या करून हा भाग भारताच्या ताब्यात दिला म्हणून हे पाउल आम्हाला उचलावे लागेल.

 

jammu kashmir 1 inmarathi
Maps of India

 

दोन आठवड्याने संपूर्ण प्रदेशात पाकिस्तानी सैन्याने आपले ठाण मांडले आणि जो भाग भारताचा होणार होता तो पाकिस्तानने हिसकावून घेतला.

मुख्य म्हणजे तेथील स्थानिक लोकांनी देखील या निर्णयाला पाठींबा दर्शवला होता. हा संपूर्ण प्रदेश मुस्लीमबहुल असल्यामुळे केवळ दोन ब्रिटीश अधिकारीच नाही तर तेथील स्थानिक मदतीचा वापर करून ही खेळी खेळली गेल्याची शक्यता देखील काही अभ्यासक दर्शवतात.

तसेच तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता या प्रदेशाला पाकिस्तान जवळ असल्याने, वाहतूक आणि दळणवळणासाठी पाकिस्तानात जाणे सोपे असा विचार तेथील जनतेने केल्याचे नाकारता येत नाही.

सध्या या प्रदेशाची पाकव्याप्त काश्मीरसारखी अवस्था आहे. त्यामुळे या प्रदेशात या घडीला पाकिस्तान विरुद्ध असंतोष आढळून येतो. पाकिस्तानने बेकायदेशीररित्या हडप केलेला भारताचा भाग म्हणून भारत गिलगीट बाल्टीस्तानकडे पाहतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?