आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
शाळा कॉलेजची परीक्षा असो व स्पर्धा परीक्षा. प्रत्येकाची अभ्यासाची आपापली पद्धत असते.
काहीजण सकाळी लवकर उठून अभ्यास करतात, तर काहीजण रात्री जागून सगळे शांत झाल्यावर अभ्यास करतात. काहींचा घोकंपट्टीवर विश्वास असतो, तर काहीजण समजून घेतल्याशिवाय अभ्यास करू शकत नाहीत.
याप्रमाणेच काहीजणांना आपाला अभ्यास एकट्याने करणे आवडते, तर काहीजण एकत्र येऊन अभ्यास करतात. बऱ्याच वेळा एकत्र येऊन अभ्यास करण्यात अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त वेळ जातो अशी (खासकरून पालकांची!) तक्रार असल्याचे पहायला मिळते.
एकमेकांचे अगदी चांगले मित्र-मैत्रिण असले तरी प्रत्येकाची आकलनशक्ती, अभ्यास करण्याची पद्धत यात बराच फरक पडू शकतो. त्यामुळे ‘ग्रुप स्टडी’ ही अभ्यासाची पद्धत कितपत प्रभावी पडते यावर अनेक मतमतांतरे आहेत.
सध्याचे युग हे स्पर्धापरिक्षांचे युग आहे. राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये दरवर्षी अक्षरशः लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात.
जवळपास ७-८ पेक्षा जास्त विषयांचा अभ्यास एकाच वेळी करावा लागत असल्याने उमेदवाराच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेचा चांगलाच कस लागतो.
अशा वेळेस दोन-तीन जणांनी एकत्र येऊन चर्चेतून अभ्यास केला, तर त्याचा चांगला फायदा होतो असे मानले जाते. पण अशाप्रकारे एकत्र येऊन अभ्यास करत असताना गप्पाटप्पा होऊन वेळ वाया जाण्याची शक्यताही तेवढीच असते.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये जिथे अक्षरशः मिनीटा-मिनिटांचा वेळ अमूल्य असतो, तिथे अभ्यासाचा पर्याय काळजीपूर्वकच निवडावा लागतो.
अलीकडेच राजस्थान मध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात तीन मित्रांनी यश मिळवले. आता तुम्हाला वाटेल, यात विशेष ते काय?
या तीन मित्रांनी मिळवलेले यश यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण या परीक्षेसाठी त्यांनी कोणताही कोचिंग क्लास न लावता एकत्रितपणे अभ्यास केला!
‘ग्रुप स्टडी’चा असा उत्तम उपयोग करून एकाच परीक्षेत निर्भेळ यश मिळवणारे हे तीन मित्र स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या इतरांसाठी आदर्शच आहेत!
अयान योगी, झुबेर खान आणि विक्रम गुर्जर हे हे तीन मित्र. राजस्थान मधील अलवर येथे राहणाऱ्या या तिघांनी २०१८ मध्ये आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या जाहिरातीतून अर्ज केला होता.
तिघेही मित्र तसे म्हटले तर वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले होते. या तिघांपैकी अयान हा शिक्षणाने इंजिनीअर. त्याने बी. टेक. चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. विक्रम आधीपासूनच राजस्थान पोलीस दलात कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होता, तर झुबेर हा एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होता.
तिघांनी एकावेळेसच या परीक्षेसाठी अर्ज केला आणि तयारी सुरू केली. सध्या एकंदरीतच सर्वत्र स्पर्धापरीक्षा देण्याकडे मुलांचा कल वाढत आहे आणि यातूनच या परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संस्थाही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.
महाराष्ट्रात पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रे दिसून येतात. यांपैकी काही ठिकाणी मार्गदर्शनाच्या नावाखाली प्रचंड शुल्क आकारून फसवणूकीचे प्रकारही घडलेले दिसतात.
अशा परिस्थितीत या तिन्ही मित्रांनी कोणत्याही कोचिंगचा आधार न घेता स्वतः अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. स्वयंअध्ययन करताना त्यांनी ‘ग्रुप स्टडी’ चा मार्ग अवलंबण्याचे ठरवले.
ग्रुप स्टडी चा होणारा मुख्य फायदा म्हणजे ३-४ जण एकत्र एखाद्या विषयावर चर्चा करत असताना, समोरच्याच्या बोलण्यातून आपल्याला न कळलेली गोष्ट अगदी सहज कळू शकते, तसेच काही मुद्दे जे आपण विचारात घेतलेले नसतात, ते समजतात.
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना याचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. कारण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विषयांचे आकलन करून घेणे हे तेव्हा जास्त महत्त्वाचे असते.
अयान, विक्रम आणि झुबेर यांनी याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले. कोणतेही क्लासेस लावलेले नसल्याने त्यांनी एकत्रितपणे एकेक विषयाचा अभ्यास सुरू केला.
काही वेळेस विक्रम आणि झुबेर अयान च्या घरी जात, तर कधी अयान विक्रम आणि झुबेरकडे जात असे. प्रत्येकजण एकमेकांना अभ्यास करताना येणाऱ्या अडचणींमध्ये मदत करत असे.
२०१८ मध्ये तिघांनीही प्राथमिक परीक्षा दिली आणि ते त्यात उत्तीर्ण झाले. पोलीस भरतीची परीक्षा असल्याने त्यात प्राथमिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत असे टप्पे होतेच.
प्राथमिक परीक्षेनंतर २०१९ मध्ये तिघांनाही शारीरिक चाचणीला बोलावले गेले. तिथे यशस्वी झाल्यावर तिघांचीही मुलाखतीसाठी निवड झाली.
मुलाखत हा स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. यात उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी होते आणि पदाबरोबर येणारी जबाबदारी सांभाळण्यास तो सक्षम आहे की नाही हे तपासले जाते.
जुलै महिन्यात या तिन्ही मित्रांच्या मुलाखती पार पडल्या. नुकताच त्यांचा निकाल जाहीर झाला आणि अयान, विक्रम आणि झुबेर हे तिघेही पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवडले गेले.
अयान २२ व्या क्रमांकाने, विक्रम ४६व्या क्रमांकाने तर झुबेर १४६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तिघांनीही पहिल्यापासून एकत्रितपणे अभ्यासाची सुरुवात केली आणि तिघेही आपले लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी ठरले.
ग्रुप स्टडी ही गोष्ट बऱ्याच वेळेस तिच्या फायद्यांपेक्षा तोट्यांमुळे उपयोगात आणली जात नाही, पण आपण आपल्या उद्दिष्टांवर संपूर्णपणे लक्ष केंद्रित केल्यास एकत्रितपणे केलेला अभ्यास किती उपयोगी पडू शकतो हे अयान, विक्रम आणि झुबेरने सिद्ध केले आहे.
‘असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे।’ ही तुकोबांची उक्ती या तिघांच्या बाबतीत शब्दशः लागू पडते. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या उमेदवारांसाठी या तिघांची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.