Site icon InMarathi

कारचा संपूर्ण कायापालट करणारा जादूगार; एक वेगळं करियर करायचंय? जरूर वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणत्याही कारमध्ये तिच्या परफॉर्मन्स बरोबरच महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तिचा लुक. त्यातही हौसेखातर किंवा ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून वापरल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये ही गोष्ट फारच कटाक्षाने पहिली जाते.

बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रोल्स रॉईस, लॅम्बॉर्गिनी यांसारख्या आलिशान गाड्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लुक्समुळे जास्त ओळखल्या जातात.

 

 

गाडीची रस्त्यावरची कामगिरी, तिच्या इंजिनाची क्षमता कितीही उत्तम असली, तरीही जर ती दिसायला खास नसेल तर ती बाजारात यशस्वी ठरू शकत नाही.

एखादी कार बाजारात आणायच्या आधी त्या कंपनीची रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) टीम अनेक महिने त्यावर काम करत असते. यात गाडीच्या लुक्सवर फार जास्त मेहनत घेतली जाते. गाडीचा लुक काही वेळेस तिच्या कामगिरीवरही प्रभाव पाडू शकतो.

स्पोर्ट्स कारच्या बाबतीत ही गोष्ट दिसून येते. जास्त वेगाने पळण्यासाठी हवेचा कमीत कमी प्रतिरोध होईल अशा प्रकारचे डिझाइन बनवले जाते.

कारचे डिझाईन करणे ही वरकरणी सोपी गोष्ट दिसत असली, तरी प्रत्यक्षात ते फार मेहनतीचे काम असते.

काही वेळेस हौशी ग्राहक आपल्या आवडीनुसार गाडीच्या मूळ डिझाइन्स मध्ये बदल करून गाडीची आपल्याला हवी तशी आरामदायी रचना करून घेतात. काही वेळेस जुन्या गाड्यासुद्धा Modify करून अद्ययावत केल्या जातात.

कार्सची आवड असलेल्या लोकांना दिलीप छब्रिया हे नाव नवीन नसेल. भारतातीलच नव्हे, तर जगातील अग्रगण्य कार डिझायनर्स मध्ये दिलीप छाब्रिया यांचे नाव घेतले जाते.

 

 

‘डीसी डिझाइन्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कार डिझाइन स्टुडियोद्वारे त्यांनी अनेक प्रकारच्या गाड्यांचा अक्षरशः चेहरामोहरा बदलून टाकला आहे. बॉलिवूड मधले अनेक सेलिब्रेटी, मोठमोठे उद्योगपती त्यांनी डिझाईन केलेल्या गाड्यांचे चाहते आहेत.

दिलीप छाब्रिया यांचा जन्म मुंबईतला. त्यांच्या वडिलांचा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा व्यवसाय होता. लहानपणापासून वह्यांच्या मागच्या पानांवर गाड्यांची चित्र काढण्याचा त्यांना छंद होता. आपल्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे ते कॉमर्स विषय घेऊन ग्रॅज्युएट झाले.

एकदा एका नियतकालिकात त्यांनी अमेरिकेतील कार डिझायनिंगचे शिक्षण देणाऱ्या एका संस्थेबद्दल माहिती वाचली. आधीपासूनच गाड्यांची आवड असणाऱ्या दिलीप यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच होती.

त्या काळात, म्हणजे सुमारे चाळीसएक वर्षांपूर्वी भारतात कार डिझाइनिंगच्या शिक्षणाचा विचार करणंही हास्यास्पद होतं, तेव्हा दिलीप छाब्रियांनी या कोर्सला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

यानंतर कॅलिफोर्नियातील ‘आर्ट सेंटर कॉलेज ऑफ डिझाईन’ या संस्थेत ‘ट्रान्सपोर्टेशन डिझाईन’ या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाला, तेही परदेशात प्रवेश घेणे हे धाडसाचेच होते.

दिलीप यांनी कार डिझाईनचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. यानंतर ते अमेरिकेतील वाहन उद्योगातील प्रसिद्ध कंपनी जनरल मोटर्स मध्ये रुजू झाले, पण दिलीप छाब्रियांच्या मनात काही वेगळेच होते.

 

 

कंपनीत काम करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे डिझाइन्स करण्यापेक्षा आपण स्वतंत्रपणे गाड्यांचे डिझाईन का करू नये? असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर जनरल मोटर्सला आणि पर्यायाने अमेरिकेला रामराम करून ते भारतात परतले.

दिलीप भारतात परतले त्या काळात भारतात वाहन उद्योग फार वाढलेला नव्हता. प्रीमियर, मारुति, महिंद्र, टाटा यांसारखे तुरळक वगळता बाकी जास्त वाहन उत्पादकही नव्हते.

आपल्या वडिलांच्या फॅक्टरीत मुंबईत मरोळ येथे दिलीप यांनी आपले पहिले प्रॉडक्ट बनवले. प्रीमियरच्या पद्मिनी या गाडीसाठी त्यांनी रिंगच्या आकाराचा हॉर्न तयार केला आणि तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

या हॉर्नची किंमत त्यांनी ४० रुपये ठेवली होती आणि याउलट तो बनवायला लागणारा खर्च होता फक्त ८ रुपये!

१९९२ साली त्यांनी आपले पहिले कार मॉडिफिकेशन केले. त्यांनी स्वतःच्या जिप्सी या गाडीला नवीन रूप दिले. त्यांचे हे काम पाहून महिंद्रा कंपनीने आपल्या आरमाडा या गाडीमध्ये डिझाईनच्या दृष्टीने बदल करण्यास पाचारण केले.

महिंद्राची सार्वकालिक यशस्वी गाडी ‘स्कॉर्पियो’च्या डिझाईनचे मूळ दिलीप यांनी आरमाडाला मॉडिफाय करताना जे बदल केले त्यात होते.

 

 

यानंतर दिलीप छाब्रिया हे नाव कार डिझायनिंगमध्ये प्रसिद्ध होऊ लागले. यातूनच पुढे त्यांनी ‘डीसी डिझाइन्स’ हा आपला ब्रँड सुरू केला ज्याच्या अंतर्गत ग्राहकाच्या आवडीनुसार गाड्या मॉडिफाय करून देण्यास त्यांनी सुरवात केली.

भारतात व्यावसायिक तत्वावर कार मॉडिफिकेशन याआधी कोणीही केले नव्हते. २००३ मध्ये दिलीप यांच्या कारकीर्दीला मोठे वळण मिळाले.

ऍस्टन मार्टिन या जगप्रसिद्ध कंपनीची DB8 ही गाडी त्यांनी डिझाईन केली जी ‘जेम्स बॉण्ड’ च्या एका चित्रपटात वापरली गेली. यामुळे दिलीप छाब्रियांचे नाव जगभर झाले.

 

 

२००४ च्या दरम्यान आलेला ‘टारझन द वंडर कार’ हा चित्रपट आठवत असेलच. त्यात दिसणारी जांभळ्या रंगाची स्पोर्ट्स कार ही सुद्धा दिलीप छाब्रियांनीच डिझाईन केलेली आहे.

आपल्या स्टुडियोच्या माध्यमातून दिलीप छाब्रियांनी आजवर अनेक गाड्यांची नवनिर्मिती केली आहे. २०१५ मध्ये त्यांनी ‘डीसी अवंती’ ही पहिली भारतीय स्पोर्ट्स कार बनवली.

 

 

एकाही भारतीय कंपनीने याआधी स्पोर्ट्स कारच्या विश्वात पाऊल टाकलेले नव्हते. २ लिटर पेट्रोल इंजिनवर २५० अश्वशक्तीची पॉवर देणारी अवंती ही जगातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स कार म्हणता येईल. लॉन्च होताना ३५ लाख रुपये एवढ्या किमतीत ती उपलब्ध होती.

दिलीप छाब्रियांच्या डिझाईन्सवर बॉलिवूड अक्षरशः फिदा आहे. अनेक मोठमोठ्या सेलिब्रेटींनी आपल्या गाड्या ‘डीसी मॉडिफाय’ केल्या आहेत.

शाहरुख खान, सलमान खान यांनी आपल्या व्हॅनिटी व्हॅन दिलीप छाब्रियांकडून डिझाईन करून घेतल्या आहेत, ज्यांची किंमत प्रत्येकी जवळपास साडेतीन कोटी आहे!

हृतिक रोशन, माधुरी दीक्षित यांसारख्यांनी देखील आपल्या गाड्या दिलीप यांच्याकडून मॉडिफाय केल्या आहेत.

 

 

आजमितीला दिलीप छाब्रियांच्या डिझाईन स्टुडिओत ४०० पेक्षा अधिक इंजिनियर्स आणि डिझायनर्स काम करतात. त्यांचे स्वतःचे गाड्यांचे कलेक्शनही पाहण्यासारखे आहे.

यात बीएमडब्ल्यू एक्स 6 एम, मर्सिडीज SLS AMG, ऑडी R8, पोर्शा 911 आणि त्यांनी स्वतः डिझाईन केलेल्या अनेक गाड्या आहेत.

एक साधा हॉर्न बनवण्यापासून सुरुवात केलेल्या दिलीप यांच्या डिझाईनचे चाहते आज जगभर आहेत. कार डिझायनिंग बरोबरच दिलीप छाब्रिया उत्तम चित्रकार व शिल्पकारही आहेत.

ज्यावेळेस कोणी विचारही केला नव्हता, त्या काळात कार डिझाईन सुरू करून त्यात यशस्वी होईपर्यंतची दिलीप छाब्रियांची वाटचाल ही थक्क करणारी आहे.

नव्या वाटा धुंडाळून त्यात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दिलीप छाब्रियांचे उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version