पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचं कवित्व – आपण काय शिकायला हवं?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
५ राज्यांचे निकाल आज जाहीर झालेत, exit poll च्या निष्कर्षानुसार निकाल बऱ्यापैकी अनपेक्षित म्हणावे लागतील मुळात exit poll ची विश्वासार्हता किती हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण कुठलीही निवडणुक येते ती एक trend किंवा एक wave घेऊन येते. सहसा त्याचं फारसं कोणी आकलन करत नाही पण कदाचित आता भारतात ते सुरु होईल. ही दोन फॅक्टर्स निवडणुकीत फार महत्वाची असतात ती ज्या पक्षाला, राजकारण्याला ओळखता आली तो विजयी होतो इतकं सरळ गणित ते आहे. २०१४ पासुनचा trend बघा २ पॅटर्न तुम्हाला दिसतील. अपवाद वगळता लोकांचा कल हा एका पक्ष/आघाडी ह्याला संपूर्ण बहुमत देण्याकडे आहे. म्हणजे जे काय विकास/भकास राज्य तुम्ही ५ वर्षात कराल ते पूर्ण ताकदीनिशी करा उगाच तंगड्यात तंगड फसवून ह्यांनी राज्यशकट हाकूच दिला नाही ही कारणं देऊ नका. आणि दुसरा पॅटर्न म्हणजे जर नेतृत्व प्रभावी असेल, सरकारच वर्तन फार बेमुवर्तखोर नसेल तर दुसरी टर्म अपवादात्मक स्थिती नसल्यास शक्यतोवर मिळते. निदान ह्या दोहोंचा अभ्यास अखिलेशनी केला असता तर आज त्यांचा इतका मोठा पराभव झाला नसता. असो.
तर आपण पक्षनिहाय विश्लेषण बघण्यापेक्षा राज्यनिहाय विश्लेषण बघुयात.
उत्तरप्रदेश
उत्तर प्रदेश हे तसं पाहिलं तर फारच complicated राज्य आहे. पण ऐतिहासिक निकाल लागलाय त्याचं सगळं श्रेय हे मोदी-शहा जोडगोळीलाच जातं. विरोधकांवर कुठलीच दयामाया दाखवायची नाही किंबहुना त्यांना अक्षरशः संपवायचं ह्या एकच फॉर्म्युलानी अमित शहा नावाचा Micro-strategist काम करतो. जबरदस्त पक्ष संघटन, मेहनत, मोदींचा करिष्मा ह्या बळावर भाजपचा इतका मोठा विजय झालाय. आपल्या उणिवा काय आणि आपली बलस्थानं ह्याची सांगड सुद्धा अमित शहांनी योग्यरित्या घातली. आणि म्हणूनच एकही मुस्लिम उमेदवार न देता जवळ जवळ 45 मुस्लिम लोकसंख्या अधिक असणाऱ्या जागांवर सुद्धा भाजपचा गैरमुस्लिम निवडुन आलाय. त्यामागे गणित आहे गैरमुस्लिम मतांचं एकत्रीकरण. मुस्लिमांची मतं जितकी भाजप दावा करते आहे त्यापेक्षा नक्कीच कमी त्यांना मिळाली असणार. पण त्याची भरपाई त्यांनी गैरमुस्लिम मत एकत्रीकरण करून मिळविली. त्याच्या सोबतीला ट्रिपल तलाख सारखे अनेक पुरोगामी निर्णय होते ज्याचा परिणाम मुस्लिम महिला आणि अनेक सुशिक्षित तरुण मुस्लिमांवर झाला असण्याची शक्यता देखील आहे.
मोदींनी एक गोष्ट नक्की केली ती म्हणजे निवडणुक त्यांच्या मताप्रमाणे ते ठरवतील त्या मुद्द्यांभोवती फिरत राहतील मग तो स्मशान,कब्रिस्तान मुद्दा असो की दिवाळी,रमजान एक पुडी त्यांनी सोडली आणि विरोधक तीच चघळत बसले. केंद्र सरकारचे अनेक मुद्दे देखील मोदींनी व्यवस्थित en-cash केलेयत. हया सगळ्यात मोदींनी front line वर जाऊन भाजपची आघाडी सांभाळली आणि त्याचा खूप मोठा परिणाम झाला. सगळीच ताकद त्यांच्यामागे खंबीरपणे होती ह्याच्या अगदीच उलट परिस्थिती सपा आणि काँग्रेसची होती.
समाजवादी भांडण, राहुल आणि पर्यायाने काँग्रेस ह्या हताश आणि मरगळलेल्या पक्षाची साथ, सपा ची स्वतःची विघटित पक्ष संघटना ह्या सगळ्या पेचात अखिलेश समोर आव्हान होतं ते म्हणजे मोदी-शहा जोडगोळीच हे म्हणजे आशिष नेहरानी ब्रेट ली ला पॅड न घालता फेस करण्यासारखं आहे. Demonetization मुळे मायावतींची परिस्थिती डबघाईला आलेल्या सहकारी बँकेसारखी होती. मुळात मायावती ह्यांच राजकारण चालू होतं कारण मुलायम नावाच्या दबंग वादळापुढे खंबीरपणे कोण उभं राहील तर मायावती कारण दुसऱ्या पक्षांची तितकी ताकदच नव्हती, जशी भाजप लोक पर्याय म्हणुन पाहू शकतील इतकी मजबुत झाली तसा मायावतींचा कार्यकारण भाव संपुष्टात आला.
उत्तराखंड
हरीश रावत हा तसा सभ्य माणुस. म्हणजे त्यांचं काम फारच वाईट होतं ह्यातला भाग नाही. पण परत एकदा लाट आली आणि त्यात सगळं वाहून गेलं, उत्तरप्रदेश सोबत ह्या राज्यातही लाट चालली आणि भाजप निवडून आली.
तसा ह्या राज्याचा trend आहे म्हणा की दर ५ वर्षाने सत्ता बदल होतोच तसा ह्या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला. रावतांना अजुन थोडा जास्त free hand काँग्रेस नेतृत्वाकडून मिळाला असता तर इतका मोठा पराभव पदरी पडला नसता…थोडी लाज वाचवण्यालायक परिस्थिती राखली गेली असती.
पंजाब
अकाली दलाने केलेले अनिर्बंध घोटाळे, सत्तेचा माज हया सगळ्यांना पंजाबच्या जनतेने साफ नाकारलं. एक न उमगलेलं कोडं म्हणजे भाजप नी अकाली दलाची का सोडली नाही – हे. महाराष्ट्रात ते शिवसेनेची साथ सोडू शकतात तर मग पंजाबमध्ये अकाली का नाही. कदाचित भाजप धुरिणांना मतदान घोषित होण्याआधी उत्तरप्रदेश बाबत साशंकता असेल म्हणून अकाली दलाल दुखविण्याचं धाडस भाजपनी दाखवलं नाही. जर दाखवलं असतं तर चित्र नक्कीच वेगळं असतं.
भाजप कडे सिद्धू सारखा चेहरा सुद्धा होता. कदाचित २०१९ पूर्वी ही युती तुटलेली असेल. काँग्रेस चा विचार केला तर हा विजय निव्वळ कॅप्टन अमरिंदर सिंग ह्यांचाच विजय आहे. हा माणूस खरंच हिरा आहे पण काँग्रेसी culture नावाच्या कोंदणात दबल्या गेलेला हा हिरा आज झळाळून बाहेर आलाय तो केवळ स्वकर्तृत्वावर…! खलिस्तानवादी आप आणि प्रचंड भ्रष्टाचारी अकाली ह्या दोन दिग्गजांना पराभूत करणं निश्चित नव्हतं पण जिद्दीने अमरिंदर ह्यांनी ते करून दाखविलं. २०१९ मध्ये अमरिंदर ह्यांच्या पंजाब कडून काँग्रेस ला बऱ्याच अपेक्षा असतील.
गोवा
गोव्यात भाजपला बसलेला फटका हा केवळ “अडेलतट्टू” राजकारणामुळे बसला आहे. पर्रीकर-पार्सेकर, वेलिंगकर वाद भाजप ला भोवला. पण ह्या वादामुळे परत घोडाबाजाराची स्थिती आलीय, जी भाजप नेतृत्वाला कदाचित टाळता आली असती.
मणिपूर
बाहेरून आयात केले गेलेले एन.बिरेन सिंग हे भाजपचा मणिपूर मधील आसाम फॉर्म्युलाचा परिपाक होते आणि त्याच बळावर आज आसाम नंतर मणिपूर ह्या दुसऱ्या उत्तरपूर्वी राज्यात भाजपनी मुसंडी मारलीय. राष्ट्रीय दृष्ट्या हा एक चांगला संकेत आहे, की उत्तरपूर्वी भाग क्षेत्रीय पक्षांच्या तावडीतून सुटतो आहे.
ह्या ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा मुख्य ठळक परिणाम असेल तो म्हणजे मोदींची एकूण देशावरची पकड आणखीन मजबूत होईल. २०१८ पर्यंत उत्तरप्रदेशातल्या संख्याबळाच्या जोरावर भाजप राज्यसभेतले आपले संख्याबळ वाढवेल, जुलै मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला कोणाचेही पाय धरावे लागणार नाहीत. उत्तरप्रदेश मध्ये एक नवीन आणि चांगला चेहरा समोर येईल.
मोदींची कार्यशैली अभ्यासली तर कळेल ते अगदी संघाच्या गट-गण पद्धतीनुसार काम करतात. नीट आठवा २०१३ नंतर जिथे जिथे भाजप जिंकली आहे किंवा मजबुत झालीय तिथल्या स्वच्छ चारित्र्याच्या आऊट ऑफ द बॉक्स माणसाला सुद्धा मोदींनी समर्थन देत पुढे केलंय आणि तो माणूस स्वबळावर त्या राज्यात भाजप ला कसं वाढवू शकेल ह्यासाठी त्याला पाहिजे तितका फ्री हँड दिलाय. शिवराज,रमणसिंग, मनोहरलाल खट्टर असोत किंवा आताचे सगळ्यात तगडे उदा देवेंद्र फडणवीस असोत. त्यांच्या चेहऱ्यावर पुढची निवडणूक राज्यात लढविता येईल आणि २०१९ साठी फार महत्वाचा ग्राउंड बेस तयार करता येईल हे मोदींचं लॉंग टर्म प्लांनिंग आहे. म्हणतात ना नेता हा तोच असतो जो leading from the front असतोच पण त्याच्या पश्चात दुसरं नेतृत्व उभं राहावं ह्यासाठी दुरदृष्टी ठेवून प्रयत्न करतो. ह्याचीच कमी विरोधात आहे, ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसच स्थानिक नेतृत्व बऱ्यापैकी शाबूत आहे तिथे तिथे काँग्रेस नी तग धरून ठेवला आहे.
मागे २००५ की २००६ साली प्रभू चावला म्हणाले होते की तुम्ही मोदी मोदी ओरडत बसलात तर तुम्ही ह्या माणसाच्या विरुद्ध पराभूतच व्हाल कारण हा माणुस त्याची ढाल म्हणून उपयोग करतो. बघुयात ह्यातुन तरी विरोधक काही शिकणार का?? नाहीतर ओमर अब्दुल्ला म्हणतात तसं २०१९ विसरून २०२४ साठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. मी इतका भाबडा नाही आणि माझ्यामते मोदीसुद्धा नसावेत तेंव्हा सगळ्या मोदी विरोधकांनी कामाला लागलेल बरं…!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.