' चिंच उपयोगी आहेच, पण त्यापेक्षा “जबरदस्त” उपयोगी आहेत चिंचेची पाने! वाचा – InMarathi

चिंच उपयोगी आहेच, पण त्यापेक्षा “जबरदस्त” उपयोगी आहेत चिंचेची पाने! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय स्वयंपाकघर चिंचेशिवाय अपूर्ण आहे. रोजच्या भाजी-आमटीपासून ते चटपटीत भेळपुरीपर्यंत विविध खाद्यपदार्थांमध्ये चिंच हा महत्त्वाचा घटक आहे.

भारतीय खाद्यसंस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या बहुतांश वनस्पतींचा प्रत्येक अवयव या ना त्या कारणामुळे उपयोगी पडतो. चिंचही याला अपवाद नाही.

 

tamarind inmarathi

तिखट मीठ लावलेली गाभूळलेली चिंच पहिली की तोंडाला आपसूकच पाणी सुटते. चिंचेचे झाडही एवढे डेरेदार असते, की त्याच्या सावलीत बसण्यात वेगळाच आनंद आहे

.

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी चिंचा पाडून खाल्ल्या असतील. अंगभूत चव आंबट असूनही चिंचेचा योग्य प्रमाणातील वापर पदार्थाला एक वेगळी लज्जत आणतो.

 

Sweet Tamarind InMarathi

 

चिंचेतील आंबटपणा आणि इतर काही द्रव्यांमुळे भांडी स्वच्छ करण्यासाठीसुद्धा तिचा उपयोग केला जातो.

 

tamarind to clean inmarathi

 

चिंच ही अनेक प्रकारे शरीराला गुणकारी आहे, पण चिंचेप्रमाणेच चिंचेची पानं सुद्धा अत्यंत उपयोगी आणि शरीराला लाभदायक आहेत. चिंचेच्या पानांचे प्रत्यक्ष चिंचेपेक्षा जास्त उपयोग आहेत.

चिंचेचे शास्त्रीय नाव टॅमरिंडस इंडिका (Tamarindus indica) असे असून तिचे मूळ स्थान आफ्रिका असल्याचे मानले जाते.

भारतात चिंच पूर्वापार आढळून येत असल्याने तिचे मूळ स्थान भारत असल्याचेही काही शास्त्रज्ञांचे मत आहे. उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात चिंच आढळून येते.

चिंच ही सदाहरित वृक्षवर्गीय वनस्पती असून तिचे खोड सुतारकामात वापरता येते. चिंचेचे झाड १२ ते १५ मीटर पर्यंत वाढू शकते. चिंचेच्या झाडाचे आयुष्यमान ६० ते १०० वर्षे असते. यापेक्षाही जास्त वयाची झाडे भारतात काही ठिकाणी आढळून येतात.

 

tamarind tree inmarathi1

 

भारतासह चिंचेचा प्रसार जवळपास जगभर झालेला आहे. मध्य आफ्रिकेतील बऱ्याचशा देशांत चिंच आढळून येते. काही हजार वर्षांपूर्वी चिंचेचा प्रसार आग्नेयेकडील इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, म्यानमार येथे झाला.

साधारणपणे १६ व्या शतकात पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांकडून चिंच कॅरेबियन बेटे, मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत पोचली. नुसती पोचली नव्हे, तर तेथील खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचा घटक म्हणून चिंचेचा वापर सुरू झाला.

भारत हा जगातील चिंचेचा सर्वात मोठा उत्पादक असून भारतात महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांत चिंचेची प्रामुख्याने लागवड केली जाते. जवळपास अडीच लाख मेट्रिक टन एवढे उत्पादन दरवर्षी घेतले जाते.

चिंचेची पानं साधारणतः एक इंचापेक्षाही लहान, गडद हिरव्या रंगाची, काहीशी गुलमोहराच्या पानांच्या जवळ जाणारी असतात. चिंचेप्रमाणेच पानांनाही आंबट चव असते.

चिंचेच्या पानांमध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन सी आणि टार्टारीक आम्ल असते. तसेच यात फायबर, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम ही पोषणद्रव्ये आढळतात. चिंचेप्रमाणेच तिच्या पानांचा वापर अन्नपदार्थांमध्ये केला जातो.

 

tamarind to clean inmarathi2

 

इंडोनेशिया, म्यानमार, सिंगापूर, फिलिपिन्स या देशांमध्ये सीफूड मध्ये चिंचेच्या पानांचा सर्रास वापर केला जातो.

आपल्याकडे सॅलड, कोशिंबिरी यांसारखे पदार्थ कायम केले जातात. यात चिंचेची पानं वापरून आलेला किंचित आंबट स्वाद फार सुरेख लागतो. तसेच पदार्थांच्या सजावटीसाठीही चिंचेची पाने वापरता येतात.

दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये आंबट गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आढळतो. त्यातही चिंचेच्या पानांशिवाय दाक्षिणात्य पदार्थांचे ‘पान’ हलत नाही! रस्सम, चटण्या, सार या पदार्थांमध्ये चिंचेची पाने वापरली जातात.

आंध्र प्रदेशात चिंचेच्या पानांबरोबर शेंगदाणे, लसूण, जिरे घालून केलेली ‘चिंताचीगुरु पचडी’ या नावाची चटणी प्रसिद्ध आहे.

कोणत्याही पदार्थात चिंचेऐवजी तिची पाने वापरून पदार्थाला किंचित आंबट स्वाद देता येतो. चिंचेची पाने पचनास उत्तम प्रकारे मदत करतात. भारतातील पूर्वेकडील राज्यांत चिंचेच्या पानांपासून केलेली चटणी फार प्रसिद्ध आहे.

 

tamarind leaves inmarathi

 

चिंचेच्या पानांचा रोजच्या खाद्यपदार्थात उपयोग आहेच, पण याखेरीज त्यांचे असे अनेक उपयोग आहेत जे सर्वसामान्यांना माहीत नसतील.

चिंचेची पाने त्यांतील पोषणद्रव्यांमुळे शरीराला अत्यंत लाभदायक ठरतात. शरीराला रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते जे साधारणपणे आंबट पदार्थांमधून मिळते.

चिंचेच्या पानातील टार्टारीक आम्ल आणि व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्व्ही हा रोग होतो ज्यात नखांतून व हिरड्यांतून रक्त येणे, थकवा येणे अशी लक्षणे आढळतात. चिंचेच्या पानात अस्कॉरबिक आम्ल मोठ्या प्रमाणावर असते जे स्कर्व्ही विरुद्ध जोवनसत्त्वे तयार करण्यास मदत करते.

अनोफिलीस डासांपासून मलेरिया हा आजार पसरतो. डास हे या आजाराच्या प्रसारात वाहक म्हणून काम करतात.

एका संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे, की चिंचेची पाने मलेरियाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असणाऱ्या ‘प्लाझमोडियम फॉल्सिपेरम’ या घटकाच्या वाढीस अटकाव करतो.

 

tamarind leaves inmarathi1

 

चिंचेची पाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच कविळीवरही उपचारात या पानांचा उपयोग होतो.

चिंचेची पाने पाण्यात भिजवून त्यांचा काढलेला अर्क हळदीप्रमाणे अँटिसेप्टिक म्हणून काम करतो. याचा वापर त्वचारोग आणि जखमांवर उत्तमरित्या करता येतो.

चिंचेच्या पानांचा लेप जखमेवर होणाऱ्या अन्य परपोषी जीवाणूंची वाढ थांबवतो आणि जखम भरून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नवीन पेशींच्या वाढीस चालना देतो.

तसेच सांधेदुखी आणि सूज येणे यावरही हा अर्क गुणकारी ठरतो. चिंचेची पाने बारीक करून पाण्यात उकळून, मध आणि लिंबाच्या रसाबरोबर घेतल्यास घशातील खवखव आणि कफापासून आराम मिळतो.

स्त्रियांसाठी चिंचेची पाने विशेष आरोग्यदायी आहेत. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना सुसह्य करण्यासाठी चिंचेच्या पानांचा रस घेणे फायदेशीर ठरू शकते. स्तनदा मातांसाठी चिंचेच्या पानांच्या रस दुधाची पोषणमूल्ये वाढवण्यास मदत करतो.

 

menopause inmarathi 4

 

तोंडाच्या दुर्गंधीमुळे बरेचजण त्रस्त असतात. चिंचेची पाने चावून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी जाते आणि दातदुखीपासूनही आराम मिळतो.

चिंचेच्या पानांचा रस अँटीऑक्सिडंटस्नी समृद्ध असतो. शरीरात अँटीऑक्सिडंटस् चे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते.

अनेक विकारांवर गुणकारी अशी चिंचेची पाने अल्सरच्या त्रासावरही लाभदायक आहेत. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यातही त्यांचा हातभार लागतो, पण शेवटी प्रत्येकाने चिंचेचा वापर आपल्या शरीर प्रकृतीला अनुसरून केलेला कधीही उत्तम.

चिंचेची पाने जरी कफावर गुणकारी असली, तरी जास्त प्रमाणात चिंच खाणे खोकल्यास आमंत्रण देणारेही ठरू शकते! यामुळे योग्य सल्ला घेऊन चिंचेच्या पानांचा वापर करणे नक्कीच लाभदायक ठरू शकेल.

एवढ्या सगळ्या माहितीवरून आपणास कळले असेलच, की चिंचेपेक्षा चिंचेची पाने फार आरोग्यदायी आणि म्हणूनच महत्त्वाची आहे. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ हे चिंचेच्या पानांना अक्षरशः लागू पडते.

 

Tamarind-During-Pregnancy InMarathi

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?