आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
संगीत, कला, क्रीडा ह्या तीनही क्षेत्रात भारत नेहमीच अव्वल राहिला आहे. क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर, कला विश्वात अमिताभ बच्चन आणि संगीत विश्वातल्या लता मंगेशकर ही ३ नाव कोणाला माहिती नाही असा भारतीय विरळाच.
ह्या तिघांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जी अतुलनीय कामगिरी केली आहे त्या बद्दल त्यांना वेगवेगळ्या सर्वोच्च पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले आहे!
पण संगीत क्षेत्रात आणखीन अशी एकमेव व्यक्ती आहे जी लता मंगेशकर यांच्या बरोबरीनेच अत्यंत गुणी आणि प्रतिभावान गायिका म्हणून लोकप्रिय झाली, ती व्यक्ती म्हणजे आशा भोसले.
आशा ताई म्हणचे भारतीय संगीतातलं अत्यंत मानाचं नाव. एकाच कुटुंबात संगीताचे धडे गिरवून लतादी आणि आशाताई लहानाच्या मोठ्या झाल्या.
मास्टर दीनानाथ ह्यांनी केलेले सांगीताचे संस्कार आणि भाऊ पं.हृदयनाथ मंगेशकर ह्यांची शिकवण यामुळे लतादी आणि आशा ताई ह्या दोघींनी करोडो चाहत्यांच्या मनात स्वतःच असं अढळ स्थान निर्माण केलं जे आजही तसंच आहे!
दोघीही सख्ख्या बहिणी असल्याने आजही कित्येक चाहते त्यांच्यात तुलना करतात. परंतु त्या दोघींची गायकी ही प्रचंड वेगळी आहे, स्वतंत्र आहे. त्यामुळे दोघींची तुलना करणं म्हणचे निव्वळ मूर्खपणाच!
आज ८ नोव्हेंबर आशा भोसले ह्यांचा वाढदिवस. आशाताईंचा सांगीतिक प्रवास हा बऱ्याच लोकांनी याची देही याची डोळा पाहिला आहे, अनुभवला आहे.
पण आज आम्ही तुम्हाला आशाताईंनी बद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या फार कमी लोकांना ठाऊक आहेत.
आशा भोसले ह्यांचा स्वभाव त्यांच्या गाण्यांच्या मूड सारखाच आहे सदाबहार! शिवाय कोणतीही नवीन गोष्ट करण्याकडे त्यांचा असलेला कल त्यांच्यातल्या सच्च्या कलाकाराचे दर्शन घडवतो.
संगीत क्षेत्रात इतक्या भरीव कामगिरीचा गर्व आणि पर्सनल लाईफ मध्ये आलेले बरेच चांगले वाईट प्रसंग याचं भांडवल कधीच त्यांनी केलं नाही किंवा कोणत्या चाहत्याशी त्या उर्मटपणे वागल्या नाहीत.
सदैव हसमतमुख आणि फर्माईश केल्या केल्या कोणाचीही भीड न बाळगता बिनधास्त गायला सुरू करणाऱ्या आशाताईंसारख्या गायिका दुर्मिळच.
१८ वेगवेगळ्या भाषांमध्ये जवळजवळ २०००० हुन अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या आशाताईंविषयी काही खास गोष्टी आपण जाणून घेऊया!
१. कॅब्रे नंबर्स साठी लोकप्रिय, पण गझल गाऊन जिंकला राष्ट्रीय पुरस्कार :
८० च्या दशकात सिनेमात असणारे कॅब्रे नंबर्स (म्हणजे आजच्या काळातली आयटम सॉंग) ला आशाताई ह्यांचा आवाज प्रचंड लोकप्रिय होता.
पिया तू अब तो आजा यावर थिरकणारी हेलन आणि तिला दिलेला तो आशाताईंचा आवाज आजही कित्येकांच्या लक्षात आहे. शिवाय ह्या गाण्यांसाठी त्यांना बरेच फिल्मी अवॉर्डस सुद्धा मिळाले.
पण खैयाम यांच्या उमराव जान मधल्या गाण्यांनी आशाताईंना एक वेगळीच ओळख मिळवून दिली, शिवाय या गझल्स मधून आशा भोसले ह्या काय लेव्हल च्या गायिका आहेत याची सुद्धा जाणीव प्रेक्षकांना झाली.
उमराव जान च्या त्या गाण्यांसाठी त्यांना उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला. आणि मग कॅब्रे सॉंग आणि आशा भोसले हे समीकरण बदललं ते कायमचंच!
२. जेम्स बॉण्ड कनेक्शन :
आशाताई, आरडी बर्मन (पंचमदा) आणि गुलजार हे तिघे एका अल्बम वर काम करत होते आणि काही केल्या पंचम ह्यांना चाल सुचत नव्हती.
एके दिवशी टेलिव्हिजन वर जेम्स बॉण्ड चित्रपट बघताना एका सिन मधक्या जेम्स बॉण्ड च्या एन्ट्री च्या बकग्राऊंड म्युझिक मुळे पंचम ह्यांना एक चाल सुचली. त्यांनी लगेच त्यावर काम करायला सुरुवात केली.
लगोलग त्यांनी ही गोष्ट गुलजार आणि आशाताई ह्यांच्या कानावर घातली, आणि अशाबाईंच्या ५४ व्या वाढदिवशी त्या गझल्स चा अल्बम लॉन्च केला गेला. त्याचं नाव होतं ‘दिल पडोसी है!’
ह्या नॉन फिल्मी गझल्स आजही कित्येकांना तोंडपाठ आहेत!
३. अभिनय आणि संगीत दिग्दर्शनात सुद्धा रुची :
वर म्हंटल्याप्रमाणे आशाताई ह्यांनी कधीच नवीन गोष्टी ट्राय करायला नकार दिला नाही. उलट त्यांनी संगीत क्षेत्रात निरनिराळे प्रयोग केले अगदी संजय दत्त बरोबर सुद्धा एका अल्बम मध्ये गाणं म्हंटलं आहे.
शिवाय २००२ मध्ये आलेल्या आप की आशा ह्या अल्बम मधल्या गाण्यांना त्यांनी चाली दिल्या, शिवाय वयाच्या ७९ व्या वर्षी आशाताईंनी माई ह्या मराठी चित्रपटात पद्मिनी कोल्हापूरे आणि राम कपूर ह्यांच्या सोबतीने अभिनय सुद्धा केला.
हे ही वाचा –
===
४. ग्रॅमी अवॉर्ड साठी नॉमीनेट झालेली पहिली भारतीय गायिका –
ऍक्टर्स साठी फिल्मफेयर असतो, खेळाडूंसाठी खेलरत्न असतो, तसाच संगीत क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या लोकांसाठी ग्रॅमी हा एक प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो, संगीतातला ऑस्करच जणू.
आणि ह्या अशा पुरस्कारासाठी आशा भोसले ह्या पहिल्या भारतीय गायिका आहेत ज्यांना नामांकन मिळालं होतं.
सरोद वादक उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत रेकॉर्ड केलेल्या ‘लेगसी’ ह्या अल्बम मधल्या गाण्यांसाठी आशाताईंना ग्रॅमीचं नॉमिनेशन मिळालं होतं.
शिवाय फक्त एकदाच नव्हे तर चक्क २ वेळा आशाताईंनी हे नामांकन मिळालं. पुरस्कार जिंकणं न जिंकणं ती नंतरची गोष्ट पण आज एका मराठी गायिकेने मारलेली ही मजल खरंच कौतुकास्पद आहे!
५. त्या गाण्याला फिल्मफेयर मिळाला जे गाणं कधी पडद्यावर दिसलंच नाही –
संगीतकार ओपी नय्यर आणि आशाताई हे समीकरण तर सगळ्यांनाच ठाऊक असेल. ओपी नय्यर ह्यांची बहुतेक सगळीच गाणी आशा भोसले ह्यांनी गायली.
एका अर्थी आशा भोसले ह्यांच करियर घडवण्यात नय्यर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हंटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
१९७४ साली आलेल्या त्यांच्याच सिनेमाच्या गाण्याला फिल्मफेयर पुरस्कार आशाताईंनी मिळाला. सिनेमा होता ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ आणि ते गाणं होतं ‘चैन से हमको कभी आपने जिने ना दिया.’
हे गाणं चित्रपटात नाही पण यासाठी आशाताईंना फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आणि हे गाणं त्यांच्या कारकिर्दीतल्या उत्तम गाण्यांपैकी एक मानलं जातं!
६. ऑल इंडिया रेडियो ने केलेलं आशाताई ह्यांचं गाणं बॅन :
७० च्या काळात तरुण पिढीला वेड लावणारं एक गाणं आलं ज्यामुळे कित्येक लोकांच्या भुवया उंचावल्या. पंचम यांचं संगीत, आशाताईंचा आवाज आणि देव आनंद ह्यांचा सिनेमा ‘हरे रामा हरे कृष्णा’ यातलं गाणं दम मारो दम.
प्रथम हे गाणं पंचम ह्यांचे वडील एस डी बर्मन हे करणार होते. पण हिप्पी कल्चर बद्दल असलेले विचार त्यांच्या आड आले आणि मग पंचम ह्यांनी हे गाणं स्वीकारून संधीचं सोनं केलं आणि पंचम आणि आशाताई ह्या तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले.
ऑल इंडिया रेडियो ने हे गाणं बॅन केलं होतं. पण रेडियो सिलोन आणि बिनाका गीतमाला ह्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे गाणं तुफान चाललं आणि यशस्वी झालं. आजही त्या गाण्याचं रिमेक करून लोकं स्वतःचे खिसे भरत आहेत!
अशा ह्या आपल्या सुरांनी कित्येक करोडो संगीतप्रेमींच आयुष्य फुलवणारऱ्या आशा भोसले ह्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
कट्यार काळजात घुसली मधला सचिन यांचा डायलॉग आशाताईंसाठी तंतोतंत लागू होतो “जिते रहो मगर गाते रहो!”
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.