गुलाबो – महिन्याला लाख रुपये उलाढालीचा व्यवसाय फुलवलाय २ मैत्रिणींनी, वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
गुलाबाचं फुल म्हणजे फुलांचा राजाच. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि वासामुळे गुलाब सगळ्या फुलांमध्ये उजवा ठरतो. फुलशेतीमध्ये आजकाल गुलाबाच्या लागवडीचे यशस्वी प्रयोग भारतात सर्वत्र केले जात आहेत.
कर्नाटकातील २ गृहिणींनी वेळ जाण्याचे साधन म्हणून अशाच प्रकारे गुलाबाची लागवड केली, एवढेच नव्हे तर त्यापासून इतरही अनेक उत्पादनांची निर्मिती करून आपल्या छंदाला व्यवसायाचे रूप दिले.
कर्नाटकातील सेदम या गावी राहणाऱ्या राधिका तापडिया आणि संगीता बलदवा यांची ही कहाणी खूपच प्रेरणादायी आहे.
१५ वर्षांपूर्वी जेव्हा राधिका आणि संगीता एकमेकींना भेटल्या, तेव्हा इतर गृहिणींप्रमाणे त्याही आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्त होत्या.
एका कार्यक्रमाच्या तालमीच्या निमित्ताने त्यांच्या वारंवार भेटी होत राहिल्या व त्यांची उत्तम मैत्री झाली. नेहमीच्या गप्पाटप्पांमधून मोकळा वेळ सत्कारणी कसा लावता येईल याचा विचार करीत असताना त्यांना बागकाम करण्याची कल्पना सुचली.
राधिका यांच्या घरची काही वंशपरंपरागत जमीनही उपलब्ध असल्याने यांच्या या कल्पनेला उत्तेजनच मिळाले. २००८ मध्ये त्यांनी या जमिनीच्या एका तुकड्यात काही फळे आणि पालेभाज्यांची लागवड करून सुरुवात केली.
दोघींनाही गुलाबाची फार आवड. यामुळे सुरुवातीला फळे आणि भाजीपाल्याबरोबरच त्यांनी गुलाबाची काही रोपे लावली.
केवळ आवड म्हणून लावलेली गुलाबाची रोपे अल्पावधीतच उत्तमरीत्या लागू लागली. गुलाबाच्या एवढ्या फुलांचे करायचे काय असा प्रश्न आता त्यांच्यापुढे निर्माण झाला.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद, गुलाबपाणी यांसारखी उत्पादने बनविण्यास सुरुवात केली.
गुलकंद शरीरातील उष्णता कमी करण्यात मोलाची भूमिका बजावतो. तसेच मिल्कशेक, आईस्क्रीम व इतर काही गोड खाद्यपदार्थांमध्येही गुलकंद वापरला जातो. गुलाबापाणीही थंडावा देणारे असून त्याचा वापर सरबते व अत्तरांमध्येही केला जातो.
गुलाब आणि त्याच्यापासून बनवलेल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन २०१२ साली राधिका आणि संगीता यांनी ‘गुलाबो’ या नावाने आपली उत्पादने विकण्यास सुरुवात केली.
केवळ छंदापायी सुरू केलेल्या या व्यवसायातून आज या दोन मैत्रिणी वर्षाकाठी जवळपास १० ते १२ लाख रुपयांची उत्पादने विकतात.
राधिका आणि संगीता केवळ स्वतःपुरत्याच थांबल्या नाहीत, तर आपल्यासारख्याच २० वेगवेगळ्या गृहिणींद्वारे या सर्व उत्पादनांच्या विक्रीसाठी विपणनाचे जाळे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यांत तयार केले आहे.
या दोघींच्या गुलकंद, वाळवलेल्या गुलाब पाकळ्या यांसारख्या उत्पादनांची ख्याती ऑस्ट्रेलिया, कॅनडा सारख्या देशांतही जाऊन पोचली असून तेथेही ही उत्पादने निर्यात केली जातात.
संगीता या मूळच्या हैदराबादच्या असून त्यांनी बी.ए. पर्यंतचे शिक्षण हैद्राबाद मध्ये घेतले. राधिका महाराष्ट्रातील अहमदपूर येथील असून त्याही कला शाखेच्या पदवीधर आहेत. दोघीही लग्नानंतर सेदम येथे स्थायिक झाल्या.
राधिका यांच्या घरची वंशपरंपरागत जमीन कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगात आणणे या उद्दिष्टातून ‘गुलाबो’ चा पाया रचला गेला.
दोघींनाही बागकामाची आवड होती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी त्या वेळही देऊ शकत होत्या. सुरुवातीला मेथी, पालक, भेंडी इ. भाज्यांच्या लागवडीपासून त्यांनी सुरुवात केली.
हळू हळू भाज्यांबरोबरच चिकू, आंबा, जांभूळ, सीताफळ यांसारखी फळझाडे लावण्यासही त्यांनी प्रारंभ केला. केवळ आवड म्हणून त्यांनी गुलाबाची लागवड केली.
उत्तम निगा राखली गेल्याने ही गुलाबाची झाडे उत्तम फुले देऊ लागली. घरात नैमित्तिक पूजेला व इतर गोष्टींसाठी वापरूनही गुलाबाची फुले शिल्लक राहू लागली. यातूनच गुलकंद निर्मिती सुरू झाली.
‘गुलाबो’ ला मिळालेल्या प्रतिसादामुळे राधिका आणि संगीता यांच्या इतर उत्पादनांचा खपही वाढला. आता गुलाब आणि त्याच्याशी निगडित उत्पादनांबरोबरच फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादनही वाढले आहे.
व्हॉट्सऍप च्या माध्यमातून या दोघींनी आसपासच्या भागात ताज्या भाज्या आणि फळांची विक्री करण्यास सुरुवात केली. ग्राहकांपर्यंत रसायनविरहित वस्तू पोहचवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
गुलकंदाचा प्रयोग यशस्वी झाल्यावर या दोघींनी गुलाबपाणी आणि गुलाब अर्काची निर्मिती सुरू केली. यासाठी उत्तम प्रतीचे गुलाब वापरले जातात.
सेदम येथे मुळात हवामान उष्ण असते. अशा वातावरणात गुलाब जगू शकतील की नाही याबद्दल त्यांना शंका होती. परंतु यासाठी राधिका आणि संगीता यांनी राजस्थान मध्ये लावल्या जाणाऱ्या गुलाबाच्या जातीची लागवड केली. त्यामुळे सेदम येथील उष्ण हवेतही गुलाबाची शेती यशस्वी होऊ शकली.
गुलकंद बनविण्यासाठी उत्तम फुले निवडून त्यांच्या पाकळ्या काळजीपूर्वक काढल्या जातात. या पाकळ्या साखरेत नीट मिसळून गुलकंद मोठ्या बरण्यांमध्ये मुरण्यासाठी ठेवला जातो.
कालांतराने पाकळ्यांचा राग गडद होत जाऊन संपूर्ण साखर विरघळते आणि जॅम प्रमाणे दिसणारा गुलकंद तयार होतो.
गुलाबाची निगा राखण्यासाठी तसेच गुलाबपाणी, गुलाब अर्क निर्मितीसाठी राधिका आणि संगीता यांनी कायमस्वरूपी २ माणसांची नियुक्ती केली आहे.
या उत्पादनांची विक्री करणे हे मोठे काम होते. सोलापूर तसेच जयपूर येथील २ गृहिणींनी गुलाबोच्या गुलकंदाची चव चाखली होती. त्यांनी आपणहून गुलकंद विकण्याची तयारी दर्शविली.
या प्रकारे जवळपास २० गृहिणींच्या मार्फत आज ४-५ राज्यांत ‘गुलाबो’ च्या उत्पादनांची विक्री सुरू आहे.
गुलकंद – गुलाबापाण्याबरोबरच या दोघींनी गुलाबाचे लोशन, साबण, बिस्किटे यांचीही यशवी निर्मिती केली आहे. भविष्यात ‘गुलाबो’ उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याचा संगीता आणि राधिका यांचा मानस आहे.
थोडे कष्ट घेतले तर आपल्या आवडीचे आपल्या व्यवसायात अत्यंत यशस्वीपणे रूपांतर करता येते याचे राधिका व संगीता हे उत्तम उदाहरण आहे.
त्यांनी आपल्या उत्पादनांच्या विक्रीचे जाळे उभे करताना गृहिणींना संधी देऊन त्यांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून दिलेली आहे.
राधिका आणि संगीता याची ही कहाणी चूल आणि मूल यांत अडकून पडलेल्या भारतीय गृहिणींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ही आत्मनिर्भरतेकडे झालेली वाटचाल खूप काही शिकवून जाणारी आहे यात शंकाच नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.