लडाखमध्ये चीनला धोबीपछाड देणाऱ्या “स्पेशल फ्रंटियर फोर्स” बद्दल वाचायलाचं हवं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतीय लष्करातील गोरखा रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, मराठा लाईट इन्फन्ट्री अशा वेगवेगळ्या तुकड्यांबद्दल तुम्ही कधी ना कधी नक्कीच ऐकले असेल, पण आम्हाला खात्री आहे, की लष्कराच्या सर्वाधिक गुप्त असणाऱ्या “स्पेशल फ्रंटियर फोर्स” किंवा “विकास बटालियन”बद्दल तुम्हाला नक्कीच माहित नसेल.
१९६२ च्या भारत-चीन युद्धातील पराभवानंतर “स्पेशल फ्रंटियर फोर्स”ची स्थापना त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली.
या तुकडीच्या स्थापनेचा प्रमुख उद्देश चीनच्या “पीपल्स लिबरेशन आर्मी” विरुद्ध लडाख, तिबेट भागात टेहळणी करणे आणि युद्धकाळात गनिमी काव्याने शत्रुप्रदेशात खोलवर जाऊन गुप्त लष्करी मोहिमा राबवणे हा होता.
भारताच्या “इंटेलिजन्स ब्युरो”चे तत्कालीन प्रमुख भोलानाथ मुलीक ह्यांचा “विकास बटालियन”च्या स्थापनेत सिंहाचा वाटा होता.
विकास बटालियनचे पहिले प्रमुख मेजर जनरल सुजन सिंग उबान हे होते, ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात बाविसाव्या माऊंटेन डिव्हिजनचे नेतृत्व केले, त्यामुळे विकास बटालियनला “एस्टॅब्लिशमेंट २२” ह्या टोपणनावाने देखील ओळखलं जातं.
ह्या तुकडीत प्रामुख्याने “तिबेटी खाम्पा” लोकांचा समावेश केला गेला, कारण चीनच्या तिबेटवर असणाऱ्या राजवटीला त्यांचा कडवा विरोध होता. शिवाय, त्यांची चेहरेपट्टी, शारीरिक जडणघडण ही या तुकडीच्या कार्यक्षेत्रासाठी प्रचंड अनुकूल होती.
विकास बटालियनचे मुख्यालय डेहराडून जवळील चक्राता येथे उभारण्यात आले. इथे त्यांना पर्वतीय प्रदेशातील युद्धतंत्र आणि गुप्तचर कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येते.
ह्या सर्व प्रक्रियेत अमेरिकेची गुप्तचर संस्था “सी आय ए” आणि भारताची “रॉ” ह्यांनी एकत्रित कार्य केले.
एक आश्चर्याची बाब म्हणजे ह्या “विकास बटालियन” केवळ लष्करी कारवायांपुरत्याच इंडियन आर्मीच्या अधिकार क्षेत्रात येतात, परंतु त्यांच्या संबंधातील इतर संचालन हे मंत्रिमंडळ सचिवांच्या कार्यालयाद्वारे (कॅबिनेट सेक्रेटरी) केले जाते. त्यामुळेच “स्पेशल फ्रंटियर फोर्स”मधील रँक ह्या इंडियन आर्मीच्या समकक्ष परंतु वेगळ्या आहेत.
अजून एक असामान्य गोष्ट म्हणजे, ह्या विकास बटालियन्समध्ये महिला सैनिकांचादेखील पूर्णपणे सहभाग असतो.
आपल्याला माहिती आहेच, की सध्या पॅंगॉन्ग त्सो सरोवर परिसरात भारत आणि चीनची लष्करे एकमेकांसमोर उभी ठाकली असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे.
२९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या कारवाईत विकास बटालियनने पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील ब्लॅक टॉप परिसर आपल्या ताब्यात घेतला.
ह्या कारवाईदरम्यान सातव्या विकास बटालियनचे कंपनी लीडर न्यिमा तेन्झिन ह्यांना वीरमरण आले.
विशेष म्हणजे त्यांचा पार्थिव देह भारतीय राष्ट्रध्वजासोबतच तिबेटी ध्वजामध्येही गुंडाळण्यात आला होता. हा एकप्रकारे भारताचा चीनला कठोर राजकीय संदेश देखील आहे, की भारत तिबेटी जनतेच्या हक्कांसाठी कटिबद्ध आहे.
अशा प्रकारच्या गुप्त आणि धाडसी मोहीमा “स्पेशल फ्रंटिअर फोर्स” साठी सामान्य गोष्ट आहे.
१९६० च्या दशकात चीन-अमेरिका संबंध हे अजिबात मैत्रीपूर्ण नव्हते; इतकेच नाही तर अमेरिकेने “पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना”ला अधिकृत मान्यता देखील दिली नव्हती, परंतु त्याकाळात चीन अतिशय जलद गतीने अण्वस्त्रे विकसित करत होता आणि अमेरिकेला त्यावरती नजर ठेवायची होती.
मग एक योजना बनविण्यात आली. ज्यानुसार, प्लुटोनियम बॅटरीवर चालणारे एक उपकरण भारताच्या नंदादेवी शिखराच्या परिसरात पंचवीस हजार फूट उंचीवर बसविण्यात येईल.
हे उपकरण अतिशय प्रदीर्घ कालावधीसाठी चीनच्या शिंजियांग प्रांतातील लॉप-नॉर परिसरातील अणुचाचण्यांवर नजर ठेवण्यास मदत करणार होते.
ह्या योजनेला भारतीय नौदलातील कॅप्टन आणि जगप्रसिद्ध गिर्यारोहक मोहन सिंग कोहली ह्यांच्या सहभागाने गिर्यारोहण मोहिमेचा मुलामा देण्यात आला होता.
परंतु नंदादेवी शिखरापासून अवघ्या काहीशे मीटर अंतरावर असतांना अत्यंत खराब हवामानामुळे ते आण्विक उपकरण पर्वतांमधील एका गुहेत तसेच लपवून ठेवावे लागले, ज्याचा पुढे काहीच सुगावा लागला नाही.
त्यानंतर १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात “विकास बटालियन”चा वापर “ऑपरेशन ईगल” अंतर्गत अत्यंत प्रभावीपणे करण्यात आला.
ह्या तुकडीवरती चितगॉन्ग टेकडी परिसरात पाकिस्तानी लष्कराची संपर्क यंत्रणा उध्वस्त करणे तसेच पाकिस्तानी सैनिकांना म्यानमारमध्ये पळून जाण्याची संधी न देणे अशी जबाबदारी सोपविण्यात आली होती.
युद्धकाळात पाकिस्तानी लष्कराला नामोहरम करण्यासाठी “स्पेशल फ्रंटिअर फोर्स”ने कर्णफुली नदीवर असणारे कपटाई धारण फोडले होते.
संपूर्ण बांग्लादेश मुक्तियुद्धात जवळपास तीन हजार “स्पेशल फ्रंटिअर फोर्स” कमांडोंनी सहभाग घेतला. ह्या मोहिमेत गाजवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले, तसेच ही तुकडी “चितगॉन्गचे फँटम” म्हणूनही ओळखली जाऊ लागली.
इंदिरा गांधींच्या पंतप्रधान काळात जेव्हा जर्नेलसिंग भिंद्रनवाले सहित अन्य दहशतवाद्यांनी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावरती कब्जा केला होता, तेव्हा चालवलेल्या “ऑपरेशन ब्लू स्टार” मध्ये देखील “विकास बटालियन”च्या कमांडोंचा सहभाग होता.
१९८४ मध्ये जेव्हा सियाचीन हिमनदीवर ताबा मिळविण्यासाठी “ऑपरेशन मेघदूत” चालवले गेले, त्यात देखील ह्या तिबेटी कमांडोंनी पराक्रम गाजवला होता. तेव्हापासून “स्पेशल फ्रंटिअर फोर्स”ची एक तुकडी सदैव सियाचीन प्रदेशात तैनात असते.
आधुनिक काळात ही सैन्य तुकडी इस्रायली बनावटीच्या “हेरॉन” तर स्वदेशी “रुस्तम” ड्रोन्सचा वापर टेहळणी तसेच सर्वेक्षणासाठी करते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.